अध्याय चौदावा - पूर्णविराम

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


ॐ नमोजी सीतारामा । अतर्क्य अघटित तुजा महिमा । नकळे आम्हास सीमा । तुझ्या योजनेची ॥१॥
तुझ्या सत्तेवीण । न हाले झाडाचेही पान । हे आले मज दिसोन । या चरित्र कथनीं ॥२॥
मनुष्यास अभिमानाचा मोठा । मी पणाचा चढे ताठा । म्हणोन हातीं सूत्र ठेवोन एकटा ॥३॥
कणभर अभिमान । तू न करिसी सहन । कारण ते अध:पतन । जीवमात्राचे ॥४॥
तू तरी आम्हास न दिससी । परी आपुले आस्तित्व जाणविसी । विचारवंतास चकित करिसी । आपुल्या प्रभावानें ॥५॥
गेली चार वर्षे मामांचे । अभ्यासितां जीवन साचे । स्वरुप कळले तुझ्या योजनेचे । काहींसे आम्हा ॥६॥
क्षण भक्तांच्या भाग्याचे । आले आणि गेलें कायमचे । भाग्यवान होत त्यांचे । साधले देवा ॥७॥
जे उदया करु म्हणून बसले । ते कायमचे हळहळले । आता तरी आकाश कोसळले । ऐसे वाटे ॥८॥
नरदेह ही संधी सोन्याची । शाश्वती नोहे एका क्षणाची । जोवर हाती आहे तोवर भाग्याची । वाटचाल करु ॥९॥
हाच तुझा संदेश । कळला हे जगदीश । बहुमोल विशेष । महत्वाचा ॥१०॥
त्रयोदशाक्षरी मंत्रांच्या अक्षरीं । गुंफावी चरित्र कुसरी । ही माझी इच्छा परी । आला चौदावा अध्याय ॥११॥
चरित्र झाले होते छापून । दुधाचा पेला ओठा लागून । ठेविला परी तुझे वचन । आले वेगळेची ॥१२॥
कळसाध्याय संपविला । विराम दिला लेखणीला । परी तुझी विचित्र लिला । ये अनुभवासी ॥१३॥
तो हा सतीचा अध्याय । हे कळसावरील सोने होय । तेज तेजासवे जाय । अतर्क्य अघटित गोष्ट ही ॥१४॥
मामा स्वस्वरुपीं झाले विलीन । तोच मामी वदली प्रतिज्ञावचन । कीं आता मी हीं जाईन । वर्ष न संपेल तोवर ॥१५॥
दु:खांती बोलली असेल । म्हणोनि दुर्लंक्षिलें तिचे बोल । परी किंचित् जाता काल । बोला सारिखी चाल दिसे ॥१६॥
तिनें मनाशी निश्चय केला । आणि विरहाग्नी चेतविला । आत कणकण जळू लागला । देह मामीचा ॥१७॥
हास्य मुखावरील मावळले । विचारासि गांभिर्य आले । शरीर क्षीण होऊ लागले । दिवसेंदिवस ॥१८॥
आपण ऐकतो सतीच्या गोष्टी । परी प्रहरांत जळे देहयष्टी । येथें वेगळेच दावी दृष्टी । ध्यास पतिचरणाचा ॥१९॥
म्हणे एकमेव माझे निधान । गेले आता निघोन । सर्व जग शून्य । दिसे मला ॥२०॥
गोविंद तेथे इंदिरा । हाच मार्ग आता बरा । हे रघुनाथप्रिय गुरुवरा । करा सोय माझी ॥२१॥
महद्‍भाग्ये लाभली संगती । ज्या पुण्यपुरुषाची मजप्रती । ती सोडावी ही मति । माझी नव्हे सर्वथा ॥२२॥
तव राम विचारी मनांत । दिसे कांही विपरीत । तो म्हणे हे आई शांत । तू हो आता ॥२३॥
आधार तूच आम्हाला । आधीच माझा जीव घायाळ झाला । दुसरा आघात सहन करण्याला । सामर्थ्य माझें नाही ॥२४॥
मी अशक्त तुझा बाळ । तुझ्या आशिर्वादाचे पाहिजे बळ । आजवरी तुम्ही प्रेमळ । म्हणोन मी सुखावलो ॥२५॥
ठेवू मामांची आठवण चित्ती । चालवू त्यांचे कार्य पुढती । जेथे कीर्तन तेथे मामा निश्चिती । हा माझा दृढविश्वास ॥२६॥
