* प्रतिहार षष्ठी
कार्तिक शु. षष्ठीला हे नाव आहे. हे सूर्यव्रत आहे. या दिवशी सायंकाळी नदीच्या तीरावर जाऊन सूर्याभिमुख होऊन व्रत संकल्प करतात आणि नानाविध फळे, दूर्वा, रक्तचंदन, अन्न अशा वस्तु एका ताम्हनात घेऊन पुढील मंत्राने सूर्याला अर्घ्य देतात.
'नमोऽस्तु सूर्याय सहस्रभानवे नमोऽस्तु वैश्वानर जातवेदसे ।
त्वमेव चार्घ्य प्रतिगृह्य गृह्य देवाधिदेवाय नमो नमस्ते ॥'
मग त्याची पूजा करतात. गीतवाद्य-नृत्यादिकांनी ती रात्र जागवतात. सकाळी पुन्हा सूर्याची पूजा करून ब्राह्मण-भोजन घालतात.
फल - आरोग्यप्राप्ती व मनोरथपूर्ती
* महाषष्ठी किंवा वन्हिमहोत्सव
एक तिथिव्रत. कार्तिक शु. षष्ठीला सूर्य वृश्चिक राशीत आणि मंगळवार असेल तर त्या दिवसाला 'महाषष्ठी' असे म्हणतात. आदल्या दिवशी उपवास करणे, षष्ठीला अग्नीची पूजा करणे आणि ब्राह्मणभोजन घालणे असा याचा विधी आहे.
फल - पापनाश.