श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय दुसरा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम:
हे शिखर शिंगणापुरवासिया । भाललोचना करा दया । दासगणू लागला पायां । आतां अभय असावें ॥१॥
हरा आणि हरी । स्थित शैलशिखरावरी । यासम अन्य भूवरीं । क्षेत्र नाहीं कोठेच ॥२॥
शैव आणि वैष्णव पंथाचे । एकीकरण केले साचें । देवानें म्हणून तयाचें । महत्व विशेष भरतखंडीं ॥३॥
अगस्ती स्कंदालागुनी । पुन्हा करी विनवणी । या सुधासरोवरास येऊनी । शिवानें नृत्य कां केलें ? ॥४॥
त्या नृत्याची पवित्र कथा । सांग अम्हांसी पार्वतीसुता । तें ऐकून सांगता । स्कंद झाला तयासी ॥५॥
हे अगस्ती ! दानवात युध्द घनघोर अत्यंत । झाले, सर्व लोकांत । ज्या युध्दास जोड नसे ॥६॥
छेद करा, भेद करा । ऐशा गर्जना एकसरा । कानावरी मुनीवरा । येंऊ लागल्या रणांत ॥७॥
शस्त्रें तेजाळ असुरांची । बाण तलवार फ़रशू साचीं । तिरपिट उडविली देवांची । अगस्ते रणाचिया ठायीं ॥८॥
हातपाय निर्जराचे । तोडिते झाले असूर साचे । त्यायोगे इंद्राचें । धाबें गेले द्णाणून ॥९॥
उरले देव ते पळर सुटले । दानवांच्या भयें भलें । इंद्राच्या पाणी पळालें । तोंडचें की मुनिवर्या ॥१०॥
इंद्र विचार करी मनांत । आतां जाऊन ही मात । सत्यलोकी विधात्याप्रत । पाहिजे की कळविली ॥११॥
गा-हाणें करण्याची । ही कचेरी पहिली साची । आहे म्हणुन विधात्याची । भेट घेणें भाग मला ॥१२॥
इंद्र सत्यलोकासी आला । विधात्यासी वंदिता झाला । गा-हाणें सांगू लागला । सर्व कांही साकल्यें ॥१३॥
इद्राची ऐकून दीनवाणी । त्यालागुनी । हे मेघवाहना येउनी । येथे काय उपयोग ॥१४॥
तव संकट माझ्याच्यानी । नाहीं निरसन होणार जाणी । परी तव स्थिती पाहुनी । उपाय एक कथितों तुसी ॥१५॥
तूं असाच जा सत्वरी । त्या कोथल पर्वतावरी । जो महाराष्ट्रांत भूमीवरी । विराजमान झाला असे ॥१६॥
तेथे भगवान कर्पूरगौर । मृडानीपती शंकर । झाले आहेत पहा स्थिर । भक्त गा-हाणे ऐकायला ॥१७॥
या शैली शंकर । कौतुकानें झाले स्थिर । म्हणुनी नाम साचार । कुतूहलशैल  लाधलें त्या ॥१८॥
शिववपू जी कोथळी । त्यायोगे या लाधली । कोथल नामाभिधा भली । हे रुषे अगस्ते ॥१९॥
या कोथल पर्वतातें । युगपरत्वे नाम होतें । लाधलेलें की पहा तें । चार प्रकारे मुनिवर्या ॥२०॥
दक्षिण कैलास हें नाम ख्यात । होतें कृतयुगांत । त्यालाच त्रेतायुगांत । धवलगिरी नाम पहा ॥२१॥
सुवर्णमुख द्वापारी । कलियुगी कोथलगिरी । हा सकल पापांची बोहरी । करी दर्शनमात्रें पहा ॥२२॥
सबळ पुण्यावांचून । याची नव्हे प्राप्ती जाण । येथेच राहीला मदनदहन । भक्तकामना पुरवावया ॥२३॥
या पीयुषसरोवरी । शिव सर्वदा नृत्य करी । नृत्याची त्या आवडी भारी । सच्चिदानंदाकारणें ॥२४॥
ऐशा त्या रम्य स्थला । इंद्रा तू जाय भला । तप करुन शंकराला । अमृत मागुन घ्यावे रे ॥२५॥
त्या अमृते करुन लुळे झालेले देवगण । होतील पहिल्यासमान । सत्य सत्य त्रिवाचा ॥२६॥
ब्रम्हदेवाने जैसे कथिले । इंद्रानेंही तैसच केलें । कोथल पर्वती मांडिले । येऊन त्याने तप दुर्धर ॥२७॥
उमेसहीत शिवाची । त्यानें स्थापना केली साची । अमृतेश्र्वर तयाची । ठेवुनिया नामा- भिधा ॥२८॥
सुधाकुंडी करी स्नान । प्रत्यहीं तो शचीरमण । भस्म रुद्राक्ष धारण । करुनिया अंगावरी ॥२९॥
महान्यासपूर्वक । करी रुद्राचा अभिषेक । शिवस्मरणाहूनी एक । क्षणही तो जाऊं न दे ॥३०॥
शिव तपें प्रसन्न झाला । वर माग म्हणे इंद्राला । पाहूनी त्या कंठनीला । इंद्र आनंदित झाला कीं ॥३१॥
शिवदर्शनें रोमांचित । तनु झाली असें सत्य । कंठ झाला सव्दादित । शब्द मुळीच उमटेना ॥३२॥
विनयें बहु स्तुती करी । हे भगवान मन्मथारी । आदिमाया त्रिपुरसुंदरी । अर्धांगी तुझ्या नीलकंठा ॥३३॥
तूं दशभुज पंचवदन । वन्ही तुझा तृतीय नयन । तुलाच नागभूषण । नाम हें की शोभतसें  ॥३४॥
हे हरिहरस्वरुपा देवदेवा । मृडानिपते सदाशिवा । रक्षण करी अवघ्या देवा । महत संकटापासूनी ॥३५॥
तुझ्यावाचुनी त्राता कोणी । नाहीं अम्हां पिनाकपाणी । मशीं अमृत देउनी ।देव अवघे सुखी करा ॥३६॥
ऐशी इंद्राची ऐकुन स्तुती । प्रसन्न झाला पशुपती । अमृतकलश त्याचे हाती । देता झाला महादेव ॥३७॥
या अमृताचा ऐसा गुण । अकाली आलेले वृध्द्पण तात्काल टाकी नासून । तैसा अकाली मृत्यु पहा ॥३८॥
इंद्र घेऊन अमृत । ईश्र्वरा करुन दंडवत । जाता झाला स्वर्गाप्रत । देवरुषींना पाजावया ॥३९॥
या अमृत प्रभावेंपहिल्यावरी देव झाले निर्धारी या अमृतेश्र्वराची सरी । न ये कोण्याही देवातें ॥४०॥
या अमृतेश्वर लिंगाप्रत । कामधेनू घालितात । निज पयाचा आभिषेक सत्य । प्रत्यहीं उष:कालाला ॥४१॥
येथेच बलिराजाचें । तप पूर्ण झाले साचें । या अमृतेश्वर लिंगाचे । वर्णन करावें कोठवरी ॥४२॥
येथे अनुष्ठान जे जे करिती । त्यांच्या वासना पूर्ण होतीं । वैरीही शरण येती । ऐसा प्रभाव तयाचा ॥४३॥
वा जो अमृतेश्वराचें । महात्म्य श्रवण करील साचें । येणार आहे तयाचें भाग्य तें उदयाला ॥४४॥
लुळा खुळा असला जरी । तो सशक्त होईल सत्वरी । ही असत्य नव्हे वैखरी अनुभवून पहा हो ॥४५॥
हें तृतीयाध्यायाचें । सार कथिले तुंम्हा साचें । आतां निरुपण चौथ्याचें । होईल तें श्रवण करा ॥४६॥
अगस्ती पुसे स्कंदासी । गुप्र स्थानांतून व्योमकेशी । सांग कोणत्या स्थलासी । जाता झाला निजलीलें ॥४७॥
स्कंद बोले त्यावर । भवभवांतक भवानीवर । स्थानांतून साचार । शांडीरक वनाते पातला ॥४८॥
हें अत्यंत शोभायमान । शांडीरक नांवाचे वन । वाटे वनश्री येऊन । येथे मुक्काम राहीली ॥४९॥
सरोवरें स्वच्छ जलाची । आजूबाजूस असती साचीं । रगाडी श्रीफ़लाची । जे ठायीं मुनीस्तव ॥५०॥
ऐशा रमणीय वनांत । रहाता झाला पार्वतीकांत । पदनतांचे अवघे हेत । पुरवावयाकारणें ॥५१॥
अगस्तीनें स्कंदाला । पुन्हा ऐसा प्रश्न केला । या वनांत कवणाला । शिवें सांग उध्दरिले ॥५२॥
स्कंद म्हणें ऐका आतां । मी ही सांगतो पुरातन कथा । देवशर्मा नामें होता । द्विज अत्यंत शुचिर्भूत ॥५३॥
हा अवघी शास्त्रें पारंगत । कर्मठ तितुकाच ज्ञानवंत तैसाच होता परमभक्त भोळा अत्यंत विबुधहो ॥५४॥
तो चंद्रग्रहणाच्या आधले दिवशी । येता झाला या वनासी । आराधावया व्योमकेशी । निज कल्याण व्हावया ॥५५॥
त्या ग्रहणपर्वतासी । रात्रौ गेला स्नानासी । तेथल्या शिवतीर्थासी । तै ऐसें वर्तले ॥५६॥
एक मोठा मगर । तेथे आला साचार । लागला ओढण्या फ़रफ़र । पूर्ववैरानुबंधानें ॥५७॥
मगर ओढी पाण्यात । देवशर्मा झाला दु:खित । वाटे आपुला प्राणांत । होण्याची ही वेळ आली ॥५८॥
मगरमिठींतून सुटण्याचे । उपाय अवघे हरले त्याचे । मग त्यानें शंकराचें । स्तवन मांडिले भावबळें ॥५९॥
हे हरिहर-स्वरुप परमेश्वरा । नीलकंठा कर्परगौरा । तूं या असून शिंगणापूरा । ऐसा प्रसंग यावा काय? ॥६०॥
अमृताचे जवळी । मरण ये ना कदा काळीं । येथे झाली चंद्रमौळी । गोष्ट उलटी अत्यंत ॥६१॥
देवा तुझ्या भक्ताप्रत । मगरानें कां ओढणें येथ? । माझा झाल्यास प्राणांत । काळीमा तुझ्या कीर्तीला ॥६२॥
शिव शिव म्हणता विघ्ने पळती । गंडांतरेंही निरसन होती । ऐशा आहे शास्त्रोक्ती । मग ऐसे व्हावें कां ? ॥६३॥
मी तुझ्यावरी विश्वासलों । ग्रहणानिमित्य येथ आलों । तीर्थी स्नानास उतरलों । तों हा प्रसंग ओढवला ॥६४॥
संकट समयी तुझ्यावीण । आधार देवा नाही आन । हे भक्तवत्सल दयाघन । धांवण्या धांव शंकरा ॥६५॥
तूं वसिष्ठवामदेवांना । साह्य केलेंस दयाघना । श्रियाळाच्या सदना । चिलया जिवंत केलास कीं ॥६६॥
देवा मगरापासून । माझें करा हो रक्षण । मी अत्यंत झालो दीन । तुजवीण बाहूं कवणाला ? ॥६७॥
ऐशी ऐकून त्याची स्तुती । प्रकट झाला दक्षिणामूर्ती । थोर आयुधें ज्याच्या हातीं । शूलादिक असती जे ॥६८॥
त्या शूलानें मगराला । शंकराने आघात केला । तो तात्काळ मुक्त झाला । मगरयोनीपासून ॥६९॥
देवशर्म्यासी आनंद भारी । झाला बुधहो ते अवसरीं । शिवाचिया पायावरी । लोळूं लागला गडबडा ॥७०॥
केवढा मी देवा धन्य । तुझें साक्षात दर्शन । झालें या दासालागुन । धन्य धन्य तीर्थ हें ॥७१॥
आतां हेंच मागणें । आहें देवा तुजकारणें । ते ते उदारपणे देणें । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥७२॥
तव पायाची निष्काम भक्ति । उपजवीं माझ्या चित्तीं । तुझ्या भक्ताची संगती । सर्वकाल घडूं दे ॥७३॥
ऐसे देवशर्मा बोलतां । मस्तकी त्याच्या धरलें हाता । आणि भगवान झाला बोलता । तें ऐका विबुधहो ॥७४॥
तूं जे जे मागितलें । तें मी तुला अवघें दिलें । गणांसहीत वास्तव्य केलें । कोथल पर्वतीं पूर्वीच मीं ॥७५॥
अवांतर प्रांतांत । मी आहें अंशभूत । या कोथल पर्वती मात्र । पूर्णपणें वास केला ॥७६॥
तो पहा एवढयाचसाठीं । शैववैष्णवांच्या कटकटी । विकोपा न जातां शेवटीं । त्यांचे ऐक्य व्हावें रे ॥७७॥
कोळसा भस्माचें भांडण । हें हिंदुधर्मासी लांछ्न । तें पुसून टाकाया जाण । मी आलों ये स्थलीं ॥७८॥
हरि आणि हर यांत भेद नाहीं तिळभर । ऐसे जो मानिल नर । तोच आमचा भक्त असे ॥७९॥
हे देवशर्म्या भक्तवरा । तूं जा आतां आपुल्या घरा । सर्व सुखे आगरा । चालत तुझ्या येतील ॥८०॥
नाहीं तुला दुर्गती । कैलासी जाशील अंती । ऐसे सांगून पशुपती । अंर्तधान पावला ॥८१॥
ऐसे बिल्वलिंगाचे महिमान । सांगतां झाला उमारमण । याचे महत्व आगळे पूर्ण । या मांगीशमहात्म्यामध्यें ॥८२॥
याचा जे जे आठव करतील । ते ते सर्व सुखा पावतील। लौकिक त्यांचा होईल । उत्तमसा जगामध्यें ॥८३॥
हें चतुर्थ अध्यायचें । सार तुम्हां कथिलें साचें । अधिक न्यूनाधिकाचें । महत्व येथे मानूं नका ॥८४॥
हें त्यांचे आहे सार । मुळींच नोहे भाषांतर । हेंच पसरुनिया पदर । आहे तुम्हा सांगणें ॥८५॥
तें हंसक्षीर न्यायानी । ग्रहण करावे श्रोत्यांनीं । मांगीशमहात्म्य पाहूनी । मीं हें सात लिहिले असे ॥८६॥
करुं जाऊं भाषांतर । तरी अडचण आहे थोर । संस्कृताचा साचार । परिचय नाहीं अल्प मला ॥८७॥
म्हणून पुराण ऐकिले । त्याचें हें मी सार कथिलें । तें मी आदरें अर्पिलें । आहे बिल्वलिंगाच्या ॥८८॥
स्कंद म्हणे अगस्तीला । बिल्वलिंगाहून निघाला । प्रभु शंकर ईशान भोला । तों पथीं ऐसे घडलें कीं ॥८९॥
बिल्वलिंगापासुन साचार । मुनिवरा दोन कोसांवर । शिव निघाला झडकर । हें तूं आहेस ऐकिलें ॥९०॥
परी पथामाजी अदभुत । गोष्ट एक झाली सत्य । पिनाकधनुष्यापासुन च्युत । एक बाण जाहला ॥९१॥
ऐसे द्दश्य पाहिले । भगवान तेथेंच स्थित झाले । पार्वतीभयानें राहिले । लिंगरुपे तया ठायीं ॥९२॥
अगस्ती पुसे स्कंदासी । त्या स्थलीं जो व्योमकेशी । स्थित झाला त्याचे मशीं । कारण असल्यास सांगावे ॥९३॥
कारणविशेष कांही नसे । पूर्वी तेथेंच आला असें । तप कराया खासें । बाणासूर स्कंद म्हणे ॥९४॥
बाणासुरानें शंकराला । जो का प्रसन्न करुन घेतला । तो मुने! याच स्थला । ऐसा इतिहास आहे कीं ॥९५॥
बाणासुराचे तप खडतर । त्याने ओंकाररुप परमेश्वर । ह्रदयीं सांठविला निरंतर । नासाग्रद्दष्टी ठेवूनिया ॥९६॥
वल्कलें केली परिधान । कंदमुलाचें भक्षण । ओम नम: शिवाय हें भजन । अहोरात्र ज्याच्या मुखी ॥९७॥
ऐशी कित्येक वर्षे गेली । अखेर प्रसन्न झाला शूली । भाणासुराची पुरविली । मनीशा येथ शंकरानें ॥९८॥
बाणासुर म्हणे देवा । हेत हा तूं पुरवावा । लिंगास पहातां आठव व्हावा । माझा तव भक्तासी ॥९९॥
म्हणून बाणलिंग ऐशी । नामाभिधा या लिंगासी । आणि कोथल पर्वतासी । अंती स्थान असावें ॥१००॥
ऐसे मागतां बाणासूर । तथास्तू बोलला शंकर । या बाणलिंगाचा अपार । महिमा या कोथलीं ॥१॥
वद्दाच्या कृष्ण चतुर्दशीसी । म्हणजे मुनीवरा शिवरात्रीसी । जो जो अर्चिल या लिंगाशी तो तो पावेल सर्वसुखा ॥२॥
बाणलिंगाचें अनुष्ठान । तात्काळ होय फ़लद जाण । हा आहे विशेष गुण । या लिगाठायी पहा ॥३॥
येथें जे तप करिती । ते सकल सुखा पावती । ही कथा सुरस अती । आहे पंचमाध्यायांत ॥४॥
तो अध्याय येथ झाला । आतां परिसा सहाव्याला । या शंभुमहादेव-महात्म्याला । वाया न जाऊं द्दावा क्षण॥५॥
इति श्रीदासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्य सरामृत । करुन देवो साधकाप्रत । श्रीहरिहराची प्राप्ती ती ॥१०६॥
श्रीहरिहरार्पणमस्तु । श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु ॥
॥ इति द्वित्तीयोध्याय : समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP