मे ९ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


आपल्या घरातले वातावरण शुध्द , शांत आणि पवित्र असावे . आपल्याकडे येणार्‍या माणसाला परत जाऊच नये असे वाटावे . अगदी भगवंताच्या इच्छेने प्रपंच चालला आहे असे समजून , त्या प्रपंचात विद्या , वैभव , घरदार , इत्यादि सर्व काही यश संपादन करा ; अगदी एखाद्या राजयोग्याप्रमाणे प्रपंचात ऐषआरामात राहून गाद्यागिरद्यांवर लोळा ; पण हे करीत असताना तुमचे अंत : करण मात्र भगवंताच्या ओथंबलेले राहू द्या . कोणाशी वाद घालीत बसू नका . जगाचा मान फार घातक आहे ; त्याची चटक लागली की मनुष्य त्याच्यामागे लागतो , नंतर मान मिळविण्याची कृती थांबते आणि मानही नाहीसा होतो . जगातले अजिंक्य पुरुषसुध्दा कुठेतरी विषयात गुंतलेले असतात , तिथे त्यांचा घात होतो . जगाला ते भारी असतील , पण त्या विषयापुढे त्यांचे काहीच चालत नाही . प्रेमात गुंतू नका , तसे द्वेषमत्सरातही गुंतू नका ; दोन्ही सारखेच घातक आहेत . आपला प्रिय नातेवाईक मेला , आणि आपण ज्याच्यावर दावा लावला आहे तो भाऊबंद मेला ; दोघेही मेल्याचे सुतक सारखेच ! त्याचप्रमाणे , मनुष्य प्रेमाने गुंतला काय आणि द्वेषाने गुंतला काय , नुकसान सारखेच होते . भगवंताचा विसर हा कोणत्याही कारणाने झाला तरी बरा नाही ; मग प्रपंचात सुखसोयी असल्याने तो होवो किंवा प्रपंचात दु : ख झाल्यामुळे होवो . ढोंग , बुवाबाजी , इत्यादींच्या भानगडीत तुम्ही पडू नका ; अगदी काहीही न केलेत तरी चालेल , पण ढोंग मुळीच करु नका ; आणि सर्वांनी माझ्यावर कृपा करा , अगदी अनुभवाने मी सांगतो , की बुवा होण्याच्या फंदात तुम्ही पडू नका . आपले कर्तव्य भगवंताच्या स्मरणात करुन , त्याचे अनुसंधान अखंड टिकू द्या . आमची अशी वृत्ती बनण्यासाठी संतांच्या संगतीची आपल्याला जरुरी आहे . आपण सर्वजण सत्संगतीमध्ये आहोत असे म्हणतो , मग आमची वृत्ती का न सुधारावी ? तर संतांना ज्याची आवड आहे ते आम्ही धरले नाही , म्हणून आमची वृत्ती सुधारत नाही .

श्रीकृष्णाने उध्दवाला ज्ञान देऊन त्याला गोपींकडे पाठविले . भगवंताच्या नामामध्ये त्या रंगून गेल्या होत्या . गोपींचे नामावरचे प्रेम पाहून उध्दवाला आश्चर्य वाटले . नामामध्ये त्यांना भगवंत दिसत असे ; ते पाहून उध्दवाने देवाला सांगितले , " देवा , तू मला ज्ञान दिलेस खरे , पण तुझ्या भक्तीचे प्रेम त्याहून श्रेष्ठ आहे , ते तू मला दे . " खरोखर , त्या नामाचे माहात्म्य देवाच्या वर्णनापेक्षाही कठीण आहे . तुम्ही सर्वजण इथे आला आहात ; इथून रामाजवळून काही मागून न्यायचेच असेल तर त्या नामाचे प्रेम तुम्ही सर्वांनी मागा . सर्वांनी नामस्मरण करा आणि आनंदात राहा . राम कृपा करील , हा भरंवसा बाळगा .

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP