श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय सोळावा

श्रीमांगीशमहात्म्य


श्रीगणेशाय नम: ॥
जयजयाजी अघनाशका । हे श्रीशंभू त्र्यंबका । हे अपर्णेच्या नायका । देवदेवेश सदाशिवा ॥१॥
कृता त्रेता द्वापारीं । लीला केल्यास नानापरी । त्या लीलेचें ग्रंथांतरीं । वर्णनही झालें असें ॥२॥
कलियुग जयीं लागलें । तयीं तूं हें स्थान निर्मिलें । उगीच रुसंण्याचें सोंग केलें । उमेवरी नीलकंठा ॥३॥
तें इतुक्याचसाठीं हरा । यावयासी शिंगणापुरा । महाराष्ट्राच्या उध्दारा । यांत कांही शंका नसे ॥४॥
कलियुगीं दैवतें दोन । कोथलपर्वती नागभूषण । पंढरीसी रुक्मिणीरमण । भक्तास्तव राहिला ॥५॥
आयोध्या गोकुळ द्वारावती । ही पूर्वीची क्षेत्रे निश्चितीं । कलियुगी न त्याची महती । ती मानणें भाग मात्र ॥६॥
शिव-दैवत शिंगणापुरी । नारायण तें पंढरपुरीं । ठेवूनिया कटीवरी । उभे आहेत राहिले ॥७॥
कलियुगीचे बहुतेक संत । होते झाले याचेच भक्त । भक्तिविजय ग्रथांत । ज्याचें वर्णन असे कीं ॥८॥
म्हणून तुम्हां दोघाला । दासगणू हा शरण आला । या कळसाध्यायाला । मम मुखें वदवा हो ॥९॥
महाराष्ट्राचें भाग्य धन्य। म्हणून लागलें असती चरण । हरिहराचें श्रोतेजन । या देशाकारणें ॥१०॥
पूर्वीचिया कालांत । पाहूनी हिमालय पर्वत । लक्ष्मीपती आणि गिरिजाकांत । तेथें राहतें जाहलें ॥११॥
तैसें या कलियुगासी । उभयता आले महाराष्ट्रासी । पंढरींत ऋषीकेशी । शिंगणापुरीं सदाशिव ॥१२॥
जितकीं तीर्थे हिमालयांत । तितकीं निर्मिलीं आहेत येथ । फ़क्त वगळिला येथें मात्र । बर्फ़ पहा उभयतांनी ॥१३॥
बद्रिकाश्रमीं नारायण । बद्रिकेदारीं उमारमण । आपआपला घेऊन । परिवार रहाते जाहले ॥१४॥
महाराष्ट्राचा केदार । आहे शिखर शिंगणापुर । नारायण ते झाले स्थिर । पंढरीक्षेत्रामाझारीं ॥१५॥
गंगोत्रीपासुन । गंगा झाली अवतीर्ण । या गंगेचें महिमान । पुराणांनी वाखाणिलें ॥१६॥
ती क्षत्रिय गंगाभागीरथी । उत्तरदेशा भूषविती । इकडे ब्रह्मगिरीच्यावरती । अवतरण झालें गोदेचें ॥१७॥
गौतमीगंगा गोदावरी । जी सर्व तीर्थास वृध्द करी । ती आली साजिरी । महाराष्ट्राच्या वाट्याला ॥१८॥
शिवपार्वती विवाहाचा । प्रसंग हिमालयीं साचा । घडला तोच पुन्हा साचा । होता झाला कोथलीं ॥१९॥
यमुना अलकनंदा हिमालयांत । इकडे प्रवरा भीमा महाराष्ट्रांत । हिमालय कोथलपर्वत । झाल बर्फ़ावांचून पहा ॥२०॥
कां की राजा जाय ज्या ठिकाणीं । तीच होते राजधानी । मांगीश भगवान पिनाकपाणी । कोथलासी राहिलें ॥२१॥
शिवक्षेत्रीं शिंगणापुर । जागती ज्योत साचार । हात हालवीत एकही नर । येथून परत गेला नसें ॥२२॥
जो जो शंभू महादेवा आला । तो तो अवघ्या सुखा पावला । महाराष्ट्राचा बोलबाला । याच्याच प्रसादें झाला हो ॥२३॥
देवगिरीच्या यादव वंशांत । एक शिंघणनामें नृपनाथ । होऊन गेला प्रख्यात । या महाराष्ट्रदेशामध्यें ॥२४॥
तोही शंभू महादेवाचा । भक्त परम होता साचा । विचार शिंगणापुराचा । करितां ऐसें कळतसें ॥२५॥
याच शिंघणराजानीं । गांव वसविला त्या ठिकाणीं । तीर्थाचा तलाव करुनी । ठेविला लोकसोईस्तव ॥२६॥
पुढें मुसलमानी अमलांत । जाता झाल हा प्रांत । विजापुरकरांच्या ताब्यात । अदिलशाही-माझारी ॥२७॥
त्यांनी या प्रांताचा । कांही भाग कायमचा । दिला जहागीर म्हणून साचा । घाडगे भोसल्याकारणें ॥२८॥
त्या दोघांच्या हद्दीवर । हे शिखर शिंगणापुर । आहे म्हणून वारंवार । तंटे त्यांचे होत होते ॥२९॥
त्यांत भोसल्यांच्या मंडळीची । सरसी हमेशा होय साची । चौकशी त्या स्थितीची । करतां ऐसें कळतसें ॥३०॥
भोसले मंडळींचा भार । होता शंभू महादेवावर । म्हणून त्यांचा जयजयकार । त्यावेळीही होत गेला ॥३१॥
मुसलमानी अमलात । स्थान हें होतें अस्थित्वांत । मालोजी भोसला विख्यात । एक पुरुष जाहला ॥३२॥
या मालोजी भोसल्याप्रती । निंबाळकरांनी दिली होती । आपुली बहीण निश्चिती । दीपाबाई नाम जिचें ॥३३॥
हे फलटणचे निबाळकर । होते निंबळगचे रहाणार । हा गांव साचार । अहमदनगराजवळ असे ॥३४॥
तेथून या घराण्याचा । मूळपुरुष आला साचा । नाईक हुद्दा तयांचा । असता झाला ते काळी ॥३५॥
मालोजी कांता दीपाबाई । ही भाविक होती पाही । ती कठिण प्रसंग येतां कांही । नवस करी हराला ॥३६॥
या नरवीर मालोजीला । जेव्हां जेव्हां येता झाला । अडचणीचा प्रसंग भला । तो तो देवांनी निपटिला कीं ॥३७॥
लखूजीची सोयरीक भली । शंभू महादेव प्रसादे झाली । मालोजीला मिळाली । मनसुबदारी शिवकृपे ॥३८॥
एकेकालीं शिखरावरी । मालोजीची आली स्वारी । वंदण्या तो त्रिपुरारी । शंभू महादेव नीलकंठ ॥३९॥
तो तेथे तयासी । स्वप्न पडले रात्रीसी । शंभू महादेव व्योमकेशी । स्वप्नी बोलूं लागले ॥४०॥
हे मालोजी भक्तीवरा । तूं ऐक माझी गिरा । महाराष्ट्राच्या उध्दारा । तुझ्याच पवित्र वंशांत ॥४१॥
मी अंशमात्रे येईन । महाराष्ट्राला सोडवीन । यवनांच्या जाचांतून । हीच देतों भाक तुला ॥४२॥
तुला अगणित द्रव्य ठेवा । लाधेल की बाप्पा बरवा । तो जतन करून ठेवावा । किल्ल्याच्या डागडुगीस्तव ॥४३॥
ऐसे तयासी बोलुन । शिव पावले अंतर्धान । तो उदयाचलीं नारायण । सूर्य येऊं लागला ॥४४॥
मालोजी उठून बैसले । दीपाबाईस सांगितलें । जें कां स्वप्न होतें पडलें । रात्रीचीया समयाला ॥४५॥
तें ऐकून दीपाबाई । धाती झाली चित्ताठायीं । हे शंभू महादेवा माझे आई । स्वप्न खरें ठरो कीं ॥४६॥
खरेंच झालें स्वप्न सत्य । सांपडलें द्रव्य अगणित । त्या मालोजी भोसल्याप्रत । कांही काल गेल्यावरी ॥४७॥
तेंच त्यानें श्रीगोंद्यासी । ठेविले एक्या साहुपाशीं । पुंडे आडनांव होतें ज्यासी । जो सन्नीतीचा भोक्ता असे ॥४८॥
शहाजी कांता जिजाबाई । शिवनेरी किल्ल्याचिया ठायीं । प्रसूत झाली असे पाही । वैशाखांत शुध्दपक्षीं ॥४९॥
श्रीपरशराम ज्या तिथीला । येते झाले जन्माला । तोच दिवस लाधला । जन्मास छत्रपतीसी ॥५०॥
हाच राजा शिवाजी । ज्यानें हिंदुचीं राखली बाजी । हिंमतबहाद्दर वीरगाजी । महाराष्ट्राचा केसरी जो ॥५१॥
महाराष्ट्राचे भाग्य धन्य । शिवाजीसारखें रत्न । शिवांशानें निर्माण । झालें जगदोध्दारास्तव ॥५२॥
या शिवाजी राजाचें । वेळोवेळी साह्य साचें । केले उत्तम प्रकारचें । मांगीशानें विबुधहो ॥५३॥
आशीर्वाद शिवाजीला । अमोघसा द्यावयाला । महारुद्र हाची आला । रामदासरुपानें ॥५४॥
यांचा जन्म जांबेसी । झाला गोदा सान्निध्यासी । परी सातार प्रांतासी । येते झाले शिवबास्तव ॥५५॥
श्रीतुकाराम विठ्ठलभक्त । तेही आशीर्वाद देण्याप्रत । जन्मले देहू गांवांत । इंद्रायणीचे तीराला ॥५६॥
छ्त्रपतीची पेशवाई । करण्या पिंगळी ग्रामाचिये ठायीं । चतुर पुरुष निर्मिला पाही । मोरोपंत नाम ज्याचें ॥५७॥
या गांवालागुन । पिंगळी हे अभिधान । आहे, दीड योजन । शिंगणापूर येथुनी ॥५८॥
पिंगळ्याचे आराध्यदैवत । शंभू महादेव पार्वतीकांत । माणदेशाचा अत्यंत । अभिमान ज्यांचा मानसीं ॥५९॥
असो एवंच मालोजीच्या वंशजांनी । तेथेच निष्ठा ठेवूनी । कुलस्वामी म्हणूनी । मानिले शंभू महादेवाला ॥६०॥
मंदिराचा जीर्णोध्दार । भोसल्यांनी वरच्यावर । केला आहे पहा चतुर । केवळ परमार्थद्दष्टीनें ॥६१॥
बांधणी शंभूच्या मंदिराची । आहे चालुक्य पध्दतीची । तिची डागडुगी केली साची । पुढें शिवाजी भूपानें ॥६२॥
बळवंतराव सराफ़ म्हणून । शिवाजीचा एक कारकून । होत विश्वासू पूर्ण । काम पहाया मंदिराचें ॥६३॥
खर्च अवघा डागडुगीचा । याच्या हस्तें झाला साचा । शिवरात्रीच्या खर्चाचा । बंदोबस्त केला भोसल्यांनी ॥६४॥
सहवीसशे ब्याण्णव बारा आणे । नक्त नेमणूक त्याकारणें । स्वधर्मी राजा असल्यानें । ऐसें श्रोते घडलें कीं ॥६५॥
नातरी हल्लींची । राजसत्ता विचित्र साची । वेतनें जस मंदिराची । करुं लागली हाय हाय ॥६६॥
ऐशा घातक सत्तेकडून । कोठून धर्माचे संरक्षण ?। होणार सांगा हो सूज्ञजन । भयंकर काळ आला हा ॥६७॥
राजे उमराव दीन झाले । हलकट बदमाश वैभवा चढलें । धर्मद्वेष्टे धार्मीक ठरले । नीतिभ्रष्ट ते साधू ॥६८॥
म्हणून आतां अवघ्यानीं । आराधावा शूलपाणी । वा पंढरीचा कैवल्यदानी । दशावतार धारिता ॥६९॥
या दोघांवांचुन । त्राता न उरला कोणी आन । हें ध्यानांत धरुन । चला महाराष्ट्रवासीयहो ॥७०॥
ऐशा भयंकर काळाला । हेच घालितील आळा । शोधा अवघ्या पुराणाला । म्हणजे अवघे कळेल ॥७१॥
असो ऐशा अनंत गोष्टीवरुन । शिवाजीला प्रसाद पूर्ण । झाला निश्चयेंकरुन । या शंभू महादेवाचा ॥७२॥
तैसाच एक नाझ-याचा । धनगर भक्त शंभूचा । झाला उदार मनाचा । भाविक आणि निष्ठावंत  ॥७३॥
त्या धनगरानें शिखरावरी । कमान एक बांधली खरी । एकशेंपंधरा अत्यादरी । पाय-या बांधिल्या जावयास ॥७४॥
श्रोते याच धनगराला । समाज त्याचा साह्य झाला । हें धर्मकृत्य करण्याला । हें ध्यानांत असूं द्या ॥७५॥
इकडील प्रांताचे धनगर । शंभूचे भक्त साचार । होळगांवीचा मल्हार । हें आहे ख्यात जगीं ॥७६॥
साखरवापी तीर्थाचा । जीर्णोध्दार केला साचा । त्या श्री अहिल्याबाईंचा । लौकिक झाला चोहीकडें ॥७७॥
एवंच ज्या ज्या लोकांनी । भाव ठेविला भंभूचरणीं । त्याचे त्याचे शूलपाणी । बरा करताच जाहला ॥७८॥
छ्त्रपतींच्या वंशजांनी । स्थानमहात्म्य लक्षूनी । ठेविल्या आहेत बांधूनी । छ्त्या कांही ते ठाया ॥७९॥
छत्री हें समाधीचें । द्योतक आहे पूर्ण साचें । नांवापलीकडे त्याचें । महत्व नाहीं विबुधहो ॥८०॥
मीही श्रोते असता लहान । माझा चुलता जनार्दन । एकनाथाचा नंदन । मामलेदार माळशिरसीं ॥८१॥
त्या माझ्या चुलत्याप्रत । हाच महादेव पावला सत्य । माझे वडीलही होते भक्त । या शंभूचे दत्तात्रय ॥८२॥
मी त्यांच्या बरोबरी । गेलों असतां शिंगणापुरी । मजला स्फ़ूर्ती झाली खरी । कांही काव्य रचावें ॥८३॥
तेथेंच शंभूचे समोर । मी अष्टक केलें तयार । अनुष्टुपछंदाचें साचार । तें सादर करितों की ॥८४॥

गुण गावे मला वाटे विश्वनाथा तुझे सदा ।
 सत्वरीं येउनी देवा ! गणूच्या वारि आपदा ॥१॥
व्योमकेशे, उमानाथा, नीलकंठा, सदाशिवा ।
पाहि मां पाहि मां शंभो देवेशा गिरिजाधवा ॥२॥

तें सर्व येथे देतां । उगीच वाढेल भाकडकथा । भाव शंभूपदीं असतां । सर्व कांही होतसें ॥८५॥
हें दवण्यापुरतें । उदाहरण तें दिलें येथें । माझें वय तेव्हां होतें । सोळा वर्षाचें विबुधहो ॥८६॥
हल्लीच्या काळ खडतर । दु:खद आणि भयंकर । त्याचा करण्या परिहार । राजसत्ताही सर्मथ नसे ॥८७॥
म्हणून अवघ्या जणांनी । वेळीच सावध होवोनी । शंभू महादेव पिनाकपाणी । भक्तीभावें आकळावा ॥८८॥
जिकडे जिकडे या शंभूची । भक्ती आहे जागृत साची । तिकडील या लोकांची । स्थिती उत्तम आहे कीं ॥८९॥
नांदेड, बीड, बेदर । परभणी, हिंगोली, जालनापूर । पैठण, माजलगांव, गंगातीर । इत्यादि प्रांतांमध्यें ॥९०॥
भक्त या शंभू महादेवाचे । असंख्य कीं आहेत साचे । काठया घरीं कित्येकांचे । आहेत महादेवाच्या ॥९१॥
खळद एखदपुरचा । भक्त शंभू महादेवाचा । भुत्या तेली होता साचा । निष्ठावंत भाविक ॥९२॥
त्या त्याच्याच वंशांत । कावडीचें चाललें व्रत । अवघ्या कावडसमुहांत । मुख्य स्थानीं हीच असे ॥९३॥
दुसरी कावड संगमनेरीं । उदय पावली प्रवरा तीरीं । संभूस वंशामाझारीं । तैशा आणीक असती बहू ॥९४॥
आतां अवघ्या भाविकाप्रत । विनवणी माझी जोडून हात । आहे ती ठेवा ध्यानांत । बर्‍यासाठी आपुल्या ॥९५॥
धर्मद्वेष्टी राजसत्ता । प्रस्थापित झाली आतां । संस्कृतीला नाहीं त्राता । कोणी उरला देवाविण ॥९६॥
एवंच आपुलें गा-हाणें । महादेवालाच सांगणें । त्याच्या कृपाप्रसादानें । सर्व कांही होईल ॥९७॥
मी हा ग्रंथ लिहीत असतां क। शंकर आणि अनंता । आजारी झाले तत्वतां । एक्या विषारी तापानें ॥९८॥
तयीं मी म्हणालों देवास । उतार पडूं दे दोघास । तेंच आलें प्रत्ययास । पुढें दोन तीन दिवसांनी ॥९९॥
आतां हें शंभूमहादेव सदया । पार्वतीकांता करुणालया । दासावरी करी दया । अनन्यभावें शरण मी ॥१००॥
माझ्या मनींची अवघी चिंता । निवारावी पार्वतीकांता । गोदातटाकीं तत्वतां । वास माझा असूं दे ॥१०१॥
अध्यात्माचे अवघें ज्ञान । चित्ती ठसावें परिपूर्ण । लिहिलेले भक्तिरसायन । येवो माझ्या प्रत्ययासी ॥१०२॥
अंत घडो गोदातीरीं । स्मृती राहो जागृत खरी । माझा भार दुस-यावरी । केव्हांही ना पडावा ॥१०३॥
हेंच आहे मागणें । तें तूं उदाहरणें देणें । मला ना विन्मुख लावणें । हे पार्वती परमेश्वरा ॥१०४॥
ग्रंथ हा तूं वदविला । तो मीं तुलाच अर्पिला । स्वतंत्रता कलमेला । कधींच नाहीं प्राप्त झाली ॥१०५॥
दासगणू ही लेखणी । करीं आपुल्या घेऊनी । ग्रंथ अवघा शूलपाणी । तूंच कीरें लिहिलास ॥१०६॥
आतां या कलमेला । दुर्गती ना द्यावी जगत्पाला । मोठे आपुल्या आश्रिताला । कष्ट न पडूं देती कदा ॥१०७॥
तैसें तुंवा करावें । कोडकौतुक पुरवावें । लक्ष शुध्द असावें । हरिहराचिया चरणीं ॥१०८॥
शके अठराशें त्र्याहात्तरीं । खरनाम संवत्सरी । पूर्ण झाला पंढरपुरीं । ग्रंथ दामोदराश्रमांत ॥१०९॥
माघ शुध्द द्वितियला । सोमवारी चौथ्या प्रहराला । हा ग्रंथ पुरा झाला । दासगणूच्या करानें ॥११०॥
छ्गन लेखक यासी झाला । जो शिंप्याचा पोर भला । बारटक्क्याच्या वंशाला परळीमाजी आला हो ॥१११॥
शांती शांती त्रिवार शांती । असो या ग्रंथाप्रती । शंभूमहादेवा गिरिजापती । कल्याण करो भक्तांचें ॥११२॥
इति दासगणू विरचित । श्रीमांगीशमहात्म्यसारामृत । करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥११३॥
श्रीहरिहरार्पणमस्तू ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शंभू भवतु ॥ इति षोडशोध्याय: समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 26, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP