|
अ.क्रि. लगत्यांत , जवळ येणें ; जवळ असणें ( मनुष्य , गोष्ट , काळ ). चिकटणें ; गच्च धरणें ; बिलगणें ; भेटणें . पोहोचणें ; जाणें . पूर्वी ठरलेल्या मुक्कामाच्या जागीं अगाऊ भिडतात . - गुजा ३६ . कुस्ती करणें ; झुंजणें . या वेगळा आन वीर । मजसीं भिडों शकेना । - मुआदि ४१ . १४४ . युद्ध करणें . वत्सा ! किति नित्य पुससि ? हूं भीड । - मोभीष्म ५ . ५९ . [ देप्रा . भिड ] भिडणें , भिडविणें - उक्रि . लगत्यांत , जवळ आणणें ; एकाजवळ एक मांडणें ( तुलनेकरितां ); एके ठिकाणीं जोडणें ; ठेवणें . अंगावर चालून येणें ; तोंड देणें ; झगडणें ; लढणें . अर्जुन बृहन्नडा मी , भिडला ज्या चापपाणि सह देव । - मोविराट ७ . ७ . बळें नाटोपे कवणासी । तो भिडवी बल्लवासी । - मुविराट २ . ४० . झोंबी लावणें ; झगण्यास लावणें . वेष्टणें ; बांधणें ; लपेटणें ; झटकन लावणें ( तरवार , ढाल , पट्टा , बंदूक , कट्यार , जीन , खोगीर , कांच्या , पडदळें , पोषाख इ० ); लपेटणें ; बांधणें ( कांच्यानें , खोगिरानें , हत्येरानें , सरंजामानें - कमर , गाडी , घोडा . फौज , माणूस इ० ). खुपसणें . [ देप्रा . भिडण ] कागद भिडणें , कागद भिडविणें - एक पत्र , कागद दुसर्यांत रेटणें , दपटणें . तुम्ही आपल्या लाखोट्यांत एवढा माझा कागद भिडून पाठवा . भिडती , तू , त्या , भिडू - पु . मुलांच्या खेळांतील एक शब्द ; खेळांतील जोडीदार ; एका बाजूचा म्होरक्या . रामकृष्ण जाहले भिडती । - ह १४ . १९४ . भिडन - न . जनावराच्या पाठीवर लादलेल्या ( लांकूड , कडबा इ० ) ओझ्याचें अर्ध , एक बाजू . जेरेबंद घट्ट ओढतां यावा म्हणून त्याखालील पोकळींत भरण्याकरितां खोगिरावर , मुठीवर ठेवलेल्या कापडाच्या , अथवा कसल्या तरी घड्या . भिडाऊ - वि . भिडणारा . गेला तो मांड भिडाऊ . - संग्रामगीतें १०५ . भिडावून - क्रिवि . मिळवून . मुसलमानांशीं छाती भिडावून लढण्याचें सामर्थ्य शिवाजीनें लोकांत आणिलें . - नि २९९ . भिडिनणें - अक्रि . भिडणें ; युद्ध करणें . परशुरामेंसी रणांगणीं । भीष्म भिडिनला निर्वाणबाणीं । - एभा ९ . ३९६ .
|