अध्याय दुसरा - ज्ञानेश्वरदर्शन

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


राजाधिराजा अनंत-तनया । परमप्रिय सद्गुरुराया । वंदून तव पदकमलद्वया । तव सच्चरित्र वर्णीतसे ॥१॥
धन्य धन्य महाराष्ट्रप्रदेश । संत पदरजें पुनीत अशेष । दंडकारण्य ह्मणति ज्यास । वास्तव्य श्रीरामाचे ॥२॥
श्री रामाची पाउलें । उमटोनि दंडकारण्य पुनीत झालें । ह्मणोन अनंत संत थोर । तें पावित्र्य टिकविण्या ॥३॥
श्रीज्ञानेश्वरादि संत थोर । कलीचें बंड मोडावया सत्वर । भागवत धर्माची ध्वजा सुंदर । घेऊन आले ॥४॥
मराठी भाषेस आला बहर । अध्यात्माचा झाला मराठी अवतार । झालें सुगम आणि मनोहर । रहस्य अध्यात्माचें ॥५॥
नामस्मरनाचें तारुं । आणि संत कर्णधारु । कली ह्मणे काय करुं । बोटे मोडी ॥६॥
रामकृष्णहरीचा गजर । तारुं चाललें दर्यापार । निघाले वीर झुंजार । भक्तीमार्गे ॥७॥
त्या महाराष्ट्री कृष्णातीर । जेथें श्रीदत्तात्रेयांची येरझार । नृसिंहवाडी औदुंबर । श्रीगुरुमूर्ति राहती ॥८॥
समर्थ श्रीरामदास । निर्भय करिती महाराष्ट्रास । निवारुन संकटास । श्रीराम सेवेस लावती ॥९॥
गांवोगांवीं मारुती-रायाची । उपासना बुध्दिबलवंताची । एकनिष्ठ श्रीराम भक्ताची । करिती लोक ॥१०॥
त्या पवित्र कृष्णातीरीं । वसली सांगली उभयतीरीं । पुण्यनदीच्या पूर्वतीरी । विशेषत: ॥११॥
जी तपोवन नामें विख्यात । येथे असंख्य झाले संत । पदरजें त्यांच्या गांव पुनीत । म्हणोनि सांगली पुण्यक्षेत्र ॥१२॥
राजाधिराज सांगलीचे । आणि प्रजानन त्यांचे । स्मरण अखंड ठेविती देवाचे । ह्मणोनि सांगली पुण्यक्षेत्र ॥१३॥
संतांची परंपरा चाले । ऐसे भाग्य सांगलीस आले । परमार्थी लोक भरले । ह्मणोनी सांगली पुण्यक्षेत्र ॥१४॥
महिमा सांगलीचा वर्णू जातां । भूरळ पडे माझ्या चित्ता । ऐशी आहे अपूर्वता । या सांगलीची ॥१५॥
थोर महात्मे येती जाती । अज्ञानतिमिरध्वंस करिती । यापरिस भाग्याची महति । कोठें आढळेल सांगा ना ? ॥१६॥
कांही संतांनी घर केलें । येथेंच अमरणांत राहिले । घडोघडीं मार्गदर्शन मिळे । मुमुक्षूंना ॥१७॥
असेच येथें एक केळकरकुल । जेथे श्रीरामेश्वर उपासना बहुसाल । अनंत गंगाधर प्रेमळ । करिती शिव उपासना ॥१८॥
लक्ष्मण दीक्षित त्यांचे गुरु । कर्ममार्गी विरक्त थोरु ॥ थोर ज्यांचा अधिकारु । श्रीशंकर प्रसन्न ज्यासी ॥१९॥
अनंत गंगाधर यांना । सर्व जण ह्मणती नाना । करिती कठोर उपासना । पार्थिवपूजा नित्यनेम ॥२०॥
षडक्षरीं मंत्राचा । जप वाचे नित्त्याचा । हव्यास किर्तन ऐकण्याचा । हनुमंत तात्यांचे ॥२१॥
साथीसाठी उभे रहावें । एकाग्र चित्तें श्रवण करावें । भक्तिभावें अभंग गांवें । संतांचे ॥२२॥
