रुक्मिणी स्वयंवर - प्रसंग पहिला

रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.

प्रसंग पहिला

श्रीगणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥

ॐ नमोजी कृष्णनाथा । गणेशसरस्वती नामें धरिता ।

तूंचि तूं कुळदेवता । कवणा आतां मी प्रार्थू ॥ १ ॥

तूंचि अखिल अवघे जन । सहज गुरु तूं जनार्दन ।

कृष्णकथेसी लावी मन । नित्यात्मगुण गावया ॥ २ ॥

ऎकतां कृष्णकथाश्रवण । तेणें चित्तवृत्ति वेधली जाण ।

कर्माकर्मी अखंडपण । लागलें ध्यान भीमकीसी ॥ ३ ॥

शुकयोगींद्राप्रती प्रश्न करी परीक्षिति । भीमकीहरण श्रीपति ।

काय निमित्त्तीं पैं केलें ॥ ४ ॥

का करितोसी म्हणसि प्रश्न । तरी मी त्यक्तोदक जाण ।

वदें कथामृत श्रवण । तें जीवन मज तुझेनि ॥ ५ ॥

विशेष हें कृष्णचरित्र । तुझेनि शुद्धमुखें पवित्र ।

श्रवण करितां माझे श्रोत्र । अधिकाधिक भुकेले ॥ ६ ॥

इतर कथा नव्हे फुडी । नित्य नूतन इची गोडी ।

सेवूं जाणति आवडी । ते परात्परथडी पावले ॥ ७ ॥

देखोनि प्रश्नाचा आदर । शुक कथेसी झाला सादर ।

कैसा वचन बोलिला गंभीर । कृपा अपार रायाची ॥ ८ ॥

ऎक बापा परीक्षिती । तूं तंव सुखाची सुखमुर्ती ।

भीमकीपाणिग्रहणस्थिती । यथानिगुती सांगेन ॥ ९ ॥

अगा वसुदेवाचिये तप:प्राप्ती । श्रीकृष्ण देवकीउदरा येती ।

कृष्णाची जे कृष्णशक्ती । जालो उतरती भूमंडळीं ॥ १० ॥

कनकासवें जैसी कांती । सूर्यासवे जैसी दीप्ती ।

तैसी अवतरली कृष्णशक्ती । विदर्भदेशी रुक्मिणी ॥ ११ ॥

जैसा मूर्तिमंत विवेक । तैसा जाण राजा भीमक ।

सत्त्वाथिला अतिसात्त्विक । निष्कलंक शोभत ॥ १२ ॥

श्रद्धा पत्‍नी शुद्धमती । झाला गर्भातें धरिती ।

तेथें जन्मली कृष्णशक्ती । चिच्छक्ती रुक्मिणी ॥ १३ ॥

नवविधा तेचि नवमास । गर्भा भरले पूर्ण दिवस ।

साङ्‌ग जन्मली रूपस । नवनिधान रुक्मिणी ॥ १४ ॥

पांचां विषयांचे शेवटीं । सुबुद्धी उपजे गोमटी ।

तैसी पांचांहूनि धाकुटी । जाहली गोरटी रुक्मिणी ॥ १५ ॥

जेंहूनी जन्मली कुशीं । तैंहूनि आवडे रायासी ।

अमान्य करुनि पांचासी । तेची एकी पढियंती ॥ १६ ॥

स्वरूपरूपें अतिसुंदर । लावण्यगुणें गुणगंभीर ।

दिवसेंदिवस जाहली थोर । वरविचार रायासी ॥ १७ ॥

तेथें कीर्तिनामा ब्राह्मण । रायापाशीं आला जाण ।

तेणें कृष्णकीर्तन । तेथें तनमन वेधलें ॥ १८ ॥

बसली होती रायापाशी । सादर देखोनि भीमकीसी ।

मग वर्णिलें कृष्णरूपासीं । चित्स्वरूपेसी साकार ॥ १९ ॥

जो निर्गुण निर्विकार । जो निष्कर्म निरुपचार ।

तोचि जाहला जी साकार । लीलाविग्रही श्रीकृष्ण ॥ २० ॥

अतिसुरंग चरणतळें । उपमें कठिण रातोत्पलें ।

बालसूर्याचेनि उजाळें । तैसीं कवळें टांचांचीं ॥ २१ ॥

ध्वजवज्रांकुशरेखा । चरणींची सामुद्रिकें देखा ।

न वर्णवती सहस्रमुखा । ब्रह्मांदिकां अलक्ष्य ॥ २२ ॥

पिळूनि इंद्रनीळकिळी । वोतली कृष्णतनु सांवळी ।

पाउले सुकुमार कोंवळीं । घोटीं निळीं दोहीं भागीं ॥ २३ ॥

सुनीळ नभाचिया कळीका । तैशा आंगोळिया देखा ।

वरी नखें त्या चंद्ररेखा । चरण पीयूषा लुब्धल्या ॥ २४ ॥

सांडूनि कठिणत्वाचें डिंभ । सचेतन मर्गजस्तंभ ।

तैसे चरण जी स्वयंभ । श्रीकृष्णशरीरीं शोभती ॥ २५ ॥

कृष्णअंगा जडलेंपणें । विजूसी पुट आलें चौगुणें ।

विसरली अस्तमाना जाणें । पीतांबरपणें कांसेसीं ॥ २६ ॥

कृष्णचरणींचीं भूषणें । वांकीने वेदांसी आणिलें उणे ।

ते तंव धरूनि ठेलें मौनें । कृष्णकीर्तनें हे गर्जे ॥ २७ ॥

सोहंभावाचेनि गजरें । चरणीं गर्जती नेपुरें ।

मुमुक्षूचें मन निदसुरें । त्यातें चेइरें करीतसे ॥ २८ ॥

तोडर गर्जे कवणे मानीं । जन्ममरणें हरिचरणीं ।

नाहीं उपासकालागोनी । संकल्प विकल्प गेलिया ॥ २९ ॥

अनंत रूप नाकळे वेदीं । तें आकळीं जेवीं सद्‍बुद्धी ।

तैशी मेखला माजामधीं । चिद्रत्‍नसंधी जडली असे ॥ ३० ॥

स्वपदा पावलियापाठीं । जेवीं वृत्ति होय उफराटी ।

तैशा किंकिणी क्षुद्रघंटी । अधोमुख मेखलेशीं ॥ ३१ ॥

अतिशयेंसी माजू साना । होता अभिमान पंचानना ।

देखोनी श्रीकृष्णमध्यरचना । लाजोनि राना तो गेला ॥ ३२ ॥

पहावया कृष्णमध्यरचना ॥ चित्रींचीं लेपे जाहलीं जाणा ।

सांडूनि अंगींच्या अभिमाना । मेखले खेवणा स्वयें जडिले ॥ ३३ ॥

नाभीशीं नाभी नाभिता । देऊनि स्थापिला विधाता ।

तेथीचा तो पार पाहतां । विधाता पैं नेणेचि ॥ ३४ ॥

म्हणोनी पद्मनाभी नांवा । उदरीं त्रैलोक्याचा सांटोवा ।

जेवीं सागरामाजी ठेवा । तरंगांचा पैं केला ॥ ३५ ॥

सागरीं लहरीची नव्हाळी । तैसी उदरीं त्रिगुणत्रिवळी ।

कर्माकर्म रोमावळी । बहिर्मुखें वाढलिया ॥ ३६ ॥

नकळे ह्रदयींचें महिमान । उपनिषदां पडलें मौन ।

तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी ॥ ३७ ॥

शून्य सांडोनि निरवकाश । तेंचि कृष्णह्रदय सावकाश ।

संतीं केला रहिवास । वृत्तिशून्य होऊनि ॥ ३८ ॥

तया पदीं जे सुलीन । तेचि जडीत पदक जाण ।

मुक्त मोतिलग संपूर्ण । गुणेंविण लेइलासे ॥ ३९ ॥

ज्ञानवैराग्य शुक्तिसंपुटीं । निपजलीं मुक्त मोतियें गोमटी ।

तेचि एकावळी कंठीं । श्रीकृष्णाचे शोभत ॥ ४० ॥

जनविजन समान कळा ॥ तेचि आपाद वनमाळा ।

शांति निजशांति निर्मळा । रुळे गळां वैजयंती ॥ ४१ ॥

ओंकार मातृकांसकट । तोची जाणावा कंबुकंठ ।

तेचि वेदांचे मूळपीठ । तेथूनि प्रगटे त्रिकांडी ॥ ४२ ॥

खणोनि उपनिशदांची खाणी । अर्थ काढिला शोधूनि ।

तोचि कंठीं कौस्तुभमणी । निजकिरणीं झळकत ॥ ४३ ॥

गगनगजाचे शुंडादंड। तैसे सरळ बाहुदंड ।

पराक्रमे अतिप्रचंड । अभयदानीं उदित ॥ ४४ ॥

पंचभूतें भिन्नभिन्न । तैसा आंगोळीया जाण ।

तळहात तो अधिष्ठान । पांचही मिळति एकमुष्टी ॥ ४५ ॥

चहूं खाणीं क्रियाशक्ती । त्या चारी भुजा शोभती ।

आयुधें वसविली हातीं । कवणे स्थिती पाहा पां ॥ ४६ ॥

अत्यंत तेजें तेजाकार । द्वेतदलनीं सतेज धार ।

तेंचि धगधगती चक्र । अरिमर्दनीं उद्भट ॥ ४७ ॥

घायें अभिमान करी चेंदा । तेंचि झळकत पैं गदा ।

नि:शब्दीं उठवी शब्दा । वेदानुवाद पांचजन्य ॥ ४८ ॥

अभेदभक्त मज भेटती । तेव्हां सुमनें कैंची मिळती ।

त्यांचिये पूजेलागी हातीं । ह्रदयकमळ वाहतसे ॥ ४९ ॥

बाहुवटे कीर्तिमुखें । चारीं वेद जाहले सुखें ।

करीं कंकणें जडित माणकें । वार्तिकांत वेदांत ॥ ५० ॥

यंत्रउभवणी उपासकां । त्याचि आंगोळीयां मुद्रिका ।

त्रिकोण षट्‍कोण कर्णिका । जडित माणिका आगमोक्त ॥ ५१ ॥

पूर्वोत्तरमीमांसा दोनी । कुंडलें जाहलीं कृष्णकर्णी ।

तीं उपनिषदर्थकिरणीं । झळकताती सतेज ॥ ५२ ॥

एक म्हणती साकार । एक म्हणती निराकार ।

परी साकार ना निराकार । श्रवणें विकार मावळती ॥ ५३ ॥

गाळोनियां मोक्षसुख । तेथींचा मुसावोनि हरिख ।

तेंचि कृष्णाचे श्रीमुख । नित्य निर्दोष मिरवित ॥ ५४ ॥

उपमे चंद्रकळा गहन । तो तंव कृष्णपक्षीं क्षीण ।

उदय अस्ताविण संपूर्ण । वदनेंदु कृष्णाचा ॥ ५५ ॥

उपमेरहित हनुवटी । पाहतां प्रेम दुणावे पोटीं ।

त्रैलोक्यसौंदर्य एकवटी । दाविताहे दृष्टी निमासुरा ॥ ५६ ॥

जीवशिव एकाकार । तैसे मीनले दोन्ही अधर ।

माजी दंतपंक्ती तेजाकार । चिदानंदे झळकती ॥ ५७ ॥

नास्तिका देऊनि नास्तिक । उंचावलें तें नासिक ।

पवन हिंडता पावला दु:ख । कृष्णश्वासें सुखी जाला ॥ ५८ ॥

विशाळ डोळे चैतन्यपणें । तेथें विसावों आले पाहते पाहणें ।

आपआपणिया देखणें । सबाह्याभ्यंतर समदृष्टी ॥ ५९ ॥

ज्ञानअज्ञानांचीं पातीं । मिथ्यापणें लवत होती ।

तेहीं सारूनि मागुती । सहजस्थिती पहातसे ॥ ६० ॥

अधिष्ठान विशाळभाळीं । तैसी शोभा कपाळीं ।

सच्चिदानंद एकमेळीं । तोच त्रिवळीं ललाटीं ॥ ६१ ॥

उगाळूनि अहंपण । सोहं काढिलें शुद्धचंदन ।

तेंही केलें कृष्णार्पण । निजभाळीं मळवट ॥ ६२ ॥

सपूर गगनांकुर सरळ । तैसीं मस्तकीं केश कुरळ ।

कृष्णमुखेंसी विन्मुख सबळ । अधोगती धांविन्नलें ॥ ६३ ॥

म्हणोनि ऎक्याचिये मुष्टी । आणुति बांधिलें वीरगुंठीं ।

सहज भावाचिये मुगुटी । मग दाटलें सुबुद्ध ॥ ६४ ॥

तया मुगुटा-तळवटीं । मुक्तमयूरपिच्छा वेंटी ।

कैसी शोभताहे गोमटी । दृश्यदृष्टीं अतीत ॥ ६५ ॥

सलोक सरूप समीपता । तें तंव सांडी पिसें सर्वथा ॥

देखणेंपणेंविण डोळसता । तेचि माथां स्तबक ॥ ६६ ॥

अलंकारामाजी आवडी । तेथें कृष्णासी अधिक गोडी ।

तेंचि सांगू विसरली फुडी । चुकी गाढी पडियेली ॥ ६७ ॥

सकळ भूषणांमाजी भूषण । ब्राह्मणाचा दक्षिण चरण ।

ह्रदयीं वाहे नारायण । श्रीवत्सलांच्छन गोविंद ॥ ६८ ॥

श्रीकृष्णाची कृष्णमूर्ती । लावण्य आलें त्रिजगतीं ।

बरविया बरवा श्रीपती । वाचा किती अनुवादों ॥ ६९ ॥

जें जें अत्यंत सुंदर दिसे । तें ते कृष्णाचेनि लेशें ।

डोळियां तेणें लाविले पिसें । जालीं मोरपिसें हरिअंगी ॥ ७० ॥

सौंदर्याचा अभिमान । मदनाआंगी संपूर्ण ।

तेणें देखोनिया श्रीकृष्ण । स्वदेहासी विटला ॥ ७१ ॥

मदनें कृष्ण देखिला साङ्‌ग । अंग जाळूनी जाला अनंग ।

पोटी येऊनियां चांग । उत्तमांग पावला ॥ ७२ ॥

बरवेपणें मीच मोठी । हें होतें लक्ष्मीचे पोटीं ।

कृष्ण देखोनियां दृष्टी । तेही उफराटी जाहली ॥ ७३ ॥

रूपा भाळोनिया कैसी । रमा झाली परम पिसी ।

लक्ष्मी नावडे देवासी । जाली दासी पायांची ॥ ७४ ॥

कृष्ण देखिला जिये दृष्टी । ते परतोनि मागुती नुठी ।

अधिकाधिक घाली मिठी । होय तल्लीन हरिरूपीं ॥ ७५ ॥

कृष्ण पहावयाच्या लोभा । नयनीं नयनासी निघती जिभा ।

श्रवणी श्रवणासी वल्लभा । अभिनव शोभा कृष्णाची ॥ ७६ ॥

कृष्णरस जे सेवित । तयांसी फिकें होय अमृत ।

अमर अमृतातें सेवित । तेही चरफडित । हरिरसा ॥ ७७ ॥

श्रिया वाखाणितां अमरेंद्र । कृष्ण इंद्राचाही इंद्र ।

क्षय पावती इंद्र चंद्र । कृष्ण नरेंद्र अक्षयी ॥ ७८ ॥

असुर सुरां उत्थापिती । ते गार्‍हाणें हरीसीं देती ।

इंद्र चंद्र प्रजापती । तेही चरफडती हरिपदा ॥ ७९ ॥

ते वेळीं कृष्णनाथ । कंस केशिया करी घात ।

देवा निजपदीं स्थापित । अमरनाथ श्रीकृष्ण ॥ ८० ॥

कृष्णऎसा त्रिशुद्धी । उदार न देखें स्वात्मबुद्धी ।

सेवकां बैसवी निजपदीं । अक्षय सिद्ध देऊनियां ॥ ८१ ॥

जे नेदी देवकीयशोदेसी । ते गति दिधली पूतनेसी ।

समान येणें अरिमित्रांसी । उदारतेसी काय वानूं ॥ ८२ ॥

निजपदातें श्रीकृष्णनाथ । सद्भक्तांसी आपण देत ।

आपण होय भक्तांकित । राहे तिष्ठत तयांपासी ॥ ८३ ॥

भक्ताआज्ञा मानी मोठी । सिंह सूकर होय जगजेठी ।

प्रकटला कोरडिये काष्ठीं । वचनासाठीं भक्ताच्या ॥ ८४ ॥

ऎसा धीरवीर उदार । गुणागुणी गुणगंभीर ।

पृथ्वीवरी यदुवीर । दुजा नाहीं सर्वथा ॥ ८५ ॥

कृष्णचरणींचा आराम । पाहातां विसरें क्रियाकर्म ।

समाधी तेथे विश्राम । मनोरम हरिपदीं ॥ ८६ ॥

कृष्णरूपाची प्राप्ती । भीमकी सादर श्रवणार्थी ।

ह्रदयीं आविर्भवली मूर्ती । बाह्यस्फूर्ति मावळली ॥ ८७ ॥

आंग जाहलें रोमांचित । कंठी बाष्पें पैं दाटत ।

शरीर चळचळां कांपत । पडे मूर्च्छित धरणीये ॥ ८८ ॥

एक म्हणती धरा धरा ॥ एक पल्लवें घालिती वारा ।

एक म्हणती हे सुंदरा । कृष्णकीर्तनें झडपलीं ॥ ८९ ॥

भक्तीपाशीं भावना जाये । तैसी धांविन्नलि धाये ।

झणी दृष्टी लागेल माये । म्हणोनि कडिये घेतली ॥ ९० ॥

रायासी कळलें चिन्ह । ईस जाहले कृष्णश्रवण ।

तेथेंचि वेधलें असे मन । कृष्णार्पण हे करावी ॥ ९१ ॥

मनीं धरोनि हाचि भाव । अंत:पुरा आला रावो ।

रुक्मिणीसी कृष्णनाहो । राणिये रावो पुसतसे ॥ ९२ ॥

मग बोलली शुद्धमती । हेंचि होतें माझिये चित्तीं ।

कन्या अर्पावी श्रीपती । पुण्य त्रिजगतीं न समाये ॥ ९३ ॥

वर मानला आम्हांसी । कन्यादान श्रीकृष्णासी ।

तरीच सार्थकता जन्मासी । दोहीं पक्षांसी उद्धार ॥ ९४ ॥

विकल्परुक्मिया कृष्णद्वेषी । वचन न मानेचि त्यासी ।

काय म्हणावे वडिलांसी । गोवळीयासीं सोयरीक ॥ ९५ ॥

कृष्ण अगुणांचा अरूप । कन्या सुगण अतिस्वरूप ।

दोहींशीं घटिताचा विकल्प । शून्य संकल्प सोयरिकें ॥ ९६ ॥

रुक्मिया कृष्णनिंदा करित । वाग्देवता स्तुति वदत ।

निंदेसी वागेश्वरी भीत । पाप अद्‍भुत निंदेचे ॥ ९७ ॥

एका जनार्दनीं विनवित । निंदेमाजी स्तुति होत ।

श्रोतीं तेथें ठेवुनि चित्त । कथा निश्चित परिसावी ॥ ९८ ॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते

रुक्मिणीस्वयंवरे प्रथम: प्रसंग: ॥ १ ॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

N/A
Last Updated : July 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP