गोष्ट एकोणसाठावी

संस्कृत नीतिकथांमध्ये पंचतंत्र कथांचे प्रथम स्थान मानले जाते.

The fascinating stories told by Vishnu Sharma, called Panchatantra.


गोष्ट एकोणसाठावी

आपल्याला वाटे 'हा आपला असे' पण तोच पाठीत सुरा खुपसे.

दुष्काळामुळे अन्नपाणी मिळेनासे झाल्याने 'चित्रांग' या नावाचा एक धाडसी कुत्रा, दुष्काळ वगैरे नसलेल्या दूरच्या देशातील एका गावी गेला. तिथे गेल्यावर कुणा ना कुणाच्या घरात शिरून, तो नाना तर्‍हेचे रुचकर पदार्थ खायला मिळवत असे, पण त्या घराबाहेर पडताच त्याच्याभोवती कुत्रे जमत व त्याच्यावर भुंकून, वा त्याला चोप देऊन हैराण करीत. अखेर आपला देशच बरा होता. तिथे अन्नाच्या टंचाईमुळे आपल्या जातभाईंमध्ये भुंकण्याचावण्याचे त्राण उरले नसल्याने आपल्याला कुणाचा तसा त्रास नव्हता, असा विचार करून तो कुत्रा स्वदेशी परतला.

पददेशाहुन परतल्यावर गावातल्या कुत्र्यांनी 'चित्रांगा, परदेश कसा काय होता?' असा प्रश्न त्याला केला असता त्याने उत्तर दिले, 'तिकडे अन्नपाणी भरपूर आणि ईश्वरकृपेने बायकाही मंद गतीच्या व गाफील असल्याने, कुणाच्याही घरात शिरून मला नानातर्‍हेच्या पदार्थांवर ताव मारता येई. गोष्ट वाईट ती हिच की, आपले तिथले जातभाई एकमेकांना पाण्यात पाहणारे, व परस्परांबद्दल शत्रूत्वभावना ठेवणारे आहेत.'

ही गोष्ट सांगून ताम्रमुख वानर त्या मगराला म्हणाला, 'तेव्हा तुझ्या घरात घुसलेल्या त्या हडेलहप्पी मगराचा तू नाश कर, म्हणजे त्यात तुला सुखाने राहता येईल.' त्या मगराने तसे केले, आपले घर परत मिळविले व पुढले आयुष्य सुखात व शांततेत घालविले.

या गोष्टी त्या तीन राजकुमारांना सांगून चौथ्या तंत्राचा समारोप करीत असता विष्णुशर्मा म्हणाला, 'पराक्रम व धाडस हे गुण अंगी असल्याशिवाय कुणाला वैभव प्राप्त होत नाही, आणि समजा, योगायोगाने ते प्राप्त झाले तरी, त्याला त्या कष्टप्राप्त वैभवाची रुची येत नाही. म्हटलंच आहे-

अकृत्य पौरुषं या श्रीः किं तयापि सुभोग्यया ।

जरद्‌गवोऽपि समश्नाति दैवादुपगतं तृणम् ॥

(पराक्रम न करता जे वैभव प्राप्त होते, त्याचा उपभोग घेण्यात कसली गोडी आली आहे ? तसा म्हातारा बैलसुद्धा नशिबाने पुढ्यात येणारे गवत खाऊन दिवस ढकलतोच.)

 

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP