आरती हरिहराची
श्रीकल्हळिवेंकटेश
जयदेव जयदेव जय हरिहरमूर्ती ॥ एकचि परि भक्तांस्तव रुपें बहु धरती ॥ धृ०॥
कर्पूरशुचिशंकर शोभे हरिनीला ॥ कंठीं रुंडांची स्त्रक् तुळशीची माळा ॥ अर्धांगीं हैमवती हिमनगबाला ॥ वामांकीं रुचि देते सागरजा कमला ॥ ज० ॥१॥
अवना स्वजना हरिनें गोवर्धन धरिला ॥ त्रिलोक रक्षाया शिव हालाहल प्याला ॥ असुरां मर्दुनि सुरां देती सौख्याला ॥ सुरनरकिन्नर ऋषिमुनि वंदिति पदकमला ॥ जय० ॥२॥
सोडुनि गिरिकैलास वैकुंठस्थान ॥ भक्तां संकट पडतां जातां धांवोन ॥ दिधला उपमन्यूतें क्षीरोदधि तूर्ण ॥ तेवीं ध्रुववत्सा दे शाश्वतपदपूर्ण ॥ जय० ॥३॥
वदान्यजनवरईश्वर देई स्वस्त्रीला ॥ प्रेमें भक्तांस्तव हरि दुसर्याची झाला ॥ ऐसे सुरवर हरिहर मोदद भक्ताला ॥ भक्तार्ती हरण्या करीं खड्शूल धरिला ॥ जय० ॥४॥
अघटित प्रभुची लीला अलोट गुणकीर्ती ॥ थकल्या वर्णाया श्रुति नेति नेति वदती ॥ अनन्यभावें स्तविती जे कोणी भजती ॥ इच्छा पुरवुनि अंतिं देती त्या मुक्ती ॥ जय० ॥५॥
आरति ओवाळिती भाव धरुनि चित्तीं ॥ दुस्तरभवाब्धि तरण्या सत्य होय तरि ती ॥ दामोदरसुत हरि हा विनवी दिनरातीं ॥ करोत मम जिव्हाग्रीं त्वन्नामें वसती ॥ जय० ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : March 16, 2021
TOP