श्रीमांगीशमहात्म्य - अध्याय दहावा
श्रीमांगीशमहात्म्य
श्रीगणेशाय नम: ॥
हे आद्या अघनाशका । हे गिरिजेच्या नायका । हे सद्भक्त - संरक्षका । दीनोध्दारा विश्र्वमूर्ते ॥१॥
सूत शौनकादिकासी । सांगते झाले अति हर्षी । या कोथलाच्या पश्चिमेसी । आहे शिवाचें बाणलिंग ॥२॥
महिमा बाणलिंगाचा । येथें आहे श्रेष्ठ प्रतिचा । ती सांगण्या शक्य वाचा । होईल ना विधात्याची ॥३॥
सरस्वती ही टेकील कर । ऐसा महिमा श्रेष्ठ फ़ार । बाणलिंगाचा भूमीवर । तो मी तुम्हां सांगतो ॥४॥
या बाणलिंगापाशी । शिवरात्र व्रत करावें आदरेसी । जें व्रत पूर्वकाळासी । उमादेवीनें केले असें ॥५॥
जेंव्हा कां प्रलय झाला । अवघ्याचा निरास करुन भला । तेव्हां एकटा राहिला । सच्चिदानंद शिवची ॥६॥
त्याची जी का आद्य शक्ति । तीच उमा होय निश्चितीं । तीही शिवाप्रमाणेंच होती । स्थित श्रोते त्यावेळेला ॥७॥
चतु:षष्ठी कलेसहित । उमा होती तेव्हां स्थित । तिनें आपुल्या हृदयांत । सदाशीव सांठविला ॥८॥
षोडशोपचारेंकरुन । मनानें शिव पूजिला पूर्ण । चार प्रहर बैसून । एके जागीं अचल पहा ॥९॥
पुढें प्रलयकाल संपला । सृष्टीलागी आरंभ झाला । तैं प्रकृतीने शिवाला । ऐशारितीं बोधिलें ॥१०॥
देवा! सृष्टीच्या रचनेस । झाला आहे आरंभ खास । तेव्हां कल्याण होण्यास । व्रत एखादें पाहिजे ॥११॥
मी जी प्रलयकालीं । चार प्रहर चंद्रमौळी । तुझी आराधना आहे केली । रात्री प्रलयाच्या शेवटा ॥१२॥
त्या रात्रीचे बरवें । शिवरात्र नांव असावें । आणि जो हें व्रत करील भावें । त्याचे आर्त पुरवा तुम्ही ॥१३॥
एवढीच माझी विनवणी । आहे तुम्हां शूलपाणी । ऐसें बोलतां मृडानी । शिवानें तें मान्य केलें ॥१४॥
आणि म्हणाला तिजप्रत । हें शिवरात्रीचे व्रत । जो जो करील त्याप्रत । सर्व सुखें देईन मी ॥१५॥
ज्या अर्थी कनवाळा । जगाचा देवी! तुला आला । त्या अर्थी या व्रताला । तूंच करीं प्रथमता ॥१६॥
तूं जे जे करशील । तोच विधी ठरेल । आणि शास्त्रकारही गातील । त्याचप्रमाणें रंभोरु ॥१७॥
त्याप्रमाणे हैमवती । वद्य चतुर्दशीचे रात्रीं । करिती झाली निश्चितीं । श्रीशिवाचें आराधन ॥१८॥
शिवावरी जलधारा । रात्रीच्या त्या प्रत्येक प्रहरा । धरावी की एकसरा । अती शुद्धसा श्रध्देनें ॥१९॥
प्रत्येक प्रहराच्या पूजेप्रती । यामपूजा सूज्ञ म्हणती । हें व्रत आहे अती । प्रिय शंकराकारणें ॥२०॥
अभिषेकाकारण । रुद्रसूक्त योजावें जाण । वा महिम्नेंकरुन । अभिषेक तो करावा ॥२१॥
दोन्हीमाजी फ़रक नाहीं । ते एकची आहे पाहीं । वर्णभेदं त्या ठायीं । भेद हा कल्पिला ॥२२॥
प्रथमच्या यामपूजेला । शिवासी वहावें बिल्वदळा । द्वितीय यामपूजेला । दवना करावा अर्पण ॥२३॥
तो सुगंधित पुष्पांसहित । असावा मात्र सत्य । तिसर्या यामपूजेप्रत । धत्तूर वा दुधाणें ॥२४॥
चौथ्या यामपूजेला । मिळेल त्या साहित्याला । जमवून अर्पण शिवाला । करावें की सद्भावें ॥२५॥
ऐशारीती पूजन । चारी प्रहरां झाल्या जाण । त्याच्या सांगते कारण । ब्राह्मण भोजन घालावे ॥२६॥
दक्षणा शक्तीप्रमाणें । द्यावी आपुली ज्याने त्यानें । उगीच दुराग्रहानें । कोणतीही गोष्ट करुं नये ॥२७॥
दुराग्रहाचा भोक्ता । शिव हा नाही सर्वथा । त्याच्या भक्तानें सत्यता । केव्हांही ती सोडूं नये ॥२८॥
समाधानी ज्याची वृत्ति । सदाचारता जागृत ती । आहे जेथें तीच व्यक्ती । भक्त शिवाचा शोभेल ॥२९॥
दांभीकाचा बाजार । मानील ना शंकर । त्याला सर्व कांही प्रकार । अधीच कीं कळतसें ॥३०॥
जगत-चक्षू नाम त्याचें । त्या परमेश्वर शिवाचें । सत्यप्रतिज्ञ भक्ताचें । रक्षण अहोरात्र करी तो ॥३१॥
ऐसे शिवरात्रीव्रत । सुखदायी आहे सत्य । अखेर कैलासलोकाप्रत । ताच गमन करील कीं ॥३२॥
हें व्रत उमेनें । प्रथमता केले प्रेमाणें । तेंच स्कंद गजाननें । वीरभद्रादिकांनी ॥३३॥
श्रृंगी भृंगी शिवगण । हे शिवरात्रीव्रत जाण । करिते झाले आदरानें । मुनिवर्या पूर्वकालीं ॥३४॥
एकेकालीं विधात्याला । आणि तैसाच विष्णूला । होता अभिमान झाला । की शिवाचा पार लावूं ॥३५॥
शिववैभवाचा पहाण्या अंत । ब्रह्मदेव गेला पाताळांत । सप्तलोकावरी श्रीकांत । जाता झाला निजबळें ॥३६॥
परी शिवाच्या वैभवाचा । अंत न लागला साचा । थांग लांबी खोलीचा । सागराचा केवी लागे ? ॥३७॥
ऐसे अफ़ाट वैभव शंकराचें क। तें पाहून विष्णूचें । तैसेंच त्या विधात्याचें । धाबें गेलें दणाणून ॥३८॥
मग दोघे एकमेकां । जयीं भेटले असती देखा । तैं त्यांचा संवाद निका । झाला असे येणेंरीतीं ॥३९॥
हे अनंता आपण । थोराचा अपराध करुन । आलों याची दारुण । शिक्षा होईल आपणा ॥४०॥
कां कीं शिव भोळा पशुपती । देवाचा देव निश्चितीं । बरोबरी कधी न करिती । सिंहाची ते वृक पहा ॥४१॥
आतां उभयता आपण । शिवासींच जाऊं शरण । हें शिवरात्रीव्रत करुन । प्रायश्चित्तार्थ मंतूच्या ॥४२॥
तें विष्णूस मानलें । दोघांनी शिवरात्रीव्रत केलें । ज्या व्रतें प्रसन्न झाले । पिनाकपाणी त्यांवर ॥४३॥
मुने! सत्कुमाराला । या व्रताचा नाही लागला । पार किती सांगूं तुला । शिवरात्रीव्रत श्रेष्ठ हें ॥४४॥
या शिवरात्रीव्रतालागुनी । केले शिवाच्या गणांनी । याच व्रताच्या पुण्याईनी । शिव सान्निध्य लाधलें त्या ॥४५॥
अध्याय मांगीश पुराणाचा । हा सहविसावा संपला साचा । आतां गोषवारा सत्ताविसाव्याचा । सांगतो तो करा श्रवण ॥४६॥
या कोथलच्या नैऋत्येसी । उदितेश्वर लिंग परियेसी । हे केदारव्रत करण्यासी । अति उत्तम असे की ॥४७॥
या लिंगा लागुन । उदितेश्वर अभिधान । कां लाधलें याचे कारण । आहे ऐसे ते ऐका ॥४८॥
तपे देवांनी केलेली । येथेच उदयास आलीं । म्हणून नामाभिधा लाधली । उदितेश्वर या लिंगा ॥४९॥
वा येथें पिनाकपाणी । एकदा बोलला ऐशी वाणी । उदयोस्तु म्हणोनी । निजानंदी येऊनिया ॥५०॥
त्यामुळे या लिंगाप्रत । उदितेश्वर म्हणतात । येथे तरले असंख्य भक्त । श्री शिवाचे पूर्वकाली ॥५१॥
मुने! या लिंगापाशी केदारव्रत करावें आदरेसी । त्याचा भाद्र्पदमासी । काल उत्तम सांगीतला ॥५२॥
भाद्र्पक्षाच्या शुध्द पक्षांत । आष्टमी तिथी धादांत । असतां हें करावें व्रत । एकवीस दिवस सारखें ॥५३॥
प्रत्येही प्रातःकालाला । आदरे तेथील तीर्थाला । वंदन करुन स्नानाला । जलामाजी उतरावें ॥५४॥
स्नानसंध्या साधून । भस्म रुद्राक्ष धारण । करणे भाव ठेवून । चरणकमलीं शिवाच्या ॥५५॥
रुद्र्सूक्त अभिषेकधारा । शिवावरी धरणें एकसरा । एकादशणी रोज करा । वा सकृत आवर्तन ॥५६॥
वेळ शक्ती पाहूनिया । अभिषेक करणे ये ठायां । चित्तबुध्दीचिया ठायां । चंचलपणा असूं नयें ॥५७॥
बेल, फ़ुले आणि दवना । वहावे उदितेश्वर उमारमणा । रोज एकवीस ब्राह्मणा । भोजन ते घालावें ॥५८॥
एकवील घडले नाही जरी । भागवा एक्या ब्राह्मणावरी । तेणेही तो त्रिपुरारी । तुष्टमान होईल ॥५९॥
एकवीसावे दिवशी मात्र । एकवीस ब्राह्मण असावे सत्य । तितक्याच सवाष्ण लागतात । सांगतेसी व्रताच्या ॥६०॥
व्रतकर्त्यानें मौन । धरुन करावे भोजन ।अस्तमानी प्रदोषपूजन । सद्भावेसी करावें ॥६१॥
हा केदारव्रत करणारा । नि:संशय तरेल खरा । अष्टसिध्दी त्याच्या द्वारा । दासी होऊन राबतील ॥६२॥
संपत्ती मिळेल कुबेरापरी । कोणी न राहील पही वैरी । व्रतप्रभावें वांझोट्या नारी । पुत्रवंत्या होतील कीं ॥६३॥
या केदारव्रतांत । अनंतविधी । त्यातुन आपुल्या सोईप्रत । येईल तो करावा ॥६४॥
हें केदारव्रत समस्तां । कथिले कल्याण होण्याकरितां । रोगही पळतील हां हां म्हणतां । व्रतकर्त्याच्या शरीरातून ॥६५॥
दानवाच्या त्रासामुळें । देव कैलासी गेले सगळे । वश केला भक्तीबळे । सदाशीव नीलकंठ ॥६६॥
हे देवाधिदेवा शंकरा । भीमा भयहरा भवानीवरा । हे नीलकंठा चंद्रशेखरा । गंगाधरा महेशा ॥६७॥
आम्हां दानवांच्या त्रासातून । सोडवा हो कैवल्यदानी । ऐशी ऐकतां देववाणी । शिव चित्ती गहिवरला ॥६८॥
दानवांचा चुकविण्या त्रास । तुम्ही हे केदारव्रत करा खास । या व्रतप्रभावे होईल नाश । तुंम्हा पहांताच असुरांचा ॥६९॥
अवघ्या देवांनी तें केलें । शत्रु त्यांचे मरुन गेले । जे का राहीले । ते इंद्र शरण आले की ॥७०॥
विशुध्दात्मा ब्राह्मणांनी । कोथल पर्वती येउनी । उदितेश्वरी बैसूनी । हें केदारव्रत केलें असें ॥७१॥
त्याला पुत्र शंभर । व्रतप्रभावे साचार । झाले जे भुमीवर । महाबुध्दिमान ठरले की ॥७२॥
हा अध्याय सत्तावीस । मांगीशमहात्म्याचा आहे खास । कोठे असल्या कांही दोष । त्याची क्षमा करावी ॥७३॥
इति श्रीदासगणू विरचित । मांगीशमहात्म्य्सारामुत करुन देवो साधकाप्रत । हरिहराची प्राप्ती ती ॥७४॥
श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ इति दशमोध्याय समाप्त: ॥
N/A
References : N/A
Last Updated : December 26, 2019
TOP