आता वातव्याधि निदान सांगतो , जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ते२॥
सद्धर्माचरण करणारामध्ये श्रेष्ठ , अमृतासह समुद्रमंथनाचे वेळी समुद्रातून बाहेर प्रगट झालेले जे भगवान धन्वंतरी त्यांना नमस्कार करून सुश्रुताने विचारले .
‘‘ हे वक्त्यामध्ये श्रेष्ठ भगवान ; वायूचे स्वाभाविक स्थान व कर्म काय ? तसेच वायूची वाढ करणारे पदार्थ व व्यायामादिकांच्या परिशीलनाने तो विकृत झाला असता
कोणकोणते रोग उत्पन्न करितो ते मला सांगा .’’
ह्याप्रमाणे सुश्रुताचे ते वचन ऐकून सर्व वैद्यांमध्ये श्रेष्ठ भगवान धन्वंतरी म्हणाले , ‘हा जो सर्व जगताचा भगवान् स्वयंभू (नित्य ) परमात्मा तो वायू या नावाने सांगितला आहे ’
हा वायु स्वतंत्र आहे (म्हणजे ह्याला कार्य करण्याला दुसर्याची गरज लागत नाही .) तसेच हा नित्य आहे (म्हणजे अविनाशीतेनाश न पावणारातेशाश्वत आहे ) त्याचप्रमाणे हा सर्वगामी (सर्वत्र संचार करणारा ) आहे . सर्व स्थावरजंगम प्राणिमात्रांच्या सर्व क्रियांना कारणीभूत असा सर्वात्मा हा वायूच आहे . म्हणून हा सर्व लोकांनी वंदन केलेला असा आहे . सर्व प्राणिमात्रांच्या उत्पत्ति , स्थिति व लयाला कारणीभूत हा वायूच आहे .
हा अव्यक्त (न दिसणारा ) असून ह्याचे कार्य मात्र प्रगट (दिसून येणारे ) आहे . गुणाने रूक्ष , शीत , लघु , (हलका ), खर (स्पर्शाला असह्य ), तिर्यग्गति , शब्द व स्पर्श ह्या दोन गुणांनी युक्त , रजोगुणप्रधान अचिन्त्यशक्ति , कफ , पित्त व वातादिदोष आणि मलमूत्रादि धातु ह्यांना प्रेरक , सर्व रोगसमूहांचा राजा (अथवा रोगसमूहांच्या ठिकाणी इतर दोषांबरोबर प्रामुख्याने असणारा ) आशुकारी (त्वरित कार्य करणारा ) व पुन्ह पुन्हा संचारशील असा आहे . आणि ह्याचे स्थान म्हणजे पक्वाशय व गुद (मलाशय ) हे मुख्यतः आहे .
आता मी शरीरात संचार करीत असता काय काय लक्षण होतात ती मी सांगतो .
वायु हा प्रकुपित झाला नसला म्हणजे तो कफपित्तादिदोष , रक्तादि धातु व जठराग्नि ह्यांना साम्य स्थितीत ठेवतो . इंद्रियांना आपाआपले शब्दस्पर्शादिविषय ग्रहण करवतो . व मलमूत्रविसर्गादि क्रिया योग्य रीतीने करतो .
पित्ताच्या आश्रयाने असणारा देहस्थ अग्नि त्यांच्या स्थान व क्रिया भेदाने पाचक , रंजक , आलोचक , भाजक व साधक अशा पाच नावांनी पाच प्रकारचा आहे . त्याप्रमाणे शरीरस्थ वायु त्याची निरनिराळी स्थाने निरनिराळी कर्मे व नावे अशा भेदाने पाच प्रकारचा आहे .
प्राण , उदान , समान , व्यान व अपान अशा पाच नावांनी भिन्न असलेले हे वायु आपआपल्या स्थानी असले म्हणजे मनुष्याच्या शरीराचे पोषण करितात .
जो वायु श्वासोच्छ्वासाच्या योगाने तोंडावाटे देहात संचार करितो त्याला प्राणवायु म्हणतात . हा (मस्तक , हृदय , कंठ व नाक ह्या स्थानी राहून ) देहाचे धारण करतो , खाल्लेले अन्न आत (कोठ्यामध्ये ) पोचवितो व प्राणादिकांना (जठराग्नि इत्यादिकांना ) आपआपली कामे करण्यास प्रवृत्त करितो हा प्राणवायु कुपित झाला असता बहुतेक उचकी , श्वास इत्यादि रोग उत्पन्न करितो .
सर्व वायुमध्ये श्रेष्ठ असा उदानवायु हा (नाभि ऊर व कंठ ह्यांच्या आश्रयाने राहून ) ऊर्ध्वगतीने मस्तकाकडे जातो . त्यामुळे तो संभाषण व गायन वगैरे क्रिया करवितो . हा प्रकुपित झाला असता मानेच्या वरच्या भागासंबंधी सर्वप्रकारचे रोग उत्पन्न करितो .
समानवायु हा जठराग्निच्या सन्निध राहून आमाशय व पक्वाशय ह्यामध्ये संचार करितो . हा अन्नाचे पचन करवितो व त्यापासून निघणारे रसादि पदार्थ (रसधातु , मलमूत्र वगैरे ) वेगवेगळे करतो . हा प्रकुपित झाला असता गुल्म , अग्निमांद्य व अतिसार वगैरे रोग उत्पन्न करितो .
सर्व देह व्यापून असणारा व्यानवायु रसादिकांना प्रेरणा करून सर्व देहांतून फिरवितो . घाम व रक्त ह्यांचा स्त्राव करतो . हातपाय वगैरे अवयवांचे प्रसारण (पसरणे ),
आकुंचन (आखडणे ), विनमन (वाकविणे ), उन्नमन (वर नेणे ), तीर्यक्गमन (आडवे तिडवे करणे ह्या क्रिया करितो . हा प्रकुपित झाला असता सर्व शरीरसंबंधी रोग (पक्षघातादि ) उत्पन्न करितो .
अपानवायु हा पक्वाशयामध्ये राहून हा योग्य वेळी मल , मूल , शुक्र , गर्भ व आर्तव ह्यांना खाली प्रेरणा करतो . (म्हणजे त्यांच्या त्यांच्या मार्गाने त्यांना बाहेर सोडितो .) हा प्रकुपित झाला असता बस्ती व गुद ह्या स्थानासंबंधी भयंकर रोग उत्पन्न करितो .
शुक्रासंबंधी दोष (विकार ) व प्रमेहरोग हे व्यानवायु व अपानवायु ह्या दोहोंच्या प्रकोपामुळे होतात .
हे प्राणादि पाचही वायु जर एक वेळी प्रकुपित झाले तर देहाचा निःसंशय नाश करितात ॥३ते८॥
आता ह्यापुढे शरीरातील अनेक स्थानांचा आश्रय करून असलेला वायु प्रकुपित झाला असता जे नानाप्रकारचे रोग उत्पन्न करितो ते आता ह्यापुढे सांगतो .
आमाशयामध्ये वायु प्रकुपित झाला असता वांती वगैरे विकार उत्पन्न करितो . तसेच मोह (भ्रांति ), मूर्च्छा , तहान , उरोग्रह (छाती जखडणे ), व कुशीमध्ये वेदना हे विकार उत्पन्न करितो .
पक्वाशयात वायु कुपित झाला असता आतड्यात गुडगुडणे व नाभीच्या ठिकाणी वेदना हे विकार उत्पन्न करितो . तसेच मलमूत्र फार कष्टाने होणे , पोट फुगणे व माकडहाडाच्या ठिकाणी वेदना हे विकार होतात .
कान वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी वायु कुपित झाला असता त्या त्या इंद्रियांचा नाश करितो ॥२१ते२४॥
त्वेचच्या ठिकाणी वायु प्रकुपित झाला असता त्वचेचा वर्ण चांगला राहात नाही किंवा त्यात बदल होतो . त्वचा फुरफुरते . रूक्ष होते . त्वचेला स्पर्श कळत नाही . त्वचेमध्ये चुणचुण अशा वेदना होतात . टोचल्यासारखी पीडा होते . त्वचेला भेगा पडतात व त्वचेवर काहीतरी लेप केल्यासारखे वाटते .
रक्तामध्ये वायु प्रकुपित झाला असता व्रण उत्पन्न करितो . आणि मांसाश्रित वायु प्रकुपित झाला असता ज्यांच्यामध्ये ठणका आहे अशा गाठी उत्पन्न करितो . तसेच मेदाच्या आश्रयाने असणारा वायु प्रकुपित झाला असता तोही मंदवेदनायुक्त गाठी व व्रण उत्पन्न करतो .
शिरामध्ये वायु प्रकुपित झाला असता शिरा वाताने फुगतात , आखडतात व त्यांच्यामधून शूल होतो . स्नायूंमध्ये वायु प्रकुपित झाला असता त्या त्या शरीराचा भाग ताठणे , थरथर कापणे , शूल व तो भाग हालणे हे विकार होतात . सांध्याच्या ठिकाणी प्रकुपित झालेला वायु सांध्याचा नाश करितो . (म्हणजे सांध्याच्या आखडण्याच्या व पसरण्याच्या क्रिया बंद होतात ) आणि शूल व सूज हे विकार उत्पन्न करतो .
हाडामध्ये वायु प्रकुपित झाला असता हाडांचा क्षय होतो . हाडे फुटल्याप्रमाणे वाटतात व त्यामध्ये ठणका लागतो . तसेच मज्जेमध्ये वायु प्रकुपित झाला असता जी पीडा होते ती लवकर बंद होत नाही ; आणि शुक्रस्थानी वात प्रकुपित झाला असता शुक्राची प्रवृत्ति होत नाही (कामवासना होत नाही .) किंवा आपोआप शुक्रस्राव होतो .
शरीराच्या एकाद्या भागात किंवा एकाद्या धातुच्या स्थानी प्रकुपित झालेल्या वायुची अपेक्षा केली असता तो हळु हळु सर्व शरीरात संचार करून सर्व शरीर व्यापतो . आणि त्यामुळे शरीर ताठणे , आक्षेपण (आपोआप हालणे ), शरीराला स्पर्श न कळणे , सूज व शूल हे विकार करतो .
ही जी वर वातप्रकोपाची स्थाने सांगितली आहेत त्या त्या ठिकाणी प्रकुपित झालेला वायु दुसर्या पित्तकफादिदोषांनी युक्त झाला असता त्या त्या दोषांच्या प्रकोपाच्या विकारांनी युक्त असे रोग उत्पन्न करितो .
वायु हा शरीराच्या प्रत्येक अवयवाचे ठिकाणी प्रकुपित झाला असता त्या ठिकाणी देखील अनेक रोग उत्पन्न करतो ॥२५ते३१॥
दाह , संताप (उन्हात बसल्यासारखे वाटणे ) व मूर्च्छा हे विकार वायु पित्ताने युक्त झाला असता होतात . शैत्य , (थंडी ), सूज व जडत्व . हे विकार वायु कफदोषाने युक्त झाला असता होतात . त्वचेत सुया टोचल्याप्रमाणे पीडा होणे , त्वचेला स्पर्श न कळणे , त्वचेला स्पर्शसहन न होणे , आणि बाकी पित्तासंबंधी विकार ही लक्षणे वायु रक्ताश्रित झाला असता होतात .
प्राणवायु पित्तदोषाने युक्त झाला असता वांती व दाह हे विकार होतात . तो कफाने युक्त झाला असता अशक्तपणा , ग्लानी , तंद्री (डोळ मिटून पडावेसे वाटणे ) व अंगाचा वर्ण बदलणे हे विकार होतात .
उदानवायु पित्तयुक्त झाला असता मूर्च्छा , दाह , भ्रम (घेरी ) व थकवा हे विकार होतात . तो कफदोषाने युक्त झाला असता घाम न येणे , अंगावर शहारे येणे , अग्निमांद्य , थंडी वाजणे , व अंग ताठणे हे विकार होतात .
समानवायु पित्ताने युक्त झाला असता घाम येणे , दाह , उष्णता व मूर्च्छा हे विकार होतात . तो कफदोषाने युक्त झाला असता मलमूत्रामध्ये कफाचे प्रमाण जास्त वाढते व अंगावर काटा येतो .
अपानवायु पित्तयुक्त झाला असता दाह , उष्णता (उकडणे ) व रक्तप्रदर हे विकार होतात . तो कफाने युक्त झाला असता शरीराच्या खालच्या (नाभीपासून खाली ) भागास जडत्व येते .
व्यान वायु पित्तयुक्त झाला असता दाह , हातपाय इकडे तिकडे टाकणे व थकवा हे विकार होतात . आणि तो कफाने युक्त झाला असता सर्व अवयव जड होतात . हाडे व हातपायांची पेरी ताठवतात , व काही हालचाल करता येत नाही ॥३२ते३९॥
प्रायः अनियमितपणाने आहारविहारादि करणार्या नाशक माणसांना , अति मार्गक्रमण अतिस्त्रीसेवन , अति मद्यपान , अतिशय श्रम करणे , ह्या कारणाने तसेच ऋतुमानाप्रमाणे सात्म्य अशा आहारादिकांत विपर्यास झाल्याने व स्नेहपानामध्ये बिघाड झाल्याने वातरक्ताचा प्रकोप होतो . त्याचप्रमाणे अजिबात मैथुन न करणार्या स्थूल मनुष्यासही वरील कारणांनी वातरक्ताचा प्रकोप होतो .
हत्ती , घोडा व उंट वगैरे वेगवान वाहनांवरून प्रवास करणे , ओझे वगैरे वाहणे ह्या कारणांनी व वातप्रकोपकारक आहाराने प्रकुपित झालेला वायु , तीक्ष्ण उष्ण , आंबट , खारट अशा प्रकारच्या भाज्या व इतर अन्न नित्य खाण्याने आणि ऊन व विस्तवाचा शेक फार घेण्याने रक्त हे तात्काळ क्षुब्ध होते आणि ते त्या प्रकुपित झालेल्या वायुचा मार्ग बंद करिते , त्यामुळे अत्यंत प्रकुपित झालेला तो वायु अतिशय क्षुब्ध झालेल्या त्या रक्ताला त्वरित दूषित करितो . ह्याप्रमाणे प्रकुपित झालेल्या वायूने युक्त झाल्यामुळे व त्या वायूच्या प्राबल्यामुळे त्याला वातरक्त असे म्हणतात , आणि त्याला दूषित झालेल्या पित्ताचा संबंध आला असता ते पित्तयुक्त व दुषित कफाचा संबंध झाला असता ते कफयुक्त वातरक्त असे म्हणतात .
वातयुक्त वातरक्त लक्षण वातरक्ताने पायांना स्पर्श सहन होत नाही , पायास टोचल्याप्रमाणे पीडा होते , पायास भेगा पडतात . पाय कोरडे होतात . व पायांना स्पर्श कळत नाही . पित्तयुक्त वातरक्ताने पायाचा अत्यंत दाह होतो . पायाला अतिशय उष्ण अशी तांबूस व मऊ लागणारी सूज येते . कफयुक्त वातरक्तामध्ये पायांना कंडु येतो . पायाची त्वचा श्वेतपर्ण व थंडगार लागते . आणि पायाला सूज आली असतां तिच्या योगाने पाय अतिशय घट्ट व ताठल्यासारखे होतात . आणि वातादि सर्व दोषांनी (त्रिदोषांनी ) युक्त झालेल्या वातरक्तामध्ये वातादिदोश आपआपली लक्षणे दाखवितात . (म्हणजे तीनही दोषांची लक्षणे होतात ॥४०ते४९॥
पूर्वरूप
वातरक्ताच्या पूर्व रूपात पाय शिथिल , घामयुक्त व थंड असतात . किंवा ह्याच्या उलट म्हणजे कठीण , घामरहित व उष्ण असतात . पायांच्या त्वचेचा रंग बदलतो . टोचणी लागते . त्वचेला स्पर्श कळत नाही . पायांना जडत्व येते व दाह होतो .
हे वातरक्त पायाच्या ठिकाणी उत्पन्न होऊन केव्हा केव्हा हाताचे ठिकाणीही उत्पन्न होते . हे उंदराच्या विषाप्रमाणे सर्व देहातही संचार करते .
असाध्यत्व
पायापासून गुडघ्यापर्यंत फुटलेले , त्वचा विदीर्ण झालेले , वाहणारे , बलक्षय (अशक्तपणा ) व मांसक्षय (कृशत्व ) वगैरे उपद्रवांनी युक्त असे वातरक्त असाध्य समजावे .
आणि एक वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले याप्य समजावे .
प्रकुपित झालेला वायु सर्व धमन्यांमधून संचार करू लागतो व त्या मनुष्याचे अंग वरचेवर हालवितो . पुनःपुनः धमनीतून संचार करणारा वायु वरचेवर सर्व शरीर किंवा शरीराचे अवयव हालवितो ; म्हणून ह्याला ‘‘आक्षेपक ’’
असे म्हणतात ॥५०ते५१॥
ज्या आक्षेपक वायूने मनुष्य वरचेवर पडतो त्याला ‘‘अपतानक ’’ असे म्हणतात . वायु कफयुक्त होऊन त्याच धमन्यातून संचार करीत राहिला असता तो त्या मनुष्याचे अंग काठीप्रमाणे ताठवितो . त्याला ‘‘दंडापताचक ’’ असे म्हणतात .
हा कष्टासाध्य आहे ,
वाताने हनुवटी ताठली असता तो मनुष्य फार कष्टाने अन्न खातो . ज्या वातरोगाने मनुष्याचे शरीर धनुष्याप्रमाणे वाकते त्याला ‘‘धनुस्तंभ ’’ म्हणतात .
पायाची बोटे , घोटे , पोट , हृदय , वक्षस्थळ (छाती ) व गळा ह्या ठिकाणी असणारा वायु , स्नायुजालाचा आश्रय करून जेव्हा अतिशय वेगाने अंग हलवितो त्यावेळी त्या रोग्याचे डोळे ताठतात . दातखिळ बसते . कुशी वाकतात . तो तोंडावाटे कफ ओकतो . आणि अभ्यंतरी (आतील बाजूने म्हणजे छातीकडील बाजूने ) धनुष्याप्रमाणे वाकतो . तेव्हा तो वायु त्या रोग्याला ‘‘अभ्यंतरायाम ’’ या नावाचा वातरोग उत्पन्न करितो (म्हणजे त्याला ‘‘अभ्यंतरायाम ’’ होतो . हा धनुस्तंभ वाताचा एक प्रकार आहे .) तोच वात ज्यावेळी बाह्यस्नायुजालाचा आश्रय करितो त्यावेळी ‘‘बाह्यायाम ’’ नावाचा वातरोग उत्पन्न करितो (ह्या वायूच्या झटक्याने मनुष्य पाठीकडून वाकतो ) त्यामुळे त्याची छाती , कंबर व मांड्या ह्यांचा भंग होतो . म्हणून ह्या विकाराला ज्ञातवैद्य असाध्य आहे असे म्हणतात .
कफपित्तांनी युक्त झालेला वायु किंवा केवळ एकटाच वायु हा एक प्रकारचा ‘‘आक्षेपक ’’ वातरोग उत्पन्न करितो . शरीराला काही आघात झाला असता त्यामुळे होणारा आक्षेप हा आक्षेपाचा चौथा प्रकार आहे .
गर्भपातामुळे झालेला , अंगातून रक्त फार गेल्यामुळे झालेला व शरिराला जबरदस्त आघात झाल्यामुळे झालेला आहे असे तीन प्रकारचे ‘‘अपतानक वातरोग ’’ साध्य होत नाहीत .
शरीराच्या खालच्या भागात जाणार्या , तशाच तीर्यक् (आडव्या ) जाणार्या व शरीराच्या वरच्या भागात जाणार्या ज्यातेधमन्या त्यामधून ज्यावेळी अतिशय प्रकुपित झालेला वायु संचार करितो त्यावेळी तो शरीराच्या कोणत्या तरी अर्ध्या भागातील संधीबंधने मोकळी करून शरीराचा तो अर्धा भाग नष्ट करितो . (हालचाल रहित करितो ). ह्या वातविकाराला वैद्य ‘‘पक्षाघात ’’ असे म्हणतात . त्यामुळे शरीराचा तो अर्धा भाग कर्म करण्यास असमर्थ होतो , (किंचित् हालचाल करतो ) आणि ज्यावेळी तो अर्धा भाग हालचाल मुळीच करू शकत नाही त्यावेळी तो रोगी पडून राहतो आणि त्या भागातील चैतन्यच जेव्हा नाहीसे होते त्यावेळी तो प्राण सोडतो .
केवळ वातदोषाने झालेला पक्षाघात कष्टाने साध्य होतो असे म्हणतात कफपित्तादि दोषांनी युक्त झालेला पक्षाघात हा साध्य असतो . आणि शरीरातील कोणत्याही धातूच्या वगैरे क्षयापासून झालेला असाध्य असतो ॥६०ते६३॥
वायु हा प्रकुपित होऊन शरीराच्या वरच्या भागात शिरून हृदय , मस्तक व दोन्ही आंख ह्यांना जखडून हातपाय हे अवयव हालवितो आणि सर्व अंग वाकवितो . त्यामुळे तो रोगी डोळे मिटून निश्चेष्ट (बेशुद्ध ) होतो , किंवा डोळे ताठवून पारवा घुमतो त्याप्रमाणे कण्हतो . आणि त्याचा श्वासोच्छ्वास बंद होतो , किंवा तो कष्टाने श्वासोच्छ्वास करितो व बेशुद्ध होतो . वायूने हृदय सोडले म्हणजे त्याला बरे वाटते व तो सावध होतो . आणि वायूचे हृदय पुनः व्यापिले असता पुन्हा मूर्च्छित होतो . ह्या विकाराला ‘‘अपतंत्रक ’’ असे म्हणतात . हा कफदोषयुक्त अशा वायूच्या प्रकोपाने होतो .॥६४ते६७॥
मन्यास्तंभ लक्षण
दिवसा निजणे , उंचसखल अशा जागी वाकडेतिकडे बसणे , वक्रदृष्टीने , पहाणे , अशा कारणांनी प्रकुपित झालेला वायु कफाने युक्त होऊन ‘‘मन्यास्तंभ ’’ नावाचा वातरोग उत्पन्न करितो (ह्याच्या योगाने मान ताठते . हा विकार कित्येकांच्या मताने अपतानकाचे पूर्वरूप आहे )
गर्भिणी स्त्री , बाळंत स्त्री , लहान मूल , वृद्ध , मनुष्य व क्षीण मनुष्य ह्यांच्या शरीरातून रक्त जाऊन ते क्षीण झाले असता किंवा मोठ्याने भाषण करणे , कठीण पदार्थ फार खाणे , फार हसणे , अतिशय जांभया येणे , ओझे वाहणे , वाकडेतिकडे निजणे अशा कारणांची मस्तक , नाक , ओठ , हनुवटी , कपाह व डोळे ह्यांच्या सांध्याच्या ठिकाणी असणारा वायु प्रकुपित होऊन तोंडाला जखडून (पीडा करून ) ‘‘अर्दित ’’ नावाचा वातरोग उत्पन्न करितो . त्यामुळे तोंडाचा अर्धा भाग वाकडा होतो व मानही वाकडी होते . मस्तक हालू लागते . बोलणे बंद होते . आणि डोळे वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी पीडा होते . ज्या बाजूस तोंड वाकडे होते त्या बाजूची हनुवटी , मान व दात ह्यांमध्ये वेदना होतात . हा वात होण्यापूर्वी (ह्याचे पूर्वरूप ) अंगावर काटा येणे , कापणे , डोळे गढूळ होणे ,य वायूची ऊर्ध्व गती होणे , त्वचेला बधीरपणा येणे , टोचल्याप्रमाणे पीडा होणे , मान व हनुवटी ताठणे , ही लक्षणे होतात . वैद्यलोक ह्या विकाराला ‘‘अर्दितरोग ’’ असे म्हणतात .
जो अर्दितवाताचा रोगी क्षीण झाला आहे , ज्याच्या डोळ्य़ाच्या पापण्या मिटत नाहीत , जो नेहमी फार कष्टाने बोलतो , अशा रोग्याचा अर्दितवात व ज्याला तीन वर्षे होऊन गेली आहेत तो अर्दितवात , तसेच ज्याचे अंग कापत आहे त्याचा अर्दितवात साध्य होत नाही ॥६८ते७३॥
पार्ष्णि (दोन्ही घोट्यांच्या मागील व टाचेच्या वरील भाग ह्याला पायाची खोट म्हणतात .) व पायाचे प्रत्येक बोट ह्याच्या आश्रयाने असणारी कंडरा (मोठा स्नायु ) वायूने पीडित झाली असता कमरेपासून खालील पायाचा भाग पसरण्यास प्रतिबंध करितो . ह्या वातविकाराला गुध्रसि असे म्हणतात .
ह्या गुध्रसि वाताप्रमाणेच हाताच्या खांद्याच्या मागल्या भागापासून तळ हाताकडे व हाताच्या प्रत्येक बोटाकडे जाणारी जी कंडराती वाताने पीडित झाली असता हाताची हालचाल बंद करते . ह्या वातविकाराला ‘‘विश्वाचि ’’ असे म्हणतात .
वात व रक्त ह्यांच्या क्षोभामुळे गुडघ्याचे ठिकाणी अत्यंत ठणका उत्पन्न करणारी अशी सूज येते . ती कोल्ह्याच्या मस्तकाच्या आकाराप्रमाणे स्थूल असते . म्हणून ह्या रोगाला क्रोष्टुशीर्ष असे म्हणतात .
कमरेच्या आश्रयाने असणारा वायु कमरेच्या खालील पायाच्या कंडरेमध्ये शिरून तिची हालचाल बरीचशी बंद करितो . त्यामुळे तो मनुष्य लंगडा होतो . आणि ज्यावेळी दोनही पायाची हालचाल बंद होते त्यावेळी तो पांगळा होतो .
चालू लागताना जो थर थर कापतो आणि लंगडत चालतो त्याच्या त्या वातविकाराला ‘‘कलायखंज ’’ असे म्हणतात . हा विकार पायाच्या सांध्यांची बंधने शिथिल झाल्यामुळे होतो .
चालताना उंचसखल जागी जाय वाकडातिकडा पडतो , त्यामुळे पाय मुरगळल्यासारखा होऊन त्या ठिकाणी वाताने दुखु लागते . ह्या विकाराला ‘‘वातकंटक ’’ असे म्हणतात . हा विकार बहुतेक पाय व पिंढरी ह्यांच्या सांध्याच्या आश्रयाने होतो . कित्येकांच्या मताने तो पार्ष्णिच्या (खोटेच्या ) आश्रयाने होते .
पित्त व रक्त ह्यासह वायु पायांचा आश्रय करून फार चालणाराच्या पायांच्या ठिकाणी (तळपायांच्या ठिकाणी ) दाह उत्पन्न करितो त्याला ‘‘पाददाह ’’ असे म्हणतात . हा न चालणार्या मनुष्याच्या तळपायांचे ठिकाणीही होतो , पण थोडा कमी होतो .
