सुश्रुत संहिता - मुळव्याध

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता मुळव्याधीचे निदान सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

वातजन्य , पित्तजन्य , कफजन्य , रक्तजन्य , त्रिदोषजन्य व सहज (जन्मतःच असणारी ) अशी मुळव्याध सहा प्रकारची आहे .

ज्याला इंद्रिये ताब्यात ठेवता येत नाहीत अशा मनसोक्त वागणार्‍या मनुष्याने , दोषांचा प्रकोप होण्याची जी कर्मे व आहारविहार सांगितले आहेत ते केल्याने , हिताहितीय अध्यायात सांगितल्याप्रमाणे विरूद्ध पदार्थांचे सेवन , अजीर्ण असता त्याजवर जेवण , अति मैथुन , उकिडवे बसणे (पाय उभे धरून , टाचेच्या वरच्या भागाला म्हणजे खोटेला ढुंगण लावून ते खाली न टेकता बसणे ), घोड्यावरून वगैरे फार प्रवास करणे , मलमूत्रांचे वेग आवरून धरणे , इत्यादि गोष्टी नित्य विशेष केल्याने , विशेषकरून ज्याचा जठराग्नि मंद आहे त्याचे , वातादि एक एक , दोन दोन , तिन्हीही अथवा रक्तासह दोष प्रकुपित होऊन ते इकडे तिकडे पसरत मलवाहक धमनीत शिरून त्याला दूषित करून गुदाच्या वळीवर मांसाचे अंकूर (मोड ) उत्पन्न करितात . तसेच गवत , लाकूड , दगड , ढेकूळ व वस्त्र इत्यादिकांच्या घर्षणाने व थंड पाण्याच्या स्पर्शाने ते मोड वाढतात . त्यांना ‘‘अर्श ’’ असे म्हणतात .

मोठ्या आंतड्याच्या (ह्यालाच कट्यंत्र किंवा गुदाच म्हणतात ) खालच्या भागाला गुद हे संलग्न आहे . त्याचे क्षेत्र साडेचार अंगुले आहे , त्या गुदाच्या ठिकाणी दीड अंगुळाच्या अंतराने (शंखातील वलयाप्रमाणे ) एकावर एक अशा तीन वळ्य़ा आहेत . प्रवाहणी , विसर्जिनी व संवरणी ही त्या तीन वळ्य़ांची त्याच्या कार्यानुरूप तीन नावे आहेत . ह्या सर्व चार अंगुळे लांबीच्या असून आडव्या व एक अंगुळ उंचीच्या आहेत . ह्या शंखातील वलयाप्रमाणे एकावर एक अशा स्थित आहेत . ह्याचा वर्ण हत्तीच्या टाळ्य़ाच्या वर्णाप्रमाणे आहे . रोमावलीपासून अर्ध अंगुळ प्रमाणे गुदोष्ठ आहे आणि गुदोष्ठापासून एक अंगुळ अंतरावर पहिली वळी आहे ॥३ -७॥

मुळव्याधीचे मोड उत्पन्न होण्यापूर्वी होणारी लक्षणे . अन्नावर वासना नसणे , खाल्लेले अन्न कष्टाने (पोटात दुखून वगैरे ) पचन होणे , आंबट ढेकर येणे , छातीत वगैरे जळजळणे , वायुचा व मलाचा अवरोध , तहान , कमरेपासून खाली पाय गळल्यासारखे होणे , पोट फुगणे (किंवा पोटात गुडगुड वाजणे ), शरीर कृश होणे , पुष्कळ ढेकर येणे , डोळ्यांना सूज येणे , आतड्यात आवाज होणे , गुदाच्या ठिकाणी कातरल्याप्रमाणे पीडा , पांडुरोग , संग्रहणी किंवा क्षय झाल्याची शंका वाटणे , खोकला , श्वास , अशक्तपणा , घेरी येणे , तद्रा (अर्धवट झोप फार येणे .) आणि इंद्रियांना दुर्बळता ही लक्षणे मुळव्याध होण्यापूर्वी होतात .

आणि मुळव्याधीचे मोड उत्पन्न झाल्यावर हीच लक्षणे अतिशय वाढत्या प्रमाणात होतात ॥८ -९॥

वातजन्य मुळव्याधीचे मोड शुष्क , तांबुस किंवा अनेक वर्णयुक्त , ज्यांचा मध्यभाग विषम म्हणजे उंचसखल आहे असे , कळंबाचे फूल , रान कापशीचे बोंड , (किंवा तोंडले ) नाळ , फुलाची कळी व सुईचे अग्र अशा आकाराचे असतात . ह्या वातजन्य मुळव्याधीने पीडित रोग्याला शौचाचे वेळी पोटात दुखते , मळ फार घट्ट होतो , कंबर , पाठ , कुशी , उपस्थ भाग , गुद व नाभीप्रदेश ह्या ठिकाणी वेदना होतात . गुल्म , अष्ठीला , पांथरी व उदर हे रोग ह्या मुळव्याधीच्या योगाने होतात . त्या रोग्याच्या त्वचेला , नखांना , डोळ्यांना , दातांना , तोंडाला व मलमूत्रांना काळसरपणा येतो .

जित्तजन्य मुळव्याधीचे मोड टोकाला निळ्या रंगाचे , बारीक , पसरणारे , पिवळट रंगाचे , सकृताच्या वर्णाप्रमाणे दिसणारे , पोपटाच्या जिभेच्या आकाराचे मध्यभागी सातुप्रमाणे , काही जळवांच्या तोंडाच्या आकाराचे व ओलसर असतात . ह्या पित्तजन्य मुळव्याधीने पीडित जो मनुष्य त्याला दाहयुक्त व रक्तमिश्र असे पातळ शौचास होते . ज्वर , दाह , तहान व मूर्च्छा हे विकार होतात . आणि त्वचा , नखे , डोळे , दात , तोंड व मलमूत्र ह्यांचा वर्ण पिवळा होतो .

कफजन्य मुळव्याधीचे मोड पांढरे , खोल मुळे असलेले , कठीण , वाटोळे , स्निग्ध , धुरकट रंगाचे , नेपतीची फळे , फणसातील बी किंवा गोस्तनाच्या आकाराचे व न फुटणारे असे असतात . ह्यातून स्त्राव होत नाही व त्यांना कंडू फार असतो . ह्या कफजन्य मुळव्याधीने पिडलेल्या मनुष्याला कफमिश्र (आमयुक्त ), पुष्कळ व मांस धुतलेल्या पाण्याच्या रंगाचे शौचास होते . त्याला सूज , शीतज्वर , अरुचि , अपचन व मस्तकाला जडपणा हे विकार त्यामुळे होतात . त्याची त्वचा , नखे , डोळे , दांत , तोंड व मलमूत्र ह्यांचा वर्ण पांढरा असतो .

रक्तजन्य मुळव्याधीचे मोड वडाच्या पानांचे अंकूर (सुरळ्य़ा ), पोवळे किंवा गुंजाप्रमाणे तांबड्या रंगाचे व पित्तजन्म मुळव्याधीचे लक्षणांनी युक्त असे असतात . ह्या मुळव्याधीच्यामध्ये ज्यावेळी मल अतिशय कठीण होतो त्यावेळी दूषित असे पुष्कळसे रक्त शौचाच्यावेळी पडते . हे रक्त अतिशय पडू लागले असता अंगातून रक्त फार गेल्याने होणारे उपद्रव म्हणजे आक्षेपक वगैरे विकार होतात . त्रिदोषजन्य मुळव्याधीमध्ये सर्व दोषांची मिश्र लक्षणे असतात .

सहजअर्श (जन्मापासून असणारे ) अनुवंशिक म्हणजे आईबापांच्या आर्तव व शुक्रदोषांमुळे होतात . त्यांची चिकित्सा दोषानुरूप करावी . ह्या मुळव्याधीची विशेष लक्षणे म्हणजे हिचे मोड दिसण्याला फार कठीण असतात . ते कठीण पांढुरके , दारुण (आत पीडाकारक ) असून त्यांची तोंडे आत (अंतर्मुख ) असतात . ह्या मुळव्याधीने पिडलेला रोगी कृश , थोडा आहार करणारा , सर्व अंग शिरांनी व्याप्त असा (अंगावर शिरा दिसतात असे ) असतो . ह्याला संतति फार होत नाही , शुक्रधातू फार क्षीण असतो . आवाज दुर्बळ असतो . तो रोगट असतो . त्याचा जठराग्नि मंद असतो व शरीरसामर्थ्यही कमी असते .

त्याचप्रमाणे तो नाक , मस्तक , डोळे व कान ह्यांच्या रोगांनी युक्त असतो . आणि नेहमी आतड्यात आवाज होणे , पोट फुगणे , छातीत लेपटल्यासारखे वाटणे व अरुचि इत्यादि रोगांनी पीडित असतो .

ह्या सर्व जातीच्या मुळव्याधीच्या चिकित्सेबद्दल असे म्हटले आहे की , बाहेरच्या व मधल्या वळीच्या ठिकाणी असणारे जे मोड त्यांजवर योग्य ते उपचार करून ते बरे करावे . पण आतल्या वळीवर असलेले मोड असाध्य समजून त्याजवर उपचार करावे .

शिस्नाच्या ठिकाणी दोष प्रकुपित होऊन त्या ठिकाणच्या मांसाला व रक्ताला दूषित करून शिस्नाच्या ठिकाणी कडू उत्पन्न करतात . त्यामुळे त्या ठिकाणी अतिशय खाजविल्याने व्रण उत्पन्न होतो . नंतर त्या व्रणामध्ये दूषित मासापासून मोड उत्पन्न होतात . त्या मोडातून बुळबुळित असे रक्त वाहते . हे मोड लांबट व सूक्ष्म टोकाचे असे असून ते आतील बाजूस म्हणजे मण्यावर व त्याच्या कंगोर्‍याच्या मागील भागात असतात . किंवा वरील भागावर म्हणजे बाहेरील त्वचेवरही असतात . हे लिंगाचा व पुरुषत्वाचाही नाश करितात .

त्याचप्रमाणे ते कुपित झालेले दोष योनीच्या ठिकाणी संचित झाले असता तेथील रक्त व मांस दूषित करून नाजुक (कोमल ) व दुर्गंधीयुक्त मोड उत्पन्न करतात . त्यातूनही बुळबुळित असा रक्तस्राव होतो . ह्यांचा आकार छत्रीप्रमाणे असतो . ते योनीचा व आर्तवाचा नाश करतात .

हे दोष नाभीच्या ठिकाणी संचित झाले असता ते कोमल , दुर्गंधीयुक्त बुळबुळित व दानव्याच्या तोंडाच्या आकाराचे मोड उत्पन्न करितात . त्याचप्रमाणे ते प्रकुपित झालेले दोष ऊर्ध्वगामी वर गेले असता कान , डोळे , नाक व तोंड ह्या ठिकाणी देखील हे मोड उत्पन्न करितात . त्यापैकी कानातील मोडामुळे ऐकू न येणे , कानात ठणका व कानात दुर्गंधी येणे हे विकार उत्पन्न करतात . डोळ्यात झाले असता पापण्या ताठणे , वेदना , डोळ्यातून पाणी वाहणे व दिसणे बंद होणे हे विकार होतात . नाकात झाले असता पडसे , शिंका फार येणे , श्वासोच्छवासास अडथळा येणे , नाकात घाण येणे , नाकातून बोलणे , मस्तक दुखणे हे विकार उत्पन्न होतात . तोंडात हे घसा , ओठ व टाळा ह्या ठिकाणी होतात . त्यामुळे अडखळत बोलणे , जिभेला रुचि न समजणे व इतर मुखसंबंधी रोग हे विकार उत्पन्न होतात .

व्यानवायु प्रकुपित झाला असता तो कफाशी युक्त होऊन शरीराच्या बाहेरील त्वचेवर (कोठेही ) कठीण व खिळ्याप्रमाणे मोड उत्पन्न करितो . त्यांना ‘‘चर्मकीलक अर्श ’’ (चामकीळ ) असे म्हणतात ॥१० -१८॥

ह्या चामकीळामध्ये वाताने टोचल्यासारखी पीडा होते . कफदोषाने त्वचेप्रमाणेच वर्ण असलेले व ग्रंथीयुक्त असे असतात . पित्तजन्य व रक्तजन्य चामकीळ रूक्ष , काळसर , पांढर्‍या रंगाचे असतात . हे चामकीळ फार कठीण असतात . हे चामकीळाचे लक्षण सांगितले ॥१९ -२०॥

मुळव्याधीचे सामान्य लक्षण व दोषादि मेदाने सविस्तर लक्षण ह्या अध्यायात जे सांगितले आहे ते सर्व प्रथमतः अवलोकन करून नंतर त्याजवर वैद्याने उपचार करावे .

मुळव्याधीमध्ये ज्यावेळी दोन दोषांची मिश्र लक्षणे आढळून येतील त्यावेळी तो संसर्ग (दोन दोषांचा संयोग ) आहे असे समजावे . ह्या संसर्गाचे (द्विदोषजन्य मुळव्याधीचे ) ही सहा प्रकार आहेत .

त्रिदोषजन्य मुळव्याध जर थोड्याच लक्षणांची असेल तर ती याप्य (औषधोपचाराने बेतावर असणारी ) समजावी .

द्विदोषजन्य मूळव्याधीचे मोड जर दुसर्‍या वळीवर असेल तर ते फार प्रयासाने बरे होतात . तसे एक वर्ष होऊन गेलेली मुळव्याधही कष्टसाध्य असते . आणि त्रिदोषजन्य मुळव्याध व सहज (जन्मापासून असलेली , मूळ व्याध ) ह्या दोनही मुळव्याधी असाध्य म्हणून सोडून द्याव्या . ज्या रोगाच्या तीनही वळ्यावर मुळव्याधीचे मोड झाल्याने तो पीडित असतो , त्याच्या त्या मोडानी कोंडून धरलेला अपानवायु वर परत जातो आणि व्यानवयुसहवर्तमान त्या मनुष्याचा जठराग्नि मंद करितो . हा प्रकार बहुधा सहज अर्शामध्ये होतो ॥२१ -२६॥

ह्याप्रमाणे अर्शेनिदान नावाचा दुसरा अध्याय समाप्त

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP