महर्षी अगस्तीचे वास्तव्य दंडकारण्यातील एका आश्रमात होते. तेथे एकदा श्रीराम त्यांच्या दर्शनासाठी गेले असता त्यांनी विचारले, "हे एवढे मोठे वन पशुपक्षीविरहित निर्जन, शून्य व भयंकर कसे बनले?'' या प्रश्नाचे उत्तर देताना अगस्तींनी दंडकारण्याची उत्पत्ती कथा सांगितली ती अशी-
सत्ययुगात इक्ष्वाकू नावाचा धर्मपरायण राजा होता. त्याने अनेक यज्ञ केले. त्याच्या अनेक पुत्रांपैकी सर्वांत धाकटा हा शूर, विद्वान व गुणी होता. राजाने त्याचे नाव दंड असे ठेवले होते. विंध्य पर्वताच्या दोन शिखरांमध्ये मधुमत्त नावाचे नगर वसवून ते त्याला राहायला देण्यात आले. दंडाने पुष्कळ वर्षे तेथे धर्माने राज्य केले. एकदा दंड भार्गव मुनींच्या म्हणजेच शुक्राचार्यांच्या आश्रमापाशी फिरत आला असता, त्यांची सुंदर कन्या अरजा त्याने पाहिली. तिच्या रूपाने मोहित होऊन तो तिला बळजबरीने आपल्याबरोबर चलण्याचा आग्रह करू लागला. आपल्या पित्याची परवानगी घेऊन आपल्याला न्यावे, ही तिची विनवणी न ऐकताच राजाने तिच्यावर जबरदस्ती केली व तो निघून गेला.
शुक्राचार्य स्नान करून शिष्यांसह परत आल्यावर अरजाने रडतरडत ही हकिगत त्यांना सांगितली. अरजाची ती दीन अवस्था पाहून शुक्राचार्य क्रोधीत झाले व शिष्यांना म्हणाले, "तुम्ही सर्वांनी या राज्याच्या बाहेर जावे. धर्माविरुद्ध आचरण करणारा हा पापी राजा त्याचा देश, सेवक व सर्व संपत्तीसह नष्ट होईल. धुळीच्या वर्षावानं त्यांचं राज्य नाश पावेल." अरजेला तेथेच ठेवून शुक्र आश्रमासाठी दुसरी जागा शोधण्यासाठी निघून गेले. त्यांच्या म्हणण्यानुसार दंडाचे राज्य एका आठवड्यात जळून खाक झाले. तेव्हापासून हे विंध्य पर्वतावरील ठिकाण दंडकारण्य म्हणून ओळखले जाऊ लागले