श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय २
श्रीकल्हळिवेंकटेश
॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥
वैकुंठवासी कमलाकांत ॥ कर्तुं अकर्तुं समर्थ ॥ ज्यासि नसे आदिमध्यांत ॥ जो का अनंत परब्रह्म ॥१॥
दिक्पालादिक सुरवर ॥ यक्षराक्षस किन्नर ॥ नारदादि योगेश्वर ॥ विदयाधर स्तविती जया ॥२॥
अखंड प्रभुची दिव्यकीर्ती ॥ भरुनि राहिली त्रिजगतीं ॥ वर्णावया कवणा शक्ती ॥ नेतिनेति वदती वेद चारी ॥३॥
देवताविनवणी परिसून ॥ वेंकटाद्रिवरती जाण ॥ अवतरले ते जगज्जीवन ॥ भक्तजन तारावया ॥४॥
नाम धरिलें वेंकटपति ॥ निजजन जें जें इच्छिति ॥ तें तें पुरवावया निश्चितीं ॥ स्वयें जाती धांवोनियां ॥५॥
याही कलियुगांत ॥ भक्तवत्सल भगवंत ॥ होवोनियां कृपावंत ॥ भक्त अनंत उध्दरिले ॥६॥
शेषाचल सोडून ॥ कल्हळीगिरीवर जाण ॥ आले सुप्रसन्न होऊन ॥ भक्तां दर्शन दयावया ॥७॥
ती कथा परम पावन ॥ कलिमलमृगा पंचानन ॥ त्रिविधतापातें करी हनन ॥ केलिया श्रवण तें ऐका ॥८॥
हिंदु लोकांचें वसतिस्थान ॥ ह्मणून ह्मणती हिंदुस्थान ॥ तयांत दक्षिणमहाराष्ट्र जाण ॥ असे पावन देश तो ॥९॥
तया देशामाझारीं ॥ संवदत्ति नामें नगरी ॥ असे तयाचे शेजारीं ॥ लहान पुरी अमरगोळ ॥१०॥
रेणुकादेवी नामें देवता ॥ परशुरामाची ते जनितां ॥ वसतसे तेथें तत्वतां ॥ निज सुभक्ता उध्दरी ॥११॥
जगदयल्लमा म्हणोन ॥ भक्त वंदिती प्रेमेंकरोन ॥ यात्रा भरते चहूंकडोन ॥ अतिरिक्त जाण दर्शनासी ॥१२॥
या देवीची सुकीर्ती ॥ भरली असे जगतीं ॥ स्वभक्तजनांच्या कांति ॥ पूर्ण करी ती यल्लमा ॥१३॥
रेणुका सतीचे अनंत भक्त ॥ नागणैया नामें एक तयांत ॥ असे तयाची रडडीजात ॥ जवळिल खेडयांत रहातसे ॥१४॥
जो स्वधर्माचरणीं रत ॥ न वदे कदा अनृत ॥ देखोनियां साधुसंत ॥ तेविं द्विजांप्रत नमन करी ॥१५॥
नित्य उष:कालीं उठोन ॥ कूपीं करोनियां स्नान ॥ रेणुकादेवि-अर्चन ॥ करोनी चरण वंदितसे ॥१६॥
तयाचें आराध्यदैवत ॥ वेंकटपति शेषाद्रिनाथ ॥ जो वैकुंठपति कमलाकांत ॥ दयावंत शेषशाई ॥१७॥
वेंकटेश गोविंद नारायण ॥ स्वामी गिरीश रमारमण ॥ ऐसें सदा नामस्मरण ॥ रात्रंदिन करीतसे ॥१८॥
नवविधा भक्ति जाण ॥ ध्यानधारणादि करोन ॥ अंत्यजादि मूढां कारण ॥ नामस्मरण सत्य हें ॥१९॥
नको सोंवळें नको स्नान ॥ नको तप नको दान ॥ नको शुध्दि नको आसन ॥ पंचाग्निसाधन नको तें ॥२०॥
नको यात्रा नको काशी ॥ देवतीर्थें नामापाशीं ॥ वसती कीं अहर्निशीं ॥ पापविनाशी नाम एक ॥२१॥
नाहीं वेळेची ऊर्ता ॥ जातां येतां उठतां बसतां ॥ खातांपितां निद्रा घेतां ॥ घ्यावें तत्वतां सत्यनाम ॥२२॥
धातुमूर्तीस वहिलें ॥ नामेंच देवपण आलें ॥ भवभयादि पळाले ॥ नामेंच सगळे साधकाचे ॥२३॥
वेदांच्या प्रति वर्णात ॥ नाम भरलें असे निश्चित ॥ ऐशा श्रुति बोलतात ॥ नव्हेच असत्य जाण पां ॥२४॥
वाल्हया जाला वाल्मिक ॥ ध्रुव पावे वैकुंठलोक ॥ अजामिळगणकादि अनेक ॥ नामेंचि देख उध्दरिले ॥२५॥
कामक्रोधादि अष्टक ॥ दु:खदारिद्रयभयशोक ॥ दुष्टवासनादयनेक ॥ सर्वां संहारक एक नाम ॥२६॥
नाममहिमा अपार ॥ न जाणति ब्रह्मादि सुरवर ॥ पंचवदन परमेश्वर ॥ गिरिजावर एक जाणे ॥२७॥
असो प्रतिवत्सरीं आश्विनमासीं ॥ भावें जाई गिरीशीं ॥ न चुकोदें सुखराशी ॥ वेंकटेशासी नमावया ॥२८॥
तेथील तीर्थप्रसाद आणून ॥ अन्य भक्तांलागीं देऊन ॥ कसेंबसें उदरपोषण ॥ आनंद मानून करीतसे ॥२९॥
एवं द्विपंचविंशति ॥ वर्षें क्रमिलीं निश्चितीं ॥ वृध्दत्व आलें तया पुढती ॥ नागणैयाप्रति तेधवां ॥३०॥
तरी तो दृढनिश्चयाचा ॥ तसाचि जात असे साचा ॥ ऐसा देवादिदेवाचा ॥ वेंकटेशाचा निजदास ॥३१॥
कांहीं संवत्सरें अशीं लोटतां ॥ अधिकाधिक आली अशक्तता ॥ गिरीवरी जाण्याची आतां ॥ शक्ति तत्वतां न राहिली ॥३२॥
शके तेराशें सत्याऐंशी ॥ पार्थिववत्सर वरदचतुर्थी ॥ यात्रा निघाली बहुवशीं ॥ जावया गिरीशीं आनंदें ॥३३॥
तों जवळी आला आश्विन ॥ यात्रा गेली चहूंकडून ॥ ऐसें ऐकून वर्तमान ॥ झालें उद्विग्न मन तयाचें ॥३४॥
मी तों दरिद्री पामरु ॥ बहुतेकांशीं केला विचारु ॥ परि मज तेथें नेई असा उदारु ॥ एकही भक्तवरु मिळेना ॥३५॥
आज कैक हायनें जाण ॥ देवा पाहिले तव चरण ॥ आतां जाहलों शक्तिहीन ॥ तव दर्शन अंतरलें ॥३६॥
अखिल चराचरीं व्याप्ती ॥ असे तुझी बा वेंकटपति ॥ मग या दीन दासाची खरी स्थिति ॥ तव चित्तीं नये कां गोविंदा ॥३७॥
आतां कसेंही करुन ॥ न्यावें मज दयावया दर्शन ॥ वाटे संपले आयुष्यप्रमाण ॥ अंतीं तव वदन पाहूंदे ॥३८॥
तव नाम पतितपावन ॥ भक्तरक्षण ब्रीदपूर्ण ॥ धरिलें तें मज कारण ॥ दवडूं नको दातारा ॥३९॥
हे रमारमण गोविंदा ॥ भक्तवत्सला मुकुंदा ॥ पुराणपुरुषा आनंदकंदा ॥ निजजनवरदा दयानिधे ॥४०॥
स्तव करोनियां ऐसा ॥ जीवनारहित मासा जैसा ॥ तळमळत हाही तैसा ॥ जीर्ण वासावरी पहुडला ॥४१॥
ऐकोनियां भक्तस्तवन ॥ कळवळुनियां अंत:करण ॥ आले त्वरित धांऊन ॥ मनमोहन दयाळ ॥४२॥
नटले द्विजवेषधारी ॥ द्वादशनाम रेखिलें शरीरीं ॥ मेघवर्णकांति गोजिरी ॥ उष्णीष शिरीं शोभतसे ॥४३॥
वामहस्तीं धरिलें पुस्तक ॥ सव्यकरीं झारी सुरेख ॥ सुहास्यवदन देख ॥ असें सगुण मनमोहक रुप धरिलें ॥४४॥
येवोनियां स्वप्नांत ॥ स्वदासा करुनि जागृत ॥ प्रभु वदले जी कां मात ॥ देवोनियां चित्त परिसिजे ॥४५॥
बाल्यत्वादि त्रयदशा जाण ॥ प्राप्त होती सर्वांलागून ॥ वृध्दत्वें झालासि शक्तिहीन ॥ देहप्रमाण असेचि ॥४६॥
आत्मा असे अविनाशीं ॥ दशा लागति देहाशीं ॥ त्या अनित्य देहाविशीं ॥ कां खंती करिशी नागणैया ॥४७॥
सोडोनि देहाभिमान ॥ देह नाशवंत मानून ॥ मी तुज आतां सांगेन ॥ देवोनियां मन तसें करीं ॥४८॥
जमखंडीनामें प्रसिध्द नगरीं ॥ तियेपासूनि फार नसे दूरी ॥ कल्हळीनामें द्वय कोसांवरी ॥ असे एक गिरिवरी खेटक ॥४९॥
मम वचनेंकरुन ॥ रहावें तेथें जाऊन ॥ न धरितां विकल्प जाण ॥ गिरीशचिंतन करीं सदां ॥५०॥
त्या शुचिवेदगिरीवरतीं ॥ प्रगट होऊनियां तुजप्रति ॥ दर्शन देईल निश्चितीं ॥ श्रीवेंकटपति सत्यत्वें ॥५१॥
त्रिवाच उच्चार करोनि ॥ सांगतसें तुजलागुनि ॥ नसे असत्यता मम वचनिं ॥ हें तूं मनीं दृढ ठेवीं ॥५२॥
असें वदोनि प्रेमयुक्त ॥ सवें ब्राह्मण जाला गुप्त ॥ नागा होऊनि जागृत ॥
चहूंकडे पहात टकमकां ॥५३॥
ना ब्राह्मण ना कोणी दिसती ॥ आपण पडलासे वाकळेवरतीम ॥ अत्याश्चर्य मानोनियां चित्तीं ॥ बसला त्वरितगति उठोनियां ॥५४॥
मनीं वसे तें स्वप्नीं दिसे ॥ ऐसें वदती वृध्द माणसें ॥ परि स्वप्न हें खरें कीं कसें ॥ वाटलें पुसावेंसें विद्वज्जनां ॥५५॥
तसाचि उठोनि त्वरित ॥ गेला हळुहळु काठी टेंकित ॥ ब्रह्मवृंदा करोनि दंडवत ॥ स्वप्नवृत्तांत सांगतसे ॥५६॥
विचार करोनि भूदेव वदती ॥ स्वप्न पडलें तुज प्रभातीं ॥ हें असत्य नोहे कल्पांतीं ॥ ऐसी आमुची मति सांगतसे ॥५७॥
अग्रजन्मा नव्हे तो नारायण ॥ लीलाविग्रही रमारमण ॥ भक्तालागीं होऊन सगुण ॥ देऊन वरदान गुप्त जाला ॥५८॥
नागा जालासी तूं धन्य ॥ तुजसम भक्त नसेल अन्य ॥ साक्षात् येऊन भगवान ॥ स्वप्नीं दर्शन तुज दिलें ॥५९॥
कल्हळीगिरिवरी ॥ प्रत्यक्ष दर्शन जालियावरी ॥ प्रभु वेंकटेश परोपरी ॥ भक्तिपुर:सरीं पूजीं बा ॥६०॥
म्हणोनियां आतां लवकरी ॥ जावें तुवां वेदाद्रिवरी ॥ ईशाज्ञा वंदूनियां शिरीं ॥ प्रस्थान सत्वरीं करावें ॥६१॥
ऐसी ऐकोनियां विप्रवाणी ॥ नागा संतोषला अंत:करणीं ॥ देवा तुझी अघटित करणी ॥ नशके सहस्त्रफणी वर्णावया ॥६२॥
