अध्याय नववा - त्रिताप महोत्सव वर्णन

भगवान सद्गुरु श्रीगोविंद अनंत ऊर्फ श्रीमामामहाराज केळकर यांचे चरित्र.


यज्ञ दान तप उत्तम । त्यांहून श्रेष्ठ गुरुनाम । ते जपता ठेऊन प्रेम । अंतरात ॥१॥
थोर प्राप्ती तेणें मिळे । हें ज्या सद्गुरुंचेंनि कळे । त्यांची चरण कमळें । सद्भावें वंदीतसें ॥२॥
प्रयत्नेवीण जो प्रयत्न । तेथें साधकाचें लक्ष वेधून । ज्यांनी दिले समाधान । त्यांचे चरण वंदू आता ॥३॥
कुलकर्णी नामदेव एक । वय लहान परी थोर भजक । म्हणे जन्मा येईन आणिक । मामांच्या घरी ॥४॥
आला काळाचा घाला । गेला देवाच्या घराला । परी ध्यास त्याला लागला । मामांचा ॥५॥
म्हणे अखंड मिळेस सेवा । तोच लाभ मोठा जीवां । मामा दादा आळविती देवा । मीही नाचेन रंगणें ॥६॥
मामांचे चाले कीर्तन । तोही नाचे आनंदून । भावभक्ती समाधान । भोगिले त्यानें ॥७॥
मामांचे शुध्द आचरण । दे सर्वास समाधान । कोणी कांहीं उपाय योजून । संबंध जोडी मामांच्याशी ॥८॥
कोणी करी देवाची स्थापना । कोणी करी उद्घाटना । मामांना अध्यक्षस्थाना । पाचारोनी ॥९॥
सेनामंदीर पायाभरणी । झाली मामांचेंकडोनी । तेथे त्यांचे कीर्तनी । प्रेमभरे ॥१०॥
ढवळे तालमीत । शिवरायाचा उत्सव होत । मामा तेथे कीर्तना जात । प्रतिवर्षी ॥११॥
मंगलधामाचे उद्घाटन । झाले मामांचे कडोन । महादेवराव करविती आपण । अत्यादरें ॥१२॥
कैवल्यधामी भीमराव स्थापना । लाळगे विठ्ठल रुक्मिणी स्थापना । कुलकर्णी सीताराम स्थापना । झाली मामांच्या हस्ते ॥१३॥
मजुमदार विष्णुमंदिरी । दत्तोपंत बापट दत्तमंदिरी । दादा कुलकर्णी यांचे घरीं । मामा कीर्तनी तल्लीन होती ॥१४॥
विदयुद्दीप प्रगटीकरण । नृसिंहवाडीचे जे भूषण । मामांच्या हस्ते उद्घाटन । नातू शेठ करिती ॥१५॥
तेथेंही कीर्तन । दत्तगुरुनी करविले आपण । त्याचे करिता कौतुक वर्णन । शब्दही थिटे पडती ॥१६॥
कुरुंदवाडी घाटावर कीर्तन । झाले तेव्हां दत्तगुरु आपण । आले होते आनंदून । दर्शन देण्या ॥१७॥
संगमावरीं उमटली । पाण्यावरी श्रींची पाऊले भली । अनेकांनी पाहिली साक्ष त्याची ॥१८॥
गणपती मंदिरात किर्तन । झाल्यावर करीती देवदर्शन । प्रसादपुष्पें मस्तकावर गळून । पडली वारा नसताही ॥१९॥
औदुंबरी दत्तगुरुंची । दुपारी वेळ विश्रांतीची । मामांना कीर्तन सेवा करण्याची । इच्छा झाली ॥२०॥
सुरुं झाले कीर्तन । तों पुजार्‍यास दृष्टांत देऊन । श्रीदत्तगुरुनी त्यांचेकडून । दारे उघडून घेतली ॥२१॥
ब्रह्मनाळीं आम्रफळ । प्रसाद घेऊन प्रेमळ । सिध्द प्रगटोनी तात्काळ । देती कीर्तनाचे शेवटी ॥२२॥
आळंदी क्षेत्रीं मामा असता । काय वर्तले ऐका आता । कीर्तनाची परवानगी मागता । पंच देती नकार ॥२३॥
श्रीज्ञानदेवांनी काय केलें । पंचांचे अंतर पालटविले । पंच स्वत: कीर्तनास बसले । प्रसाद नारळ दिला मागुती ॥२४॥
तैसेच देहूंत भंडार्‍यावरी । श्रीतुकाराम महाराज सेवा घेती खरीं । मामांचे कीर्तन झाल्यावरी । प्रसाद शेंगा दिल्या कोणी ॥२५॥
कीर्तन मंदिर उद्घाटन । वासुदेवराव करिती आनंदून । मामांच्या हस्ते पुण्यपावन । कीर्तन मंदिर झाले । निजस्वरुप प्रकाशले । मामांच्या कीर्तनीं ॥२७॥
कीर्तन सेवा मनोभावे । झाली हे जना झाले ठावे । आतां मामांच्या स्वभावें । घेतले आणिक ॥२८॥
कीर्तन संस्था टिकावी । जिज्ञासूंची सोय व्हावी । म्हणोन तयार करावी । आणीक मंडळी ॥२९॥
ऐसे मनी योजून । ठेविले अनुसंधान । आले त्यांच्या इच्छामात्रेकरुन । पुढे कांही जण ॥३०॥
घरीं राम करी कीर्तन । मामांचे कृपा छत्र पूर्ण । त्याच्यावरी म्हणोन । रामरंगे कीर्तनी ॥३१॥
नाहीं शोधिलें विदयालय । मग कोठले विश्वविदयालय । परी सद्गुरुंचे पाय । त्यानें दृढ धरिले ॥३२॥
वय होते लहान । तेव्हाच गुरुकृपापूर्ण । नवल त्या कृपेंचे महिमान । सामान्यास नुमगे ॥३३॥
बालपणीं शुभाशिर्वाद । श्री हनुमंत तात्यांचा सुखप्रद । मिळता महाप्रसाद । उमटती अंगी ॥३४॥
सद्गुरुंची कृपादृष्टी । करी अशिर्वादाची वृष्टी । हा बोलू लागे गोष्टी । अध्यात्माच्या ॥३५॥
घरी वेदांताचे पीक आले । त्यांतच या बाळानें बाळसे धरिले । नाचूं बागडू लागले । अध्यात्मांत ॥३६॥
शब्द येता मुखीचे । ते बोल वाटती उपनिषदांचे । आता श्रीगुरुलिंगजंमांचे । लक्षवेधले रामाकडे ॥३७॥
प्रसाद गीता कानडीतून । कानडीचा गंधही नसून । श्रीनारायण प्रसादवचन । स्फुरे अंतरीं ॥३८॥
जें स्फुरे अंतरीं । ते राम साठवी हृदयांतरी । त्याचा पूर्ण ठसा कागदावरी । उमटे मागुती ॥३९॥
कीती तरी कानडी काव्य आले । एक नवल वर्तले । त्याचा त्यासीही अर्थ नुकले । ग्रंथ गर्भीचा ॥४०॥
केले मग सद्गुरुस्तवन । होता आले कृपादान । अर्थ मिळे संपूर्ण । मराठी भाषेमध्यें ॥४१॥
जेथें सद्भक्त आणि संत । तेथे काळावरी झाली मात । ऐसे आकर्षण जबरदस्त । गुरुशिष्यांचे ॥४२॥
शिष्य झाला अधिकारी । मग गुरु त्याचा शोध करी । येती देहही ठेविल्यावरी । धुंडीत त्यासी ॥४३॥
ऐशा अनंत घटना । सच्चरित्रीं पहाना । विकल्प मुरडतील माना । अभाविकांचेही ॥४४॥
संत सत्स्वरुपीं मिळाले । त्यांचे भूत भविष्य सरले । ते सदा वर्तमानी राहिले । भक्ताकरणें ॥४५॥
तीव्र स्मरण होता धावतीं । हेत मनीचे पूरविती । आणि सदा जागते ठेविती । परमार्थ विषयीं ॥४६॥
राम झाला घरचा । वारसदार मामांचा । आणिक ही इतरांचा । उल्लेख करुं ॥४७॥
सूर्य रामपुत्र चतुर । राही कीर्तना विषयीं तत्पर । वय लहान परी विचार । परमार्थाचा ॥४८॥
पिता प्रपिता पाठीशी । मग काय चिंता त्यासी । अखंड साखळी जोडण्यासी । मामा योजिती मनांत ॥४९॥
गणपतराव कानिटकर । निष्ठा मामांच्यावरी थोर । गौण मानोन संसार । कीर्तन करिती ॥५०॥
विनायकराव बंधू त्यांचे । वेड त्यांनाही कीर्तनाचे । गावोगांवी भक्तिप्रसाराचे । काम करिती ॥५१॥
वासुदेवराव जोशी । माधवनगरचे रहिवासी । मिळाले या कीर्तन गंगेसीं । एकसरे ॥५२॥
बापुराव बंधू त्यांचे । कीर्तनांत लक्ष ज्यांचे । पदवीधर विश्वविदयालयचे । परी लक्ष अध्यात्मात ॥५३॥
उमाबाई भक्तीनें । रंगविती कीर्तनें । गावोगावी जनमनें । बोधिती भक्तिसाठीं ॥५४॥
कोणी एक नरहरी । हातीं कीर्तनाची झांज धरी । मामांच्या कौतुकावरी । तुष्टा सदा ॥५५॥
प्रताप सुर्य मामांचा । प्रकाश पसरे किरणांचा । विळखा त्यांच्या प्रेमकरांचा । असे सर्वांसी ॥५६॥
पार्वतीबाई बोडस । उभ्या राहती कीर्तनास । मामांच्या गुणगौरवास । मनोभावें करिती ॥५७॥
तैशाच अक्कूताई मनेराजुरीकर । करिती हरिकीर्तन गजर । मामांच्यावरी भक्ती फार । कीर्तनी वर्णिती ॥५८॥
ऐसे हे ओघ गंगेचे । पसरले कीर्तनाचे । घरोघरी त्याचे । कोंतुकची होई ॥५९॥
सत्ता सद्गुरुंची वरती । देशपांडे अक्कूताई ज्ञानेश्वरी सांगती । असो नमस्कार चरणा प्रती । सद्गुरुंच्या ॥६०॥
निमित्त मात्र इतर जन । सद्गुरु करविती कार्य आपण । ही अंतरीं राहता खूण । अखिल जीवन कृतार्थ होय ॥६१॥
त्यांच्या कृपेवीण काय बोलावे । हे न कळेचि स्वभावे । आणि कळ फिरता व्हावे । वक्ता दशसहस्त्रेषु ॥६२॥
