श्रीकल्हळिवेंकटेश देवचरित्र - अध्याय ८

श्रीकल्हळिवेंकटेश


॥ श्रीगणेशाय नम: ॥
॥ श्रीसांबसदाशिवाय नम: ॥
॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥

॥ जयजय पुरुषोत्तमा ॥ वेदवंदया कैवल्यधामा ॥ निजजनमनविश्रामा ॥ मेघ:शामा मापते ॥१॥
जयजया श्रीनिवासा ॥ भक्तजनमानसहंसा ॥ तुज नमो जगन्निवासा ॥ जगदाभासा जगद्गुरो ॥२॥
पतितपावना नारायणा ॥ मधुसूदना त्रितापशमना ॥ त्रिविक्रमा वामना ॥ कमल लोचना श्रीहरि ॥३॥
योगयागव्रत उपोषण ॥ नको जपतप धूम्रपान ॥ नको तीव्र अनुष्ठान ॥ वायुभक्षण नकों तें ॥४॥
नको वेद-शास्त्राध्ययन ॥ नको संस्कृत शिक्षण जाण ॥ एक भक्तीचें कारण ॥ श्रीहरिचरण पहावया ॥५॥
गजेंद्र ध्रुव काय पडले ॥ कुब्जेनें काय अभ्यासिलें ॥ व्रजनारींनीं तरी काय केलें ॥ गर्वानें बुडाले पंडित ॥६॥
अनन्य भक्तीचें महिमान ॥ वर्णूं शकेल असा कोण ॥ भक्तीनेंच आकळे भगवान ॥ अन्य साधन व्यर्थ तें ॥७॥
एतद्विषयीं परम पावन ॥ कथा वदवतील हरिहर जाण ॥ तैशीच करीन कथन ॥ श्रोतेजन तोषावया ॥८॥
नरसापाचारी अयाचित ॥ नामें कोणी द्विज शुचिर्भूत ॥ षटकर्में आचरित ॥ जमखंडिनगरींत रहातसे ॥९॥
जो सदाचारसंपन्न ॥ नित्य करी वेदपठण ॥ न वदे अनृत भाषण ॥ सत्वगुणी ब्राह्मण शास्त्रज्ञ ॥१०॥
जयाचें साधारण उत्पन्न ॥ प्रपंचा न पडे वाण ॥ आनंदें करित कालक्रमण ॥ तो भूदेव जाण वर्ततसे ॥११॥
पहिली स्त्री निवर्तली ॥ पुनश्च तेणें दुजी वरली ॥ परि पुत्रेच्छा नाहीं पुरली ॥ तशीच राहिली मनांत ॥१२॥
आपल्यास व्हावें पुत्ररत्न ॥ जन्म व्यर्थ पुत्राविण ॥ सुगतीस मुख्य कारण ॥ पुत्रचि जाण निर्धारें ॥१३॥
निपुत्रिकाचें न पहावें वदन ॥ तया गृहीं न घ्यावें अन्न ॥ ऐसें बोलती ज्ञानसंपन्न ॥ तेणें मन दु:खित ॥१४॥
बुबुळाविणें अंबक ॥ नाशिकाविणें मुख ॥ तेविं पुत्राविणें ओक ॥ शून्य देख वाटतसे ॥१५॥
ऐशी कळ रात्रंदिन ॥ मना राहिली लागोन ॥ तेणें उद्विग्न मन ॥ आचारि जाण राहिला ॥१६॥
वया पन्नास वर्षें लोटलीं ॥ परी तिजी वधू वरली ॥ पुत्रेच्छा पूर्ण खवळली ॥ प्रेरणा केली तिणेंच ॥१७॥
तया स्त्रीचे सद्गुण सद्वर्तन ॥ पाहोन आनंदे पतीचें मन ॥ तीहि पतिशुश्रूषासेवा जाण ॥ भक्तिभावें करोन करीतसे ॥१८॥
यापरी ती दंपती ॥ सुखें काल क्रमिती ॥ बरींच वर्षें गेलीं तरी ती ॥ पुत्रसंतति पाहीना ॥१९॥
श्री अश्वत्थनारायणा ॥ घालविल्या प्रदक्षिणा ॥ देवता नवसिल्या नाना ॥ परि कोणीच पुत्रफळ देईना तयांतें ॥२०॥
वाढों लागलें वृध्दपण ॥ हळुंहळुं होय शक्त क्षीण ॥ आतां पुत्रेच्छा व्यर्थ जाण ॥ सर्व प्रयत्न खुंटले ॥२१॥
वेंकटाचलवासी वेंकटरमण ॥ दयावया निजभक्तां दर्शन ॥ आले कल्हळिगिरिवर धांवोन ॥ शेषशयन गोविंद ॥२२॥
ते भक्तजनकैवारी ॥ वसोनि भक्तहृदयांतरीं ॥ भक्तेच्छा सुपूर्ण करी ॥ वेदाद्रिवरी राहोनियां ॥२३॥
निपुत्रिकां पुत्र होती ॥ जन्ममूक उत्तम बोलती ॥ कुष्ठ गेलें त्वरित गति ॥ वेंकटेशभक्ती अलौकिक ॥२४॥
कैक भक्तां उध्दरिलें ॥ कित्येकांचे हेतु पुरविले ॥ कारागृहांतुनी मुक्त केलें ॥ स्वयें धांवोन वेंकटेशें ॥२५॥
यापरिची प्रभूची सुकीर्ती ॥ ऐकिली म्यां निश्चितीं ॥ आतां राहिली हीच युक्ती ॥ करावी भक्ती वेंकटेशाची ॥२६॥
जरी माझे प्राक्तनीं ॥ पुत्र नसे लिहिला ब्रह्मयांनीं ॥ तरी देणार चक्रपाणि ॥ वेंकटेशधनी समर्थ ॥२७॥
काय न करी रमापती ॥ अघटित घडवी निश्चितीं ॥ तरती पर्वत भू पाण्यावरती ॥ रव, शशि, मित्र वसती निराधारें ॥२८॥
सर्वव्यापी लक्ष्मीरमण ॥ तो म्हणेल तेंच प्रमाण ॥ त्याचे आज्ञेवांचोन ॥ एकहि वृक्षपर्ण हलेना ॥२९॥
ऐसें आणोनि मनांत ॥ आचारि सांगे स्वस्त्रियेप्रत ॥ तीहि झाली हर्षभरित ॥ विनयें विनवित पतीतें ॥३०॥
जें कां होतें माझे मनांत ॥ तेंच वदले स्वामी यथार्थ ॥ आतां विलंब नको त्वरित ॥ जाऊं गिरिवरत सेवेशीं ॥३१॥
पंचसूक्त पवमान ॥ याचें करीन मी पारायण ॥ त्रिकाळ स्नान करोन ॥ श्रीचरणीं मन ठेवोनियां ॥३२॥
तूं घालित जा प्रदक्षिणा ॥ अष्टोत्तरशत जाणा ॥ मनीं वदत नारायणा ॥ गोविंदा वामना श्रीहरि ॥३३॥
एकभुक्त राहोन ॥ न करितां कोणासि भाषण ॥ घालाव्या एकनिष्ठें करोन ॥ तेणें इच्छिलें नारायण देतील ॥३४॥
ऐसें भार्येतें वदोनी ॥ तीं उभयतां पतिपत्नी ॥ गेलीं कल्हळिवरी धांवोनी ॥ वेंकटेशसन्निधानीं राहिलीं ॥३५॥
ठरल्यापरि ती दंपती ॥ शुध्दभावें सेवा करिती ॥ उठतां बसतां दिनरातीं ॥ आनंदें घेती प्रभुनाम ॥३६॥
श्रीप्रदक्षिणा असे थोर ॥ प्रासादाचा मोठा प्राकार ॥ तेणें स्त्रीजात सकुमार ॥ श्रमतसे फार त्या घालतां ॥३७॥
असाहि श्रम सोसोनि ॥ घाली प्रदक्षणा प्रतिदिनीं ॥ ईशचरणीं मन ठेवोनी ॥ त्याविना अन्नपाणी स्पर्शेना ॥३८॥
यापरि जातां बरेच दिन ॥ अबलेचे श्रमनिष्ठा पाहोन ॥ कळवळलें अंत:करण ॥ प्रभुरायाचें जाण निर्धारें ॥३९॥
श्रीहरींनीं दाविला चमत्कार ॥ तो सांगतसें सविस्तर ॥ ऐका श्रोते सादर ॥ मन स्थिर करोनियां ॥४०॥
एके दिवशीं दोनप्रहरीं ॥ अती श्रमली ती सुंदरी ॥ पहुडली तेथेंच वाटेवरी ॥ तंव गांठिलें सत्वरी निद्रेनें ॥४१॥
इतुकिया अवसरांत ॥ भक्तवत्सल भगवंत ॥ ब्राह्मणवेशें कमलाकांत ॥ तियेचे स्वप्नांत पातले ॥४२॥
प्रेमें सतीतें बोलती ॥ ऐक गे राधे गुणवती ॥ देखोनि तव विमलभक्ति ॥ वेंकटेश चित्तीं संतोषले ॥४३॥
तुज होईल पुत्ररत्न ॥ सत्य नोहे मम वचन ॥ आतां सेवा समाप्त करोन ॥ जावें तूर्ण गृहाशीं ॥४४॥
होवोनियां प्रसन्नचित्त ॥ नारळ घालोनियां ओटींत ॥ ब्राह्मणरुपें दिनानाथ ॥ गेले गुप्त होवोनियां ॥४५॥
ते स्त्री होवोनि जागृत ॥ चहूंकडे टकमका पहात ॥ नाहीं ब्राह्मण ना कोणी तेथ ॥ तेणें विस्मित जाहली ॥४६॥
जें घोळतसे मनीं ॥ तेंच दिसतसे स्वप्नीं ॥ ऐसें बोलती वृध्द ज्ञानी ॥ तो अनुभव मजलागोनि आलासे ॥४७॥
उठे यापरि विचार करीत ॥ तों पाहिला नारळ ओटींत ॥ म्हणे कोणीं दिला हा येथ ॥ देवा रमानाथ तुज ठावें ॥४८॥
होवोनि आश्चर्य भयमुक्त ॥ तैशीच आली त्वरित ॥ पतीस सांगे वृत्तांत ॥ जोडोनि हस्त विनयानें ॥४९॥
तो वदतसे स्त्रियेला ॥ तंव हेतु मज कळों आला ॥ सेवेचा येवोनि कंटाळा ॥ असत्य बोला बोलतेसी ॥५०॥
प्रिये तव मुखांतून ॥ कधींच नायकिलें असत्य वचन ॥ सेवेस आज कंटाळोन ॥ तुज हें भाषण योग्य नव्हे ॥५१॥
इतरांसम नव्हे ही दासी ॥ अनृत न वदे पायांपाशीं ॥ ऐसें वदोनि चटदिशीं ॥ नारळ पतिपायापाशीं ठेविला ॥५२॥
तों असोला नारळ पाहोनि ॥ आचार्य तत्काळ उठोनि ॥ म्हणती देवा तूंचि स्वप्नीं ॥ आलास ब्राह्मण होवोनि निश्चयें ॥५३॥
स्वल्प सेवा करोनि ग्रहण ॥ आम्हां पतितांतें केलें पावन ॥ आम्ही तरी मूढ हीनदीन ॥ न शकों तव वर्णन करावया ॥५४॥
यापरी विनयें विनवोन ॥ षोडशोपचारें श्रीतें पूजोन ॥ यथाशक्त्या ब्राह्मणभोजन ॥ करविलें जाण भक्तीनें ॥५५॥
ईशाज्ञा घेवोनि नंतर ॥ गृहीं आलें तें जोडपें सत्वर ॥ श्रीवेंकटेशचरणाब्जा वर ॥ होवोनिअ भ्रम्र राहिलें ॥५६॥
पुढें कांहीं दिवसांवर ॥ राधासती झाली गरोदर ॥ नवमास पूर्ण होतां सत्वर ॥ उत्तम पुत्र प्रसवली ॥५७॥
जयजया गोवर्धनधरा ॥ निगमागमा अगोचरा ॥ लक्ष्मीहृदयाब्जभ्रमरा ॥ अंबुजधरा गोविंदा ॥५८॥
देवा तव कृपें करोन ॥ आम्हीं पाहिलें पुत्रवदन ॥ ऐसें हस्तद्वय जोडोन ॥ केलें स्तवन आचार्यें ॥५९॥
तंव विनवीत ते सती ॥ मायबापा व्यंकटपती ॥ तुझेनीच मी पुत्रवती ॥ हें निश्चितीं श्रीहरी ॥६०॥
व्यंकटेशकृपें निर्धारीं ॥ पावलों पुत्र अवधारीं ॥ म्हणोनि तया नाम सत्वरीं ॥ व्यंकटदासाचारी ठेविलें ॥६१॥
आचार्य आपली इनाम जमीन ॥ त्यांतील दोन कुर्‍या जाण ॥ व्यंकटेशचरणारविंदीं अर्पण ॥ प्रेमेंकरोन करितसे ॥६२॥
तैंपासोन तेथेंच देख ॥ तीं दंपतीं भावयुक्त ॥ घालती झालीं नवरात्र वार्षिक ॥ श्रीवैकुंठनायक तोषावया ॥६३॥
तैसेंच तें अदयावत ॥ चालविती त्यांचे पुत्रपौत्र ॥ तेही वेंकटेशाचे भक्त ॥ सदा भावयुक्त राहती ॥६४॥
पहा हा भक्तीचा प्रकार ॥ म्हणोन वदती भक्ति थोर ॥ भक्तांचें तें माहेरघर ॥ बाप इंदिरावर माता मा ॥६५॥
गलगलीं ग्रामांत जाण ॥ भिक्षुकी करीत साधारण ॥ विष्णुभट गालवनामें करोन ॥ कोणी एक ब्राह्मण राहातसे ॥६६॥
जो सदाचारसंपन्न ॥ वेंकटेशचरणीं ज्याचें मन ॥ सदा शुचिर्भूत राहोन ॥ श्रीनामस्मरण करीतसे ॥६७॥
जयाचा असे सत्वगुण ॥ कदां न वदे अनृत भाषण ॥ हृदयीं धरी श्रीचरण ॥ रात्रंदिन भक्तीनें ॥६८॥
घडावी सेवाचाकरी ॥ देवा वेंकटेशाची निर्धारीं ॥ यास्तव कल्हळी गिरिवरीं ॥ आला सत्वरीं प्रेमानें ॥६९॥
प्रात: स्नानसंध्यादि सारोन ॥ जपजाप्यानुष्ठान ॥ तैसेंच पवमानादी पठन ॥ करीत कालक्रमण राहिला ॥७०॥
यापरि हा प्रभूचा दास ॥ सेवा करी रात्रंदिवस ॥ शुची जाह्लें तयाचें मान्स ॥ श्रीनिवासभक्तीनें ॥७१॥
हें पूर्वसुकृताचें फळ ॥ तेणें सद्बुध्दि होय प्रबळ ॥ तीतें नाहीं काळवेळ ॥ श्रीचरणकमळ वंदावया ॥७२॥
मुधोळकराची वर्णी ॥ पुढती मिळे तयालागोनी ॥ स्वीयानुष्ठान सारोनी ॥ तेही वर्णी करीतसे ॥७३॥
ऐसे जातां कांहीं दिवस ॥ एके दिनीं संध्यासमयास ॥ ज्वर भरला तयास ॥ तेणें खिन्न मानस जाहला ॥७४॥
जो सर्व रोगांचा अधिपती ॥ वाढों लागला शीघ्रगती ॥ तेणें विष्णुभट स्थिती ॥ बरवी निश्चितीं दिसेना ॥७५॥
ज्वर जाला प्रबळ ॥ तेणें करितसे तळमळ ॥ ज्वर नोहे हा काळ ॥ म्हणती सकल भक्तजन ॥७६॥
ऐसे गेले सप्त दिन ॥ कांहींच न पडतां नून ॥ नवज्वर असें नामाभिधान ॥ तयाकारण ठेविती ॥७७॥
लोळत पडलासे मंडपांत ॥ होवोनियां भ्रांतचित्त ॥ जवळी ना कोणी आप्तमित्र ॥ शुश्रूषार्थ तयाच्या ॥७८॥
दिसेना कांहीं नीट लक्षण ॥ मंडपीं होवों नये प्राणोत्क्रमण ॥ म्हणोनि अन्य भक्तें जाण ॥ ओरींत नेवोन ठेविलें ॥७९॥
कैशी कर्माची विचित्र गति ॥ तेथें न चाले कवणाची मति ॥ कोण असोन काय करती ॥ होणार निश्चितीं चुकेना ॥८०॥
गंधर्व यक्ष किन्नर ॥ दिवौकसादि सुरवर ॥ यांतेंहि न सोडी कर्म दुस्तर ॥ तेथें काय नर बापुडे ॥८१॥
मनीं म्हणे वेंकटरमण ॥ मम सर्वेच्छा झाल्या पूर्ण ॥ प्रभुसन्निधानीं येतां मरण ॥ परम पावन होईन मी ॥८२॥
एकचि इच्छा असे केशवा ॥ अजोनि घडावी तंव सेवा ॥ यास्तव या दीन शरीरा ठेवा ॥ देवाधिदेवा माधवा ॥८३॥
यापरि शुध्दांत:करणांतून ॥ निघतां प्रेमयुक्त भाषण ॥ द्रवलें प्रभूरायाचें मन ॥ गेलें धांवोन तत्काळ ॥८४॥
बाबा वैदयाचें रुप धरिलें ॥ पहांटे तया जागृत केलें ॥ क्षणैक नाडी पाहोनि वहिले ॥ काय बोलिले तें ऐका ॥८५॥
बाबा वैदय नामें जमखंडींत ॥ होते प्रसिध्द वैदयक्रिया करित ॥ जे सदा असती शुचिर्भूत ॥ सात्विक सद्भक्त शंकराचे ॥८६॥
तयाचें स्वरुप म्हणोन ॥ धरिते झाले भगवान ॥ वदती तुझा भोग सरला येथोन ॥ हें सत्य जाण निर्धारें ॥८७॥
या घे ओषधिपुडया सात ॥ घेईजे दुवक्त श्रीतीर्थांत ॥ तेणें होशील रोगमुक्त ॥ लोकमाताकांत कृपेनें ॥८८॥
इतुकें बोलोनि वैदय गेला ॥ तों भास्कर उदया आला ॥ तैं वेंकणभट साबडे पातला ॥ समाचार घ्यावयाला भटाचा ॥८९॥
वदती कशी काय आहे प्रकृत ॥ म्हणे बरें वाटतें मजप्रत ॥ आतां बाबा वैदय आले होते येथ ॥ ओषध देवोनि परत गेले ते ॥९०॥
मजवरी त्यांचा उपकार ॥ न बोलावितां आले येथवर ॥ नाडी पाहूं देत आणखी एकवार ॥ कृपेनें तया सत्वर बोलवा ॥९१॥
यापरी ब्राह्मणाची उक्ती ॥ ऐकूनि वेंकणभट मनीं म्हणती ॥ यातें वायू झाला निश्चितिं ॥ होणार गती कळेना ॥९२॥
उघड बोलती विष्णुभटाला ॥ बाबा वैदय नच आला ना गेला ॥ या भाषेवरोनि तुम्हांला ॥ भ्रम झाला वाटतसे ॥९३॥
नाहीं भ्रमिस्त आहें मी स्मृतींत ॥ मज ज्या पुडया दिल्या सात ॥ त्या सारल्या हंतरुणाखालत ॥ ऐसें खचित मज वाटे ॥९४॥
वेंकणभटांनीं घातला हात ॥ तों मिळाल्या पुडया सात ॥ होवोनियां आश्चर्यजनित ॥ पहाती तयांत अंगारा ॥९५॥
म्हणती नव्हे नव्हे तो बाबा ॥ अखिल जगाचा माबा ॥ त्याचेंच हें कृत्य बाबा ॥ वाटे अचंबा मजलागीं ॥९६॥
विष्णुभटा तूं झालास धन्य ॥ तुजवरी श्रीहरिकृपा पूर्ण ॥ म्हणोनि देवोन दर्शन ॥ गेले निघोन सत्वरी ॥९७॥
सात पुडया संपण्याच्या आंत ॥ उतार चालला पडत ॥ पुढें थोडक्याच दिवसांत ॥ निस्तोष रोगमुक्त जाहला ॥९८॥
वदे श्रीवेंकटेशा ॥ पाहोनि माझी निकृष्टदशा ॥ धांवलासि वैदयरुपें हृषिकेशा ॥ भवभयनाशा दयानिधे ॥९९॥
तूं भक्तांचा पूर्ण त्राता ॥ ऐशा ऐकिल्या पौराणिक कथा ॥ त्याचा अनुभव मज आतां ॥ अच्युतानंता आला असे ॥१००॥
अनंता तुझे अनंत गुण ॥ न वर्णूं शकती ब्रह्मादि जाण ॥ तेथें हा य:कश्चित पामर हीनदीन ॥ काय वर्णन करुं शके ॥१०१॥
यापरि करोनियां स्तवन ॥ यथाशक्त्या ब्राह्मणभोजन ॥ केलें विष्णुभटानें जाण ॥ ईशचरणीं मन ठेवोनियां ॥१०२॥
रमावर वेंकटपति ॥ भक्त भक्तिघनें विकत घेती ॥ मग चाकर होवोनि निश्चितीं ॥ कामना सर्व पूर्ण करती भक्तांच्या ॥१०३॥
आतां आणखी एक चमत्कार ॥ सांगतसें सविस्तर ॥ ऐकतां श्रोतेजन चतुर ॥ तुम्हां विचित्र फार वाटेल ॥१०४॥
पटवर्धन हरिवंश चूडामणि ॥ परशरामभाऊ वीराग्रणी ॥ ज्याच्या कीर्तिडंक्याचा ध्वनि ॥ ऐकों ये कर्णीं अदयावत ॥१०५॥
तत्पुत्र अपासाहेब शूर ॥ त्यांहीं गाजविली समशेर । तत्सुत राजकार्यधुरंधर ॥ रावसाहेब सरदार वदती जया ॥१०६॥
त्याचे पुत्र अपासाहेब दत्तक ॥ सद्गुणें असती अलौकिक ॥ वर्णिताती सकल लोक ॥ अदयापि देख चोहोंकडे ॥१०७॥
ते जमखंडीचे अधिपति ॥ पुत्रवत् प्रजा रक्षिति ॥ तिचीहि अत्यंत प्रीती ॥ असे न्याय नीती पाहोनियां ॥१०८॥
जणूं गुणिजनांचें तें माहेर ॥ शांतवृत्ति उदार धीर ॥ सदा ध्याती श्रीरामेश्वर ॥ सुरेश्वर जगदात्मा ॥१०९॥
स्वधर्मीं असती रत ॥ परधर्मा नसे निंदित ॥ दृष्टवस्तु समस्त ॥ शिवरुप सत्य मानितसे ॥११०॥
अन्नदानीं बहू प्रीती ॥ मिष्टान्नें सकळ जाती ॥ जेऊं घातल्या निश्चितीं ॥ शिवपार्वती मानोनियां ॥१११॥
असो पुढें कांहीं दिवसांनीं ॥ बंडाच्या आरोपावरोनी ॥ बेळगांवीं नेलें त्यांस धरोनी ॥ सरकारांनीं जाणपां ॥११२॥
तेणें दु:ख झालें सर्वांस ॥ त्यांतून विशेष प्रजेस ॥ काय करील होवोन उदास ॥ गिरिजापतीस विनवीतसे ॥११३॥
हे गौरिहरा रामेश्वरा ॥ तव प्रियभक्त नृपवरा ॥ सुखरुप आणी परत धरा ॥ रमावर प्रियकरा सर्वज्ञा ॥११४॥
यापरि दु:खभरित ॥ राहोनियां दिनरात ॥ श्रीशंकरास आळवीत ॥ राहिली अनाथ होवोनी ॥११५॥
त्यावेळीं घटोपंत वकिलांनीं ॥ देवतांसि घेतलें मागोनि ॥ त्यांतच मापति मोक्षदानी ॥ वेंकटेशालागोनी नवसिलें ॥११६॥
जे का केले नवस ॥ ते मांडिले यादीस ॥ परि वेंकटेशदेवास ॥ लिहावयास विसरला ॥११७॥
हाहि घटोपंत ॥ वेंकटेशाचा असे भक्त ॥ नामस्मरणीं सदा रत ॥ राहे दिनरात न विसंबे ॥११८॥
पुढती कांहीं दिवसांनंतर ॥ सुटले अपासाहेब सरदार ॥ त्यांची चीजवस्त अधिकार ॥ केला पूर्ववत सादर सरकारें ॥११९॥
तेणें प्रजा आनंदली ॥ गुढया तोरणें उभविलीं ॥ नानापरि ख्यालीखुशाली ॥ करीत राहिलीं आनंदें ॥१२०॥
घटोपंत होवोनि खुश ॥ फेडिता झाला सर्व नवस ॥ परी राहिला निखालस ॥ एक श्रीपतीस विसरला ॥१२१॥
वैदयास रोग सरतां ॥ नावाड्यास नाव उतरतां ॥ कामकर्त्यास काम होतां ॥ तेंवि घटोपंत तत्वतां विसरला ॥१२२॥
आनंदें गेला नंतरीं ॥ बेळगांवीं आपुल्या कामावरी ॥ बहुदिन लोटले तरी ॥ तया गिरिधारी स्मरेना ॥१२३॥
श्रीहरि वदती मनांत ॥ येणें फेडिले नवस समस्त ॥ माझाच एक उरला मात्र ॥ तो विसरोनि खचित राहिला ॥१२४॥
यास्तव नव्हे हा दंडार्ह जाण ॥ करवावी तया आठवण ॥ म्हणोनि करती विंदान ॥ तें श्रोतेजन परिसावें ॥१२५॥
बहुदिसांचा प्रिय सेवेकरी ॥ वेंकणभट साबडे नामधारी ॥ जावोनि तयाचे स्वप्नांतरीं ॥ ब्राह्मणरुपें मुरारी बोलती ॥१२६॥
घालतों भोजन म्हणोन ॥ न घातलें देवोनि वचन ॥ भुकेले असती राधारमण ॥ यास्तव आलों स्मरण करावया ॥१२७॥
जावोनि पोटयाचे घरीं ॥ तुवां सांगावें यापरि ॥ आठव होतां सत्वरि ॥ येतील गिरिवरी धांवोनियां ॥१२८॥
ब्राह्मण नव्हे हा श्रीहरि ॥ मानोनियां आज्ञा शिरीं ॥ धरोनि गेला सत्वरीं ॥ पोटयाचे घरीं सांगावया ॥१२९॥
पुरुष नव्हते घरांत ॥ स्त्रियांपाशीं सांगणें व्यर्थ ॥ ऐसें आणोनि चित्तांत ॥ गेले पर भटजी ते ॥१३०॥
तिसरे दिनीं वेंकटपति ॥ स्वप्नीं आले मागुती ॥ दोन छडया पाठीवरती ॥ ओढोनि म्हणती विसरलास ॥१३१॥
ओरडत बैसला उठोनि ॥ तोंच ब्राह्मण पुढें पाहोनि ॥ वदे गेलों सांगावया लागोनि ॥ नव्हतें कोणे घरांत ॥१३२॥
येथोनि सा कोसांवरि एक ॥ आहे कन्नोळिनामें खेटक ॥ तेथें असे पोटयाचा लेक ॥ येईल उदईक दर्शना ॥१३३॥
तयातें एकांतांता ॥ तुवां सांगावी ही मात ॥ नको विसरुं आतां मात्र ॥ ठेवीं ध्यानांत निश्चयें ॥१३४॥
वेंकणभट विनवी हात जोडोन ॥ मज मारिलें विनाकारण ॥ द्विज म्हणे मार तो नव्हे जाण ॥ तेणें माझें ज्ञान होईल ॥१३५॥
ऐसें बोलत बोलत ॥ भूदेव झाला तेथेंचि गुप्त ॥ होवोनि साश्चर्य जनित ॥ बसले स्तब्धचित्त भटजी ते ॥१३६॥
तों जवळील निद्रिस्त ब्राह्मण ॥ बसले जागृत होवोन ॥ म्हणती कां ओरडलां मोठयानं ॥ तुम्हांसि होता कवण बोलत ॥१३७॥
दिव्याचा प्रकाश असे पडला ॥ परि तो न दिसे आमुच्या दृष्टिला ॥ काय बरें हा प्रकार घडला ॥ तो अखिल आम्हाला वदावा ॥१३८॥
मग वेंकणभटजी सत्वर ॥ बोलते झाले सविस्तर ॥ पहाताती तों पाठीवर ॥ वळ जोडीदार दिसताती ॥१३९॥
हिंस्त्रपशु स्वप्नांत ॥ चावले आपणां वाटत ॥ तेणें रक्तें भरलें वस्त्र ॥ परि जागृति असत्य ठरतसे ॥१४०॥
तुमचें स्वप्न म्हणावें जरी ॥ प्रत्यक्ष दिसती पाठीवरी ॥ यास्तव स्वप्न नोहे खरोखरी ॥ हें कृत्य ईश्वरी वाटतें ॥१४१॥
भटजी झालां तुम्ही धन्य ॥ साक्षात् भेटले भगवान ॥ आम्ही जड मूढ हीनदीन ॥ होईल दर्शन कोठोनियां ॥१४२॥
तंव गर्जली काकडार्तीची घंटा ॥ जणूं म्हणे सर्वां उठाउठा ॥ दर्शनाची होवोनि उत्कंठा ॥ गेले झटपटा समस्त ॥१४३॥
येतां चार घटीवर मित्र ॥ तंव आला घटोपंतपुत्र ॥ त्यास पहातां ईशचरित्र ॥ भटजीस विचित्र वाटलें ॥१४४॥
तया गांठोनी त्वरित ॥ सर्व सांगितला वृत्तांत ॥ ऐकोनि तया पुत्राचें चित्त ॥ अती विस्मित जाहलें ॥१४५॥
तो म्हणे ईशकरणी ॥ नकळे कोणालागुनि ॥ सर्व नवस फेडिले म्हणोनि ॥ तातमुखेंकरोनि ऐकिलें ॥१४६॥
परी श्रीवेंकटेशाचा मात्र ॥ चुकले नवस खचित ॥ ते रहाती बेळगांवांत ॥ लिहितों मी पत्र सत्वरें ॥१४७॥
वदोनि यापरि त्वरें गेला ॥ तत्काळ गडी पाठविला ॥ वाचोनि पत्र घटोपंताला ॥ पश्चात्ताप झाला पूर्णत्वें ॥१४८॥
म्हणे देवा सर्वस्वी चुकलों ॥ संसृतिमाजीं गुंगलों ॥ प्रभूला मुळींच विसरलों ॥ दीनदयालो गोविंदा ॥१४९॥
हा अपराध भारी ॥ घडला मजकरवीं मुरारी ॥ दया करोनि गिरिधारि ॥ क्षमा करे श्रीहरिमुकुंदा ॥१५०॥
ऐसें करोनियां स्तवन ॥ उत्तर लिहिलें पुत्राकारण ॥ तें समग्र पाहातां वाचोन ॥ गेला धांवोन गिरिवरी ॥१५१॥
नवसिक पंचवीस ब्राह्मण ॥ क्षमेचे तितुकेच जाण ॥ तयां दिधलें मिष्टान्नभोजन ॥ प्रेमें करोन भक्तीनें ॥१५२॥
पहा प्रभूचें दयालुपण ॥ चुकला असला भक्त जाण ॥ तरी करवोन आठवण ॥ नवस पूर्ण करवीतसे ॥१५३॥
झुंजूरवाडगांवीं जाण ॥ भाऊ कुलकर्णी नामें करोन ॥ कोणी एक देशस्थ ब्राह्मण ॥ संसार करोन राहतसे ॥१५४॥
ज्याची वृत्ती साधारण ॥ आहे त्यांत सुख मारोन ॥ उभयस्त्रियांसह वर्तमान ॥ आनंदें करोन वर्ततसे ॥१५५॥
तयाची ज्येष्ठ पत्नी ॥ कृष्णाबाई सदाचरणी ॥ शांतवृत्ति अनुदिनीं ॥ पतिचरणीं लीन असतसे ॥१५६॥
सवतीसवतींत सत्वर ॥ लागले सवतीमत्सर ॥ कनिष्ठ अविचारी फार ॥ करी वैर ज्येष्ठेसी ॥१५७॥
भाऊची विशेष प्रीति ॥ असे धाकटया स्त्रियेवरती ॥ परी ती कृष्णाबाई सती ॥ विकल्पचित्तीं आणीना ॥१५८॥
ऐसे जातां कांहीं दिन ॥ कनिष्ठेनें पति आपलासा करोन ॥ भलतें सलतें सांगोन ॥ पतीचें मन भ्रष्टविलें ॥१५९॥
तेणें न करितां विचार ॥ ज्येष्ठेसि घातलें गृहाबाहेर ॥ त्याच गांवी असे तिचें माहेर ॥ तेथें जावोन निराधार राहिली ॥१६०॥
मनीं म्हणे न चुकलें सेवेंत ॥ सदा वागलें आज्ञेंत ॥ निष्कारणीं मजवरत ॥ कोपले अत्यंत पतिराज ॥१६१॥
नकळतां चुकी घडली ॥ तरी पाहिजे पदरीं घातली ॥ आयकोन सवतीची मधुर बोली ॥ व्यर्थ त्यागिली अबला हे ॥१६२॥
पूर्वीं स्त्रीपुरुषां बिघडविलें ॥ कीं अन्य जोडपीं अंतर पाडिलें ॥ तेणें अशी दशा पावलें ॥ काय म्यां केलें कळेना ॥१६३॥
सवतीनें तरी काय केलें ॥ माझे प्रारब्धीं जसे लिहिलें ॥ दैवानें तसेंच जाहलें ॥ तेथें उपाय नचले कवणाचा ॥१६४॥
असो आतां तरी उभयतां ॥ सुखें नांदोत तत्वतां ॥ तें ऐकोन मम चित्ता ॥ आनंद सर्वथा होईल ॥१६५॥
आतां पुढें कोठें जावें ॥ माहेरीं तरी किती रहावें ॥ कीं विखप्राशूनि मरावें ॥ काय करावें सुचेना ॥१६६॥
आत्महत्या अनुचित ॥ ऐसें बोलती ज्ञानवंत ॥ तेही करतां अत्यंत ॥ पाप मजप्रत घडेल कीं ॥१६७॥
यापरी विचार करीत ॥ तळमळे ती दिनरात ॥ कांहींच सुचेना तिजप्रत ॥ अस्वस्थचित्त राहिली ॥१६८॥
ऐका पुढती एके दिनीं ॥ आठवलें तियेचे मनीं ॥ श्रीवेंकटेशाची करणी ॥ अघटित कर्णीं ऐकिले ते ॥१६९॥
मूकातें केलें वाचाळ ॥ निपुत्रिका दिलें पुत्रफळ ॥ कुष्टी केली सोज्वळ ॥ भक्तेच्छा सकळ पुरविल्या ॥१७०॥
ऐशी प्रभूची सुकीर्ति ॥ भरोनि राहिली जगतीं ॥ जेथें वेदहि थकले निश्चितीं ॥ तेथें ही मूढ किती वर्णावया ॥१७१॥
प्रभु असती सर्वज्ञ ॥ निर्मल असेल माझें मन ॥ तरी कृपा करतील पूर्ण ॥ भवभयहरणगोविंद ॥१७२॥
आतां पतितपावन ॥ भक्तवत्सल दयाघन ॥ शेषशयन भगवान ॥ त्यांचे चरण धरीन निश्चयें ॥१७३॥
झुंजुरवाडापासोन ॥ कल्हळगिरि एक योजन ॥ नित्य घ्यावया दर्शन ॥ अबलांसी जाण शक्य नसे ॥१७४॥
यास्तव प्रति भृगुवारीं ॥ जाय गिरिवरी ॥ पादचारी ॥ पूजोन भावें मधुकैटभारि ॥ प्रदक्षिणा शतअष्टोत्तरि घालितसे ॥१७५॥
नित्य वेंकटेशनामस्मरण ॥ जातां येतां करी रात्रंदिन ॥ जडलें हरिचरणीं अखंड मन ॥ अन्य वेवधान विसरली ॥१७६॥
माय मा पिता मुरहर ॥ तेंचि माझें माहेरघर ॥ भ्राते सासु श्वशुर ॥ भगिनी जावा दीर तेचि मानी ॥१७७॥
ऐशी तियेची वृत्ति ॥ होवोनि राहिली निश्चिति ॥ वेंकटेशावांचोन अन्यचित्तीं ॥ त्यां सतिप्रती दिसेना ॥१७८॥
यापरि लोटतां कांहीं दिन ॥ पाहोनि तिचें शुध्दांत:करण ॥ आनंदित झाले राधारमण ॥ देवकिनंदन श्रीहरि ॥१७९॥
सवें बोलती इंदिरेप्रति ॥ पहा कशी सतीची भक्ती ॥ एकाग्र झाली निजवृत्ती ॥ सर्वांभूतीं मज पाहे॥१८०॥
आतां जावोनि त्वरित गति ॥ करितसें तिची कामना पुरती ॥ ऐसें वदोनि प्रियेप्रति ॥ श्रीप्रति काय करती तें ऐका ॥१८१॥
धरोनि ब्राह्मणवेश ॥ स्वप्नीं गेले श्रीनिवास ॥ जागें करोन निजभक्तास ॥ वेंकणभटजीस बोलती ॥१८२॥
उदयीक उजाडल्यावरी ॥ झुंजुरवाडची रहाणारी ॥ कृष्णाबाई नामधारी ॥ श्रीदर्शनार्थ येथवरी येईल ॥१८३॥
त्या सतीतें पाचारोन ॥ वेंकटेशप्रसाद म्हणोन ॥ हीं पांच केळीं दयावीं जाण ॥ ममाज्ञेंवरोन द्विजवरा ॥१८४॥
तुझी पाहोनि विमल भक्ती ॥ प्रसन्न झाले वेंकटपति ॥ तुज कन्यापुत्र निश्चयें होतीं ॥ असेंहि तिजप्रति सांगावें ॥१८५॥
यापरि बोल बोलोन ॥ गेला भूदेव निघोन ॥ भटजी जागृत होवोन ॥ पहाती तों ब्राह्मण दिसेना ॥१८६॥
केळीं मात्र शय्येवरत ॥ पाहोनि झाले आश्चर्यभरित ॥ म्हणती हें देवाचें कृत्य सत्य ॥ नसे अन्यत्र मज वाटे ॥१८७॥
नाहीं त्या स्त्रियेचि मज ओळख ॥ यास्तव पुसे पुजार्‍यादेख ॥ तो वदे आहे मज ठाउक ॥ तियेतें उदयीक दावितों ॥१८८॥
नियमापरी ती सुंदरी ॥ आली कल्हळिगिरिवरी । पूजोनि सत्वरि हरिमुरारि ॥ घाली नंतरी प्रदक्षिणा ॥१८९॥
पुजार्‍यानें जावोनि त्वरित ॥ दावियलें त्या स्त्रियेप्रत ॥ भटजी आले धांवत ॥ घ्या म्हणती पदरांत केळीं हीं ॥१९०॥
ती सती वदे आपण ब्राह्मण ॥ सर्वां पूज्य दयावया दान ॥ उलट स्वामीकडोन घेवोन ॥ पापा साधन केविं करुं ॥१९१॥
बाई तुमची दृढभक्ती ॥ पाहोन तुष्टले वेंकटपति ॥ हा प्रसाद तुम्हांप्रति ॥ दयाय मज हस्तीं वोपिला ॥१९२॥
आतां सेवा करा पूर्ण ॥ तुमचें होईल कल्याण ॥ होतील कन्या पुत्ररत्न ॥ हें सत्यवचन श्रीहरीचें ॥१९३॥
ते सुंदरि वदे हास्यवदन ॥ भटजीतें करोनियां वंदन ॥ त्यागिलें पतीनें मजलागोन ॥ कन्यापुत्ररत्न केविं होय ॥१९४॥
वये देवाची अमोघशक्ती ॥ अघटित घडवी निश्चितीं ॥ आर्जवोनियां तुजप्रति ॥ गृहीं नेईल पति प्रमोदें ॥१९५॥
भटजीची सुधेसम बोली ॥ ऐकोनि मनीं आनंदली ॥ पदरीं शकुनगांठ बांधिले ॥ श्रीतें स्तवित गेली सती घरा ॥१९६॥
पुढें जातां थोडे दिवस ॥ फिरलें भाऊचें मानस ॥ पडला बुध्दीस व्यत्यास ॥ श्रीजगन्निवासइच्छेनें ॥१९७॥
म्हणे स्त्री सोडिल्यापासोन ॥ करीत आहे सदाचरण ॥ धरोनियां वेंकटेशचरण ॥ सदा नामस्मरण करीतसे ॥१९८॥
नाहींच चूक केली ॥ तियेंनें कवण्याहि कालीं ॥ माझीच बुध्दी भ्रमली ॥ श्री घालविली गृहांतुनी ॥१९९॥
दुसरीचें ऐकोन वचन ॥ म्यां व्यर्थ त्यागिलें स्त्रीरत्न ॥ आतां कसेंहि करोन ॥ आणावें तिजलागोन घराशीं ॥२००॥
ऐसें आणोनि मनांत ॥ स्त्रियेपाशीं गेला त्वरित ॥ म्हणे प्रिये चल गृहाप्रत ॥ क्षमा मजवर करोनियां ॥२०१॥
ती सती वदे उभयतां ॥ सुखें आनंदांत नांदतां ॥ हें ऐकोनि ममचित्ता ॥ संतोष सर्वथा होतसे ॥२०२॥
परी आपुली आज्ञा शिरीं ॥ धरोनि येतें चला घरीं ॥ ही दासी तुमची खरी ॥ क्षमा काय करी पतिराया ॥२०३॥
आपण माझें दैवत ॥ क्षमा कराया समर्थ ॥ मी अबला अनाथ ॥ मम प्राणनाथ हे पाय ॥२०४॥
यापरि बोलत चालत ॥ उभयतां होवोन आनंदयुक्त ॥ जावोनि आपुल्या घरांत ॥ प्रेमें वर्तत राहिलीं ॥२०५॥
होतां सतीचा सहवास ॥ भाऊस लागला तोचि ध्यास ॥ सदा स्मरे वेंकटेशास ॥ रात्रंदिवस भक्तीनें ॥२०६॥
त्या दिवसापासोन ॥ प्रति संवत्सरीं येवोन ॥ धनुर्मास करती जाण ॥ श्रीचरणीं मन ठेवोनियां ॥२०७॥
कांहीं काळ क्रमितां उभयतां ॥ पाहतीं झालीं कन्यापुत्रां ॥ श्रीहरीच्या चित्रचरित्रा ॥ कोणी पूर्ण वर्णिता असेना ॥२०८॥
पहा हो भक्तीचा झपाटा ॥ विघ्नें पळवी बारा वाटां ॥ यास्तव भक्तिसुधा उठा चाटा ॥ सोडूं नका गांठा श्रीहरीतें ॥२०९॥
आतां नव्हे स्वप्न नव्हे शार्वरी ॥ भरदिवसा दोनप्रहरीं ॥ दाविती चमत्कार श्रीहरी ॥ पापापहारि तो ऐका ॥२१०॥
कमकेरीनामें खेटक ॥ तालुका जयाचा गोकाक ॥ तेथें रहातसे एक ॥ बाळाप्पानामक कुलकर्णी ॥२११॥
तयाचें आराध्य दैवत ॥ कल्हळीश वैकुंठनाथ ॥ सदा स्मरणीं असे रत ॥ दिनरात न विसंबे ॥२१२॥
ऐसें करितां कालक्रमण ॥ तयासी वदे त्याचेंच मन ॥ एकदां कल्हळीवरी जावोन ॥ रमारमणचरण पहावे ॥२१३॥
सर्व आयती करोन ॥ सस्त्रीक निघाला आपण ॥ संगें पुराणिक बल्लव जाण ॥ आणखी एकजण घेतला ॥२१४॥
यथाशक्त्या ब्राह्मणभोजन ॥ करावें श्रीस नैवेदयापर्ण ॥ ऐसा हेतु मनीं धरोन ॥ आला धांवोन गिरिवरी ॥२१५॥
ते दिनीं तेथील ब्राह्मण ॥ गेले होते जमखंडी लागोन ॥ कोणा समाराधनेचें भोजन ॥ करावया सर्वजण मिळोनियां ॥२१६॥
होता वेंकणभट सेवेकरी ॥ दुसरा श्रीचा पुजारी ॥ तिसरा जमखंडी सरकारी ॥ वर्णीकरी बाळंभट ॥२१७॥
कराया ब्राह्मणभोजन ॥ न मिळती कोणी ब्राह्मण ॥ श्रीस नैवेदय तरी करावा म्हणोन ॥ स्वयंपाक जाण करवितसे ॥२१८॥
पुराणिक देवळांत बसोन ॥ सांगों लागला पुराण ॥ बाळापासस्त्रीक आपण ॥ घालित होता जाण प्रदक्षिणा ॥२१९॥
इकडे स्वयंपाक सिध्द झाला ॥ कडबुत्रयाचा नैवेदय पाठविला ॥ बल्लवें त्याच समयाला ॥ अकस्मात आला एक ब्राह्मण ॥२२०॥
ज्याचा शुध्द कृष्णवर्ण ॥ कपाळीं केलें त्रिपुंड्र धारण ॥ स्वच्छ शुभ्रवस्त्र परिधान ॥ शिरीं उष्णीष जाण शोभतसे ॥२२१॥
आकर्णनयन हास्यवदन ॥ रेखिलें द्वादशनाम चंदनें करोन ॥ गळां यज्ञसूत्र रुळतसे जाण ॥ देदीप्यमान दिसतसे ॥२२२॥
तो वदे मी एक क्षुधित ब्राह्मण ॥ आलों असें फार दुरोन ॥ येथें मिळेल काय मिष्टान्नभोजन ॥ कृपा करोन सांगावें ॥२२३॥
बल्लव वदे आपण एक कां आणखी चार ॥ असाल तितक्यांनीं यावें लवकर ॥ पाक झालासे सर्व तयार ॥ यजमानहि सत्वर येतील कीं ॥२२४॥
येथील नैवेदयाची रीत ॥ ठाव नसावी तुजप्रत ॥ जें काय केलें असेल घरांत ॥ तें पांच नैवेदयांवरत घालावें ॥२२५॥
ऐशी ऐकोनि द्विजवाणी ॥ बल्लव खोचला आपुले मनीं ॥ मी तीन घातले ते यालागोनि ॥ कळलें कोठोनि कळेना ॥२२६॥
कां हा असावा अंतरज्ञानी ॥ कीं कर्णपिशाच सांगतें येवोनि ॥ काय असेल न कळे मजलागोनि ॥ ईशकरणी अतर्क्य ॥२२७॥
मग उघड बोलला द्विजाला ॥ मजकरवीं अपराध घडला ॥ ओरडोन सांगे पुराणिकाला ॥ नैवेदय वेंकटेंशाला अर्पूं नका ॥२२८॥
ही ओरड ऐकोन ॥ आले वेंकणभट उठोन ॥ पहाती तों बल्लव आणि ब्राह्मण ॥ उभे असती जाण बोलत ॥२२९॥
तैसेच जवळ येतांक्षणीं ॥ तेथेंच विप्र गेला गुप्त होवोनि ॥ हें प्रत्यक्ष पाहोनि नयनीं ॥ दोघेहि मनीं वेडावले ॥२३०॥
तोंच बाळाप्पा स्त्रीसहित ॥ आला पुराणिकहि तेथ ॥ ऐकोनि सकल वृत्तांत ॥ आश्चर्यजनित जाहली ॥२३१॥
तव वेंकणभट वदे नव्हे हा ब्राह्मण ॥ वेंकटपति भगवान ॥ बाडववेशें येवोन ॥ गेले देवोन दर्शन मज वाटे ॥२३२॥
मानवाचें नव्हे हें कृत्य ॥ जेथील तेथेंच व्हावयाचें गुप्त ॥ यास्तव हें ईश्वरी तत्व सत्य ॥ हेंचि निश्चित जाणपां ॥२३३॥
ऐकोनि वदे यजमान ॥ भटजी आपण झालांत धन्य ॥ तुमच्याहुनी बल्लव जाण ॥ झालें दर्शन भाषण हरीशीं ॥२३४॥
मीं मात्र मूढमति हीनदीन ॥ असेन पातकी परिपूर्ण ॥ म्हणोनि मज वेंकटेशदर्शन ॥ होईल कोठोन पतितातें ॥२३५॥
जय जयाजी वेंकटेशा ॥ आदिपुरुषा हृषीकेशा ॥ अमित अघविनाशा ॥ जगदीशा तुज नमो ॥२३६॥
माझीं पापें अनंत ॥ होवोनियां कृपावंत ॥ क्षालन करण्या तूंचि एकसमर्थ ॥ प्रभो दिनानाथ स्वामिया ॥२३७॥
यापरि करोनियां स्तवन ॥ यथाशक्त्या ब्राह्मणभोजन ॥ करवोनि गेला गांवीं जाण ॥ आज्ञा घेवोन श्रीहरीची ॥२३८॥
प्रभुचरणीं तयाचें मन ॥ होवोनि गेलें तल्लीन ॥ वेंकटेशाचें नामस्मरण ॥ करीत रात्रंदिन राहिला ॥२३९॥
हा अध्याय भक्त माउली ॥ करोनि कृपेची साउली ॥ देईल भक्ति भांडारकिल्ली ॥ आपुल्या मुलामुलींलागोनी ॥२४०॥
जो द्वापारिंचा आठवा ॥ तया वंदोनि देवादिदेवा ॥ हा अष्टमाध्याय मेवा ॥ श्रीमहादेवा हरि अर्पी ॥२४१॥

इति अष्टमोऽध्याय: ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : March 16, 2021

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP