समर्थ आहे भारतभूमी, समर्थ सेनादळे
’सदैव असतो जय सत्याचा’ इतुके आम्हां कळे
लोकशाहिचे सदा समर्थक, आम्ही भारतवासी
शांतिप्रिय जन, स्नेह आमुचा सार्या जगताशी
हुकुमशाहिशी मात्र मित्रता मुळी न आम्हां जुळे
स्वातंत्र्यास्तव लढती, त्यांचे आम्ही पाठीराखे
चळे न अमुची निष्ठा, अरिच्या शस्त्राच्या धाके
अन्यायाची उखडून काढू, छाया, पाळे-मुळे
नसे कुणाशी वैर आमुचे, नको दुजी भूमी
तत्त्वासाठी साहाय्य होतो, दुबळ्यांच्या कामी
निरापराध्या होता पीडा, हृदय आमुचे जळे
विजयी सेना, विजयी जनता, विजयी जननेते
तरी न आम्ही, कधी आक्रमक कोणाचे जेते
समान सारे देश आम्हांला, सारी मानवकुळे