मंगळवारचें पद देवीचें
उदो देवी तूझा, उदो देवी तूझा । असो गोंधळ, पाही माझा ॥ध्रु०॥
आदिमाये तुवां हा प्रसाद दिला । हे निवृत्तिवधू आजीं मजला ॥
लाधली आजि बरा हर्ष ज्ञाला खरा । घालुं गोंधळ आतां शीघ्र तूझा ॥१॥
हा निगम संबळ, वाजवुनि केवळ । लोक मिळवुनियां येथ सबळ ॥
स्वात्मज्योती ती बरी दिवटि धरुनि करी । नाचूं थै थै पुढें आजि तूझ्या ॥२॥
काममहिषीचिया बळिसि घेई दयाब्धे । तुझ्या वंदुं ह्या देवी पाया ॥
आजिचा सुदिन हा मंगळचि होय हा । आली अंगीं महामाय माझ्या ॥३॥
धन्य हे माउली, आजि मज पावली । नवस घेउनी भली तृप्त झाली ॥
चिन्मयी ती कुलस्वामिनी केवळ । वासुदेवा विमळ बोध दे जी ॥४॥
मंगळवारचा अभंग
स्मरुं अंबिकेला महेश मेहळा । अवितर्क्य लीला मला पहा ॥१॥
नमूं आदिमाये, अये शंभुजाये । त्वरें धांवत ये तूं ये वेळा ॥२॥
कामक्रोधशुंभनिशुंभ माजले । आम्हां गांजियेलें धांवें पावें ॥३॥
लोभ रक्तबीज संहारीं तो आज । न दिसे त्राता मज तुजविण ॥४॥
चंड मुंड मद मत्सर हे खेद । देती, शिरच्छेद करी यांचा ॥५॥
अहंकार धूम्रनेत्र खाऊं आला । मारी त्वरें याला मूलासहित ॥६॥
हाणी प्रतिपक्षीं वासुदेवा रक्षीं । कृपेनें निरीक्षीं साक्षिभूते ॥७॥
भजन
जय जय भगवति दुर्गेदेवी । मजवरी कृपा दृष्टी ठेवी ॥