मे १ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


तमोगुण हा तिन्ही गुणांत जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगामध्ये लगेच दिसून येतो . दुष्ट बुध्दी हा तमोगुणाचा परिणाम आहे . परंतु भगवंताच्या नामाने बुध्दी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे . यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे , म्हणजे सत्त्वगुणाचा उदय होतो आणि बुध्दी शुध्द बनते . देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही . तसे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणार्‍यांना भगवंत लवकर वश झाला असता ! भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते . आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी , ते पाहून लोक फसतील , पण भगवंत फसणार नाही . आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा . परमार्थामध्ये ढोंग फार बाधक असते . प्रापंचिक गोष्टीकरिता उपवास करणे ही गोष्ट मला पसंत नाही . उपवास ‘ घडावा ’ यात जी मौज आहे ती उपवास ‘ करावा ’ यामध्ये नाही . भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्याजवळ वास करतो आहोत असे मनाला वाटावे . मग देहाने अन्न खाल्ले म्हणून कुठे बिघडले ? याउलट , आपल्या चित्तात भगवंताचे नाम नसताना आपण देहाने पुष्कळ उपवास केले , तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही . काही लोक वेडे असतात ; त्यांना आपण उपासतपास कशासाठी करतो आहोत हेच समजत नाही . कोणत्याही कृतीला वास्तविक मोल तिच्या हेतूवरुन येते . हेतू शुध्द असून एखादे वेळी कृती बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते ; पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्यापासून दूरच राहतो . माणसाने केलेला उपवास निष्काम असून , तो केवळ भगवंताच्या स्मरणात राहावे म्हणून केलेला असला तर फारच उत्तम आहे . निष्काम कर्माचे फार फार महत्त्व आहे . ‘ भगवंतासाठी भगवंत हवा ’ अशी आपली वृत्ती असावी . किंबहुना , नाम घेत असताना , प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला , आणि ‘ तुला काय पाहिजे ? ’ असे त्याने विचारले , तर ‘ तुझे नामच मला दे ’ हे त्याच्याजवळ मागणे , याचे नाव निष्कामता होय . कारण , रुपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हातरी नाहीसा होईल , पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल ; आणि त्याचे नाम घेतले की त्याला आपल्याकडे येणे जरुर आहे . म्हणून , देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठी नाम घेत असावे . त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP