प्रसंग सतरावा
श्रीगणेशाय नम: । श्रोते म्हणती नवल । ऎकता याचे रसाळ बोल । अति अनुभव आणि सखोल । येताती डोल प्रेमाचे ॥ १॥
मग म्हणती कविपोषका । थोर मिळविलें सुखा । पार नाहीं आजिचिया हरिखा । कथा सांग कां नि:शंक ॥ २ ॥
महाप्रसाद जी आतां । म्हणॊनि चरणीं ठेविला माथा । कोणें नाचविलें कृष्णनाथा । नोवरी नाचविता कोण झाला ॥ ३ ॥
दोहीं पक्षींच्या दोघां जणां । कांस घालोनि आले रंगणा । सभा देखोनि दाविती खुणा । कळा नाचणीं दाविती ॥ ४॥
बोधें कृष्ण घेऊनि खांदी । नाचत ऎक्यतालें तिहीं छंदीं । चुकों नेदी समान बुद्धी । नाना छंदी नाचत ॥ ५ ॥
देहाभिमानें घेतली नोवरी । दावित नाना छंद कुसरी । द्वंद्वतालातें सांवरी । देतसे भोंवरी भवस्वर्गी ॥ ६ ॥
बोध नाचत घेऊनि कृष्ण । नोवरी घेऊनि देहाभिमान । आपुलाले पक्षीं जाण । दोघेजण नाचती ॥ ७ ॥
ओंवाळूनी श्रीकृष्णासी । अनंत मुद्रा याचकासी । देऊनि आभर केलें त्यांसी । मागों आणिकांसी विसरले ॥ ८ ॥
ओंवाळणी हातीं चढे । तों न पाहे आणिकांकडे । वानिती श्रीकृष्णाचे पवाडे । मागणें त्यापुढें खुंटलें ॥ ९ ॥
श्वेतपीत त्रिगुणवास । वोवाळूनि सावकाश । त्याग करिती कृष्णदास । अतिउल्हास सोहळियाचा ॥ १० ॥
ओंवाळणी नोवरीकडॆ । अमित विषयसुख पडे । घेतां अधिक तृष्णा वाढे । चहूंकडे ते मागती ॥ ११ ॥
न सुटती अभिलाषाच्या गाठी । सोडूनि देतां कांपती मुष्टी । मागुती लोलंगता दृष्टी । कवडीसाठीं झोंबती ॥ १२ ॥
त्यागितां जीर्ण देहाचें वास । दाते होती कासाविस । न सरे मागत्याची आस । त्यातें बहुवस वानिती ॥ १३ ॥
पाहतां अत्यंत जर्जर झालें । दिसे नवांठायीं तरकेलें । पाहिजे अविमुक्ती त्यागिलें । वायां गेलें दो दिसां ॥ १४ ॥
ऎकोनि त्यागाची भात । अधोमुख होय गृहस्थ । लोभ न संडी पोटाआंत । क्रोधें निंदित शिकविल्या ॥ १५ ॥
तुम्हीं कैसेनि त्याग केला । शिकवूं आलेती पुढिलांला । आम्ही नायकों तुमच्या बोला । म्हणोनि रुसला त्यागासी ॥ १६ ॥
त्याग नोहे नोवरीपक्षीं । देखोनि हांसिजे मुमुक्षीं । कृष्णवर्हाडी अतिदक्षी । त्याग विषयीं उद्भट ॥ १७ ॥
कृष्ण घेऊनि नाचतां । बोध शिणला तत्त्वतां । हळूच उतरूनि कृष्णनाथा । होय निघता लाजोनी ॥ १८ ॥
अभिमान पैं नोवरी । कांहीं केल्या न उतरी । पळे उठी पळे दूरी । लाज न धरी सभेची ॥ १९ ॥
त्यासी धरूं धांविन्नले एक । नोवरि घेऊनि पळे देख । कोंडूं जातां अधिकाधिक । ठकूनि लोक तो पळे ॥ २० ॥
त्यासी संतीं केली विधी । हळूचि आणिला सोहंबुद्धी । तेही सांडुनि त्रिशुद्धी । नोवरी संधी उतरली ॥ २१ ॥
तेथे झाली जी नवलपरी । भक्तिं प्रार्थिला मुरारी । नोवरी घेऊनि खांद्यावरी । रंगी श्रीहरी नाचावे ॥ २२ ॥
भक्तिभाव भुलला देवो । वचन नुल्लंघीच पाहा हो । नोवरी घेऊनि देवाधिदेवो । दावीं निर्वाहो नृत्याचा ॥ २३ ॥
निजीं निजरूपावरी । समसाम्य निजनोवरी । घेऊनियां खांद्यावरी । नृत्य करी स्वानंदें ॥ २४ ॥
पहिलेनि तालें जी तत्त्वतां । अकार हाणोनियां लातां । उकरमकारंचिया माथां । पाय पिटीता होय कृष्ण ॥ २५ ॥
उल्लाळ देत कवणे परी । वैकुंठ-कैलासांहूनि वरी । शून्य सोडूनियां दुरी । चिदंबरीं नाचत ॥ २६ ॥
नोवरी वाढवीं आपणावरी । आपण वाढें नोवरी । क्षणा तळीं क्षणा वरी । नानापरी नाचत ॥ २७ ॥
पहातां पहातां पडलें टक । नोवरी नोवरी झाली एक । जीव शिव हे सरली भाक । निजसुख स्वानंदें ॥ २८ ॥
कृष्णासी आठवलें देख । आम्ही दोघें होऊनि एक । नाचतां जीवसकळिक । जीवपणासी मुकतील ॥ २९ ॥
यालागीं काळाचिये स्थिती । नोवरी उतरी श्रीपती । जयजयकार कीजे भक्तिं । वोंवाळिती सर्वस्वें ॥ ३० ॥
धेंडा नाचविलियावरी । तळी आणिली बाहेरी । फळीं पुष्पीं अति साजिरी । ज्ञानदीपें सोज्वळ ॥ ३१ ॥
दिधली अनुभवाच्या हाता । वंदूनि झाला तो बोलता । वेगीं सांगा कुळदेवता । नाचविता मी होईन ॥ ३२ ॥
आधीं सांगा नोवरीकडे । नांवे एकों द्या निवाडे । ते नाचवीन वाडेंकोडें । वराकडे मग पुसों ॥ ३३ ॥
नोवरीकडील कुळदेवता । मायाराणी आणि ममता । कल्पनाकामाक्षी सर्वथा । माजघरी खेळतसे ॥ ३४ ॥
वासनादेवी सकळी । बाळा बगळा मुकी मैराळी । मारको मेसको कराळी । उच्छिष्ट चांडाळी भाणाची ॥ ३५ ॥
आशा तृष्णा दोघीजणी । आमुच्या कुळी मुळींहूनी । निंदादेवी महादारुणी । तिसी सज्जनी कांपिजे ॥ ३६ ॥
मोहमातंग आमुचे कुळी । लोभवेताळ त्याजवळी । क्रोध झोटिंग महाबळी । आधीं सळी शुभकार्या ॥ ३७ ॥
जें जें दैवत सांगे पैं गा । तें तें नातळत आणि रंगा । न ये त्या वाटा लावी वेगा । नाचवूनि उगा तो राहे ॥ ३८ ॥
कृष्णपक्षी अलौकिक । अवघें कुळदैवत एक । नाचतां अनुभव कौतुक । पडलें टक सकळिकां ॥ ३९ ॥
कृष्ण कुलदैवत एक । दुजें नाहीं नाहीं देख । एका जनार्दनीं सुख । अति संतोष नाचतां ॥ ४० ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमतें रुक्मिणी स्वयंवरें धेंडानृत्यं नाम सप्तदश: प्रसंग: ॥ १७ ॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