रामाशी सीतेचा विवाह होण्यापूर्वी एकदा सीतेला मैत्रिणींसह उद्यानात विहार करीत असता पोपटाची एक जोडी दिसली. उद्यानातील एका झाडावर बसून ते बोलत होते, "पृथ्वीवर श्रीराम नावाचा सुंदर व पराक्रमी राजा होईल. सीता त्याची महाराणी होईल. सर्व राजांना जिंकून घेऊन सीतेसह श्रीराम अनेक वर्षे अयोध्येचे राज्य सुखाने करील." पोपटाची ती बोली ऐकून सीतेने विचार केला, "ही तर माझ्याच जीवनाची कथा! या पक्ष्यांना पकडून सर्व हकिगत सविस्तर जाणून घ्यावी." मैत्रिणींना सांगून सीतेने त्या जोडप्याला पकडले व सीतेच्या स्वाधीन केले.
मग सीतेने त्यांना हळुवारपणे विचारले, "राम सीतेच्या कथेची तुम्हाला कशी माहिती?" यावर त्या जोडप्याने सांगितले, "वाल्मीकी नावाचे ऋषी आहेत. आम्ही त्यांच्याच आश्रमात राहातो. त्यांनी रामायण नावाचा ग्रंथ लिहिला असून ते व त्यांचे शिष्य रात्रंदिवस त्याचेच मनन, चिंतन करीत असतात. आम्ही ती कथा वारंवार ऐकली आहे. भगवान विष्णू श्रीरामाच्या रूपाने अयोध्येत जन्म घेतील. विश्वामित्रांसह ते मिथिलेस येतील. येथेच एक मोठे धनुष्य तोडून जनकाची मुलगी सीता हिच्यासह विवाह करतील. पण तू हे इतके उत्सुकतेने का ऐकत आहेस?" यावर सीतेने आपली ओळख सांगितली व आता श्रीरामाचे येथे येऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करेपर्यंत तुम्ही येथेच सुखाने राहायचे आहे. असे सांगितले. यावर तो पोपट म्हणाला, "ही माझी पत्नी लवकरच पिलास जन्म देणार आहे. तरी तू आता आम्हाला सोड. पिलू जन्माला आल्यावर मी स्वतः तिला इथे घेऊन येईन." पण सीतेने ते न ऐकता त्या पोपटाला एकट्याला परत जाण्यास सांगितले. त्यामुळे ते जोडपे दुःखी होऊन आपण उगाचच श्रीराम कथेची चर्चा केली, असे म्हणू लागले. वारंवार विनंती करूनही सीता त्या पक्षिणीस सोडायला तयार होईना. तेव्हा तिने रागावून शाप दिला, की ज्या प्रकारे मी गर्भिणी असता तू मला पतीपासून विलग करते आहेस, तशीच वेळ तुझ्यावर येईल." एवढे बोलून पतीच्या विरहाने व्याकूळ होऊन त्या पक्षिणीने प्राण सोडला. तो पोपट शोक करीत म्हणाला, "मी अयोध्येत जन्म घेईन. माझ्याच बोलण्याने उद्विग्न होऊन तुझा पती तुझा त्याग करील."
क्रोध व अपमानाने प्रेरित होऊन त्याने अयोध्येत धोब्याचा जन्म घेतला व पुढचे रामायण घडले. पूर्वकाळातील एका पक्ष्याचा शाप सीतेस भोगावा लागला