तू धीर सोडशील । तरी माझाही आधार सुटेल । तुझ्या कृपेची छाया अंतरेल । असा विचार करु नको ॥२७॥
परी मामांच्या निर्याणाचा । आघात जबरदस्त मनावरचा । तिने ध्यास घेतला मामांचा । खिळली अंथरुणाला ॥२८॥
म्हणे ही सरस्वतीची । सेवा मनापासूनची । समाधानी मनाची । जेणे झाली ॥२९॥
भाची शरयूवर । मामीचे प्रेम फार । आठवण वारंवार काढीतसे ॥३०॥
राम गजबजला मनीं । करी तिच्या इच्छा पूर्ण आवर्जूनी । आणिक तेरा रुपयांची मनी आँर्डर करुनि । प्रार्थी कुलदैवताला ॥३१॥
जय जय जय श्रीरामेश्वरा । तुझाचि आम्हास आसरा । आता शुभ तेचि तुम्ही करा । मज शब्द न बोलवे ॥३२॥
चालावे कार्य मामांचे । हेच एक आहे माझ्या मनीचे । त्याचसाठी या देहाचे । मज काम आहे ॥३३॥
नातरी या संसारयातना । मज आता सोसवतीना । हे रामेश्वरा तुमच्याचरणा । नमन माझे अखंड असो ॥३४॥
राम विचार करी मनीं । म्हणें आता त्वरा करुनी । मामांच्या चरित्र श्रवणीं । मन तिचे रमवू ॥३५॥
तैल चित्र मामांचे दाखवू । मस्तक नमविण्या सिंहासन करवू । मामांचे कीर्तन चालवू । खंड न पडता ॥३६॥
तन मन आणि धन । अपार कष्ट वेचून । करु पाहे तिचे सांत्वन । परी हाय हाय ॥३७॥
मामी म्हणे रामाला । तुझें कार्य पाहोन संतोष मला । परी माझ्या विकल हृदयाला । मी आता कैसे आवरु ॥३८॥
माझी नव्हे योग्यता । परी मी पुरुषोत्तमाची झाले कांता । त्यांच्याच मागोमाग आता । मन घे ओढ माझे ॥३९॥
जरी मी त्यांचा ध्यास सोडेन । तरीं जे मज जातील विसरुन । त्यांच्याविण माझे मन । न रमे मी काय करु ॥४०॥
हट्ट कधी मी नाहीं केला । वस्त्र भूषण सुवर्णाचा भला । आशा आकांक्षांचा चूर केला । कोणासाठी ॥४१॥
चार शब्द सुखाचे बोलावे । त्यांच्या सांनिध्यात असावे । सदा त्यांचे प्रसन्नवदन पहावे । हेची माझे भाग्य होते ॥४२॥
ज्यासाठी व्रतवैकल्य केले । निराहार उपवासाने शरीर कष्टविले । सावित्रीचे कठोरव्रत आचरिले । कोणासाठीं ॥४३॥
तरीं हा दैवाचा घाला । मजवरी आला । हेही सुख पाहवेना त्याला । झाले दैव आडवे ॥४४॥
हे शरीर प्रारब्धाचे । म्हणोन क्रूर खेळ चालती त्याचे । मला न कौतुक या देहाचे । आता वाटे ॥४५॥
एक एक दिवस । मागे पाडी युगास । कधी पाहीन त्यांच्या चरणास । ऐसे मज जाहले ॥४६॥
संत आले या घराला । अखिल केळकर कुलाचा उध्दार झाला । आता मला माझा मार्ग मोकळा । असोदे देवा ॥४७॥
संतांच्या आशिर्वादापुढें । माझे बळ काय बापुडे । येथें अखंड वाजतील चौघडे । रामनामाचे ॥४८॥
माझ्या चिरसुखाचा ठेवा गेला । तिकडे माझा जीव लागला । सोडा आता माझा मार्ग मोकळा । मला तुम्ही ॥४९॥
आर्त स्वर मामीचा । ठाव घेई हृदयाचा । विकल देहास भार शोकाचा । असह्य दिसे ॥५०॥
खाणे पिणे सुटले । व्याधीनी शरीर घर केले । मनीं एकचि चिंतन राहिले । महा प्रयाणाचे ॥५१॥
श्रीतुकारामाचे अभंग बारा । मामी करी पुन:पुन्हा उच्चारा । तोच जीवास आसरा । तिला वाटे ॥५२॥

साधितील येणे इहपरलोक । सत्य सत्य भाक माझी तुम्हा ॥
येणे भवव्यथा जाईल तुमची । सख्या विठ्ठलाची आण मज ॥

अखंड पाठ अभंगाचा । तोच आधार तिच्या जीवाचा । हाचि मार्ग पैल तीराचा । तिला वाटे ॥५३॥
म्हणता म्हणता जाई दमून । तरी रात्रंदिन हेचि चिंतन । श्रीतुकारामांचे संदेह स्वर्गारोहण । पाही डोळ्यापुढे ॥५४॥
रामाने केली मामांची आरती । म्हणे मामी आहे सुंदर किती । पंचप्राणांची पंचारती । फिरे संताच्यापुढे ॥५९॥
कोणी म्हणे तिला । आता उत्सव जवळ आला । दु:ख वाटते मला’ । एवढेच म्हणें ॥५५॥
कोण वार कोण दिवस । याची सदा विचारपूस । मनीं तिच्या विश्वास । गाठीन वेळ ॥५६॥
म्हणें ‘सहा दिवस उरले’ उत्सवाला । आणि आपुला समय आला । दिवस श्रीगणेशजन्माचा भला । पाही हाललेला झोपाळा ॥५७॥
तोचि माघ महिना आला । तोचि शुध्द पक्ष आला । तोच सोमवार गाठला । मामीनें ॥५८॥
मामी म्हणे मनांत । मी जाईन विरुन त्यांच्या स्वरुपांत । मगचि होईल धर्मकृत्य । यथासांग ॥५९॥
माघ शुध्द चतुर्थीशी । शके आठराशे चौर्‍यांशी । उरली दहा मिनिटे चार वाजण्यासी । दीप गेला विझून ॥६०॥
एकच प्रहरापूर्वी वदली । आज माझी गादी हलली । माझी शेवटची आशा पुरविली । संत श्रेष्ठांनी ॥६१॥
मामा आणि मामी । झाले पूर्ण कामी । आता काय वर्णन करु मी । उरले काय ॥६२॥
मामांचे चित्र तिनें पाहिले । सिंहासन प्रेमे कुरवाळले । चरित्रहीं ऐकिले । अश्रुपूर्ण नयनें ॥६३॥
मामा मामी कां गेले । कारण आमुचे भाग्य सरले । श्रीरामाचे श्रीरामानें नेले । श्रीराम जयराम जयजयराम ॥६४॥
या कराल कलियुगी । आहे काय सांगा उपयोगी । संत समागम हेचि जगीं । परम भाग्य ॥६५॥
निष्ठावंत परमभक्त । आदर्श जगा पुढें सतत । हाल अपेष्टांतही अमृत । देती जना ॥६६॥
त्यांची थोर तपस्या पाहून । सामान्यांचेही वळे मन । शांति सौख्याचें महिमान । कळे संतांच्यामुळें ॥६७॥
आता पुन्हां भाग्याचा ठेवा । श्रीरामस्मरणें साठवावा । तरीच लागेल सुगावा । संत सानिध्याचा ॥६८॥
नाव आमुची संसार डोही । परी नावाडी दिसत नाहीं । तारु चालले दिशा दाही । वादळांत ॥६९॥
जय जय श्रीकरुणाकरा । स्मरण राहील ऐसे करा । न लागो माया मोहाचा वारा । हृदयीं राहो गोविंद ॥७०॥
विश्वास मुद्रणालयाचे चालक मान्यवर । श्री भाऊराव पडसलगीकर । मामांचे शिष्यवर । आदरभाव मामांच्यावरी ॥७१॥
म्हणोन झीज सोसून । केले चरित्रमुद्रण । प्रेमा शिवाय सर्व न्यून । हे येथेंहि दिसून आले ॥७२॥
याचा लेखक नरहरी । आणि मुद्रकही नरहरी । आता नरामध्यें कैसा प्रगटेल हरी । ते हे चरित्रचि सांगेल ॥७३॥
मामा आपुल्या कीर्तनांत । मज पाहोन हेच म्हणत । हरि प्रगटल्या सार्थक सत्य । नरदेहाचे ॥७४॥
ऐसे थोर चरित्र मामांचे । भाग्य आहे वाचकांचे । थोर स्मृती अंत:करणाचे । घर करी ॥७५॥
आता इंदिरा गोविंद स्मरणीं । नत मस्तक करुन चरणीं । पूर्णविरामी ही लेखणी । देत असे ॥७६॥

भक्ति प्रेम सुखालागी । स्मरु गोविंद इंदिरा ।
आयुष्य वेचिले ज्यानी । श्रीरामस्मरणीं सदा ॥

इतिश्री गोविंदचरितमानस । जे स्वभावेचि अतिसुरस । जेथे अखंड उसळेल भक्तिरस । पूर्णविरामोध्याय गोड हा ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP