प्रसंग अठरावा
श्रीगणेशाय नम: । हातीं दुधातुपाची वाटी । देवकी बैसवूनि पाटी । पुढें दिधली भीमकी गोरटी । उदर शिंपी शुद्धमती ॥ १ ॥
धन्य धन्य तुमची कुशी । जेथें जन्मले ह्रषीकेशी । म्हणोनि लागली चरणांसी । रुक्मिणीसी निरवित ॥ २ ॥
चौघां पुत्रांहूनि आगळी । वाढविली हे वेल्हाळी । आतां दिधली तुम्हांजवळीं । कृष्णस्नेहें पाळावी ॥ ३ ॥
दोघीजणीं मातापितरीं । हातीं धरूनियां नोवरी । यादवांचे मांडीवरी । यथानुक्रमें बैसविली ॥ ४ ॥
गहिंवर न धरवे भीमकासी । प्रेम लोटलें तयासी । मिठी घालोनि कृष्णचरणांसी । उकसाबुकसी स्फुंदत ॥ ५ ॥
लाज सांडोनि शुद्धमती । पाया लागली श्रीपती । भीमकी देऊनियां हातीं । वैकुंठपती जोडिला ॥ ६ ॥
पाहाती नरनारी सकळा । आसवें आलीं त्यांचियां डोळां । खंतीं न भीमकबाळा । मायेकडे न पाहेचि ॥ ७ ॥
कृष्णीं लागलिया प्रीती । मायमाहेराची खंती । सर्वथा न करी चितीं । निजवृत्ती हरिचरणीं ॥ ८ ॥
वोहमायेसी कळवळ । पायां लागे वेळोवेळा । आसुवें पूर्ण आलीं डोळा । म्हणे प्रतिपाळा भीमकीसी ॥ ९ ॥
शुद्धमती म्हणेज रायासी । मज आंदण द्या भीमकीसी । होईन कृष्णाची निजदासी । चरण सेवेसी निरंतर ॥ १० ॥
राजा म्हणे शुद्धमती । जीवप्राण आणि संपत्ती । सर्वस्व अर्पिले श्रीपती । विकल्प चित्तीं न धरावा ॥ ११ ॥
भाव विश्वास दोघेजण । दिधले भीमकीसी आंद्ण । कृष्णसेवेलागीं जाण । अहर्निशी सादर ॥ १२ ॥
द्विपदा आणि चतुष्पदा । नाना रत्ने धातु अष्टधा । भीमकें आंदण गोविंदा । बहुत संपदा दीधली ॥ १३ ॥
वसुदेवादि उग्रसेन । भीमकासी करिती आमंत्रण । भोजनाचा आग्रह जाण । केला सन्मान सर्वांचा ॥ १४ ॥
भीमकें विनविलें कृष्णासी । विनंति आहे पायांपाशी । पुत्र झालिया भीमकीसी । निजपंक्तीसी शेष दीजे ॥ १५ ॥
चतुर्विधा सूत्रधारी । तुझी आज्ञा आमुचे शिरीं । भोजनाचा आग्रह न करीं । वचन श्रीहरी मानलें ॥ १६ ॥
वरात निघाली वेगेंसी । गृहप्रवेश द्वारकेसीं । आज्ञा दिधली भीमकासी । निजनगरासी तो निघे ॥ १७ ॥
दोघें वधूवरें गजस्कंधीं । भोंवतीं यादवांची मांदी । गीत नृत्य अतिविनोदीं । द्वारकेंमध्यें उत्सवो ॥ १८ ॥
मदगजगंधाचे पैं सडे । कुंकुम कस्तूरी चहूंकडे । मखरें श्रृंगारली पुढें । वाडेंकोडें झळकती ॥ १९ ॥
नगर श्रृंगारिलें कुसरी । गुढिया तोरणें घरोघरीं । कर्दळीस्तंभ रोविले द्वारीं । फळें त्यामाझारीं शोभती ॥ २० ॥
पूर्णकुंभ द्वारोद्वारीं । प्रदीप्त दीप ठेविले वरी । दधि-अक्षता-दुर्वांकुरीं । सुमनहारीं सुगंध ॥ २१ ॥
वोहरें पहावया कौतुक । नगरनागरिक लोक । मुडपघसणी होतसे देख । एकेंएक धांविन्नले ॥ २२ ॥
एक चढलीं माडिया गोपुरीं । पुष्पांजुळी देती नरनारी । देव वर्षती अंबरीं । जयजयकार प्रर्वतला ॥ २३ ॥
पाहता कृष्णस्वरूपासी । अराणुक नाहीं डोळीयांसी । यालागीं न येति दृश्यापाशीं । कृष्णसुखासी पकडले ॥ २४ ॥
पदोपदीं दीपावळीं । वोंवाळीती वनमाळी । बाप दैवाची नव्हाळी । भीमकबाळी अर्धांगी ॥ २५ ॥
वेश्या आणि संन्यासी । मुडपघसणी होतसे कैसी । कोप आला श्रीपादासी । दंडें वैश्येसी ठोकिलें ॥ २६ ॥
येरी विसरली देहासी । वृत्ति लोभली कृष्णस्वरूपासीं । रागें लाता हाणोनि तिसी । म्हणे विटाळ आम्हासी कां केला ॥ २७ ॥
येरि हांसोनि कपाळ पिटी । अजुनी क्रोध न सोडी पाठी । विटंबिली दंड कांसोटी । आत्मदृष्टी तुम्हां नाहीं ॥ २८ ॥
मी उत्तम पैल हीन । विषमभेदाचें अज्ञान । सर्वांभूतीं समसमान । निजात्मज्ञान तुम्हा नाहीं ॥ २९ ॥
नाहीं निजशांती रोकडी । तंव कां केली तडातोडी । भगवीं नाशिलीं लुगडीं । उपाधि गाढी श्रीपादा ॥ ३० ॥
शेंडी सांडिली उपडोनी । वासना वाढविली चौगुणीं । श्रीकृष्ण देखिलिया नयनीं । विटाळ मानी तो निजांध ॥ ३१ ॥
ऎसा करितां वाग्वाद । तंव दुरी अंतरला गोविंद । आड ठाकला जनसंबंध । न दिसे मुकुंद सर्वथा ॥ ३२ ॥
वोहरे आली महाद्वारा । लोण उतरिती सुंदरा । मूद वोवाळी सुभद्रा । कृष्ण पुढारां चालिला ॥ ३३ ॥
पूर्ण कलशेंसीं आल्या दासी । अनंत वाणें परिवस्त्रेंसी । ते ते मेचू देऊनि त्यांसी । नानाविधेंसीं अलंकार ॥ ३४ ॥
शोभा आली भाणववासी । कृत्रिम लक्ष्मी शोभली कैसी । साच मानलें जनांसी । तिणें सकळांसी भुलविलें ॥ ३५ ॥
येतां देखोनि कृष्णनाथा । लक्ष्मी लाजली तत्त्वता । सांडूनियां कृत्रिमता । निजस्वरूपता प्रगटली ॥ ३६ ॥
भीमकीया देखिलें लक्ष्मीसी । विस्मय वाटला तियेसी । विचारितां निजमानसीं । दोहीं रूपेंसीं आपणचि ॥ ३७ ॥
विधि गृहप्रवेशासी । वोहरें बैसविली भाणवसासी । करविती लक्ष्मीपूजनासी ॥ विधिवेदेंसी द्विजवर ॥ ३८ ॥
परमामृतें भरूनि वाटी । देवकी लावी सुनेच्या वोठीं । पुसे वृद्धाचारगोष्टी । सुनें घालीसी पोटीं निजमाये ॥ ३९ ॥
येरीं म्हणे परमानंदें धाल्यें । कृष्णसुखे नित्य निवाल्यें । तुमचे सेवेसी पावल्यें । प्राप्त झाल्यें हरिचरणा ॥ ४० ॥
रेवती येऊनि भीमकीपाशीं । वेगीं निरवी भाणवसासी । हातीं धरूनि नोवरीसी । काय तियेसी सांगत ॥ ४१ ॥
वरूनि आलीसी कृष्णानाथा । तरी हे सर्व तुझे माथां । देणेंघेणें कार्यचिता । कर्तव्यता तुज आली ॥ ४२ ॥
येथींची ऎसी आहे रिती । सुचित्त राखावी चित्तवृत्ती । सकल मानावी कृष्णस्थिती । जेणें श्रीपती संतोषे ॥ ४३ ॥
जे कां खरकटलें पाळें । अत्यंत गोंगाणी गोंगाइलें । तें भाणवसाबाहेर पाहिजे केलें । नेऊन घातलें वोंवळ्यांत ॥ ४४ ॥
जेंकां उठंडळ डळमळी । अत्यंत झणत्कारें गडबडीं । आश्रमआळां ठेविं रोकडी । वेळणी तोंडीं विधीची ॥ ४५ ॥
जें कां कांठफरा उललें । देखसी ज्याचें बुड भंगलें । ते न पाहिजे हालविलें । असो संचरले निजआळां ॥ ४६ ॥
तपें तापली तुपाची । स्वर्गसिंका बैसका त्याची । सामुग्री वेंचिल्या तेथींची । मग उलंडूनि सांडिती ॥ ४७ ॥
कामक्रोधाचे उंदीर । कोरूनि टोलर करिती अपार । त्यांच्या मुखीं घालूनि पाथर । येतें द्वार बुजवावें ॥ ४८ ॥
लाविल्या लोण नलगे ज्यासी । लोणलक्षण त्या काय पहासी । ते तंव नाणावे पंक्तीसी । चवी त्यांसी पैं नाहीं ॥ ४९ ॥
सगळे शिजविता अवघड । काकड करिती कडकड । समजावें भरडीं दृढ । होतील गोड परिपाकें ॥ ५० ॥
कणिक चाळावी असकट । पाखडूनि सांडावें कसपट । होईल परिपाक चोखट । पूर्णपुरिया सिद्धलाडू ॥ ५१ ॥
कृष्णभाणवसा त्रिशुद्धी । अष्टमहासिद्धी नवनिधी । तेथें तुवां वागावें सोहंबुद्धी । जीवउपाधी सांडूनी ॥ ५२ ॥
सासु सासरे भावे दीर । आदिकरून लहान थोर । होऊनि अवघ्यासी सादर । अति तत्पर सेवेसी ॥ ५३ ॥
वडील जाऊ आपण । भीमकीकरीं निजकांकण । घालूनि करी निरवण । पाणिग्रहण भाणवसा ॥ ५४ ॥
धाकटे जावेसी प्रीतिकर । नवविध नवरत्नांचा हार । कंठीं घातला मनोहर । येरीं नमस्कार तिसी केला ॥ ५५ ॥
बाई जें जें तुम्ही शिकविलें । तें तें मज हितासी आलें । रेवति हरिखेली येणें बोलें । आलिंगिलें भीमकीसी ॥ ५६ ॥
एवं द्वारकेमाझारीं । परमानंद घरोघरीं । देव वर्षती कुसुमें अंबरीं । जयजयकार प्रवर्तला ॥ ५७ ॥
यापरी गृहप्रवेश । करूनियां हृषीकेश । रमायुक्त जगन्निवास । द्वारकावास करीतसे ॥ ५८ ॥
शुक म्हणे परीक्षिती । गृहस्थ जाला श्रीपती । भीमकीहरणाची ख्याती । तुजप्रती सांगितली ॥ ५९ ॥
एवं हरण पाणिग्रहण । तुज केलें गा श्रवण । ज्याचेनि श्रवणें जाण । दोष दारुण नासती ॥ ६० ॥
ग्रंथपीठिका संपूर्ण । कथेसी श्रीकृष्ण कारण । कळसा आलें निरूपण । प्रेम सज्जन जाणती ॥ ६१ ॥
रुक्मिणीहरणवार्ता । जुनाट होय सर्वथा । परी पाणिग्रहण व्यवस्था । नवी कथा कवित्वाची ॥ ६२ ॥
ऎसा विकल्प मानाल झणीं । जें बोलिले श्रीव्यासमुनी । तोचि अर्थ विस्तारूनी । प्रगट केला प्राकृतें ॥ ६३ ॥
यथाविधि पाणिग्रहण । मुळीं आहे व्यासवचन । तें सूत्रपाय निरूपण । श्लोकार्थ जाण बोलिलों ॥ ६४ ॥
साच न मानी ज्याचें चित्त । तेणें पाहावें श्रीभागवत । तेथील श्लोकीच श्लोकार्थ । ऎसाचि असे सर्वथा ॥ ६५ ॥
राजे जिणोनि दारुण । भीमकी आणोनी आपण । कृष्णें केलें पाणिग्रहण । हें निरूपण मुळींचें ॥ ६६ ॥
येणेंचि पदें पदविस्तारीं । कथा चालिली पुढारी । खोडी ना ठवावी चतुरीं । ग्रंथ निर्धारीं न पाहतां ॥ ६७ ॥
जैसें वटबीज अल्पप्राय । परी विस्तार गगना जाय । तैसीच हे कथा होय । थोडेनि बहू विस्तार ॥ ६८ ॥
मूळ सांडूनि सर्वथा । नाहीं वाढविलें ग्रंथा । पाहातां मूळींच्या पदार्था । अर्थकथा चालिली ॥ ६९ ॥
नाहीं ग्रंथारंभसंकल्प । नव्हता श्रोतयांचा आक्षेप । ग्रंथीं उजळला कृष्णदीप । सुखरूप हरिकथा ॥ ७० ॥
जेणे हा ग्रंथ करविला । तो आरंभींच उपरमला । पुढें ग्रंथ कैसा चालिला । बोलतां बोला न बोलवें ॥ ७१ ॥
नेणों काय कृष्णनाथा । हे आवडली ग्रंथकथा । तोचि होऊनि श्रोता वक्ता । अर्थ परमार्था आणिला ॥ ७२ ॥
ये ग्रंथींचें निरूपण । जीवशीवां होतसे लग्न । अर्थ पाहतां सावधान । समाधान सात्त्विकां ॥ ७३ ॥
येथें विवेकी व्हावा वक्ता । समाधान पाहिजे श्रोता । त्याचेनि संवादे हरिकथा । सुख समस्तां होईल ॥ ७४ ॥
होऊनि अनुभवकसवटी । कथा चालिली मर्हाठी । वोवी न चले फुकासाठीं । श्रद्धा पोटीं धरिलिया ॥ ७५ ॥
हे कृष्णकथा अलोलिक । महादोषांसी दाहक । भवरोगासी छेदक । अर्धमात्रा सेविलिया ॥ ७६ ॥
हे मुमुक्षीची कुलदेवता । मुक्तांची करी नित्य मुक्तता । येरां संसारियां सर्वथा । नवरसें निववीत ॥ ७७ ॥
जरी कोणी स्वभावें पुढें । उघडती कानींचीं कवाडें । अर्थ ऎकतां निवाडें । पुढें पुढें अतिगोड ॥ ७८ ॥
गोडपणें पडल्या मिठी । सुटती जीवशिवांच्या गांठी । कृष्णकथा हे गोमटी । उठाउठी विजलाभू ॥ ७९ ॥
येथें भीमकीचे पुरले आर्त । तो हा आदरें वाचितां ग्रंथ । श्रोतयांचे मनोरथ । कृष्ण समर्थ पुरवील ॥ ८० ॥
माझे पुरवाया मनोरथ । तों मनचि झाले कृष्णनाथ । एका जनार्दनीं नित्य तृप्त । परंगत हरिचरणीं ॥ ८१ ॥
एका जनार्दना शरण । म्हणतां गेलें एकपण । सहज खुंटलें निरुपण । महामौन कथेचें ॥ ८२ ॥
मुखीं जनार्दनचि वक्ता । जनार्दनचि झाला श्रोता । जनार्दनचि ग्रंथ लिहिता । सत्य सर्वथा हे वाणी ॥ ८३ ॥
एका एकजनार्दनीं । जनार्दनचि एकपणीं । निर्मळ जान्हवीचें पाणी । मनकर्णिका अतितीर्थ ॥ ८४॥
वाराणसी महापुरीं । मनकर्णिकेच्या तीरीं । रामजयंतीमाझारीं । ग्रंथ निर्धारीं संपविला ॥ ८५ ॥
शके चवदाशे त्र्याणव । प्रजापति संवत्सराचे नांव । चैत्रमासाचें वैभव । पर्व अभिनव रामनवमी ॥ ८६ ॥
ते दिवशीं सार्थक अर्थी । रुक्मिणीस्वयंवरसमाप्ती । एका जनार्दन कृपास्थिती । ग्रंथ वाराणसीप्रति संपविला ॥ ८७ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणि स्वयंवरे एकाकारटीकायां अष्टादश: प्रसंग: ॥१८॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ संपूर्ण ग्रंथसंख्या १७०८.
॥ समाप्तोऽयं ग्रन्थ: ॥