एक शिकारी एकदा शिकार करण्यासाठी रानात गेला. त्याने बरेच कुत्रे स्वतःबरोबर घेतले होते. परंतु ते आपल्या मर्जीप्रमाणे इकडेतिकडे पळू नयेत म्हणून त्याने दोन दोन कुत्रे जोडीने एका साखळीने बांधले. त्यांपैकी वाघ्या व पाग्या या नावाच्या दोन कुत्र्यांची एक जोडी होती. ते एकमेकांवर प्रेम करीत असत. ते नेहमी बरोबर खात-पित, नेहमी एकत्र खेळत असत. तेव्हा ते चांगले काम करतील असे त्या शिकार्याला वाटले. पण थोड्या वेळाने पाहतो तर वाघ्या पुढे ओढ घेत असता पाग्या मागे राहू लागला व पाग्याने एका दिशेने ओढ घेतली की वाघ्याने उलट दिशेने घ्यावी असे होऊ लागले. शेवटी दोघेही एकमेकांचे लचके तोडण्याच्या बेतात आले. ते पाहून एक म्हातारा कुत्रा त्यांना म्हणाला, 'मूर्खांनो, तुम्ही दोघांनी थोडी पड घेतली तर भांडणाची वेळ का येईल ? मी आणि माझा सोबती नेहमी एकमेकांच्या मर्जीप्रमाणे वागत असूं, त्यामुळे आमच्यावर कधीही भांडण्याचा प्रसंग आला नाही.'
तात्पर्य - एकत्र राहावयाचे असेल तर सर्वांनी एकमेकांच्या सोयी पाहाव्या लागतात.