मे ३१ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


मी जे जे करतो ते ते भगवंताकरता करतो असे जो म्हणतो तो खरा आणि उत्तम भक्त होय . कर्तेपण घालवायला उत्तम भक्त व्हावे लागते . भगवंतप्राप्तिशिवाय दुसरे काहीही नको असे वाटणे , हे भक्ताचे लक्षण आहे . चांगले कार्य हेसुध्दा बंधनाला कारणीभूत होत असते ; याकरिता , कोणतेही कृत्य भगवंताला स्मरुन करावे . भगवंताच्या स्मरणामध्ये स्नानाची आठवण झाली नाही तर त्याला पापी कसे म्हणावे ? जो काळ भगवत्स्मरणात जातो , तोच काळ सुखात जातो . विषयासाठी आपण स्वत :ला विसरतो , मग भगवंताला आठवण्यात का नाही स्वत :ला विसरु ? मला सगुणांत प्रेम येत नाही असे जोपर्यंत वाटते , तोपर्यंत सगुणभक्ती करावी . गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो , म्हणजे माझी इच्छा नाहीशीच नाही का झाली ? यामध्ये अभिमान अनायासे मारला जातो . मीपणा टाकल्याशिवाय गुरुआज्ञा नाही पाळता येत . गुरुआज्ञा प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुध्दा ती आपले डोके मधूनमधून वर काढतेच . पण तिला एकदा कळले की हा ऐकत नाही , की मग ती हळूहळू नाहीशी होत जाते . देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली , तरी गुरुआज्ञा मोडू नये . देहातीत व्हायला , गुरुआज्ञेप्रमाणे वागणे यापरते दुसरे काय आहे ? ‘ मी देही नाही ’ असे म्हणत राहिला , तर माणूस केव्हातरी देहातीत होईल .

आपला धर्म आणि नीती सांभाळावी , आणि सत्संगतीने राहण्याचा प्रयत्न करावा . संत आणि प्रापंचिक , दोघेही प्रपंच करतात ; पण प्रापंचिक , कर्तेपणा आपल्याकडे घेतात , तर संत ‘ राम कर्ता ’ असे म्हणून प्रपंच करतात . कर्तेपण तुम्ही आपल्याकडे घेतलेत तर सुखदु :ख भोगावे लागेल . बायको आजारी पडली तर रात्रंदिवस जागतो आणि स्वत :ला विसरतो , मग भगवंताकरिता नाही का तसे करता येणार ? तळमळ असली पाहिजे की मग सर्व काही होते . ‘ किती दिवसांत मुक्ती मिळेल ? ’ याला समर्थांनी फार चांगले उत्तर दिले आहे . ‘ ज्या क्षणी भगवंतस्मरणात स्वत :ला विसराल त्या क्षणी मुक्ती मिळेल . ’ स्वत :ला विसरणे म्हणजे निर्गुणात जाणे . कृती करणार्‍याचाच वेदान्त खरा असतो . मी विद्वान आहे असे वाटू लागले की भगवंताचे भजन करण्याची लाज वाटते . याकरिता सतत भगवंताच्या नामाचा सहवास ठेवा . सहवासाने माणसाचेसुध्दा प्रेम जर वाढते , तर भगवंताचा सहवास केल्याने त्याचे प्रेम नाही का येणार ? भगवंताला शरण जावे आणि त्याचे होऊन राहावे , यातच सर्व धर्माचे आणि शास्त्रांचे सार आहे .

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP