राना-माळात दिवाळी हसली
पानापानांत झुंबरं सजली.
पात्या गवती हिरव्या-पिवळ्या
वर-खालून चोचीत ओवल्या
सोनरंगात घरटी मढली
राना-माळात दिवाळी हसली.
शेता-भातात सुगरण गाती
आले भरुन कणसांत मोती
उभ्या वर्षाची सराई पिकली
राना-माळात दिवाळी हसली.
शेतकरी, केली अंगाची माती
कितीक पिकल्या सोन्याच्या राशी
खळ्याखळ्यांत दौलत पडली
राना-माळात दिवाळी हसली.
चिवचिव बाळे, पाहुणे आले
खाती नव्या पिकाचे दाणे ओले
खुशीखुशीत घरटी हलली
राना-माळात दिवाळी हसली.
गार हिवाळी धुके मनमानी
रुपेरी फांदयांत दिवाळीची गाणी
चारी बाजूंना गजबज झाली
राना-माळात दिवाळी हसली.