मे ८ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


फार दिवस वापरुन जोडा फाटला की तो कितीही दुरुस्त केला तरी पुन : पुन : फाटतोच . तसेच शरीराचे आहे . शरीर जीर्ण झाल्यावर त्याला काही ना काही तरी होतच राहते . दुरुस्त केलेल्या जोड्यातला एखादा खिळा जर पायाला टोचू लागला तर मात्र त्याला जपावे लागते . तसे , आजारपणामुळे मनाला टोचणी लागली तर जपावे आणि त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये . आपल्या आजाराचा , म्हातारपणाचा , आपण फायदा करुन घ्यावा . एखादी शहाणी सुगरण बाई ज्याप्रमाणे कोंड्याचा मांडा करते , त्याप्रमाणे आपण आपल्या दुखण्यामधून भगवंताचे अनुसंधान टिकवायला शिकले पाहिजे . अनुसंधानात असले की प्रपंचात मजा आहे ; अडचणी आणि संकटे यांचीसुध्दा मजा वाटेल . पोहायला येणार्‍या एखाद्याला नुसते सरळ पोहायला सांगितले तर आवडणार नाही . तो उड्या मारील , बुड्या मारील , वाकडातिकडा पोहेल ; तसे , भगवंताच्या अनुसंधानात राहिले तर प्रपंचाची मजा वाटेल .

कोणतीही गोष्ट एकदा ओळखली की मग तिची नाही भीती वाटत . विषय जोवर ओळखले नाहीत तोवरच ते आपल्याला त्रास देतात . याकरिता , ज्या ज्या गोष्टी होत असतात , त्या त्या भगवंताच्या इच्छेनेच होत आहेत , ही जाणीव ठेवून वृत्ती आवरण्याचा प्रयत्न करावा . परमार्थाच्या आड आपले आपणच येत असतो . आपली वृत्ती जिथे जिथे वावरते तिथे तिथे भगवंताची वस्ती असते . म्हणून वृत्ती जरी कोणतीही उठली तरी तिथे भगवंताची आठवण केली तर ती चटकन मावळते . आपण नेहमी आपल्या उपास्य देवतेचे स्मरण करीत असावे . त्याच्या पायावर मस्तक ठेवावे , आणि त्याची अनन्य भावाने प्रार्थना करावी की , " हे भगवंता , तुझ्या आड येणारे हे विषय तुझ्या कृपेशिवाय नाही दूर होणार . आजवर जगाचा मी अनुभव पाहून घेतला . तुझ्या प्राप्तीशिवाय कशातही सुख नाही असे भासू लागले , तरी वृत्ती आड आल्याशिवाय रहात नाही . माझ्या अज्ञानाने मी आज स्वत : च्याच आड येत आहे . तरी तुझी , म्हणजे पर्यायाने माझीच , ओळख मला पटावी , आणि त्यात मी तुला पाहावे , हीच माझ्या जीवितातली शेवटची इच्छा आहे . ही इच्छा तुझ्या कृपेशिवाय पूर्ण होणे शक्य नाही . तरी , हे भगवंता , माझे मन तुझ्या चरणी राहो असे कर . यापेक्षा मला जगात दुसरे काहीही नको . आता मी तुझा झालो . यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन , आणि तुझे नाम घेण्याचा अटोकाट प्रयत्न करीन . तू मला आपला म्हण . "

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP