* कार्तिक उद्यापन
कार्तिक शु. चतुर्दशीस गणपति-मातृका, नांदीश्राद्ध, पुण्याहवाचन, सर्वतोभद्र, ग्रह व हवनाची यथायोग्य वेदी बनवून रात्री तीवर त्या त्या देवांची स्थापना करून पूजा करावी. यासाठी यथाशक्ती भगवान विष्णूची सायुध सुवर्णमूर्ती बनवून व्रतोद्यापन-कौमुदी किंवा व्रतोद्यापन-प्रकाश यानुसार सर्वतोभद्र मंडळ स्थापित केलेल्या सोन्याच्या कलशावर उक्त मुर्तीची यथाविधी स्थापना, प्रतिष्ठा व पूजा करून रात्रभर जागरण करावे व पौर्णिमेस पहाटे प्रात:स्नानादी उरकून गोदान, वस्त्रदान, शय्यादान, अन्नदान इ. करून तीस दांपत्यांना भोजन द्यावे व व्रतविसर्जन करून मित्रपरिवारासह मग जेवावे.
* कार्तिकी किंवा मत्स्यावतार दिन
कार्तिक शु. चतुर्दशी दिवशी ब्रह्मा, विष्णू, महेश, आदित्य व अंगिरा यांनी हे पर्व फार परमपवित्र आहे असे सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी स्नान, दान, होम, यज्ञ, उपासना इ. केल्यास अनंतपट फळ मिळते. या दिवशी कृत्तिका नक्षत्र असेल तर हिला 'महाकार्तिकी' म्हणतात. या दिवशी भरणी नक्षत्र असेल तर हिचे जादा फळ असते, व रोहिणी असेल तर हिचे महत्त्व वाढते. याच दिवशी सायंकाळी भगवान विष्णूनी मत्स्यावतार धारण केला होता, त्यामुळे या दिवशी दान केल्यास यज्ञाचे फळ मिळते. तसेच जर या दिवशी चंद्रमा व बृहस्पती कृत्तिका नक्षत्रात असतील तर हिला 'महापौर्णिमा' नामाभिधान आहे. या दिवशी चंद्र कृत्तिकेत व सूर्य विशाखात असेल तर 'पद्मक' योग असतो. की जो पुष्करातही दुर्लभ आहे. या दिवशी संध्याकाळी त्रिपुरोत्सव करून
'कीटा: पतंगा: मशकाश्च वृक्षे जले स्थले ये विचरन्ति जीवा: ।
दृष्ट्वा प्रदीपं नहि भगिनस्त्वें मुक्तरूपाहि भवन्ति तत्र ॥'
असे म्हणुन दिपदान केल्यास पुनर्जन्मापासून मुक्ती मिळते. जर या दिवशी कृत्तिकेत 'विश्वस्वामी' चे दर्शन घेतले तर ब्राह्मण सात जन्मपर्यंत वेदपारंगत व धनवान बनतो. याच दिवशी चंद्रोदयाच्या वेळी शिवा, संभूती, प्रीती, संतती, अनसूया व क्षमा या सहा तपस्वी कृत्तिकांची पूजा करावी; कारण या सहाही जणी कार्तिकेयाच्या माता होत. कार्तिकेय, खड्गी (शिवा), वरुण, हुताशन व सशूक (मोडयुक्त) धान्य या वस्तू संध्याकाळी दरवाजावर टांगण्यायोग्य असल्याने गंधपुष्प इ. नी यांचे पूजन केल्यास शौर्य, वीर्य, धैर्य, इ. गोष्टी वाढतात. कार्तिकीस नक्तव्रत करून बैल दान केल्यास शिवपदाची प्राप्ती होते. जर गाय, घोडा, हत्ती, रथ, तूप इ. वस्तूंचे दान केल्यास संपत्ती वाढते. या दिवशी सोपवास हरिस्मरण केल्यास अग्निष्टोम यज्ञाचे फळ मिळून सूर्यलोकाची प्राप्ती होते. आपल्या अगर दुसर्याच्या कन्येचे 'सालंकृत' कन्यादान या दिवशी केल्यास 'संतानव्रत' पूर्ण होते. सोन्याचा मेंढा दान केल्यास ग्रहबाधा नष्ट होते, व या पौर्णिमेपासून सुरू करून वर्षभर दर पौर्णिमेस नक्त व्रत केले तर सर्व मनोरथ पूर्ण होतात.
* पाषाण चतुर्दशी
या कार्तिक शु. चतुर्दशीला जवाच्या पिठाची चौरसाकार भाकरी करून गौरी (पार्वती ) ची पूजा करावी व तिला त्या भाकरीचा नैवेद्य दाखवावा. नंतर आपण तसलीच भाकरी खावी. यायोगे सुख, संपत्ती व सौंदर्य यांची प्राप्ती होते.
* ब्रह्मकूर्च
कार्तिक शु. चतुर्दशीस रोजी स्नानानंतर उपवासाचा संकल्प सोडून देवांना जल, अक्षता, इ. व पितरांना जल, तीळ इ. वाहून
(१) कपिला गाईचे 'गोमूत्र'
(२) काळ्या गाईचे 'गोमय',
(३) पांढर्या गाईचे 'दूध',
(४) पिवळ्या गाईचे 'दही',
(५) कबर्या गाईचे 'तूप'
घेऊन सर्व वस्तू एकत्र मिसळाव्यात व गाळाव्यात. नंतर त्यात दर्भ-जल टाकून रात्री हे 'पंचगव्य' प्याल्यास ताबडतोब सर्व पापतापांपासून मुक्ती मिळून, सर्व रोगदोष दूर होतात. अद्भुत अशी शक्ती प्राप्त होऊन पराक्रम व निरोगीपणात वाढ होते.
* वैकुंठ चतुर्दशीव्रत
हे व्रत सनत्कुमार संहितेत सांगितलेल्या कार्तिक माहात्म्यात आहे. अरुणोदयव्यापिनी कार्तिक शु. चतुर्दशी दिवशीच हे व्रत करतात. निर्णय सिंधुकार म्हणतात की, रात्रीव्यापिनी चतुर्दशी दिवशी विष्णुपूजेसाठी घ्यावी व विश्वेश्वराची पूजा प्रसन्नता यासाठी अरुणोदयव्यापिनी घ्यावी. सनत्कुमार संहितेप्रमाणे उपवास मात्र आदले दिवशी करावा. कारण हेमलंब नामक संवत्सरी कार्तिकी शु. चतुर्दशी दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णूनीच मणिमर्णिका घाटावर आंघोळ करून श्रीशिवांचे पूजन केले होते.
यासाठी विष्णुपूजेला रात्रिव्यापिनी व शिवपूजेला अरुणोदयव्यापिनी तिथी असावी. या दिवशी प्रात:स्नान करून उपवास करावा. सायंकाळी श्रीविष्णुची व पहाटे श्रीशिवाची १००० कमळांनी पूजा करणारा जीवन्मुक्त होतो. वैकुंठचतुर्दशीस रात्री तुळसी व पहाटॆ शिवाला बेल वाहावा.
या दिवशी सूर्योदयापूर्वी नगरप्रदक्षिणा घातल्यास वैकुंठलोक प्राप्त होतो अशी भाविकांची समजूत आहे, म्हणून या दिवशी नगरप्रदक्षिणा घालतात.