गोष्ट एक्कावन्नावी
नको तिथे बोलणे, म्हणजे आपलीच 'शोभा' करून घेणे.
युधिष्ठिर नावाचा एक कुंभार दारूच्या नशेत असताना अंगणात पडला. त्याच्या कपाळाला फुटलेल्या मडक्याची एक अणकुचीदार खापरी लागून मोठी जखम झाली. काही दिवसांनी ती जखम बरी झाली, तरी तिची मोठी खूण कपाळावर कायमची राहिली.
पुढे तो राहात होता त्या राज्यात भयंकर दुष्काळ पडल्याने, तो इतर काहीजणांसंगे दुसर्या राज्यात गेला व नोकरीसाठी त्या राजाला भेटला. त्याचे ते गोरगोमटे रूप व कपाळावरची जखमेची खूण पाहून 'हा एखादा राजघराण्यातला असून, याच्या कपाळावरची खूण ही याने कुठल्यातरी युद्धात भाग घेतला असता, शत्रूच्या तरवारीच्या वारामुळे झालेल्या जखमेची आहे,' असा राजाचा समज झाला. त्याने त्याला आपल्या राजवाड्यात मोठ्या सन्मानाने ठेवून घेतले.
पण थोड्याच दिवसांत राजावर युद्धावर जाण्याचा प्रसंग आला. आता या युधिष्ठिराला सैन्यातले एखादे मोठे पद द्यावे, म्हणजे तो शत्रूचा धुव्वा उडविण्यात मोलाची कामगिरी बजावील, असा विचार मनात येऊन त्या राजाने विचारले, 'युधिष्ठिरजी, कुणाबरोबर लढताना तुम्हाला ही जखम झाली हो ?' तो कुंभार म्हणाला, 'मी एकदा दारू पिऊन बेभान स्थितीत चालत असताना पडलो आणि मीच बनविलेल्या व नंतर फुटलेल्या मडक्याची टोकदार खापर कपाळात घुसून जखमी झालो. त्या जखमेची ही खूण आहे. पण लढाईचा मला अनुभव नसला, तरी मी शत्रूला भारी होईन हे निश्चितच.'
यावर त्याला राजवाड्यातून घालवून देत राजा म्हणाला, 'बाबारे, रणांगणात लढणं हे घरी बसल्या बसल्या मडकी घडविण्याएवढं सोपं का आहे ? 'बाळा, ज्या कुळात तुझा जन्म झाला, त्या कुळात कुणीही कधी हत्तीला मारलेलं नाही,' असं ती सिंहीण उगाच का त्या कोल्ह्याच्या मुलाला म्हणाली?'
'ती गोष्ट काय आहे?' असे त्या कुंभाराने विचारताच, राजाने त्याला ती गोष्ट सांगायला सुरुवात केली -