स्कंध ७ वा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


८९
शुक महामुनि बोलले रायासी । कथा प्रल्हादाची रुचली धर्मा ॥१॥
सर्वत्र गेय तें अद्वितीय वृत्त । प्रल्हादचि भक्त सर्वश्रेष्ठ ॥२॥
नारदासी धर्म म्हणे तुम्ही योगी । साधनें तपादि आचरितां ॥२॥
यास्तव पित्याचें प्रेम तुम्हांवरी । निवेदावे तरी वर्णधर्म ॥३॥
दयावंत शांत धर्म जैं जाणिती । गुह्य इतरांसी न कळे तेंवी ॥५॥
वासुदेव म्हणे कथिती नारद । वर्णधर्मसार ऐका आतां ॥६॥

९०
धर्मा, धर्मपत्नी ‘मूर्तीच्या’ उदरीं । जन्म पावे हरी जनहितार्थ ॥१॥
नरासवें तप करी बदरीवनीं । तयासी वंदूनि कथितों धर्म ॥२॥
हरि वेदमय, वेदज्ञांची स्मृति । तृतीय संतुष्टि धर्मांगें हीं ॥३॥
सत्य, दया, तप, शौच, शम, दम । तितिक्षा तैं जाण ब्रह्मचर्य ॥४॥
अहिंसा, स्वाध्याय, त्याग, साधुसेवा । संतोष आर्जवां स्वीकारावें ॥५॥
शनै: शनै: तेंवी ग्राम्यधर्मत्याग । कर्ममार्गबोध तेंवी मौन ॥६॥
आत्मविमर्शन अन्न वस्त्र दान । मूर्ती भगवान तेंवी जनीं ॥७॥
भक्ति नवविधा त्रिंशल्लक्षण हा । तारक जाणावा सकलां धर्म ॥८॥
वासुदेव म्हणे कथिती नारद । अनुष्ठानें चित्त शुद्ध होई ॥९॥

९१
विधियुक्त-सुसंस्कॄत, विधिमान्य । विप्र तोचि जाण युधिष्ठिरा ॥१॥
त्रिकर्माधिकारी द्विजचि जाणावे । मार्गही ऐकावे जीविकेचे ॥२॥
अध्यापन, याजन तैं प्रतिग्रह । यायोगें निर्वाह विप्र करो ॥३॥
आपत्कालीं दोन विहीत क्षत्रिया । प्रतिग्रह तया त्याज्य सदा ॥४॥
अविप्र करादिअ वृत्ति नृपाळासी । विप्रानुरोधें ती वार्ता वैश्यां ॥५॥
हितप्रद शूद्रां त्रैवर्णिकसेवा । धर्म वासुदेवा प्रिय वाटे ॥६॥

९२
शिलोंछ ते ऋत अयाचित दुजी । याचना वृत्ति ती तृतीय जाणा ॥१॥
प्रमृत कृष्यादि अंतिम वाणिज्य । नीचसेवा त्याज्य श्ववृत्ति ते ॥२॥
शम, दम, तप, शौच तैं संतोष । क्षमा, सरलत्व, दया, सत्य ॥३॥
विवेक, आस्तिक्य, लक्षणें विप्राचीं । ऐकें क्षत्रियाचीं चिन्हें आतां ॥४॥
शौर्य, वीर्य, धृति, आत्मजय, तेज । ब्रह्मण्य तैं त्याग, प्रसन्नता ॥५॥
प्रजारक्षण तैं क्षमा सद्‍गुण । क्षत्रियाचीं जाण सुलक्षणें ॥६॥
देव गुरुभक्ति त्रिवर्गपोषण । उद्यमनैपुण्य वैश्यचिन्हें ॥७॥
विनम्रत्व शौच निष्कपट सेवा । नमस्कारें व्हावा यज्ञ ज्यांचा ॥८॥
आस्तेय तैं सत्य गो-विप्ररक्षण । शूद्रांचें लक्षण धर्मा, जाणें ॥९॥
वासुदेव म्हणे निवेदिती आतां । नारद स्त्रियांचा धर्म, धर्मा ॥१०॥

९४
सेवा शुश्रूषा पतीची । सन्मावावें पतिबंधूंसी ॥१॥
व्रतें पतीचीं समस्त । आचरणें हेंचि व्रत ॥२॥
सडासंमार्जनादिकीं । भूषवावें गृहाप्रति ॥३॥
ल्यावे सौभाग्यालंकार । तोषवावें पतिअंतर ॥४॥
नम्रभाव तैं संयम । सत्य सदुक्ति सुप्रेम ॥५॥
ऐसा आचाच जियसी । म्हणती सज्जन ते साध्वी ॥६॥
सदा संतुष्ट ते राही । न धरी आसक्ति विषयीं ॥७॥
सत्य शुद्ध ते धार्मिक । सत्यभाषणी सद्‍वृत्त ॥८॥
लक्ष्मी जेंवी श्रीहरीसी । तोष देई ते पतीसी ॥९॥
वासुदेव म्हणे सती । नेई पतीतें वैकुंठीं ॥१०॥

९५
अंत्यजादि प्रतिलोमज जनांनीं । अनुलोमजांनीं त्याचिपरी ॥१॥
परंपराप्राप्त जीविका वरावी । प्राप्तही त्यजावी स्तेय हिंसा ॥२॥
स्वभावज कर्म श्रेयस्कर होई । यथाक्रम नेई उत्कर्षातें ॥३॥
पेरणी ज्या क्षेत्रीं नित्य तें निवीर्य । तैसेचि विषय सुटती भोगें ॥४॥
अतिघृतें अग्नि होतसे विनष्ट । अल्पघृतें दीप प्रदीप्तचि ॥५॥
अन्यवर्णी अन्य लक्षणेंही कदा । कोठें सांपडतां भ्रम न होवो ॥६॥
तत्तद्वर्णामाजी ते ते ब्राह्मणादि । जाणावे ही ऐसी व्यवस्था ते ॥७॥
वासुदेव म्हणे वर्णधर्म ऐसे । नारद धर्मातें निवेदिती ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP