मे ६ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


परस्परांत प्रेम वाढविण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत . एक , बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करुन प्रत्येकाच्या स्वभावाला थोडी थोडी सवलत ठेवावी ; म्हणजे द्वेष वाटणार नाही . दुसरी , सर्वांना प्रेमाची अशी जी एखादी जागा असेल त्याकडे दृष्टी ठेवावी . तिसरी , कोणतीही सूचना सांगायची झाली , तर त्या व्यक्तीविषयक न बोलता , नम्रतेने आणि गोड शब्दात सांगावी . चौथी , अत्यंत महत्त्वाची गोष्ट , जीमध्ये या सर्वांचा बर्‍याच प्रमाणात अंतर्भाव होतो अशी बाब , म्हणजे स्वार्थाला आळा घालणे ; म्हणजे , मी स्वत : जितका माझ्याकरिता आहे असे वाटते , त्याच्याहीपेक्षा जास्त मी दुसर्‍याकरिता आहे असे वाटणे ही होय . आणि ही जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हेच प्रेम वाढवायला मदत करते . ज्या माणसाला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही . जिथे नि :स्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे .

आता स्वार्थाचा विचार करताना असे सहज वाटते की , मी कुठे स्वार्थी आहे ? मी कुठे कुणाजवळ काय मागतो ? पण एवढ्याने ‘ स्वार्थदृष्टी नाही ’ असे म्हणता येणार नाही . अहंकाराइतकाच स्वार्थ जबरदस्त आहे . त्याच्या मुळ्या इतक्या खोल आणि सूक्ष्म असतात की त्यांचा पत्ताच लागत नाही . स्वार्थ तीन प्रकारचा असू शकतो ; कायिक , वाचिक आणि मानसिक . देहाला दुसर्‍यानिमित्त कष्ट न होतील इतक्या काळजीने वागणे , हा कायिक स्वार्थ म्हणतात . माझ्या बोलण्याला सर्वांनी मान डोलवावी , मी कोणाला काही कमीजास्त बोललो तरी ते निमूटपणे सहन करावे , अशा तर्‍हेच्या वृत्तीला वाचिक स्वार्थ म्हणता येईल . आणि माझ्या मताप्रमाणे सर्वांनी वागावे , माझे विचार बरोबर आहेत अशी जाणीव इतरांनी ठेवावी , अशा तर्‍हेची आपली इच्छा , त्याला मानसिक स्वार्थ म्हणता येईल . आता , मी माझ्याकरिता जितका असेन त्याहून जास्त मी दुसर्‍याकरिता आहे , असा विचार केला तर असे दिसून येईल की , मी जेवढी मला स्वत :ला सवड ठेवतो , तेवढीच किंवा त्याच्याहून थोडी जास्त सवड दुसर्‍याला ठेवणे जरुर आहे . म्हणजेच , जे दुसर्‍याने आपल्या बाबतीत करणे आपल्याला बरे वाटत नाही , ते आपण दुसर्‍याच्या बाबतीत न करणे ; आणि त्याच्याच उलट , जे दुसर्‍याने आपल्याला केले तर बरे वाटते तेच आपण दुसर्‍याच्या बाबतीत करावे . हेच सर्वांचे सार आहे आणि हाच खरा धर्म आहे . आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही . आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तर आपण एकटेच त्यांचे करतो , पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात . जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP