* अक्षय नवमी
कार्तिक शु. नवमी दिवशी विष्णूने कूष्मांड दैत्याचा वध केला. म्हणून या तिथीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या तिथीस विष्णूची पूजा करतात.
* आरोग्यव्रत
कार्तिक शु. नवमी रोजी अगर अन्य कोणत्याही महिन्यातील शु. नवमीस उपवास करून दशमीस स्नान करून श्रीविष्णूची पूजा करावी. फळफूल अर्पण करून पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. तसेच चक्र, गदा, मुसळ, धनुष्य व खड्ग या आयुधांची लाल फुलांनी पूजा करून गोड अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवावा. याखेरीज मृगाजिनावर तिळांचे कमळ करून भॊवती द्रोण लावावेत. कमळावर सोनेरी किंवा चांगल्या रंगाचे अष्टदल काढून प्रत्येक पाकळीवर पूर्वादिक्रमाने मन, श्रोत्र, त्वचा, चक्षू, जिव्हा, घ्राण व बुद्धी यांची पूजा करावी.
'अनामयानींद्रियाणि प्राणश्च चिरसंस्थित: ।
अनाकुला च मे बुद्धि: सर्वेस्युर्निरुपद्रवा: ॥
मनसा कर्मणा वाचा मया जन्मनि जन्मनि ।
संचितं क्षपयत्वेन: कालात्मा भगवान हरि: ॥'
अशा मंत्राने यांची प्रार्थना केल्यास रोगी निरोगी होतो व दीर्घकालपर्यंत त्याची प्रकृती चांगली राहते.
* कूष्मांड नवमी
कार्तिक शु. नवमीस हे नाव आहे. या दिवशी कोहळा दान देण्याचे व्रत करतात. त्याचा विधी असा - कोहळा गाईच्या तुपात बुडवितात. त्याची पूजा करतात. मग तो पंचरत्ने, फळे, अन्न, दक्षिणा यासह पुढील मंत्राने ब्राह्मणाला दान देतात. -
'कूष्मांडं बहुबीजाढ्यं ब्रह्मणा निर्मितं पुरा ।
दास्यामि विष्णवे तुभ्यं पितृणां तारणाय च ॥'
* तुलसीवास
कार्तिक शु. नवमी रोजी प्रात:स्नान करून घरात वाळूची वेदी बनवावी. त्यावर तुळशीची सपर्ण फांदी, तुळशीचे संपूर्ण झाड, चांदीची सपर्ण फांदी व सोन्याची तुळशीची मंजिरीयुक्त प्रतिकृती ठेवुन यथाविधी पूजन करावे. यथाऋतू फळेफुले अर्पावीत. लांब वात असणारा एक तुपाचा दिवा अखंड प्रज्वलित ठेवावा व निराहार राहून रात्री कथा श्रवण करुन मग जमिनीवर झोपावे. याच प्रकारे नवमी, दशमी व एकादशीस करून मग द्वादशीस (रेवतीचा तृतीय चरण असल्यास तो सोडून मग ) ब्राह्मणदंपतीस दानधर्म करून भॊजन द्यावे व मग आपण जेवावे.
* तुळसीविवाह
पद्मपुराणानुसार कार्तिक शु. नवमीला तुलसीविवाहाचा उल्लेख आढळतो; पण इतर ग्रंथांच्या मते प्रबोधिनी एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस अधिक फलदायी होतो. विवाहाच्या पूर्वदिवशी तुलसीवृंदावन सारवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात व तुलसीच्या मुळात चिंचा, आवळे ठेवतात. काही लोक सकाळी, काही सायंकाळी तुलसीविवाह लावतात.
व्रत करताना विवाहापूर्वी तीन महिने आधीपासून तुळशीला पाणी घालून टवटवीत ठेवावे. प्रबोधिनी किंवा भीष्मपंचक किंवा ज्योति:शास्त्रोक्त मुहूर्तावर तोरण बांधून, मंडप बनवून, सोबत आणखी चार ब्राह्मण घेऊन गणपति-मातृकापूजन, नांदी श्राद्ध व पुण्याहवाचन करून टवटवीत अशा तुळशीबरोबरच सोन्याची लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व चांदीची तुळस चांगल्या आसनावर प्रतिष्ठित करावी (पूर्वाभिमुख) व यजमानांनी सपत्निक उत्तराभिमुख बसून 'तुलसीविवाह विधी' नुसार 'वर 'पूजन (भगवान विष्णुचे पूजन), तसेच कन्या. 'तुळस' हिचे कन्यादान इ. विधी करावेत. कुशकण्डीहवन व सप्तपदी करून वस्त्रालंकार दान द्यावेत. यथाशक्ती ब्राह्मण-भोजन घालून मग स्वत: जेवावे. तुळसीविवाहसमाप्तीनंतर चातुर्मासात जी व्रते घेतली असतील त्या सर्वांची समाप्ती करतात व चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतील, ते पदार्थ ब्राह्मणास दान देऊन मग स्वत: सेवन करतात.
* त्रिरात्र तुलसी व्रत
कार्तिक शु. नवमीपासून तीन दिवस हे व्रत करतात. लक्ष्मीनारायणाच्या सुवर्णमूर्तीची तुळसीखाली पूजा, विष्णुहोम, विष्णुश्राद्ध, दांपत्यपूजा व द्वादशीला व्रताची सांगता, असा याचा विधी आहे.
फल - संतती, संपत्ती व स्वर्गप्राप्ती.
* नवमीव्रत
कार्तिक शु. नवमी रोजी व्रतपूजा, तर्पण व अन्नदान केल्यास अनंत फलप्राप्ती होते. पूर्वाण्हव्यापि तिथी यावेळी घेण्याची प्रथा आहे. जर ही दोन्ही दिवस नसेल अगर दोन्ही दिवस असेल तर मग-
'अष्टम्या नवमीविद्धा कर्तव्या फलकांक्षिणा ।
न कुर्यान्नवमीं तात् दशम्या तु ददाचन ।'
यानुसार पूर्वविद्धा तिथीच घेणे सयुक्तिक होय. या दिवशी केलेली जपतपपूजादी कृत्ये, तसेच दानपुण्यादी लाभ 'अक्षय' स्वरूपाचे असतात म्हणून ही 'अक्शय नवमी' याही नावाने ओळखली जाते. या दिवशी गाय, सोने, वस्त्रालंकार इ.च्या दानामुळे कर्मगतीनुसार इंद्रत्व, शूरत्व वा राजेपद मिळते; इतकेच नव्हे तर ब्रह्महत्यादि पापांपासून मुक्ती मिळते. हीच तिथी 'धात्रीनवमी' व कूष्मांड नवमी' या नावांनीहि ओळखली जाते. त्यामुळे या दिवशी प्रात:स्नानादि उरकून धात्री (आवळ) वृक्षाखाली पूर्वाभिमुख बसून '
ॐ धात्र्यै नम: ।'
अशाप्रकारे आवाहन करुन षोडशोपचार अगर पंचोपचार पूजा करावी.
'पिता पितामहाश्चान्य अपुत्रा ये च गोत्रिण: ।
ते पिबन्तु मया दत्तं धात्रीमूलेऽक्षयं पय: ॥
आब्रह्मस्तंबपर्यंत देवर्षिपितृमानव: ।
ते पिबन्तु मया दत्तं धात्रीमूलेऽक्षयं पय: ।'
या मंत्रांनी आवळ्याच्या झाडाशी मुळाशी दुधाची धार धऊन
'दामोदर निवासायै धात्र्यै देव्यै नमोनम: ।
सूत्रेणानेन बध्नोमि धात्रि देवि नमोऽस्तु ते ॥'
अशा मंत्राने झाडाभोवती दोर्याचे वेढे द्यावेत. नंतर निरांजन अगर कर्पुरारती ओवाळून
'यनिकानिज पापानि... ॥'
असा मंत्र म्हणत झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. त्यानंतर पिकलेले कूष्मांड (कोहळा) घेऊन त्यात सोने, चांदी, पैसे इ. ठेवुन त्याची गंधाक्षतपुष्पांनी पूजा करावी.
'कूष्मांडं बहुबीजाडढ्यं ब्रह्मणा निर्मितं पुरा ।
दास्यामि विष्णवे तुभ्यं पितृणां तारणाय च ।'
अशी प्रार्थना करून सुयोग्य ब्राह्मणास गंधादी अर्पून
'ममाखिल पापक्षयपूर्वक सुखसौभाग्यदींनामुत्तरोत्तराभिवृद्धये कूष्मांडं दानं करिष्ये ।
या मंत्राने हा कोहळा त्यास दान द्यावा.