माहेरी माझें चित्त रमले गोडी विषयाची लागली । पंधरा परद्वारा करीन परंतु नको लग्नाचा भोंदू भगली ॥
गावांमध्ये गरका मारा कधी मानिना मी वडिलां । सख्या भावाचे घरी निघालें त्याचा माझा संग घडला ॥
त्रिकूट भुवनी पाल मांडुनी विचार केला मी पुढिला । त्रिगुण पंचतत्त्वांची गादी सप्तधातूनें डागली ॥
छत्तीसांची मिळवणी अवघी अशी रुढ आली मागली । माहे० ॥१॥
भरज्वानीचा धूर आला डोळ्यावर नवती अंगी दाटली । आधीच मन लागलें तुम्हांपासी पत लावूनि मर्जी पटली ॥
वैराग्य पलंगी शेज केली नामपुष्पाची माळ पटली । षड्‍ विकारासी धुंडून काढिलें कल्पनेनें केली चुगली ॥
सासुसासरा टाकुन आलें सुखसागरि भक्ति फुगली । माहेरी० ॥२॥
चवघीजणी माझे पंगती त्यांनी मंत्र कानी फुंकला । तोच शब्द मी ध्यानांत धरला द्वैताचा फेरा चुकला ॥
बिकट वाट चढले खांब सत्राविचा पडदा उकला । औटपीठ गोल्हाट चढुन कैलास भुवनिं बाग पिकला ॥
नाम मोगरा सोहम्‍ शेवंती अशिं फुले नाकीं हुंगली । सुगंध सारा शरीरी भरला वैखरी वाचा भागली । माहेरी० ॥३॥
पराहुन परता त्याहून वरता परपुरुष बाई पाहिला । त्यासी वरुन मी पतिवरता चरणिं लागलें सोईला ॥
चरण वंदून रुपासी मिळालें सुख झालें अशा वयाला । गुरुकृपेने साधन झाले मूळ मार्ग त्याने दाखविला ॥
दत्तसावतळ प्रसन्न वडगांव दक्षिणी वस्ति चांगली । कवि गणपत आत्मज्ञानाची तोड ऐकून चतुर गुंगली । माहेरी० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 27, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP