* अन्नकूट
कार्तिक शु. प्रतिपदा या दिवशी जेवणात नेहमीच्या पदार्थांखेरीज यथाशक्ती इतर पदार्थ, जसे - भात, आमटी, कढी, भाजी इ. कच्चे; पुरी, खीर; शिरा इ. पक्के; लाडू, पेढे, बर्फी, जिलबी इ. गोड; केळी; संत्री, डाळींबे, सीताफळे इ. फळे; वांगे, मुळा, कांद्याच्या पाती इ. भाज्या; चटणी, मुरंबा, लोणचे इ. तिखट-मिठाचे पदार्थ- असावेत व त्यांचा नैवेद्य श्रीकृष्णास दाखवावा. याखेरीज इतर काही पदार्थ तयार करून त्यांचाही नैवेद्य दाखवावा. ब्राह्मणांना पोटभर अन्न वाढून उरलेले इतर इच्छुकांना देऊन टाकावे. खरे पाहता गोवर्धन पूजेचाच हा एक विधी होय.
यादिवशी मिठाईच्या पदार्थांची देवापुढे रास उभारतात. राजस्थानमधील नाथद्वार, काशीतील अन्नपूर्णा मंदिर या ठिकाणी या दिवशी भाताचे डोंगर असतात. उदेपूर येथे मिरवणूक निघते.
फल - श्रीविष्णूची प्राप्ती
* कार्तिक व्रत
हे एक स्त्रीव्रत. हे कार्तिक शु. प्रतिपदेपासून कार्तिक व. अमावस्येपर्यंत करतात. त्याचा विधी - प्रात:काली स्नान करून विष्णुपूजा करावी व दररोज काहीतरी दान द्यावे. तूप व मध घालून तयार केलेले अन्न देवपितरांना समर्पावे व दीप प्रज्वलित करावेत.
व्रताचे फल - सौभाग्य व गोलोक यांची प्राप्ती.
* बलिप्रतिपदा
कार्तिक शु. प्रतिपदा विक्रम संवत्सराचा आरंभ-दिवस. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी अर्धा मुहुर्त आहे. प्रात:काळी अभ्यंगस्नान करून नवीन वस्त्र परिधान करावे. ह्या दिवशी सार्वजनिक लोकोपयोगी रस्ते, शाळा, नदीचे घाट, पूल, तलाव, वाचनालय इ. कार्यास प्रारंभ करावा. सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीस ओवाळावे. रात्री बळीची पूजा करून त्यास दीपदान करावे. गादीवर तांदळाने बळीची आकृती काढून तिची पूजा करावी. ह्या दिवशी रात्री खेळ, गायन वगैरेंचा कार्यक्रम करून जागरण करावे.
* रथयात्रेचे व्रत
या दिवशी रथयात्रेचे एक व्रत आहे. या व्रताचा विधी आश्विन अमावस्येस उपवास करावा. कार्तिक शु. प्रतिपदेस अग्नी व ब्रह्मा या देवता रथात ठेवून चांगल्या विद्वान ब्राह्मणाच्याकरवी तो रथ ओढवावा. जागोजागी रथ थांबवून त्यातील देवतांस आरती ओवाळावी. जे भक्तिपूर्वक दर्शन घेतात. ते सर्वोच्च लोकाला जातात.
* देवीव्रत
हे व्रत कार्तिक महिन्यात करतात. व्रतकालात व्रतकर्त्याने दिवसा दुधावर आणि रात्री फक्त भाजीपाल्यावर निर्वाह करायचा असतो. दुर्गादेवीची पूजा व तिळाचा होम असा या व्रताचा विधी आहे. या व्रतात पुढील मंत्रांचा जप करायचा असतो -
जयन्ती मंगला काल भद्रकाली कपालिनी ।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमोऽस्तु ते ॥
फल - पाप, रोग, भय यांच्यापासून मुक्ती.
दुसरा पर्याय -
व्रतकर्त्याने शंभू व गौरी, जनार्दन व लक्ष्मी, सूर्य व त्याची पत्नी यांच्या मूर्तीची पूजा करावी आणि घंटा व दिवा यांचे दान द्यावे.
फल - पवित्र व सुंदर देहाची प्राप्ती.
तिसरा पर्याय -
कोणत्याही पौर्णिमेला दुधावर राहून गाय दान देणे.
फल - लक्ष्मीलोकप्राप्ती.
* द्यूत प्रतिपदा
कार्तिक शु. प्रतिपदा या तिथीस द्यूत खेळावे, असे धर्मशास्त्राचे वचन आहे. या दिवशी प्रात:काळी अभ्यंगस्नान करून लक्षपूर्वक द्यूतक्रीडा खेळावी. त्यावरून वर्ष कसे जाईल याची कल्पना करता येते.