नामामृत कर्णोपकर्णी । शिरावे सर्वांच्या म्हणुनी । व्याप केला सद्गुरुंनी । तो झाला सफळ ॥६३॥
माई दांडेकर पालघरी । करिती कीर्तन विठ्ठल मंदिरी । आशिर्वाद मामांचा त्यांच्यावरी । म्हणोनिया ॥६४॥
ऐसा कीर्तनाचा महिमा । वाढला त्या नाही सीमा । म्हणोनी सर्वांना मामा । प्रिय झाले ॥६५॥
मामा करिती कीर्तन गजर । आणि सगळे श्रोते साथीदार । ऐसा कोठे प्रकार । ऐकिला का हो कोणी ॥६६॥
परी येथे दृश्य ऐसे । मामांना नाठवे ऐसे जेव्हां दिसे । तेव्हां श्रोते सुचविती पद योग्य से । जे मामांच्या मनीं ॥६७॥
संतोष मामाना । आणि प्रिय श्रोत्यांना । प्रेमभरे डोलती माना । सर्वांच्या ॥६८॥
प्रतिवर्षी हनुमंत षष्ठीला । मामा समाधींत जाती कीर्तनाला । सेवा सद्गुरु चरणाला । अर्पावया ॥६९॥
तोही नेम अखंड चाले । जरी शरीर विकल झाले । आणि प्रारब्धाचे घाले आले । शरीरावरी ॥७०॥
सहा दिवस कीर्तन । दिले समाधीत नेमून । जणू मामांचे सिंहासन । मानाचे ते ॥७१॥
ऐसे गंगाधरराव सिंग । बोलले वाणी अभंग । ज्यांनी समाधिसेवेस अंग । झिजविले आपुले ॥७२॥
मामा कीर्तन करिती । आणि श्रीहनुमंत डोलती । सेवेचे मोल चित्ती । धरोनिया ॥७३॥
मामा सशरीरीं अशरीर । देहीं विदेहीपण भोगणार । म्हणोनि नेम खडतर । चालें मामांचा ॥७४॥
ऐसे दिवस चालले । तो काळाचे माप भरले । लोक म्हणो लागले । मामा दिसती अशक्त ॥७५।
सीता रामाची प्रियपत्नी । करी मामांची सेवा आवर्जुनी । प्रेमभाव मनीं ठेऊनी । जपे मामाना ॥७६॥
ममा अति नेमस्त । मोजकेच घास घेत । तव सून म्हणे मनांत । शक्ति टिकेल कैसी ॥७७॥
अन्नमय हे शरीर अन्नाशिवाय । कैसा आधार । आणि मामा अंथरुणावर । आतां काय उपाय ॥७८॥
मग ती काय करी । एक एक घास मोठा भरी । आता शक्ती टिकेल बरी । म्हणे मनाशी आपुल्या ॥७९॥
तिचा सद्भाव ओळखून । मामा होती प्रसन्न वदन । म्हणती सून युक्तिवान । असे मोठी ॥८०॥
चार नातू मामांचे लडिवाळ । चंद्र सुर्य अनल अनिल । खेळ सोडून कीर्तनांत ताल । धरिती मामांच्या ॥८१॥
अनंतातून गोविंद आला । आत्माराम पुत्र शोभला । इडा पिंगला सुषुम्नांचा संगम झाला । तो चौथा नातू अनिल ॥८२॥
सूर्य एके दिवशी म्हणें मामांना । मज कांहीं सांगा उपासना । करावे नामस्मरण हे मना । येई माझ्या ॥८३॥
तुम्हीच करावे मार्गदर्शन । ऐसे सांगे माझें मन । त्याची इच्छा परिपूर्ण । केली मामांनी ॥८४॥
बालक म्हणोन उपेक्षिले । ऐसे मामांनी कधी न केले । लहान थोरांचे सदा केलें । परम कल्याण ॥८५॥
जो जो भक्तिभावे आला । आणि मामांच्या चरणीं लागला । त्याला सरता केला । परामार्थ पंथी ॥८६॥
कोणी संसार दु:खासाठीं । कोणी परमार्थ लाभासाठीं । कोणी संकट विमोचनासाठीं । घे भेटी मामांची ॥८७॥
नामस्मरण औषधराज । पुरवी मनीचे सर्व काज । मार्ग दाखवी सहज । कैवल्याचा ॥८८॥
श्रीतुकारामांचे बारा । प्रसाद अभंग पाठकरा । नित्यनेमें उच्चारा । तोही लाभ मोठा ॥८९॥
जो अर्थ तेथीचा । तो जरीं ठसेल कायमचा । तरी शेवट संसार दु:खाचा । सहजचि आहे ॥९०॥
ऐसे मार्गदर्शन मोंलाचे । होते मामांचे । म्हणोनि लक्ष लोकांचे । वेधले मामांच्याकडे ॥९१॥
मामा एक थोर अधिकारी । लोक उठले जयजयकारी । कोणी सत्कारासाठीं त्वरा करी । परी मामा अढळ ॥९२॥
ध्वजा तोरणे उभारावी । थोर मंडळी बोलवावी । सभा सत्काराची करावी । धमाल मोठी ॥९३॥
भास्कर दत्तात्रय लिमये । यांच्या मनांस ऐसेच ये । म्हणोनि आदरे करिती जा ये । मामांच्या घरीं ॥९४॥
प्रसंग साधून गीता जयंतीचा । लिमये ठाव घेती मामांच्या मनाचा । म्हणती हट्ट पुरवावयाचा । तुम्ही हा ॥९५॥
आम्ही तुमचा गौरव करावा । हा विचार आमुचा बरवा । गीता जयंतीचा व्हावा । दिवस निमित्त मात्र ॥९६॥
मामा म्हणती ऐका म्हणणें । जरी समारंभ असेल करणे । तरी नामस्मरणास बसू एकत्रपणें । करुं आरती शेवटीं ॥९७॥
दिवस गीता जयंतीचा । हाच खरा मोलाचा । घेऊ लाभ भगवत्प्रसादाचा । सर्वजण ॥९८॥
हाच थोर समारंभ । जो जीवन्मुक्तीच्या कार्याचा आरंभ । सोडोनि दर्प आणि दंभ । स्थिर रहावे साधनी ॥९९॥
मी देवाची सेवा करितो । सेवेचा गौरव काय तो । म्हणोन म्हणतो । हे विघ्न कशासाठीं ॥१००॥
करणें आहे गीताजयंती । तरी वाढवावी गातेची महती । मज सामान्याची कशास कीर्ती । त्या ठिकाणीं ॥१०१॥
सत्काराचा बेत रद्द करुन । दिले मामांना अध्यक्षस्थान । त्यांच्या गुणगौरवपर भाषण । एकेकानी केले ॥१०२॥
समारंभ झाला कीर्तन मंदिरीं । वासुदेवराज जोशी यांचे घरीं । दुधाची तहान ताकावरी । भागविली भक्तांनी ॥१०३॥
समारंभ ग्रंथ प्रकाशनाचे । झाले मामांच्या घरीं महत्वाचे । वैभव त्या समयाचे । अवर्णनीय ॥१०४॥
श्रीहनुमत्गुरुचरित्र सार । हा मामांचा ग्रंथ थोर । लहान त्याचा आकार । परी साधन मार्ग विशद केला ॥१०५॥
श्रीदादासाहेबांचे हस्ते झाला । प्रकाशन समारंभ भला । वंदनीय पूजनीय झाला । म्हणती ग्रंथ ॥१०६॥
श्रीज्ञानदेव तहत्तिसी । त्याची महती वर्णू कैशी । जो झोंबेल अर्थाशी । ऐसा श्रोता दुर्लभ ॥१०७॥
राम त्यावरी टीका करी । ग्रंथ गर्भीचा अर्थ स्पष्ट करी । प्रकाशन समारंभाची सरी । वर्णिता नये ॥१०८॥
श्रीगुरुसिद्दाप्पा अध्यक्षस्थानी । आनंदे ग्रंथ प्रकाशन करुनी । लाभ भाविक श्रोत्यांनी । घेतला त्याचा ॥१०९॥
श्री काकासाहेब तुळपुळे म्हणती । ग्रंथ मूळ अवघड किती । त्याचा अर्थ यावया चित्ती । ही टीका उद्बोधक ॥११०॥
वासुदेवआण्णा कामत । अपरोक्ष ज्ञान साक्षात्कार ग्रंथ लिहीत । ग्रंथ त्यांचा सर्व संमत । प्रसादवाणी कामतांची ॥१११॥
मामांच्या आशिर्वादे प्रकाशन । व्हावे ही इच्छा धरुन । मामांच्या घरी समारंभ करुन । हेतू त्यांनी साधीला ॥११२॥
संत सज्जनांचे अंत:करणीं । मामा राहिले वास करुनी । सुख मिळे सुखालागूनी । लाटा गगनीं उसळती ॥११३॥
कीर्तिध्वज फडके डौलानें । सुखवीत राहिला सज्जनांची मने । या परते भाग्य इच्छिणे । काय आहे ॥११४॥
परी रोग करिती विकल काया । चिंता सर्वांच्या हृदया । लोक म्हणती रघुराया । तूंचि एक आधार आता ॥११५॥
आधाराशिवाय बसणें । आधाराशिवाय उठणें । खाणे पिणे जेवणे । सारेचि झाले अवघड ॥११६॥
आधी एक वृध्दावस्था । त्यावरी रोग चालविती सत्ता । चौफेर हल्ला होता । काय चालेल शरीराचें ॥११७॥
मामा मोठया धीराचे । अति थोर आत्मबल त्यांचे । घाव सोशिती प्रारब्धाचें । सुहास्य वदने ॥११८॥
शरीराची अधोगती । तरीही नित्यनेम नेटे चालती । समाधान चेहर्‍यावरती । लोक होती विस्मीत ॥११९॥
दिवस आला राम नवमी । म्हणती उठून कीर्तन करीन मी । कोण ही उत्साहाची उर्मी । कोण विसर हा शरीराचा ॥१२०॥
अंगी ताप सणाणे । तरीही कीर्तनास उठून बसणे । उत्साहे रंगणे । नामसंकीर्तनी ॥१२१॥
हे प्रेम रघुरायाचे । हे आकर्षण नित्यनेमाचे । हे वेड भजनाचे । कोठे दिसेल सांगा ॥१२२॥
अंतरीची जागरुकता । दाखवावया जगता । ही बाह्य नेमांची कठोरता । अंगिकारिली मामानी ॥१२३॥
ते जरी आत्मस्वरुपीं राहते । तरी शरीर काय त्यांना कष्ट देते । परी जडजीवांचे उध्दारकर्ते । न लेखिती शरीर कष्ट ॥१२४॥
प्रारब्धाचा घाला शरीरावरी । परी मामा दिसती सदैव बाहेरी । सत्ता चालविती काळावरी । सस्मित वदने । १२५॥
आता त्रितप महोत्सवाच्या । नौबती झडू लागल्या भाग्याच्या । पताका धवल यशाच्या । फडकल्या डौलानें ॥१२६॥
गावोगावीचे संत सज्जन । प्रांतोप्रांतीचे श्रेष्ठ जन । आतुर घेण्या शुभ दर्शन । मामांचे ॥१२७॥
त्यांना त्रिताप महोत्सव ही पर्वणी । म्हणती आता चुकवू नका कोणी । चला जाऊ झणी । सांगलीला ॥१२८॥
निमंत्रणे त्रितप महोत्सवाची । लिहून धाडिली प्रेमाची । ती झाली अनंत पटीची । कल्पना न करवे ॥१२९॥
निमंत्रण पोचले एकाला । तो ते पाठवी दुसर्‍याला । तो तिसराहि म्हणे चला । सांगलीस जाऊ ॥१३०॥
आहो या संत दर्शनाला । कोण विचारातो निमंत्रणाला । चला जाऊ सुक्षेत्राला । शांतवाया मन ॥१३१॥
कोण जाणे कोण वेळ । चला हेच शुभमंगल । कान डोळे निवतील । संत दर्शनें ॥१३२॥
जातीभेद मावळले । पक्षोपपक्ष थंडावले । ज्यांच्या त्यांच्या हृदयांत शिरले । मामा त्यांचे ॥१३३॥
श्रीराम जयराम जयजयराम । हाचि जीवासि आराम । उत्सवाचा अनुपम । आनंद लुटू ॥१३४॥
अशीं प्रेरणा किती एकांना । अनोळखीही माणसांना । कैशी झाली पहाना । याच वेळीं ॥१३५॥
श्रीराम सुचवी अंतरात । ज्याच्या त्याच्या मनांत । दिवस होतसे अस्तंगत । आता सुवेळ दवडू नका ॥१३६॥
नातरी कष्टी व्हाल । संत दर्शनी अंतराल । भाग्य हातचे जाईल । काळ मोठा खडतर ॥१३७॥
उभारिली पताका तोरणे । लोक जमले आनंदानें । ऐकती कीर्तन प्रवचनें । करिती घोष नामाचा ॥१३८॥
कैसे ईश्वराचे सुत्र फिरे । तो कोणाच्या बुध्दीत कसा शिरे । झाले अघटितचि सारे । यावेळी ॥१३९॥
काडसिध्द पीठ मूळ । या सांप्रदायाचे प्रबळ । तेथेही फिरली कळ । अलौकिक झाले ॥१४०॥
त्यांना कळले कोणाकडुनी । कीं सांगलीस एक नाम संकीर्तनी । नित्यनेमे रमले प्रतिदनी । झाली वर्षे छत्तीस ॥१४१॥
आनंदे फुललें अंत:करण । आले कामे बाजूस सारुन । संत तेथेच संतजन । हे सूत्र ईश्वराचे ॥१४२॥
प्रेरणा झाली ईश्वराची । तेथे मात्रा न चले लौकीकाची । लाट उसळली आनंदाची । आले काडसिध्द महाराज ॥१४३॥
प्रसाद ईश्वराचा । आशिर्वाद पीठाचा । घेऊन सांगलींचा । मार्ग श्रींनी धरिला ॥१४४॥
उफाळला महासागर । मग वेग कैसा आवरणार । आनंदी आनंद थोर । प्रसन्नता साकारली ॥१४५॥
महारांजांची आणि मामांची । दृष्टादृष्ट होता उभयतांची । दाटी झाली प्रेमाश्रूंची । सुख भेटले सुखाला ॥१४६॥
मूळपीठ सद्गुरुचरण । मामा घालती लोटांगण । प्रेमभरे आलिंगन । अवर्णनीय सुखसोहळा ॥१४७॥
श्रीराम सिंहासनी । आणि संत भेटती संतालागूनी । हे दृष्या पाहिले मी नयनी । सुखावलो सुखावलो ॥१४८॥
आनंद झाला महाराजांना । तो त्यांना शब्दाने बोलवेना । परी कळले लोकांना । हे अबोल बोल ॥१४९॥
शब्दांची धाव किती । हे सौख्यचि अनुपमेय जगती । शब्दा आधी शिरे चित्ती । चाकाटे मन एक सरे ॥१५०॥
सद्गदित अंत:करण । महाराज बोलती प्रसादवचन । जेणे संतोषले मन । श्रोत्यांचे ॥१५१॥
“अनेक गांवें आलो फरुन । परी कोठें न रमले माझे मन । या कीर्तन गंगेत स्नान । करीता धाले पित्त माझे ॥१५२॥
अखंड ध्यास परमार्थाचा । वीट मानोन संसाराचा रंग उसळे जो ईशप्रसादाचा । पाहोन संतोषलो ॥१५३॥
संसार करावा नेटका । परी तो कुचका आणि मोडका । तो झाला येथे फिका । दिसतो मज ॥१५४॥
सात्विक भाव मनीं उठतीं । आदरे मस्तक लवती । थोर पुण्याची महती । ऐसे मामांचे दर्शन ॥१५५॥
धन्य भाग्य सांगलीचे । म्हणोन वास्तव्य संतांचें । आणि स्थान विश्रांतिचे । आल्या गेल्या ॥१५६॥
महाराजांची मधुर वाणी । पडली ज्यांच्या ज्यांच्या कर्णी । हृदय उचंबळे आनंदुनी । त्यांचे त्यांचे ॥१५७॥
प्रेम संतांचे । असे नि:स्वार्थ बुध्दींचे । म्हणोनि भरते ये आनंदाचे । त्या मोलचि नसे ॥१५८॥
निर्व्याज प्रेम संत करिती । म्हणोनि तेथे देवही डोलती । त्या भक्तिप्रेमांत आनंद किती । कोण सांगू शकेल ॥१५९॥

मच्चित्ता मद्गत: प्राणा: बोधयंत: परस्परम् ।
कथयंतश्च मां नित्य तुष्यंतिच रमंचित ॥भ.गी.॥

ज्यांनी अंत:करण आपुले । ईश्वरास अर्पण केले । बोधमय जीवन झाले । त्यांचे सर्वांसी ॥१६०॥
सांडून विषयाची चिंता । ज्यांनी देवचि आणिला चित्ता । सदासर्वदा देवाचीच वार्ता । मनोभावे करिती ॥१६१॥
ज्यांच्या अंतरीं भगवंत । जागा असे सतत । ऐसे सज्जन भाग्यवंत । परस्परे भेटती ॥१६२॥
महोत्सवी जमती । अध्यात्माची देवाण घेवाण करिती । देवचि देती देवचि घेती । सौख्यभरे ॥१६३॥
नाहींत देवावींण गोष्टीं । म्हणोन तेथे स्वानंदाची पुष्टी । यासाठीं हे समारंभ दृष्टी । सदा पहावे ॥१६४॥
मामा होवोन अधिष्ठान । करिती संतांचे संमेलन । आम्ही उपकृत जन । सदा मामांचें ॥१६५॥
श्री हरेराम बोडस । ज्यांची वस्ती मिरजेस । प्रेमे योवोन सांगलीस । या महोत्सवी ॥१६६॥
बोल बोलती सर्वांच्या मनीचे । उपर्युक्त श्लोकाधारे साचे । ज्या गीता वचनी मामांचे । जीवनसार असे ॥१६७॥
सोडोन मामांनी प्रेमाचे पाश । आकर्षिले संत सज्जन सावकाश । म्हणोनि मतिप्रकाश । आम्हा सामान्यासी ॥१६८॥
कोठवर मानू उपकार । काहीं न चले विचार । म्हणोनि मौनींचे नमस्कार । असो मामांच्या चरणी ॥१६९॥
गुरुतृतीया कथा संकलित । केशवराव आपटे त्वरीत । करिती तो समग्र वृत्तांत । नाना जोगळेकर प्रकाशती ॥१७०॥
हेचि सखारामपंत जोगळेकर । उत्सवासाठीं सदा तत्पर । तनमनधन समग्र । सेवेसांठीं अर्पिती ॥१७१॥
केशवराव नानांच्या नात्याचे । आणि सेवाव्रत तसेच त्यांचे । विदयाविभूषित परी अहंतेचे । नांव नसे ॥१७२॥
अध्यात्माची तळमळ । गुरुसेवेस अर्पिले मन सकळ । तेचि परम मंगल । जीवाचे मानिती ॥१७३॥
गणपतराव कानिटकर । हेहि सेवेस अतितत्पर । राबती प्रहरो प्रहर । उत्सवासाठीं ॥१७४॥
प्रेमळ त्यांचा स्वभाव । आपुला मानोन उत्सव । मामांच्यासाठी जीवभाव । ओवाळती ॥१७५॥
व्यवस्था समारंभाची । निर्भर त्यांच्यावरी सदाची । ‘दमलो’ या शब्दाची । जेथे सदावाण ॥१७६॥।
आणीक कीती एकजण । वेचती उत्सवासाठीं जीवप्राण । त्यांचे करु जाता वर्णन । ग्रंथ अति विस्तारेल ॥१७७॥
बर्वे बुक्का लाविती । लाखेंबुवा तबल्यावरती । बलगवडेकर सुरेल गाती । अभंग श्रीतुकारामांचे ॥१७८॥
अढळ निष्ठा मामांच्यावरी । ही खूण सर्वांच्या अंतरी । प्रेमबंधनें बळकट सारी । या निष्ठेपायी ॥१७९॥
श्रम बुध्दी इच्छा आणि पैसा । लागे येथें सत्कार्यी कसा । पहा, म्हणोनि भरवंसा । सुखाचा मिळे सर्वांसी ॥१८०॥
वाटे सद्भावना मूर्तिमंत । वावरे येथें सतत । म्हणोनि उबग न मानी येथ । कोणी कामाचा ॥१८१॥
उत्साहाचे भरते । आणि उत्सव गौरवाते । म्हणोनि लहान थोराते । हें स्थान प्रिय झाले ॥१८२॥

सततं कीर्तयंतोमां यतंतश्च दृष्टव्रत: ।
नमस्यंतश्च मां भक्त्या नित्य युक्ता उपासते ॥भ.गी.॥

सदा रत नाम स्मरणीं । अविश्रम व्रत आचरणी । सर्वांभूती नम्र होवोनि । वागती जे ॥१८३॥
ते माझे खरे उपासक । मज त्यांची सदा जवळीक । भाव भक्तीचे पीक । अलौकीक येई येथें ॥१८४॥
हा मामांच्या जीवनाचा आलेख । भगवद्गीतेत सुरेख । सापडे त्यांचा हारिख । होवोन फार ॥१८५॥
संतश्री फुटाणे महाराज । साधिती मामांच्या गुणगौरवाचे काज । त्यांच्या प्रवचनाची मौज । लुटती भाविक ॥१८६॥
वाटे ईश्वरासी झाला आनंद । तो झाला मनी सद्गद । म्हणोनि उमलले मुखारविंद । हर एकाचे ॥१८७॥
पांचा मुखीं परमेश्वर । करी भक्त स्तवनाचा गजर । दुमदुमले नगर । मामांच्या कीर्तीनें ॥१८८॥
वहावया भाव फुलांची ओंजळ एक । आले त्यांचे शिष्य अनेक । मामा होते शाळेंत शिक्षक । म्हणोनिया ॥१८९॥
त्यांत एक देशमूख वकिल । बोलती अंतरीच्या तळमळीचे बोल । ते शब्द रुजती खोल । हृदयीं श्रोत्यांच्या ॥१९०॥
“आस सोडून संसाराची । ज्यांनी नोकरी घालविली सुखाची । संसाराच्या अडीअडचणींची । तमा न केली ॥१९१॥
भाव ठेवून ईश्वरावर । केला कीर्तनाचा गजर । निंदा स्तुतीचे थेर चालू न दिले ॥१९२॥
ज्या मार्गांनी संत गेले । तेच त्यांनी चोखाळले । विषय सुखास मुरडले । एकदाच मागे ॥१९३॥
ऐसे संत श्रेष्ठ शिक्षक । लाभले आम्हास वेचक । अतुलनीय भाग्य एक । आमचेअसे” ॥१९४॥
थोर चारित्र्याचा प्रभाव । विदयार्थ्यांचा बदले स्वभाव । जरी बंडखोर तरीही सदैव । नम्र राहती ॥१९५॥
एकदां एका वर्गात । मुले होती दंगा करीत । टोप्या घेऊन हातात । गडबड करिती ॥११६॥
कोणी शिक्षक त्यांना । बाहेरुनच करिती सूचना । अरे टोप्या डोक्याला घालाना । थांबवा गडबड ॥१९७॥
तोच मामा शिरले वर्गात । तव मुले झाली चकित । टोप्या डोक्यावर चढल्या त्वरित । न सांगता ॥१९८॥
ऐसा सद्भाव विदयार्थ्यांचा । सतत असे ॥१९९॥
रामभाऊ रानडे म्हणती ही परमार्थी शाळा । हा भावचि दिसे आगळा । ऐसा सद्भाव झाला गोळा । मामांच्या भोवती ॥२००॥
त्यांचे विदयार्थी चढले मान्यतेला । तरीही मामांच्यावरी आदर भला । विदयार्थ्यांच्या चित्ती राहिला । प्रभाव चारित्र्याचा ॥२०१॥
देवधर वकिल । जरंडीकर ही अभ्यासू सखोल । राजाभाऊ ओंजळ । अर्पिती भाव फुलांची ॥२०२॥
सोडली शिक्षकाची नोकरी । परी शिक्षक जिवंत राहिला अंतरी । परमार्थाची पाठशाळा घरीं । सुरु केली ॥२०३॥
अध्यात्माचे कोठार उघडले । ज्ञानसत्र खुले केले । परतली लक्ष्मीं परी उमटली पाऊले । श्री विष्णूची द्वारी ॥२०४॥
घरी हीच पाठशाळा । साधनाची प्रयोगशाळा । ज्याचा बाजारी न बोलबाला । ऐकू येई ॥२०५॥
येथील मामा प्रमुख शिक्षक । अभ्यासू साधक जमती अनेक । मन करोनि नि:शंक । रमती साधनीं ॥२०६॥
श्रवण मनन कीर्तन । अखंड चालले साधन । मामांचे एकांत चिंतन । सदा चाले ॥२०७॥
चिंतनाचा परिपाक । अभंग जाहले अनेक । प्रबुध्द होण्या साधक । मामा रचिती ॥२०८॥
द्विसहस्त्र रचना झाली । जेणे साधकांची सोय झाली । अपरिमित प्रमेये उलगडली । जी कूट आणि अवघड ॥२०९॥
एका नामस्मरणावाचून । अन्य न वेचिती विचार धन । सांधकांच्या अडचणी दूर सारुन । सुखसंपन्न त्यांना करिती ॥२१०॥
अभंगसागर मामांचा । तो ठेवा अति मोलाचा । आरसा मामांच्या अध्यात्मजीवनाचा । जणू आत्मचरित्र त्यांचे ॥२११॥
अचूक व्हावया मार्गदर्शन । अचूक रहावया अनुसंधान । अचूक घडावया साधन । अभंगवाणीं श्रवण करा ॥२१२॥
अखंड मामांचे कीर्तन । साधकांनी ऐकावे अनुदिन । त्यांच्या अभंगाचे श्रवण । हे कीर्तनासी उणे नसे ॥२१३॥
प्रासादीक मेवा मामांचा । हा ठेवा अभंगाचा । तरणोपाय उध्दाराचा । भवसागरातुनी ॥२१४॥
अखंड मामांचे कीर्तन चालले । या अभंगातून भले । ऐसे प्रासादिक काव्य आगळे । मामांचे ॥२१५॥
असो येणे परी त्रिपत महोत्सव । गाजला गांवोगांव । संदेशही आले अभिनव । किती एकांचे ॥२१६॥
मामांची अमोल ईश्वर सेवा । संतजन करिती वाहवा । ऐसा हा बहुमोल ठेवा । भक्तासांठीं ॥२१७॥
खडतर तप आचरिले । सुगंधे अंतरंग दरवळले । भक्तांनी हात जोडले । मामांच्या पुढें ॥२१८॥
मामा तुम्ही मार्ग सांगता । परी या न दिसती येरा गबाळांच्या गप्पा । दृढ निश्यचीच अपापा । स्थिर राहील मार्गावरी ॥२१९॥
आमुचा एक पाय संसारी । आणि दुसरा तुमच्या दारी । याचेनि आमुची परी । कैसी होईल ॥२२०॥
संसाराचे अनेक चटके । सोसून तुमचे पाय देखिले कौतुके । जेणे संसार यात्रा कैशी चुके । हे कळले ॥२२१॥
जरी आम्हा आहे संसारी परतणे । जिणे येथील लाजिरवाणे । हे जीवन दैन्यवाणे । सुटेल केव्हा ॥१२२॥
सद्गुरुंचे निवास स्थान । सदा असावे अंत:करण । एवढें दयावे वरदान । आम्हासि आता ॥२२३॥
स्मरण सद्गुरुंचे राहील । तरीच तरणोपाय दिसेल । भव सागरांतून निघेल । नांव आमुची ॥२२४॥
ठेऊ मस्तक चरणावर । करु गोविंद नाम गजर । मति वळवावी सत्वर । आमुची परमार्थी ॥२२५॥
प्रेमे आशिर्वाद दयावा । तोचि आम्हास विसावा । निज सौख्याचा ठेवा । आमुचा तो ॥२२६॥
संपता त्रितप महोत्सव । सुखस्मृतीची घेऊन ठेव । सुजन परतले गांवोगांव । प्रसन्न हृदये ॥२२७॥
मामा म्हणती प्रिय पुत्राला । आपल्या रामाला । ऐक माझ्या बोलाला । तू एकचित्ते ॥२२८॥
जन्मापासोनि आजवरी । जी जी इच्छा केली बरी । ती सद्गुरुकृपेनें खरी । पूर्ण झाली ॥२२९॥
पावलो पूर्ण समाधान । धाले माझे मन । कांही न घडले न्यून । या संसारी ॥२३०॥
श्री ज्ञानेश्वर माऊली । केली मज कृपेची साऊली । हौस माझी पुरविली । परमार्थाची ॥२३१॥
आता तू एक करी । चालीव कीर्तन परंपरा खरी । हीच एक आस ऊरी । माझ्या असे ॥२३२॥
विकल झाली माझी काया । स्वस्थचित्ते आळवीन रघुराया । त्तू चालीव नियमा या । मी पाहीन कौतुक तुझे ॥२३३॥
वर्ष दोन वर्ष पाहूदे । तुझे कीर्तन मज ऐकूदे । ऐसे माझे वदे । मन मला ॥२३४॥
मधुर शब्द मामांचे । परी काळीज भेदीत गेले रामाचे । शब्द न फुटती वाचे । मामा मनीं सद्गद ॥२३५॥
चित्त त्याचे हेलावले । म्हणे हे काय मामा बोलले । म्हणोनि विनीत भावे बोले । उत्तर मामांना ॥२३६॥
“मामा तुमचे किर्तन ऐकता । अजून तृप्ती न माझ्या चित्ता । म्हणोन व्याकुळता । ये माझ्या मनासी ॥२३७॥
माझ्या सारखे कितीतरी । भुकेले असतील अंतरी । त्यांना संधी मिळाली बरी । कीतन श्रवणाची ॥२३८॥
म्हणोन ऐसे न करावे । कीर्तन ऐसेच चालवावे । थोडे फार हे न घ्यावे । मनामध्ये ॥२३९॥
जेवढी शक्ति तुंम्हासी । तेवढे चालवावे नेमासी । मी आहे मदतीसी सर्वकाळ ॥२४०॥
जरी न मानेल प्रकृतीसी । तरी चालवीन नेमासी । परी अंतरु तुमचा मधुर वचनासी । ऐसे करुं नका ॥२४१॥
पुन्हा कृत निश्चय मामांचा । आमरण कीर्तन चालविण्याचा । हा प्रसाद राम सूचनेचा । लाभला सर्वांना ॥२४२॥
आता सांप्रदाय महेश्वर । आणि संत मंडळी थोर थोर । जीवनाचा अस्त जाणोन सत्वर । पाचारितील भेटीसाठीं ॥२४३॥
अति सुरम्य ते वर्णन । निवतील नयन आणि कान । महापुण्य़पीठाचे दर्शन । मनो मार्गे ॥२४४॥

इतिश्री गोविंचचरितमानस । जे स्वभावेचि अतिसुरस । जेथें अखंड उसळेल भक्त्तिरस । त्रिपत महोत्सव वर्णन नाम नवम अध्याय ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP