करि मुक्त विहंगम हा रमणी !
रहावया मज प्रिये, मनोहर
कनकाचा घडविलास पंजर
छतास बिलगे मोत्यांचा सर
या सलत शृंखला तरि चरणीं !
करि मुक्त विहंगम हा रमणी !
तुझ्या कराचा विळखा पडता
तव वृक्षाच्या उबेत दडता
गमे जिण्याची क्षण सार्थकता
परि अंतरि करि आक्रोश कुणी
करि मुक्त विहंगम हा रमणी
नकोस पसरूं मोहक बाहू
मृदुल बंध हे कुठवर साहू
नभ-नाविक मी कुठवर राहू
या आकुंचित जगि गुदमरुनी
करि मुक्त विहंगम हा रमणी !
जावे गगनी आणिक गावे
मेघांच्या जलधीत नहावे
हिरव्या तरुराजीत रहावे
ही आस सदा अंतःकरणी
करि मुक्त विहंगम हा रमणी !