एकतारी पदे - पद ५
महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण भागात एकतारी भजनी परंपरा आहे.
खेळती गिरिजाशंकर ज्ञानचौसर । शंभूने टाकिले फांसे शहाण्णव घर ॥धृ०
पार्वती म्हणे शंकरा ऐकून निर्धार । मज सांगा सहापासून सोळावा सार ॥
शंकर म्हणे ऐक मी जो ईश्वर । तयापासून पुढे उद्भवले बीज ॐकार ।
स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण पट असे चार । जारज, अंडज, उद्भिज, स्वेदज घेई घेर ॥
षट् चक्र सहा दर्शन षड् विकार । अष्ठकट्यावर अष्टसिध्दि बसे अनिवार ॥१॥
मुख्य एकापासून झाले हा दशपवन । दशइंद्रियांमध्यें चंचल फिरतें मन ॥
दुरी जीव शिव दोन तीरी परके त्रिगुण । चार वेद शून्य सार निवडून ।
पंचवीस गुण उत्पत्ती पांचापासून । सहा बारा बुडविती डाव झाडून शेण ॥
दहा पंचवीस नरदा बसवती सोळा बरोबर । सोळा चौक चार अंगाचे चौसष्ट घर ॥२॥
आठ नऊ चौदा आणि बारा सोळा । चौसष्ट बावन बाहात्तर झाल्या गोळा ॥
त्यांत चौघीजणी धांवल्या करितां सोहळा । भाव विवेक वैराग्य निजबोध जिव्हाळा ॥
सोहं वाणी धरली नरद केली अवकळा । होतां असे द्वैतभाव कल्प पडला काळा ॥
ब्रह्मभुवनीं घरें चालतीं नाम ठसा वर । आल्या फिरुन नरदा जीव झाला बिनघोर ॥३॥
जुना गांव जागा ओळखून मिळे रुपासी । गुरुबळें डाव साधला ठाव कैलासी ॥
ठाव चुकतां नरद फिरली हिंडे चौर्यांशी । नरकांत पडतां कधी चुकेना फांसी ॥
असे ऐकूण पार्वती लागे शंभूच्या चरणांसी । धन्य धन्य त्रिनयन सूत्र खेळविसी ॥
गुरुवांचून ना कोठें ठाव करा विचार । गुरु भीमराव कवि गणपति सांगे शास्त्र ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP