गोष्ट अठ्ठेचाळिसावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


तंत्र चौथे - लब्धप्रणाश

त्या तीन राजकुमारांचे अभिवादन स्वीकारून विष्णुशर्मा आपल्या नित्याच्या आसनावर बसला व त्यांना म्हणाला, 'आजपासून आपण पंचतंत्राच्या चौथ्या तंत्राला सुरुवार करीत आहेत. या तंत्राचे नाव 'लब्धप्रणाश' म्हणजे 'जे मिळवले ते घालवले' असा आहे. संकटकाळी प्रत्येकाने आपली बुद्धी स्थिर ठेवली पाहिजे, हे या तंत्रातून आपल्याला शिकायचे आहे. तशी बुद्धी स्थिर ठेवली, म्हणूनच ते वानर स्वतःचे प्राण वाचवू शकले ना?'

यावर 'ती गोष्ट काय आहे?' असे त्या राजकुमारांनी विचारले असता विष्णुशर्मा म्हणाला, 'लक्ष देऊन ऐका-

गोष्ट अठ्ठेचाळिसावी

संकटात जो बुद्धी स्थिर ठेवतो, तोच त्यावर मात करतो.

समुद्रकिनार्‍याच्या वाळवंटात, पिकलेल्या निळसर टपोर्‍या जांभळांनी भरलेला एक वृक्ष होता. त्या जांभुळवृक्षावर ताम्रमुख नावाचा वानर ती जांभळे भक्षण करून राही.

एकदा दुपारच्या जेवणासाठी तो वानर ती जांभळे खायला सुरुवात करणार, तोच एक मगर त्या समुद्रातून बाहेर आला व त्या जांभूळवृक्षाखाली जाऊन बसला. त्याला पाहून तो वानर म्हणाला, 'या मगरराव, नेमके जेवणाच्या वेळी आलात. तेव्हा अशा अतिथीचं कूळ, गोत्र, योग्यता वा आर्थिक परिस्थिती यापैकी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता त्याला तृप्त करणं हे गृहस्थाश्रमी व्यक्तीचं कर्तव्य असल्याने मी तुम्हाला पोटभर जांभळे खायला देतो. कारण म्हटलंच आहे-

अपूजितोऽतिथिर्यस्य गृहाद्याति विनिःश्वसन् ।

गच्छन्ति विमुखास्तस्य पितृभिःसह देवताः ॥

(ज्याच्याकडे आलेला अतिथी स्वागत न झाल्याने, दुःखाचे निःश्वास सोडत निघून जातो, तेव्हा त्याच्याबरोबर त्या यजमान गृहस्थाचे पितर व देवही खिन्न होऊन निघून जातात. )

- असे बोलून त्या वानराने त्या मगराला बरीच जांभळे दिली व ती त्या मगराने मोठ्या आवडीने खाल्ली. मग त्या जांभळांची गोडी लागल्याने तो मगर दररोज त्या ताम्रमुखाकडे येऊ लागला आणि त्याने दिलेल्या जांभळांतली काही जांभळे स्वतः खाऊन, बाकीची जांभळे तो आपल्या बायकोसाठी घेऊन जाऊ लागला. हळूहळू तो वानर व मगर यांच्यात दृढ स्नेह निर्माण झाला.

एके दिवशी मगराची बायको त्याला म्हणाली, 'अहो, तुमचा तो वानरमित्र गेली अनेक वर्षे, ती गोडगोड जांभळे खात असल्याने, त्याचे काळीज किती गोड झाले असेल ? तेव्हा त्या तुमच्या मित्राला मारून तुम्ही मला त्याचे काळीज आणून द्याल का?'

यावर तो मगर तिला म्हणाला, 'प्रिये, काय भलतेच बोलतेस तू हे ? जो आता मला माझ्या भावापेक्षाही अधिक प्रिय वाटू लागला आहे, त्या माझ्या मित्राचा मी प्राण घेऊ ? मित्राविषयी असं म्हणतात -

एकं प्रसूयते माता द्वितीयं वाक् प्रसूयते ।

वाग्जातमधिकं प्रोचुः सोदर्यादपि बान्धवात् ॥

(एक भाऊ हा एकाच मातेच्या उदरी जन्म घेतल्याने निर्माण होतो, तर दुसरा भाऊ हा गोड संभाषणातून उत्पन्न होतो. पण एका आईच्या पोटी जन्म घेतल्यामुळे निर्माण झालेल्या भावापेक्षा मधुर संभाषणातून उत्पन्न होणारा भाऊ हा अधिक श्रेष्ठ असल्याचे सूज्ञ मानतात.)

मगराच्या या बोलण्याने त्याची बायको भडकली व त्याला अद्वातद्वा बोलू लागली. तेव्हा त्याने तिचे म्हणणे मान्य केले व त्या ताम्रमुख वानराला आपल्या घरी जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानुसार त्या मगराच्या पाठीवर बसून तो वानर समुद्रातून जाऊ लागला. किनारा बराच दूर जाताच, 'आता याला खरे सांगितले तरी हा काही कुठे पळून जाऊ शकणार नाही,' असा विचार करून मगराने त्याला आपल्या हेतूची कल्पना दिली. तरीही गांगरून न जाता तो वानर त्याला म्हणाला, 'मगरराव, तुम्ही अगदीच वेडे कसे हो ? मला झाडाझाडांवरून उड्या माराव्या लागत असल्याने, एखाद् वेळ अंदाज चुकून खाली पडल्यास काळीज फुटेल व दुखावेल, म्हणून मला कुठेही बाहेर जाताना माझे काळीज, त्या जांभूळवृक्षाच्या खोडातील ढोलीत ठेवून द्यावे लागते. प्रत्येक वानर असेच करतो, ही गोष्ट तुला ठाऊक नाही का ? चल, परत मला माझ्या झाडाकडे पोहोचते कर. वहिनीसाठी मी माझे काळीजच काय, पण वेळ आल्यास माझे प्राण देईन.' त्या वानराचे हे बोलणे खरे वाटून, त्या मगराने त्याला त्याच्या झाडाकडे पोहोचवले.

मग झाडावर चढून तो वानर त्या मगराला म्हणाला, 'अरे मूर्खा, काळीज कधी शरीराबाहेर काढून ठेवता येते का ? तू मला कपटाने मारू पाहात होतास, म्हणून मी ती तुला थाप मारली आणि तुला ती खरी वाटली ! यापुढे तू चुकूनही माझ्याकडे येऊ नकोस.' मग पुन्हा त्याला फसविण्यासाठी तो मगर म्हणाला, 'हे मित्रा, ताम्रमुखा, अरे मी तुला मारीन कसा ? तुला केवळ भिवविण्यासाठी मी तसे बोललो होतो. तेव्हा तू माझ्या घरी चल. माझ्या सुगरण बायकोने तुझ्यासाठी फार चांगले पदार्थ केले आहेत.'

यावर ताम्रमुख म्हणाला, 'अरे दगलबाजा, एकदा ज्याचा वाईट अनुभव आला, त्याच्या बोलण्यावर सूज्ञ कधी विश्वास ठेवतात का ? म्हणून तर गंगदत्त नावाच्या त्या बेडूकराजाने 'आता त्या विहिरीत मी चुकूनही येणार नाही,' असा निरोप त्या कपटी प्रियदर्शन नावाच्या सर्पाला पाठविला ना ? -

'ती गोष्ट काय आहे?' असे त्या मगराने विचारले असता, झाडाच्या फांदीवर बसल्याबसल्या ताम्रमुख म्हणाला, 'ऐक-

 

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP