प्राचीन काळी पुरुरवा नावाचा विष्णुभक्त राजा होता. विष्णूचा अत्यंत लाडका असल्याने स्वर्गातील नंदनवनातही त्याचा मुक्त संचार असे. एकदा तो असाच नंदनवनात फिरत असता त्याची उर्वशी नावाच्या अप्सरेशी नजरानजर झाली. दोघेही एकमेकांना मनापासून आवडले; पण उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील अप्सरा असल्याने त्याची परवानगी असल्याशिवाय त्यांना भेटता येत नव्हते. क्षीरसागरात विश्रांती घेत असलेल्या विष्णूंना ही गोष्ट समजताच त्यांनी नारदांना इंद्राकडे पाठवले.
पुरुरव्याला बरोबर घेऊन नारद इंद्रांकडे गेले व त्यांना विष्णूची आज्ञा सांगितली. आणि त्याच्याकडून पुरुरव्याला उर्वशी देवविली. पुरुरवा उर्वशीला घेऊन पृथ्वीवर परतला. उर्वशीच्या जाण्यामुळे स्वर्गातील वातावरण उदास झाले; पण पृथ्वीवर उर्वशी व पुरुरवा एकमेकांच्या सहवासात आनंदात होते.
एकदा इंद्राचे राक्षसांबरोबर युद्ध सुरू झाले, तेव्हा इंद्राने पुरुरव्याला मदतीला बोलावले. युद्धात इंद्राचा विजय झाला. स्वर्गात विजयोत्सव सुरू झाला. त्यात सर्व अप्सरा नृत्य करू लागल्या. अप्सरांचे गुरू तुंबरू हेही तेथे हजर होते. नाचताना रंभा नावची अप्सरा चुकली तेव्हा पुरुरवा हसला. त्यामुळे तुंबरू रागवला व त्याने पुरुरव्याला शाप दिला, की कृष्णाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेईपर्यंत तुला उर्वशीपासून लांब राहावे लागेल. काही दिवसांनी पुरुरव्याच्या नकळत गंधर्वांनी उर्वशीला पळवून नेले. हे शापाचेच फळ आहे, असे समजून पुरुरवा बद्रिकाश्रमास गेला व त्याने श्रीकृष्णाची आराधना चालू केली. इकडे उर्वशी राजाच्या वियोगाने व्याकुळ होऊन गंधर्वांच्या घरी निपचित पडून राहिली. पुरुरवा राजाने श्रीकृष्णाला आपल्या तपाने प्रसन्न करून घेतले. त्याच्या कृपेमुळे गंधर्वांनी स्वतःच उर्वशीला राजाकडे परत आणून दिले. अशा प्रकारे उर्वशी व पुरुरवा पुन्हा एकत्र राहू लागले.