ज्याच्या पायाला मुंग्या आल्याप्रमाणे वाटते , व किंचित् वेदना झाल्यासारखेही वाटते आणि पायांना स्पर्श कळत नाही , ते बधीर होतात , त्यावेळी त्या कफवातजन्य वातविकाराला ‘‘पादहर्ष ’’ असे म्हणतात .
खांद्याच्या आश्रयाने असणारा वायु खांद्याची बंधने (त्या स्थानचा कफ ) शुष्क करून ‘‘असशोष ’’ नावाचा वातरोग उत्पन्न करितो . (त्यामुळे खांदा शुष्क होतो .) त्या खांद्याच्या आश्रयाने असणारा तोच वायु शिरांचे आकुंचन करून ‘‘अवबाहुक ’’ नावाचा वातरोग उत्पन्न करितो . (त्यामुळे दंड मागेपुढे करवत नाही .)
ज्यावेळी केवळ वात किंवा कफयुक्त वात शब्दवाहक स्त्रोतसे भरून राहतो , त्यावेळी त्या मनुष्याला ‘‘वाधिर्य ’’ (बहिरेपणा ) प्राप्त होतो .
हनुवटी दोन्ही आंख , मस्तक व मान ह्या ठिकाणी फोडल्याप्रमाणे पीडा करीत वायु दोन्हीही कानांमध्ये शूल उत्पन्न करतो त्याला ‘‘कर्णशूल ’’ असे म्हणतात .
प्रकृपित झालेला वायू कफाने युक्त होऊन शब्दवाहक धमनीमध्ये शिरून ती पूर्ण व्यापून टाकितो . त्यामुळे तो त्या मनुष्याला मुका करितो (किंवा धमनी जशी कमीजास्त आवृत्त असलेल्या मानाने ) ‘मिम्मिण ’ (नाकात बोलणारातेगेंगणा ) करितो किंवा ‘गग्दद ’ (अस्पष्ट बोलणारा ) असा करितो .
वातप्रकोपामुळे मलमूत्राशयातून निघणार्या ज्या वेदना खाली शिरून गुद व उपस्थ ह्यांच्या ठिकाणी फोडल्याप्रमाणे अतिशय ठणका उत्पन्न करितात . त्या वातविकाराला ‘तुनी ’ असे म्हणतात .
त्याचप्रमाणे गुद व उपस्थ ह्यांच्या ठिकाणी वेदना उत्पन्न होऊन त्या उलट्या वर चढून पक्वाशयामध्ये वेगाने जातात त्या वातविकाराला ‘‘प्रतूनी ’’ असे म्हणतात .
पोटामध्ये (पक्वाशयात ) गुडगुड आवाज होणे , पोट अतिशय दुखणे व फुगणे ही लक्षणे ज्या वातप्रकोपाने होतात त्या वाताच्या अवरोधामुळे होणार्या भयंकर विकाराला ‘‘आध्यमान ’’ असे म्हणावे . (हा पक्वाशयाच्या आश्रयाने होतो .)
हृदय व कुशी सोडून वरील ‘‘आध्यमान ’’ वातविकार आमाशयात झाला असता त्याला ‘‘प्रत्याध्यान ’’ असे म्हणतात . ह्या विकारात वायकफाने युक्त असतो . फणसातील आठळीप्रमाणे कठीण व वरच्या बाजूस लांबट व उंच अशी एक गाठ (नाभीच्या खाली ) उत्पन्न होते . तिला ‘‘वाताष्ठीला ’’ असे म्हणतात .
ह्या वाताष्ठीलेप्रमाणेच शूल वगैरे पीडा देणारी अधोवायू व मलमूत्र ह्यांचा अवरोध करणारी अशी पोटामध्ये (त्याच भागात ) आडवी गाठ उत्पन्न होते . तिला ‘‘प्रत्यष्ठीला ’’ असे म्हणतात .
( वाताष्ठीलेची गाठ वर उभी असते आणि ही आडवी असते ॥७४ते९१॥
ह्याप्रमाणे सुश्रुतसंहितेच्या निदानस्थानातील ‘‘वातव्याधिनिदान ’’ नावाचा पहिला अध्याय समाप्त .