बालगीत - इथे गांधीजी राहात होते अ...
महापुरुषांची चरित्रे स्फूर्तिदायक असतात. त्यांच्या उदात्त जीवनमूल्यांचे त्या चरित्रांतून आकलन होते. त्या विभूतींवरील कविता वाचून मनाला उभारी मिळते.
इथे गांधीजी राहात होते
अजूनही दिसताहेत त्यांच्या पावलांचे ठसे
मार्ग दाखवायला, मार्ग उजळायला
इथे नाहीत गांधीजींचे पुतळे
पण आहे त्यांच्या कामाची गाथा
इतिहासाला दिव्येतिहास करणारी
मानवाला महामानव बनवणारी.
गांधीजी होते -
सागरातले महासागर
पर्वतराजीतले हिमालय
वृक्षराजीतले वृक्षराज
आकाशातले चंद्र-सूर्य
त्यांनी तत्त्वज्ञान फक्त वाचले नव्हते,
तर ते पचवले होते.
सिद्धान्त मांडले नव्हते,
तर वर्तनात सिद्ध केले होते.
साधनशुचित्व सांगितले नव्हते,
तर कार्यान्वित केले होते.
वेदातील निसर्गशक्तिपूजा
भागवतातील भक्तिनिष्ठा
गीतेतील ज्ञान, योग, कर्म
सर्वधर्मीसमानत्व
यांचा संगम होता त्यांच्या जीवनात.
मृत्यूला ते घाबरले नाहीत
पण मृत्युंजयाचा अहंकार त्यांना नव्हता
शत्रूशी ते लढले पण
शत्रुत्व त्यांनी बाळगले नाही
त्यांचा द्वेष करणे त्यांच्या मनातही नव्हते.
जनतेला त्यांनी दिशा दाखविली
पण जनतेपासून ते दूर गेले नाहीत.
ते होते -
नम्रतेचे सागर
धर्माचे आगर
शांतीचे प्रेषित
स्वातंत्र्याचे आणि समतेचे सेनापती
युगप्रवर्तक
त्यांच्या पावलांचे ठसे सांगताहेत...
इथे गांधीजी राहात होते.
N/A
References :
कवी - रा.सो.सराफ
Last Updated : September 29, 2011
TOP