गोष्ट छप्पन्नावी
घातक्याचे शस्त्र दुधारी, ते दुसर्याबरोबर धन्याचाही घात करी.
एक सुखवस्तू पण अशक्त व गरीब स्वभावाचा शेतकरी होता. त्याची बायको एका पिळदार शरीराच्या व देखण्या भामट्यावर भाळली आणि त्याने तिला लग्नाचे वचन दिल्याने, एका पहाटे दागदागिने, पैसे व कपडेलत्ते यांसह त्याच्यासंगे पळून जाऊ लागली.
रस्ता चालता चालता सकाळ झाली आणि त्यांना वाटेत एक नदी लागली. तेव्हा तो भामटा तिला म्हणाला, 'लाडके, तू बरोबर आणलेल्या बोचक्यातले मौल्यवान कपडे व दागदागिने भिजून खराब होऊ नयेत म्हणून, ते बोचके मी अगोदर नदीच्या पैलतीरावर नेऊन ठेवतो आणि मग तुला उचलून नेण्याकरिता परत इकडे येतो.' त्याप्रमाणे दागदागिने, पैसे व मौल्यवान कपडे असलेले आपल्याजवळचे बोचके तिने त्याच्या हवाली केले. ते हाती येताच तो नदी पार करून पलीकडे गेला व मोठ्याने ओरडून तिला म्हणाला, 'या उतारवयातही लग्नाच्या नवर्याला सोडून माझ्यासारख्या अनोळखी माणसाशी लग्न करायला तयार झालेली तू, उद्या माझ्याहीपेक्षा तरुण व देखणा माणूस आढळल्यास त्याच्याबरोबर पळून कशावरून जाणार नाहीस ? तेव्हा तुझ्याशी लग्न करायला मी काय मूर्ख आहे ?' एवढेच तो भामटा म्हणाला आणि त्या बोचक्यासह निघून गेला.
या प्रकाराने डोके सुन्न झाल्यामुळे नदीकाठच्या वाळवंटात बसून 'आता पुढे काय करायचे?' या गोष्टीचा ती विचार करू लागली. इतक्यात तोंडात मांसखंड धरलेली एक कोल्ही तिथे आली. नदीकाठच्या उथळ पाण्यात एक मोठा मासा आल्याचे पाहून, त्याला पकडण्यासाठी तिने तोंडातला मांसखंड वाळवंटात ठेवून त्याच्याकडे धाव घेतली. पण त्यामुळे तो मासा घाबरून खोल पाण्यात निघून गेला आणि इकडे तो वाळवंटात ठेवलेला मांसाचा तुकडा एक गिधाडाने लांबवला.
यामुळे क्रुद्ध झालेली ती कोल्ही त्या मांसखंडासह उडत चाललेल्या गिधाडाकडे रागाने बघत राहिली असता, ती बाई तिला म्हणाली, 'हे कोल्हे, तोंडातला हक्काचा मांसखंड इथे टाकून त्या बेभरंवशाच्या माशामागे धावणारी आणि अखेर त्या दोघांनाही गमावून बसणारी तू किती मूर्ख आहेस ?' यावर त्या फटकळ कोल्हीने त्या बाईला प्रश्न केला, 'काय ग, लग्नाच्या हक्काच्या नवर्याला सोडून, त्या अनोळखी माणसाच्या नादी लागलेली आणि अखेर नवरा व तो प्रियकर यांच्याबरोबरच पैसा, दागदागिने, कपडेलत्ते आणि अब्रू यांना गमावून बसलेली तू शहाणी का?' तो मगर ही गोष्ट पूर्ण करतो न करतो, तोच समुद्रातून दुसरा एक प्राणी त्या किनार्यापाशी आला व त्या मगराला म्हणाला, 'मगरमामा, एका आडदांड मगराने तुमचे घर बळकावले आहे.'
ही दुसरी वाईट बातमी कानी पडताच, तो मगर एकदम हताश होऊन त्या वानराला म्हणाला, 'ताम्रमुखा, मी आयुष्यातून पुरता उठलो ! संकट हे कधी एकटेदुकटे येत नाही, हेच खरे. आता या परिस्थितीतून मला तुझ्यासारख्या सज्जनाचा उपदेशच तारू शकेल.'
ताम्रमुख म्हणाला, 'हे मूर्ख मगरा, सज्जनांचा उपदेश हा फक्त त्या उपदेशाप्रमणे वागणार्यांनाच तारक ठरतो. तुझ्यासारख्या चंचलांना नव्हे. तुझ्यासारखे चंचल व मूर्ख लोक गळ्यात घंटा बांधलेल्या त्या मूर्ख उंटाप्रमाणे स्वतःच स्वतःचा नाश करून घेतात.' यावर 'तो कसा ?' असा प्रश्न त्या मगराने केला असता ताम्रमुख वानर त्याला म्हणाला, 'ऐक-