एका माणसाने एक मांजर पाळले होते. ते फार अधाशी असल्यामुळे काही खायला मिळायच्या आशेने चारी बाजूने कानेकोपरे हुडकीत असे. एकदा एक कबुतराचे खुराडे त्याला दिसले. त्यात काही अगदी लहान पिल्ले होती. त्यांना पंखही फुटले नव्हते. त्यांना पाहताच त्या मांजराच्या तोंडाला पाणी सुटले व काही विचार न करता ते एकदम त्या खुराड्यात गेले. कबुतरांचा मालक जवळच उभा होता. त्याने त्या मांजराला पकडून खुराड्याच्या एका टोकाला लोंबकळत बांधले. त्या मांजराचा मालक रस्त्याने जात असता मांजराची स्थिती पाहून म्हणाला, 'अरे, तू जर रोजच्या साध्या अन्नावर समाधानी राहात असतास, तर तुझ्यावर हा प्रसंग आला असता का? अधाशी प्राणी असे आपणहून मृत्यूला बोलावणं पाठवतात.'
तात्पर्य - अति लोभाने अनर्थ निर्माण होतात.