मार्गशीर्ष वद्य ६
दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.
भीष्माचार्य शरपंजरी !
शकपूर्व २००९, मार्गशीर्ष व. ६ या दिवशीं भारतीय युद्धांतील कौरवांकडील विख्यात सेनापति भीष्माचार्य यांनीं शरपंजरीं देह ठेवला. नऊ-दहा दिवस युद्ध होऊनहि पांडवांकडील कांहीं हानी होत नाहीसें पाहून जेव्हां दुर्योधन कर्णाकडे सेनापतिपद देण्याचा विचार करूं लागला त्या वेळीं भीष्म संतप्त होऊन बोलले, ‘उद्यां मी मरेन नाहीं तर पांडव तरी मरतील, उद्यांमी असें युद्ध करतों कीं, त्याची आठवण हजारों वर्षे लोक काढत राहतील.’ वीरश्रीच्या आवेशांत आचार्य कौरवसेनेस मागें टाकून बरेच पुढें गेले. रक्षक मागें राहिले, ही संधि साधून श्रीकृष्णाच्या सल्ल्यावरुन अर्जुनानें शिखंडीचा रथ पुढें केला, आणि अर्जुनानें बाण टाकण्यास सुरुवात केली. शिखंडीवर बाण टाकावयाचे नाहींत ही भीष्मांची प्रतिज्ञा होती ! शिखंडीला पुढें पाहून भीष्मांनीं धनुष्य खालीं ठेवलें होतें; त्या वेळीं शेंकडों बाण कवच फोडून त्यांच्या अंगांत घुसले. ‘यांतील अर्जुनाचे बाण माझीं मर्मे तोडीत आहेत’ असें स्वत:शी म्हणत म्हातार्यानें धनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला. तोंच तें अर्जुनानें तोडून टाकलें. दुसरें उचललें तेंहि तोडलें. या अवधींत भीष्मांच्या अंगांत इतके बाण शिरले होते कीं, रिकामी जागा दोन बोटेंहि नव्हती. शेवटीं प्राण कासावीस होऊन सूर्यास्ताच्या सुमारास भीष्म रथांतून पूर्वेकडे डोकें होऊन खालीं पडले. पण अंगांत घुसलेल्या बाणांमुळें ते अक्षरश: ‘शरपंजरी’ च राहिले. दोनहि पक्षांकडील वीरश्रेष्ठ भीष्माभोंवती जमले. ‘डोके लोंबकळत आहे’ असें म्हणतांच कांहींनीं मोठमोठ्या उशा आणल्या; पण भीष्मांनी त्या नाकारल्या. तेव्हां अर्जुनानें तीन बाण मारुन त्या बाणांनीं भीष्माचें डोकें सांवरुन धरलें. भीष्म क्षीण स्वरांत बोलले, "माझें शव बाणांवरच असूं द्या. उत्तरायण होईपर्यंत मी असाच प्राण धरुन ठेवणार आहे. पिताजींच्या आशीर्वादानें मी इच्छामरणी आहें." या सर्व व्यवस्थेनंतर भीष्माचार्यांनीं दुर्योधनास उपदेश केला कीं, "दुर्योधना, हें तुझें भांडण भीष्माबरोबरच नाहींसें होऊं दे."
- २७ आँक्टोबर इ.स.पू. १९३१
N/A
References : N/A
Last Updated : October 02, 2018
TOP