स्कंध ७ वा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२०
देवर्षि कथिती धर्मराजाप्रति । इच्छा अमरत्वाची दैत्याप्रति ॥१॥
जिंकूं नये कोणी न यावें मरण । शत्रूचि उत्पन्न होऊं नये ॥२॥
एकछत्री राज्य चालवितां यावें । यास्तव करावे बहु यत्न ॥३॥
मंदराद्रीवरी यास्तव जाऊनि । अंगुष्ठीं राहूनि उभा एका ॥४॥
दृष्टी लावूनियां नभीं करी तप । सूर्यासम तेज प्रगटे अंगीं ॥५॥
तापलें त्रैलोक्य कांपली धरणी । खवळले जनीं नद्या नद ॥६॥
पेटूनियां गेल्या सकलही दिशा । धांवा विरंचीचा करिती देव ॥७॥
वासुदेव म्हणे संकटांत तरी । आठवेल हरी ऐसें करा ॥८॥

२१
विरंचीसी देव म्हणती ईश्वरा । हो आम्हां आसरा संकटीं या ॥१॥
स्वर्गांत वास्तव्य आमुचें अशक्य । जाहला कल्पान्त पृथ्वीवरी ॥२॥
हविर्भागदाते अवशिष्ट तोंचि । मार्ग या संकटीं काढीं कांहीं ॥३॥
लंघूनि सकळ मर्यादा ब्रह्माचि- । व्हावें, ऐसें इच्छी दैत्य, देवा ॥४॥
प्रतिकार याचा करावा सत्वरी । धेनु विप्रांवरी संकट हें ॥५॥
जीविका,विजय, सौख्य, उत्कर्षही । विप्र धेनूंवरी अवलंबूनि ॥६॥
नाश होतां त्यांचा त्राता सज्जनांसी । जगीं नच ऐसी पुढती स्थिति ॥७॥
वासुदेव म्हणे प्रार्थना ऐकूनि । मंदराआश्रमीं ब्रह्मा जाई ॥८॥

२२
हिरण्यकशिपु दिसेना तयासी । वारुळ सर्वांगीं होतें त्याच्या ॥१॥
पिपीलिकांनीं त्या भक्षियेलें होतें । दारुण तयाचें परी तप ॥२॥
मेघाच्छत्र सूर्यासम परिताप । संपूर्ण जगास परी त्याचा ॥३॥
विस्मित पाहूनि तया ब्रह्मदेव । म्हणे ऊठ ऊठ दैत्यश्रेष्ठा ॥४॥
संतुष्ट मी झालों पाहूनि हें तप । झालें न होईल पुढती ऐसें ॥५॥
देववर्षशत उदकविहीन । राहणें कठीण अन्याप्रति ॥६॥
दंश-कीटकांनीं भक्षिलें सर्वांग । निर्धार अभंग परी तुझा ॥७॥
केवळ निर्धारा जाहलों मी वश । माग अपेक्षित वर आतां ॥८॥
वासुदेव म्हणे मर्त्य अमर्त्यही । कृतार्थचि होई ब्रह्मस्वरें ॥९॥

२३
बोलूनियां ऐसें ब्रह्मा दिव्य जल सिंची ।
सावध तैं दैत्य उभा राहिला पुढती ॥१॥
उत्साह, सामर्थ्य, तेज, परिपूर्ण त्याचें ।
वंदूनियां रुद्धकंठें प्रार्थी विरंचीतें ॥२॥
सर्व विश्वकर्ता भर्ता संहारक तूंचि ।
करुनि अकर्ता अप्रमेय तूं अनादि ॥३॥
तुझीच चिच्छक्ति मायाशक्तीही तुझीच ।
वरदश्रेष्ठा, हा माझा घेईं नमस्कार ॥४॥
वासुदेव म्हणे वर मागे दैत्यराज ।
केवळ बुद्धि न परी करी सर्व काज ॥५॥

२४
देवा, त्वन्निर्मित प्राणी मज कोणी । वधील या जनीं न घडो ऐसें ॥१॥
दिवा, रात्रौ अंतर्बाह्य भू-नभांत । देव, पशु, दैत्य, मनुज, पक्षी ॥२॥
सर्व सजीव तैं निर्जीवहि कोणी । प्राणहर जनीं न होवोचि ॥३॥
कोणीही न शत्रु टिको मत्पुढती । सर्वांवरी माझी सत्ता असो ॥४॥
लोकपाल तेही होवोनि आश्रित । लाभो तव लोक निरंतर ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसा चातुर्यानें । वर त्या दैत्यानें मागीतला ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP