भ्रतारें वैराग्य घेतलीया वरी । जीव हा निर्धारीं देईन मी ॥ १ ॥
वत्सा साठीं देह अचेतन पडे । हें तंव रोकडें परब्रह्म ॥ २ ॥
भ्रताराचें तीर्थ न सांपडे जरी । अन्न खाय तरी मांस आम्हां ॥ ३ ॥
भ्रताराचें शेष न सांपडे तरी । पापें माझ्या शिरीं त्रैलोक्याचीं ॥ ४ ॥
चित्त हें भ्रताराविण जरी जाये । तरी वास होय नरकीं आम्हां ॥ ५ ॥
भ्रतारदर्शनाविण जाय दीस । तरी तेचि रास पातकांची ॥ ६ ॥
बहिणी म्हणे मज आज्ञाची प्रमाण । ब्रह्म सनातन स्वामी माझा ॥ ७ ॥