गुरुपरंपरा आम्हां चैतन्य बळी । तयाचें स्मरणें आम्ही वैकुंठीं बळी ॥ १ ॥
नमस्कार हा तया साष्टांग माझा । वोवाळूं जीवें साधु चैतन्य राजा ॥ २ ॥
चैतन्य सर्वगत व्यापक सद्गुरु । प्रगटला हा 'तुकाराम' वेषें दातारु ॥ ३ ॥
तयाचें हें ध्यान सदा माझिये अंतरीं । अंतरीचें ध्यान 'तुका' सबाह्याभ्यंतरीं ॥ ४ ॥
नेणे स्नान दान जप आसन मुद्रा । सदा सर्व काळ ध्याऊं चैतन्यपदां ॥ ५ ॥
बहिणी म्हणे मुक्त आम्ही सद्गुरूचे ध्यानें । प्रेमें भक्तिभावें तया वोवाळूं प्राणें ॥ ६ ॥