सूर्यवंशातील ईक्ष्वाकू राजाचा नातू मुचकुंद हा होय. तो अयोध्येस राज्य करीत असता, ब्रह्मदेवाच्या वरामुळे तारकासुर नावाचा राक्षस फार उत्पात घडवू लागला. बरीच वर्षे देवांनी त्याच्याशी युद्ध करूनही तो अजिंक्यच राहिला. मुचकुंद राजा हा रणविद्येत अत्यंत पारंगत असल्यामुळे त्याची मदत घ्यावी, या नारदांच्या सल्ल्यानुसार इंद्राने मुचकुंदाला अमरावतीस बोलावून घेतले. बराच काळ युद्ध होऊन शेवटी तारकासुराचा वध झाला. मुचकुंदाच्या उपकारातून मुक्त होण्यासाठी इंद्राने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने मोक्षप्राप्तीचे वरदान मागितले. पण इंद्राने सांगितले, "मोक्षदान देण्याची पात्रता आमच्याकडे नाही. द्वापारयुगात तुला श्रीकृष्ण भेटेल व तो तुला मोक्ष देईल. तोपर्यंत तू अयोध्येस सुखाने राज्य कर." पण आता पुन्हा जाऊन राज्य करण्याची मुचकुंदाची इच्छा नव्हती. त्याऐवजी श्रीकृष्ण भेटेपर्यंत आपणास गाढ निद्रा मिळावी, अशी मागणी मुचकुंदाने केली. त्यानुसार इंद्राने मुचकुंदास निद्रा दिली व जो तुला त्रास देऊन उठवील त्याचा नाश होईल, असे सांगितले.
पुढे कंसाला मारल्यामुळे जरासंध व श्रीकृष्ण यांच्यात वैर निर्माण झाले. सतरा वेळा मथुरेवर स्वारी करूनही जरासंधाचा पराभव झाला. पुन्हा एकदा जरासंध स्वारी करणार हे कळताच मथुरेची प्रजा श्रीकृष्णाकडे आली व आता हा अनर्थ थांबव, असे म्हणू लागली. इकडे जरासंधाने महापराक्रमी व ऋषींच्या वराचे अजिंक्य झालेल्या कालयवन राजाची मदत घेतली व कालयवन त्याच्या सैन्यासह मथुरेस गेला. श्रीकृष्णाने विश्वकर्म्यास बोलावून रात्रीतल्या रात्रीत द्वारकानगरी वसवली. एवढेच नव्हे तर मथुरेतील सर्व लोक, पशू, पक्षी, चीजवस्तू हे सर्व रात्रीच्या रात्री द्वारकेस नेऊन ठेवले.
रात्रभर श्रीकृष्ण एकटाच मथुरेत होता. सकाळी बाहेर पडून कालयवना समोरून तो जाऊ लागला. त्याला ओळखण्याच्या श्याम वर्ण, चार हातांत शंख, चक्र, गदा, कमळ व कमरेला पितांबर या जरासंधाने सांगितलेल्या खुणांवरून कालयवन त्याला धरण्याचा प्रयत्न करू लागला. श्रीकृष्ण एकटा व निःशस्त्र असल्याने कालयवनही तसाच त्याच्या मागून जाऊ लागला. होता होता ते सैन्यापासून बरेच दूर आले. तेव्हा श्रीकृष्ण एका गुहेत शिरला. तेथे आधीच झोपलेल्या मुचकुंदाच्या अंगावर आपला पीतांबर पांघरून श्रीकृष्ण निघून गेला. पीतांबरामुळे हाच श्रीकृष्ण असे वाटून कालयवनाने मुचकुंदाला जागे करण्यासाठी लाथ मारली. पण इंद्राच्या वरदानामुळे कालयवन जागीच भस्म होऊ गेला. मुचकुंदास जाग आल्यावर वराचे स्मरण झाले. त्याने श्रीकृष्णाचे स्तवन केल्याबरोबर त्याला श्रीकृष्णाचे दर्शन झाले. कृष्णाने त्याला ,तू मोक्ष पावशील' असा वर दिला व नंतर श्रीकृष्ण तेथून द्वारकेस निघाला.