मी तों अज्ञान मूढमती ॥ हें तुज ठावें बा वेंकटपति ॥ कैसी करावी प्रभुस्तुति ॥ हें नकळे मजप्रति गोविंदा ॥६३॥
मज ठावें असे एकचि ताता ॥ भक्तकल्पद्रुमा गुणवंता ॥ जातां येतां उठतां बसतां ॥ घ्यावें खातां निजतां तवनाम ॥६४॥
यापरी भावें वदत ॥ आलासे निजगृहाप्रत ॥ जावयाचा विचार करीत ॥ आनंदभरित राहिला ॥६५॥
मी तों असें द्रव्यहीन ॥ कोणी देईना मज वाहन ॥ पादचारी जावया जाण ॥ शक्ति अणुप्रमाण नसेचि ॥६६॥
न जातां राहिलों आपण ॥ तरी दिनानाथ नारायण ॥ कोपेल मजवरि पूर्ण ॥ आज्ञाउल्लंघून केविं करुं ॥६७॥
विभो पडलों अशा चिंतेंत ॥ निष्फल झाले प्रयत्न समस्त ॥ कल्हळिस न्यावया न्यावया हा अनाथ ॥ तुजवांचूनि समर्थ दिसेना ॥६८॥
हे त्रिलोकपाला गिरिधारी ॥ तव दास हा असे निराधारी ॥ आतां कळेल तैसें करीं ॥ भक्तकैवारी जनार्दना ॥६९॥
तंव कोणी सधन साहुकार ॥ संगें घेऊनियां परिवार ॥ जमखंडिवरोन जाणार ॥ गांवाबाहेर उतरलासे ॥७०॥
ऐसें ऐकतांचि श्रवणीं ॥ नागणैया जाऊन तया चरणीं ॥ नमन करुनि आपुली कहाणी ॥ दीनवाणी ऐकविली ॥७१॥
ऐकून विनययुक्त भाषण ॥ द्रवलें तयाचें अंत:करण ॥ म्हणे कां करशी कष्टी मन ॥ तुज मी नेईन निर्धारें ॥७२॥
आपुले संगति नागणैयाला ॥ तो सद्गृहस्थ घेऊन गेला ॥ कल्हळिसन्निध सोडून तयाला ॥ आपण चालला पुढारी ॥७३॥
मनीं नागणैया आनंदला ॥ वदे देवाची अघटित लीला ॥ मज येथवरी आणण्याला ॥ अनुकंपा तयाला कां यावी ॥७४॥
हा कोठील कवण ॥ ना माझी त्या ज्यानपछान ॥ असें असतां मज प्रेमेंकरुन ॥ येथवरी आणून कां सोडिलें ॥७५॥
मज वाटतें हें आश्चर्यजनित ॥ वेंकटपतीचेंच सारें कृत्य ॥ ऐसें मनामाजी भावित ॥ गेला गांवांत आनंदें ॥७६॥
तेथील ग्रामाधिकारी सज्जन ॥ याची परिस्थिति अवलोकून ॥ रहावयासी अल्प सदन ॥ प्रेमेंकरुन दीधलें ॥७७॥
तया ग्रामापासून ॥ समीप रेणुकादेवींचे भुवन ॥ असे तेथें नित्य जाऊन ॥ भावें पूजन करीतसे ॥७८॥
या परीनें वर्तत ॥ प्रभुदर्शनाची वाट पहात ॥ सदा नामस्मरण करित ॥ आनंदांत राहिला ॥७९॥
दुजा एक भक्त द्विजाति ॥ परेशदृष्टांतें नागणैयाप्रति ॥ भेटों आला निश्चिती ॥ वेदगिरिवरति प्रेमानें ॥८०॥
या द्वयभक्तार्थ नारायण ॥ धांवोनि आले गिरीहून ॥ दिधलें प्रत्यक्ष दर्शन ॥ पुढील अध्यायीं तें कथन करीतसे ॥८१॥
हरिहरांतें नमस्कार ॥ करोनि श्रोत्यां वदे सादर ॥ पुढील कथा मधुर फार ॥ करोनि मन स्थीर श्रवण करा ॥८२॥
इति द्वितीयोऽध्याय ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2021
TOP