वडिलार्जित कर्जभार । स्वकष्टेंउतरोन सत्वर । घर केलें तें झालें मंदिरा श्रीरामाचें ॥२३॥
राम करी शिवउपासना । रामेश्वर या नामीं पहाना । ऐक्य कैसे साधलें ? ॥२४॥
श्रीराम आणि महेश्वर । एकत्वी आणिती हे केळकर । ऐसा हा मनोहर संगम येथे ॥२५॥।
आचरे गांवी श्री रामेश्वर । मंदिरीं श्रीरामनामाचा गजर । श्रीरामजन्मोत्सव थोर । चाले या शिवालयीं ॥२६॥
असो, राधा नामें पतिव्रता । पत्नी शोभे या अनंता । शुध्दाचरणीं उभयतां । रत असती शिवचरणी ॥२७॥
असोनी संसारी । विरक्ति बाणली अंतरीं । भार ठेवोनी देवावरीं । सदाचरणीं निमग्न ॥२८॥
शुध्द बीजापोटीं । फळे असती गोमटीं । तपश्चर्येच्या शेवटी । कृपा भगवंताची ॥२९॥
तों आला शुभ दिवस । फाल्गुन शुध्द दशमीस । शके १८१० स । पुत्र जन्मोत्सव जाहला ॥३०॥
जो जो जो जो श्री गोविंद । तव नामी आनंद ॥धृ॥
प्रेम पालख हलविता । कृपा करा गुरुनाथा ॥१॥
हृदय पाळणा भक्तीचा । तो हा गुरुनामाचा ॥२॥
उन्मनी प्रगटले गोविंद । निजसुख परमानंद ॥३॥
कीर्तन भक्तीसी अवतार । नाम हे जगदोद्धार ॥४॥
गुप्त राखियला अधिकार । असोनी स्वरुपाकार ॥५॥
राधा सुपुत्र अविनाशी । शरयू हृदयनिवासी ॥६॥
- शरयू उपळावीकर

अनंतांचें उदरीं । गोविंद अवतरला भूवरीं । घ्यावया टाळ करीं । किर्तनाचा ॥३१॥
हा अंताजी पंतांचा लाल । शोभे जैसा नंदगोपाळ । प्रेमें करिती प्रतिपाळ । मायबाप ॥३२॥
शोभे मूर्ति बाल गोजिरी । हास्य निरागस मुखावरी । सत्त्वाची घडविली खरी । वाटे मातापित्यासी ॥३३॥
मुलाचे पाय पाळण्यांत । हरिभक्तीची आवड त्यांत । कधीं न हट्ट करीत । संतुष्ट मातापित्यांवरीं ॥३४॥
हळूहळू बाळ वाढे । तवं अधिकाधिक चित्त ओढे । देवाच्या मूर्ति ठेवून पुढें । रमे त्यांतचि गोविंद ॥३५॥
बालवया पासून. गोविंद इतरांहून भिन्न । खेळ करमणूक मनरंजन । एक देव त्यासी ॥३६॥
सदा गावे देवाचे गुण । मुखी नामसंकिर्तन । नाना म्हणती हें निधान । अपूर्व लाभलें आम्हांसी ॥३७॥
अरे हा काय योगी आला । महद्‍भाग्यें आमुच्या घराला । माप न देवाच्या कृपेला । दाता एक शिवशंकर ॥३८॥
भक्ती आमुची थोडी । तरी देव सुख दे घडोघदी । तोचि नेणार पैलथडी । धरुं चरण सदाशिवाचे ॥३९॥
या बाळाला भक्तीचा हरिख । देवपूजेचें सदासुख । लडिवाळ तरी शोभे मुख । गोविंदाचें ॥४०॥
श्रवण करी प्रभुचे गुण । हातीं देवाची मूर्ति सगुण । शिर लवे जेथें श्रीचरण । रामप्रभूंचे ॥४१॥
‘बापू’ हें टोपणनांव । सर्वांचे मुखी राहे सदैव । गोजिरे अवयव । वर्ण गौर ॥४२॥
कधी न वचनाबाहेर । मातापित्यांच्या जाणार । त्यांच्या सेवेचें वेड फार । घेतलें मनामध्ये ॥४३॥
अनंत जन्मीचे पुण्य पदरी । म्हणोन हा बालक आमुच्या घरीं । आनंदानें उभयतां उरीं । धरिती बालकासी ॥४४॥
अनंताचा सुपुत्र । स्वानंद पसरवी सर्वत्र । आमचा बापू हाचि मंत्र । ऐकू येई सर्वांमुखीं ॥४५॥
प्रेमाश्रुंचा अभिषेक । भिजे बापूचें मस्तक । प्रेमाशिर्वाद मिळोन अनेक । वाढे बापू शुक्लेंदुवत ॥४६॥
संसाराचे रहाट गाडगें । दु:ख येई सुखामागें । भोगणे लागे प्रसंगे । दोन्हीही ॥४७॥
बापूची प्रेमळ माता । संपविली इहलोकींची यात्रा । गोविंदास जन्म देण्यापुरता । संबध होता मातेचा ॥४८॥
नाना म्हणती बापूचा । दोरा तुटला मातृसुखाचा । कोण सांभाळ करील याचा । पोटीं प्रेम ठेवूनी ॥४९॥
जो नेतो तोची देतो । उगीच आपुलें धारिष्ट पाहातो । त्याच्या कृपेवर विश्वासील तो । धन्य धन्य या जगीं ॥५०॥
आई गेली, माई आली । करी त्याच प्रेमाची साऊली । सावत्र माता गेली । सावत्रपणा विसरुनी ॥५१॥
स्वर्गस्थ माता संतोषली । म्हणे बाळाची चिंता मिटली । शुभाशीर्वादांची लाखोली । वाहे बालकावरी ॥५२॥
सातवें वर्षीं थाटानें । व्रतबंध झाला उत्साहानें । आणि विदयाभास बापूनें । सुरुं केला कृतनिश्चयें ॥५३॥
श्री गणेशास स्मरुन । सुरुं केलें अध्ययन । श्रवण आणि मनन । अट्टाहासें बापू करी ॥५४॥
बुध्दीस नव्हती मलिनता । तशीच लवमात्र नसे चित्ता । तेथें अभ्यासाची अपूर्वता । कोठवरी वर्णावी ॥५५॥
प्रात:काळीं उठावें । भगवंतासी स्मरावें । आणि मुखीं उच्चारावें । राम:रामौ रामा: ॥५६॥
कधीं कोणावरीं नं कोपावें । कधीं कोणाचें व्यंग न उच्चारावें । वादावाद न करावें । कधीं कोणासी ॥५७॥
मोह न शरीर सौख्याचा । लोभ न नाटकाचा । ताठर शब्द न वदे वाचा । न मत्सर कधींही ॥५८॥
ऐसा संमजस विदयार्थी । शिक्षक म्हणती हा निस्वार्थी । रत सदा पुरुषार्थी । हा एक ॥५९॥
बापू सर्वांचा आवडता । शिक्षकांचाही आवडता । त्यांचा विश्वास पुरता । बापूवरी ॥६०॥
उध्दवराव यरगट्टीकर । ज्यांनी साधनचि केल जन्मवर । ते बापूचे सहाध्यायी थोर । शाळेमध्यें ॥६१॥
स्नेही, मित्र, सहाध्यायी । शिक्षक, पिता, आणि आई । सोयरी धायरी सर्वही । ममता करिती बापूवरी ॥६२॥
एकदां वर्गांत गोंधळ । करिती बाळगोपाळ । झाली मुलें अवखळ । तों शिक्षक पातले ॥६३॥
तो काळ होता शिस्तीचा । पालक, शिक्षक, यांचे ऐकण्याचा । नाहींतरी देहदंड शिक्षेचा । अनिवार बसे ॥६४॥
पारा चढला शिक्षकांचा । म्हणती बंदोबस्त करुं याचा । क्षणार्धात मुलांचा । गोंधळ बंद करुं ॥६५॥
नेत्रीं चढें लालिमा । तेव्हां शिक्षक लाजविती यमा । एक छडीच येईल कामा । बोला कोण अवखळ ते ॥६६॥
कोणी माजविला गोंधळ । कोणी केली गडबड सकळ । ऐकतां शांत झालें गोपाळ । चुपचाप बैसले ॥६७॥
आंतल्या आंत चूर सर्वजण । कोणी उघडीना वदन । लटपटती छडी पाहून । शिक्षक ह्मणती बापूला ॥६८॥
“आता माझी भिस्त तुझ्यावरी । सांग कोणी खोडी केली खरी । छडी त्याच्या पाठीवरी । उठेल माझी” ॥६९॥
तवं गोविंद बोले अधोवदन, । “गुरुजी, पुस्तकीं गुंतलें माझे मन । न जाणे कोण यास कारण । क्षमा मजला करावी” ॥७०॥
हतप्रभ झाले शिक्षक । म्हणती दंडीन एकूण एक । घ्या छडी प्रत्येक । उभे रहा ओळीनें ॥७१॥
येतां येतां येतां । गोविंदाकडे दृष्टि जातां । कळवळा येवोन चित्ता । काय बोलती ॥७२॥
तुझा लवमात्र अपराध नसतां । शिक्षा भोगावी लागे आतां । नियम सर्वांस लागतां । जळे ओले वाळल्यासवें ॥७३॥
छडी बसली गोविंद करी । घाव गुरुजींच्या हृदयावरी । विधीच्या न्यायाची थोरी । यापरीस काय वर्णावी ॥७४॥
बापू न गजबजला मनीं । कर्ता देव हें अंत:करणीं । चित्त अभ्यासीं घालूनीए । राहीं मनी निश्चिंत ॥७५॥
गुरुजनांचा आदर । हा गोविंदाचा स्वभाव थोर । निर्मळ राखी अंतर । अभ्यासासाठीं ॥७६॥
मान आणि अपमान । ओढी जीवासी बेगुमान । तेथून काढूनिया मन । प्रसन्न बापू सर्वदा ॥७७॥
मनुष्य फुगे मानानें । आणि रंजीस ये अपमानानें । परी हें जोखड मनानें । कां घ्यावे वायाचि ॥७८॥
गोविंद झाला चित्रकला प्रवीण । तीन परीक्षा उत्तीर्ण । अभ्यासीही ठेवून मन । चढे चढण उत्कर्षाची ॥७९॥
वाढ होई बुध्दीची । तशीच शरीरबलाची । उपासना मारुतीची । बापू करी उत्साहें ॥८०॥
नमस्कार, जोर बैठका । यांचा सुरुं असे ठेका । यांच्या बाहुबलापुढें फिका । मित्रगण दिसे ॥८१॥
दोन पुरुष उंच उडी । ही गोविंदाची नित्य धडाडी । अचाट कामांची आवडी । हा स्वभाव गोविंदाचा ॥८२॥
अकरा मारुती कोरले । ते अकरा ठिकाणीं स्थापिले । हनुमंत चरित्र वर्णनी डोले । गोविंद सद्गद ॥८३॥
परमार्थांसाठी संसार । हा गोविंदाचा निर्धार । म्हणून उपासनेसही बहरा आला बाल वयापासूनि ॥८४॥
शरीर धारणेसाठीं । करणें संसार उठाउठी । स्तोम न संसाराचें या साठीं । उभारल्या भिंती नित्त्य नेमाच्या ॥८५॥
शरीर सुखास ठेवून दूर । चित्तीं स्मरावा विश्वंभर । पुरश्चरणें प्रहरानु प्रहर । करी गोविंद उत्साहे ॥८६॥
दर्शन संतांचे घ्यावें । आशीर्वाद संतांचे मानावें । सद्ग्रंथांचें चिंतन करावें । अहर्निश ॥८७॥
हा छंद या बालकाचा । जसा ध्रुवाचा नि प्रल्हादाचा । भक्ती भाव अंतरीचा दिसे उज्वल ॥८८॥
एकदां श्रीब्रह्मचैतन्य सद्गुरुवर । आले मिरजेस गोंदवलेकर । बापूसवे अंताजीपंत सत्वर । गेले संतदर्शना ॥८९॥
संत दर्शनासाठीं अधीर । नाना असति वारंवार । मस्तक ठेविले चरणावर । घेतले आशीर्वाद ॥९०॥
तो बापू कोठे दिसेना । म्हणून म्हणती सद्गुरुना । कोठें गेला कळेना । बापू माझा ॥९१॥
तवं ते म्हणति दयार्णव । आतां आपण करुं उपाव । उदयां स्टेशनवरी सुखेनैव । या घेऊन बापूला ॥९२॥
आज्ञा प्रमाण संतांची । मानून त्वरा केली जाण्याची । दुसरे दिवशीं भेट घेण्याची । उत्सुकता मोठी ॥९३॥
गुरु-गोविंदांची दृष्टादृष्ट होतां । आनंद उसळला अनवरता । प्रेमाश्रूं आले नेत्रा । ते न सांवरती ॥९४॥
मिठी घालून कमरेला । बापू मनीं आनंदला । बालक भेटें मातेला । तैसा सोहळा ॥९५॥
हात फिरवून पाठीवर । बोलती सद्गुरुवर । करीत जा गजर । श्रीराम जयराम जयजयराम ॥९६॥
होतां गोविंद चैतन्य भेटीं । प्रेम उचंबळे उभयता पोटीं । नयनीं अश्रूंची दाटी । तें सुख अनिवार ॥९७॥
पूर्ण पावोन समाधान । बापू आला परतोन । पुन: सुरु केलें अध्ययन । ऋषीतुल्य दिनक्रम ॥९८॥
प्रात:काळी उठावें । कृष्णास्नानास जावें । गायत्री पुरश्चरण करावें । प्रवाहांत उभे राहुनी ॥९९॥
निद्रेस न विकोन प्राण । देह केला मोक्षसाधन । मोहांचे सर्वथैव बंधन । टाकिलें तोडोनी ॥१००॥
गोमूत्राची भाकरी खाणें । लक्षालक्षांची पुरश्चरणें । एकामागून एक आचरणें । देहसुख त्याज्य मानोनी ॥१०१॥
जो विरक्त जन्मापासोनी । सदा रत ईश चिंतनी । कोणी पूर्व जन्मींचा मुनी । योगीही वाटे ॥१०२॥
हा काय आपणहून आला । कीं विश्वंभरें पाठविला । कां ईश्वर भक्तीचा ध्यास धरिला । मनामध्यें ॥१०३॥
अचाट कृत्यें करणें । पुरश्चरणे आणि पारायणें । क्षण एक न दवडणें । वृथा कधीं ॥१०४॥
वज्रासारखें शरीर । अभ्यासींही तत्पर । आणि उपासना कठोर । ऐसे व्रत गोविंदाचें ॥१०५॥
स्कूल फायनलचा अभ्यास । आला आतां शेवटास । यशही भरघोंस । आलें हाता ॥१०६॥
वय वरुषें असेल सोळा । तवं वधुपिता आले शोधीत बाळां । म्हणती चला आतां उजळा । मुख आपुल्या कन्येचें ॥१०७॥
रुढी बालविवाहाची । होती त्या काळची । सुदृढ शरीरयष्टि पाहून याची । आणि विदयाअभ्यास ॥१०८॥
विष्णूसारखा वर । सत्त्वशील कुलवंत थोर । नाहीं पुन: मिळणार । प्रयत्नांतींही ॥१०९॥
मुलीचे पालक म्हणती । हा वर असो दयावा चित्तीं । त्वरा करा पुरती । नाहींतर जाईल हातचा ॥११०॥
करावया कन्यादान । उत्सुक झाले बहुतजण । अंताजीप्म्त हें पाहून । रचिती मनोरथ ॥१११॥
हा एवढाच पुत्र आपणांसी । मिळणी करावी वधुवरांसी । आपुल्या वंशवेलीसी । येईल बहर ॥११२॥
प्रेमें पुत्रासी बोलाविलें । आपुलें मनोगत निवेदिलें । तों आकाशचि कोसळलें । वाटलें बापूला ॥११३॥
दूर सारोन संसार चिंता । परमार्थ करावा पुरता । गांठ पडेल देवाभक्ता । तेंचि खरें शुभमंगल ॥११४॥
पितृआज्ञा मोडावयाचें । ब्रीद नव्हतें गोविंदाचें । म्हणोन हितगुज मनींचे । निवेदिलें नानांना ॥११५॥
नाना म्हणती बापूला । तूंच एक भाग्यपूत्र आम्हाला । तुझ्या ठायीं जीव गुंतला । संसारसोहळे तुझ्यामुळें ॥११६॥
परमार्थाची तुला आवड । तेंच आमुच्याही मनींचे कोड । संसारास परमार्थाची जोड । देऊन हो एकनाथ ॥११७॥
परी हें बापूला मानेना । तो विनवून म्हणे नानांना । अति अवघड वाटे मना । सांगा काय करुं ॥११८॥
पोटी परमार्थाची आवड । वाटे संसारासी । न दयावी सवड । मग सारेचि होईल अवघड । ना अस्त्र ना परत्र ॥११९॥
मन नाहीं म्हणून संसार गेला । संसार मोहानें परमार्थ बुडाला । इकडे आड तिकडे विहीर भला । मी मध्यें उभा दिसतसे ॥१२०॥
कान्ता, किर्ति आणि कांचन । हें परमार्थासी मोठे विघ्न । वाटे मार्ग करावा निर्विघ्न । तीन्ही सारुन अतिदूर ॥१२१॥
माई गोविंदाची माता । पुत्रावरी अति ममता । ती म्हणे बापू आतां । विचार माझा ऐक ॥१२२॥
तूं आमुचें आशास्थान । तूं आमुचें सुखनिधान । तुझ्यामुळें ऐश्वर्यपूर्ण । संसार आपुला ॥१२३॥
तों तूं आचरसी संन्यास धर्म । तवं ओढवले पुरतें कर्म । अरे संसारी परमार्थाचें वर्म । काढ शोधोनी ॥१२४॥
अश्रुं मातेच्या नयनीं । पाहून बापू गजबजल मनीं । म्हणे देवाधिदेवा, मार्ग दाखवुनि । सोडीव आतां ॥१२५॥
मातापित्यास कष्टी ठेवणें । हें मज जिणें लाजिरवाणें । देवा तुझे पाय सोडणें हेहि प्राणसंकट ॥१२६॥
तवं एक विचार आला । बापू म्हणे मातेला । मी जातो । आळंदीला । कौल मागण्या ॥१२७॥
आतां आळंदिचा जगदीश । जो देईल आदेश । तेथें ठेवूं विश्वास । आपण सर्वजण ॥१२८॥
नाना समजाविति मनाला । आतां विनवूं ज्ञानेश्वर माउलीला । दाखवील तोचि मार्ग भला । मानूं आपण ॥१२९॥
विचार मानला सर्वांसी । बापू आला आळंदीसी । परी आतां म्हणे ज्ञानेशासी । आठवूं प्रेमभावें ॥१३०॥
श्री ज्ञानराज दयार्णव । पुरवितील मनींची हांव । भक्तकाजास्तव सदैव । म्हणोन ज्ञानराज माऊली ॥१३१॥
नको आतां अनुमान । देतील प्रत्यक्ष दर्शन । जरी माझें भजन । असेल श्रध्दापूर्ण ॥१३२॥
शब्द त्यांच्या मुखांतला । घेऊं आतां या वेळेला । म्हणोन ज्ञानेश्वरी पारायणाला । सुरुवात केली ॥१३३॥
आज्ञा मिळेल जेव्हा । सोडीन आळंदी तेव्हां । आतां श्रीज्ञानेशा व्हा । पाठीराखे या संकटीं ॥१३४॥
करुणाकर निवृत्तिदास । कधीं न करिती भक्ता उदास । ऐकोन आर्त हाकेस । साक्षात् प्रगटले ॥१३५॥
बाल गोविंद विनटला । ज्ञानदेव चरणीं लीन झाला । विचारिती भक्ताला । काय इच्छा मनीं वसे ॥१३६॥
देवकार्यीं देह झिजावा । देवाची व्हावी सेवा । भक्तिभाव मनी असावा । हेंचि मनीं असे ॥१३७॥
परि विवाहाची अडचण । झाली मध्यें निर्माण । आतां तुमची इच्छा प्रमाण । मानून चालीन मी ॥१३८॥
तंव ज्ञानदेव प्रसन्नवदन । म्हणती विवाह करुन । परमार्थीही अनुसंधान । सोडू नये ॥१३९॥
साधिशील प्रपंच परमार्थ । भेटतील सद्गुरु समर्थ । आयुष्य वेचून जगदोध्दारार्थ । होशील कृतार्थ जीवनीं ॥१४०॥
लाभतां ऐसा शुभाशीर्वाद । आनंदला मनीं गोविंद । धरीलें चरण झाला सद्‍गद । म्हणे येतो जी ॥१४१॥
तें दिवस इंग्रजांच्या राजवटीचें । नित्याच्या लष्कर भरतींचे । सेवक सरकारचे । सुदृढ तरुण शोधिती ॥१४२॥
गोविंद लागला वाटेलाअ । तों कोणी विचारती त्याला । म्हणती चल हो शिपाई बाळा । भाग्य तुझें उगवेल ॥१४३॥
अधिकार येईल हाताशीं । संपत्ती लोळेल पायापाशीं । लोक बैसवितील गादीशीं । करितील मुजरा ॥१४४॥
शौर्य दाखविशील रणीं । तरी कँप्टन, मेजर होशील झणीं । मग तुझ्या वैभवाचीं गाणीं । सर्वजन गातील ॥१४५॥
शरीर सौष्ठव तुझे चांगले । म्हणोन भाग्य चालून आले । तें तुवां लाथाडले । मग वेळ पुन: न येईल ॥१४६॥
त्यांनाही एकवेळ । समजावी हा बाळ । पाहोन त्याचा निश्चय अढळ । स्तब्ध राहती ॥१४७॥
शरीर सौष्ठव तुझें चांगले । म्हणोन भाग्य चालून आलें । तें तुवां लाथाडले । मग वेळ पुन: न येईल ॥१४६॥
त्यांनाही एकवेळ । समजावी हा बाळ । पाहोन त्याचा निश्चय अढळ । स्तब्ध राहती ॥१४७॥
मनीं म्हणे हें काय झालें । परमार्थकार्यी विघ्न आलें । ऐहिक सौख्य नव्हतें चिंतिले । मनामध्यें ॥१४८॥
म्हणें धावाजी ज्ञानदेवा । हा कैसा पेटला वणवा । सत्ता संपत्तीचा लोभ नसावा । माझें मनीं ॥१४९॥
करावे भजन पूजन । संदग्रंथांचे वाचन । नामस्मरण अनुदिन । ही आस मनींची ॥१५०॥
पैसा थोडा कनवठीला । तों आला एक टांगेवाला । म्हणे मी निघालों पुण्याला । मोकळाच ॥१५१॥
चल बैसे मागें । म्हणोन टांगा हांकला वेगें । गोविंद ज्ञानदेवास मनीं सांगे । गोष्ट आनंदुनी ।१५२॥
पुन: धांवलातिं देवा । ही जीव तुमचाच ठेवा । आतां ईश्वर उपासना करवा । तुम्हीच माझ्याकडूनही ॥१५३॥
श्री ज्ञानेश्वर माऊली । करी कृपेची साऊली गोविंदास पावली । पुन: पुन: ॥१५४॥
तवं टांगा पुण्यनगरींत । लोकमान्यांचे घर शोधीत । गोविंद म्हणे हेंच अपेक्षित । घर माझें ॥१५५॥
लोकमान्य टिळक । भारताचे हितचिंतक । मीही भारतीय एक । आलों भेटीसी ॥१५६॥
लोकमान्य केवळ ईश्वर । उतरला तेथें हा बालवीर । समोर पाहून घर । राष्ट्रपित्यांचे ॥१५७॥
मागे पाहे परतोन । त्याचें भाडें दयावें म्हणोन । तो टांगेवाला गेला निघोन । क्षण न लागतां ॥१५८॥
लोकमान्य म्हणती भिऊं नको । आतां काळजी करुं नको । संकटाचा ध्यास नको । धरुं मनामध्यें ॥१५९॥
त्यास धीर देऊन । परतविला घरीं समजावून । देव पाठीशीं असतां विघ्न । येईल कैसे ॥१६०॥
घरीं येतां चित्र श्रीज्ञानेशांचे । रेखांकित केलें साचे । जैसे दर्शन संत रायाचें । झालें त्यांसी ॥१६१॥
माता पितयास वृत्तांत । निवेदिला सादयंत । दाखवितां श्रीज्ञानेशाचे चित्र । नाना सद्गद जाहले ॥१६२॥
गोविंदाचें मन वळलें । श्रीज्ञानेश प्रसन्न झाले । मज दीनांचे कोड पुरवीलें । दयार्द्र होऊनी ॥१६३॥
जयजयजयश्रीशंकरा । हट्ट पुरवीतसा खरा । हे भोलानाथ हे गिरिजावरा । आसरा तूंचि आम्हां ॥१६४॥
तुझी भक्ति सदा घडो । तुझ्या सेवेंत देह पडो । तुझ्या भक्तीची झडो । नौबत येथें ॥१६५॥
आम्ही तरी संसारी । परि तुझें प्रेम अंतरीं । फार नाहीं जरी । तरी थोडी आशा वसे ॥१६६॥
संसार सुफल राहावा । तो तुझ्यासाठी देवा । देह सुखासाठीं न राहावा । जीव आमुचा ॥१६७॥
ऐश्वर्य इहलोकींचे । नकोअ आम्हांस भक्तीवांचूनचें । जें घेऊं तें तुझ्या कामाचें । होवो सदा ॥१६८॥
संत होवोन अनुकूल । भाग्य झालें सुफल । संत कृपेची वंशवेल । वाढेल आतां येथें ॥१६९॥
इंदिरा गोविंद विवाह । हौसेचा झाला समारोह । दोन पुण्यात्म्यांचे देह । एकत्र आले ॥१७०॥
अल्पावयीं पतिपत्नी । इंदिरा-गोविंद शोभती दोन्ही । पतिसेवा व्रत मानुनी । आली लक्ष्मी घरामध्ये ॥१७१॥
गोविंदाचें असिधाराव्रत । पेटलें होमकुंड धगधगीत । आहुती वरी आहुती पडत । गृह सौख्याच्या ॥१७२॥
अति बिकट हा गृहस्थाश्रम । संन्यासही यापरिस सुगम । गोविंदाचें वैराग्य अनुपम । धगधगीत ॥१७३॥
कंठीं शोभे नाममाळा । भाळीं वैराग्याचा टिळा । भक्ती-प्रेमाचा उमाळा । हीच दिवाळी हाच दसरा ॥१७४॥
म्हणें इंदिरा-सून मनांत । हें संसाराचें वेगळेंच चित्र । हरि-हर येथें दिसत । सदा वस्तीसी ॥१७५॥
संत श्रीहनुमंत । झाले तिच्यावरी कृपावंत । अनुग्रह आणि वरदहस्त । आला शिरांवरी ॥१७६॥
म्हणोन संसाराची हळहळ । शांत झाली सकळ । परमार्थ सुख सोज्वळ । उमगूं लागलें ॥१७७॥
श्रीहनुमंत कृपाप्रसाद । सुखद त्यांचा आशीर्वाद । म्हणोनी पत्नी दे प्रतिसाद । पतिकार्यासाठीं ॥१७८॥
संतश्रेष्ठ श्रीहनुमंत तात्यांचे । निधान पूर्ण कृपेचें । लाभले म्हणून केळकरांचें । अखिल कुल धन्य झालें ॥१७९॥
नातरी हें असिधाराव्रत । संत कृपेची जोड सतत । म्हणोनी संसारताप शांत । होय सद्भक्तांचा ॥१८०॥
खडतर व्रत गोविंदजींचे । अखंडव्रत ईशसेवेचें । दिनप्रति दिन उपासनेचें । घमंड चाले ॥१८१॥
आतां पुढील अध्यायीं । दिसेल संसाराची नवलाई । असोन नसणें कसोटीची । उजळेल चरित्राची । ज्योत मोठी ॥१८३॥

इतिश्री गोविंद चरितमानस । जें स्वभावेंची अति सुरस । जेथें अखंड उसळेल भक्तिरस । श्रीज्ञानेश्वरदर्शननाम द्वितीय अध्याय ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP