६४
धर्मराजाप्रति बोलले नारद । आंवरे न क्रोध नृसिंहाचा ॥१॥
देवऋषीकृत स्तवन ऐकूनि । लक्ष्मीतें प्रार्थूनि आणिली तैं ॥२॥
परी ऐसें रुप कदाही लक्ष्मीनें । नव्हतेंचि पाहिलें भयप्रद ॥३॥
यास्तव सन्निध जावया धजेना । प्रल्हादासी ब्रह्मा वदला तदा ॥४॥
बाळा, हो पुढती शांत करीं देवा । पित्यास्तव आला क्रोध यातें ॥५॥
ऐकूनियां भीतभीतचि प्रल्हाद । नमन साष्टांग करीतसे ॥६॥
चरणारविंदी विनम्र बाळासी । पाहूनि हरीसी करुणा आली ॥७॥
मस्तकीं अभय कर ठेवियेला । कृतार्थ जाहला बाळ भक्त ॥८॥
वासुदेव म्हणे प्रल्हादाचें भाग्य । पाहूनि सद्गद कंठ होई ॥९॥
६५
कृपाकरस्पर्श होतां वासना जळाल्या ।
अहंममतेच्या ग्रंथि तुटोनियां गेल्या ॥१।
अशुभ अमंगल तें विलयासी जाई ।
अंतर्बाह्य भक्तराज हरिरुप होई ॥२॥
थरारुनि सर्व अंगीं रोमांच ठाकले ।
हृदय भरुनि अश्रु लोचनासी आले ॥३॥
आनंदसागरमग्न उन्मत्त होवूनि ।
सद्गदित कंठें बाळ रंगला स्तवनीं ॥४॥
वासुदेव म्हणे नित्य स्तवनांत दंग ।
होईल तयाचा हरी करी भवभंग ॥५॥
६६
तोषला न देवस्तुतीनेंही तया । तोषवूं मी तया केंवी दैत्य ॥१॥
परी धन, कुल, जन्म, रुप, तप । पौरुष, प्रभाव, बल, तेज ॥२॥
पांडित्य, ओज तैं बुद्धि योगादिक । सद्गुणें न तोष पावसी तूं ॥३॥
केवळ भक्तीनें संतुष्ट तूं होसी । प्रत्यय हा देसी गजेंद्रातें ॥४॥
सर्व गुणोपेत विप्रही अभक्त । सज्जन त्या तुच्छ लेखिताती ॥५॥
चांडाळही भक्त तया श्रेष्ठ वाटे । उद्धरी कुळातें भक्तिभावें ॥६॥
शोभवितां मुख प्रतिबिंब शोभे । पूजा तैं भक्तातें शोभा देई ॥७॥
स्तवनें पतिता करी जो पावन । सद्भावें वर्णन करितों त्याचें ॥८॥
वासुदेव म्हणे अवर्णनीयातें । वर्णितां चित्ताचे मळ जाती ॥९॥
६७
भक्तभयनिवारणा । करी प्रकोपशमना ॥१॥
सर्प-वृश्चिकहननें । संतोषती जैं सन्मनें ॥२॥
तेंवी तापद हा दैत्य । वधितां हर्षलें त्रैलोक्य ॥३॥
क्रोधप्रयोजन आतां । उरलें नाहीं जगन्नाथा ॥४॥
द्रंष्ट्रा कराल वदन । खदिरांगारसे नयन ॥५॥
शंकूसम कर्ण उभे । केश रुधिरेम माखले ॥६॥
कंठीं आंतडयांच्या माळा । नादें भय दिग्गजांला ॥७॥
प्रभो, विक्राळ या रुपें । भय लेशही न मातें ॥८॥
भवभीतीनें गांजलों । देवा, तुज शरण आलों ॥९॥
वासुदेव म्हणे भक्त । निवेदिती देवा दु:ख ॥१०॥
६८
देवा, या संसारीं स्वकर्मे मी बद्ध । पशु कामक्रोध नाडिती हे ॥१॥
दीनवत्सला, कां दयाळु न होसी । कदा मज नेसी चरणांबुजी ॥२॥
प्रियाप्रिय वस्तुसंयोग-वियोगें । विकार पावतें चित्त देवा ॥३॥
उपाय योजितां कांहीं परिहारार्थ । खेदचि चित्तास वाटतसे ॥४॥
व्यर्थ अभिमानें पावतों भ्रमण । तारक चरण एक तुझे ॥५॥
सेवावे चरण कैसे तें निवेदीं । दैवत मजसी तूंचि एक ॥६॥
ब्रह्मदेवें तव गुण जे गाइले । मज ते कळले संतसंगें ॥७॥
नित्य तया गानें दु:ख दूर झालें । मूळ त्याचें गेलें रागद्वेष ॥८॥
वासुदेव म्हणे सर्वोपाय हरी । यदा कृपा करी तैंचि लाभ ॥९॥
६९
कृपेविण तुझ्या साधनें विफल । साधनांचें मूळ कृपा तव ॥१॥
मातापितरेंही दु:खद कोणातें । नौकाही बुडते सिंधूमाजी ॥२॥
औषधेंही रोग न हटेचि कदा । एकमेव कृपा यश देई ॥३॥
गुणभेदें भिन्न प्रकृतीचे जन । पिता, ब्रह्मा, कर्म, पूर्वार्जित ॥४॥
जन्मला ती वेळ कारण जन्माचें । स्थळ प्रेरक तें सकळ कांहीं ॥५॥
जन्म-मृत्युभेद तूंचि एक देवा । नित्य वासुदेवा हेंचि स्मरो ॥६॥
७०
कालप्रेरणेनें गुणक्षोभ होतां । सहाय्यें पुरुषाच्या लिप्त देह ॥१॥
संक्षेपें तयासी संज्ञा देती मन । दुष्कर मीलन तुजसी त्याचें ॥२॥
अर्थवादवाक्यें रुचती तयासी । मूर्तिमंत हेंचि भवचक्र ॥३॥
एकादशेंद्रियें पंचमहाभूतें । षोडश तयातें असती आरा ॥४॥
ऐसें भवचक्र फिरे वेगवान । तेणें निजकर्म भोगी जीव ॥५॥
भक्तिवीण कोण सुटेल एथूनि । चालक या जनीं एक तूंचि ॥६॥
षोडश आरांनीं युक्त या चक्रांत । पिळीतसे नित्य माया मज ॥७॥
शरणागतासी सोडवीं दयाळा । वासुदेव झाला चरणीं नम्र ॥८॥
७१
पित्याच्या भृकुटीभंगें भय देवां । स्वर्गाचा न हेवा तया मज ॥१॥
ऐशाही दैत्यातें वधिलें जयानें । तींच पादपद्में सेवीन मी ॥२॥
आब्रह्मकीटते विषयनिमग्न । मृगजळासम जाणूनिही ॥३॥
क्षणभंगुर हे, येतांही प्रत्यय । नुपजे वैराग्य मोहमग्ना ॥४॥
दुर्लभ मानूनि रतिसौख्य जनीं । रमती कामाग्नीशमनमार्गी ॥५॥
वासुदेव म्हणे प्रभाव मायेचा । निवेदी हे वाचा प्रल्हादाची ॥६॥
७२
रजोगुणी जन्म तमोगुणव्याप्त । कोठें तो मी दैत्य कोठें कृपा ॥१॥
शिवब्रम्ह्यासीही कदा न लाभला । नाहींचि कमला लाभली जो ॥२॥
वरदहस्त तो मस्तकीं गोविंदा । ठेविलासी माझ्या वात्सल्यानें ॥३॥
काय माझें भाग्य वर्णूं देवदेवा । कैसा भेद यावा चित्तीं तुझ्या ॥४॥
कल्पवृक्ष सेवा जेंवी फल देई । भक्तीसम होई लाभ तैसा ॥५॥
कर्मगतीमाजी उच्च-नीच भाव । नसे, वासुदेव पुढती कथी ॥६॥
७३
अंधकूप हा संसार । तेथें कालसर्प घोर ॥१॥
भोगाशेनें भ्रमतां जन । पडती तयांत जाऊन ॥२॥
ऐशा जनांची संगती । घडूनि पडलों मी त्या कूपी ॥३॥
लाभला हा कृपाहस्त । पूर्वी तोषला नारद ॥४॥
आतां भक्तांचें चरण । देवा, कैसे मी सोडीन ॥५॥
देवा, भक्त कल्याणार्थ । अद्य झालासी प्रगट ॥६॥
पिता घेऊनियां खड्ग । वदला आठवीं गोविंद ॥७॥
व्यापक तूं सकळां ठाईं । साक्षात् प्रत्यय हा येई ॥८॥
वासुदेव म्हणे देव । नटला अवघें हें विश्व ॥९॥
७४
बाळ म्हणे देवा, प्रलयोदकीं त्या । वटपत्रीं तुझा वास असे ॥१॥
परी तुर्येमाजी निमग्न तूं पाही । मायामय नाहीं अवस्था ते ॥२॥
पुढती जें लीन तुझ्याठाई होतें । ब्रह्मांड प्रगटे तेंचि पुन्हां ॥३॥
कमलनालीं त्या नाभिप्रदेशांत । जाहला प्रगट प्रथम ब्रह्मा ॥४॥
शोधार्थ तो तुझ्या हिंडे बहुकाळ । शोधितां बाहेर लाभ नसे ॥५॥
रोंप होतां बीज दिसेल तें केंवी । पुढती ध्यानीं येई ब्रह्ययाच्या हें ॥६॥
सर्वव्यापक तैं रुप पाही ब्रह्मा । मधु कैटभांना वधिलेंसी तैं ॥७॥
संरक्षूनि वेद अर्पिले ब्रह्यासी । भक्त रक्षिलेसी बहुरुपांनीं ॥८॥
कलीमाजी दृग्गोचर तूं न होसी । त्रिगुण म्हणताती तुजसी तेणें ॥९॥
बहिर्मुख कामातुर मन माझें । न रुचे जयातें कथागान ॥१०॥
ऐशा चंचलाच्या सहाय्यें केशवा । केंवी बोध व्हावा मजसी तव ॥११॥
वासुदेव म्हणे ज्ञानावीण मन । चांचल्याविहीन कदा नोहे ॥१२॥
७५
अच्युता, अनेक स्त्रिया नृपाळासी । तेंवी आकर्षिती विषय मज ॥१॥
सकलांची स्थिति हेचि जानूनियां । उद्धार करावा पामराचा ॥२॥
सर्वशक्तिमंता सुलभ हें तुज । न रुचे उद्धार एक माझा ॥३॥
संतसंगें नित्य मुक्तचि मी देवा । अनुग्रह व्हावा मूढांवरी ॥४॥
कृपासिंधो, होईं दु:खितांसी साह्य । नसे भवभय लवही मज ॥५॥
त्वद्गुणकीर्तनीं दंग मी सर्वदा । आनंद हा मूढां लाभेचिना ॥६॥
मिथ्या सुखार्था ते होती भारवाही । तयांचीच येई करुणा मज ॥७॥
एकात्नप्रिय जे ध्यानमग्न योगी । बोध न करिती ऐशा मूढां ॥८॥
यास्तव प्रभो, हे दीन उद्धरावे । वासुदेव द्यावें लक्ष म्हणे ॥९॥
७६
त्यागूनियां दीनां मुक्ति नको मज । आधार दीनांस तूंचि एक ॥१॥
इंद्रियसौख्यानें संतुष्ट ते होती । परी दु:ख अंतीं तयां होई ॥२॥
अनित्यत्व दु:ख जाणूनिही मूढ । न होती विरक्त विषयांतूनि ॥३॥
गजकर्णकंडू साहूनियां ज्ञाते । योजिती औषधें योग्य तया ॥४॥
खाजवूनि व्यथा शमे न तयाची । सौख्य वाटे अंतीं परी दु:ख ॥५॥
मौन, व्रत, तप, वेद, शास्त्र, जप । स्वधर्म, एकान्त, निरुपण ॥६॥
समाधि हे दश मार्ग, जीविकाची । अज्ञां, दांभिकांसी तेंही नसे ॥७॥
वासुदेव म्हणे साधनें सकळ । आचरिती खळ उपभोगार्थ ॥८॥
७७
गौर कृष्णादिक चिन्हें मानवाचीं । लक्षणें तुजसी परी न देवा ॥१॥
निराकृति निर्गुणाही तुजप्रति । कारण कर्म हीं उपलक्षणें ॥२॥
बीजांकुरासम कथिलीं वेदांनीं । मंथनें जैं अग्नि काष्ठामाजी ॥३॥
वृक्षकार्यामाजी कारण तें बीज । विवेकी सहज जाणिताती ॥४॥
संयमी तैं योगी तुज भक्तिमार्गे । विश्वीं व्यापकातें अवलोकिती ॥५॥
अगोचर अज्ञ जीवांसी तूं ऐसें । जाणूनि भक्तीतें वरिती ज्ञाते ॥६॥
गर्वोत्पादक ते अध्ययन, तूं ऐसें । जाणूनि भक्तीतें वरिती ज्ञाते ॥६॥
गर्वोत्पादक ते अध्ययन, त्याग । त्यागूनियां चांग वरिती भक्ति ॥७॥
नमन, स्तवन, सर्वसमर्पण । श्रवण, सेवन, उपासना ॥८॥
षडविध हे भक्ति घडो मज नित्य । भक्तीविण मोक्ष न लाभेचि ॥९॥
वासुदेव म्हणे दास्यभाव ऐसा । रुचे महाभक्ता प्रल्हादासी ॥१०॥
७८
नारद बोलती, धर्मा, हें स्तवन । ऐकूनि भगवान तोष पावे ॥१॥
म्हणे दैत्यबाळा होवो त्वत्कल्याण । जाहलों प्रसन्न तुजलागीं मीं ॥२॥
इच्छित वर घे मागूनि बालका । पुरवीन तुझा सकल हेतु ॥३॥
भक्तीवीण माझें न घडे दर्शन । दु:खनिवारण दर्शनानें ॥४॥
जाणती हें तेचि भजताती मज । दर्शन तयांस भजतां लाभे ॥५॥
वराचें आमिष यापरी दावितां । धर्मा, न प्रल्हादा पडला मोह ॥६॥
वासुदेव म्हणे पुढील अध्यायीं । सकल तें येई परिसा ध्यानीं ॥७॥