सुश्रुत संहिता - क्षुद्ररोगनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘क्षुद्ररोगनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

६ ) संक्षेपतः चव्वेचाळीस क्षुद्ररोग आहेत . ते असे -१ अजगल्लिका , २ यवप्रख्या , ३ अंधालजी , ४ विवृता , ५ कच्छपिका . ६ वल्मीक , ७ इंद्रवृद्धा , ८ पनसिका , ९ पाषाणगर्दभ , १० जालगर्दभ , ११ कक्षा , १२ विस्कोटक , १३ अग्निरोहिणी १४ , चिप्य , १५ कुनख , १६ अनुशयी , १७ विदारिका , १८ शर्करार्बुद , १९ पामा , २० विचर्चिका , २१ रकसा , २२ पाददारिका , २३ कदर , २४ अलस , २५ इंद्रलुप्त , २६ दारूणक , २७ अरुपिका , २८ पलित , २९ मसूरिका , ३० यौवनपिडका , ३१ पद्मिनीकंटक , ३२ जतुमणि , ३३ , मशक , ३४ चर्मकील , ३५ तिलकालक , ३६ न्यच्छ , ३७ व्यंग , ३८ परिवर्तिका , ३९ अबपाटिका , ४० निरुद्धप्रकश . ४१ संन्निरुद्धगुद , ४२ अहिपूतन . ४३ वृषणकच्छू , आणि ४४ गुदभ्रंश ह्याप्रमाणे चव्वेचाळीस क्षुद्ररोग आहेत .

स्निग्ध , त्वचेच्या वर्णाच्या , कठीण , फारशा न दुखणार्‍या अशा गाठी कफवातापासून बहुधा लहान मुलांना होतात . त्यांना ‘‘अजगल्लिका ’’ असे म्हणतात . (लोकात ह्यांना ‘‘मेढक्या ’’ म्हणतात .)

सातूच्या दाण्यासारखी , अतिशय कठीण गाठी सारखी , मांसाच्या आश्रयाने होणारी अशी एक पुळी कफवातदोषाने होते तिला ‘‘यवप्रख्या ’’ असे म्हणतात .

कठीण , तोंड नसलेली , उंच , वाटोळी , व किंचित पू असलेली अशी एक पुळी कफवातापासून होते तिला ‘‘अंधालजी ’’ म्हणतात . जिचे तोंड पसरल्यासारखे असून जी पुळी अत्यंत दाहयुक्त व पिकलेल्या उंबराप्रमाणे लाल असते तिला विवृता म्हणतात . ती पित्तजन्य असून वाटोळी असते .

कफवातापासून कासवाच्या पाठीप्रमाणे उंच व मोठ्या अशा पाच सहा गाठी एके ठिकाणी होतात त्यांना ‘‘कच्छपिका ’’ म्हणतात .

हात , पाय , सांधे , मान व मानेच्या वरचा भाग ह्या ठिकाणी हळूहळू वारूळासारखी एक गाठ उत्पन्न होते . तिजमध्ये टोचणी दाह व कडू ही लक्षणे असून तिजवर पुष्कळ बारीकभोके (व्रण ) असतात व त्यातून स्राव होतो , ह्या कफवातपित्तापासून होणार्‍या व्याधीला ‘‘वाल्मीक ’’ वारुळ असे म्हणतात .

कमळातील केसराप्रमाणे मध्यभागी बारीक पुळ्यांनी युक्त अशी वात्तपित्तापासून एक पुळी होते तिला इंद्रवृद्धा म्हणतात ॥४ -१०॥

कानाच्या कानात किंवा कानातील आसमंतभागी किंवा कानाच्या पाठीमागे उग्र वेदनायुक्त अशी जायफळा एवढी गाठ होते ह्या कफवात जन्य गाठीला ‘‘पनसिका ’’ म्हणतात .

हनुवटीच्या सांध्याजवळ किंचित वेदनायुक्त व कठीण अशी सूज येते ती वातकफात्मक असते . तिला ‘‘पाषाणगर्दभ ’’ असे म्हणतात . विसर्पाप्रमाणे दाह व ज्वरयुक्त अशी न पिकणारी सूज अंगावर पसरते तिला ‘‘जालगर्दभ ’’ असे म्हणतात .

मस्तकावर अतिशय वेदनायुक्त व ज्वरयुक्त अशी पुळी त्रिदोषांपासून सर्व लक्षणयुक्त अशी उत्पन्न होते . तिला ‘‘इरिवेल्लिका ’’ असे म्हणतात .

दंडाच्या बाजूस , खांद्याच्या ठिकाणी किंवा काखेमध्ये काळ्या फोडांनी युक्त व वेदनायुक्त अशी गाठ पित्तप्रकोपाने उत्पन्न होते , तिला ‘‘कक्षा ’’ असे म्हणतात . ह्यासारखी एकच गाठ फोडाप्रमाणे त्वचेच्या ठिकाणी पित्त प्रकोपाने होते तिला ‘‘गंधनामा ’’ असे म्हणतात .

रक्तपित्तापासून अग्नीने भाजलयाप्रमाणे ज्वरयुक्त असे अंगावर कुठे कुठे अगर सर्वांगावर फोड होतात त्यांना ‘‘विस्फोटक ’’ असे म्हणतात .

काखेच्या भागांत मांसविदारक असे जे फोड येतात ते अंतदहि व ज्वर ह्यांनी युक्त असून पेटलेल्या विस्तवाप्रमाणे धगधगीत असतात . ते सात , दहा अगर पंधरा दिवसांत मनुष्याला मारतात . ह्या सन्निपातापासून होणार्‍या पुळीला ‘‘अग्निरोहिणी ’’ असे म्हणतात . ही असाध्य आहे ॥११ -२०॥

नखाच्या मांसाच्या ठिकाणी पित्त व वात संचित होऊन वातवेदना उत्पन्न करतो व पित्त , दाह व पाक (पिकणे ) ह्या क्रिया करिते . ह्या विकाराला ‘‘चिप्य ’’ (नखुरडे ) असे म्हणतात . ‘‘क्षतरोग ’’ अथवा ‘‘उपनख ’’ असेही म्हणतात .

नखावर अभिघात झाल्याने ते नख दूषित होऊन रूक्ष , काळसर व खरखरीत होते ‘‘त्याला कुनख किंवा कुलीन ’’ असे म्हणतात .

मस्तकावर जिचे मूळ खोल आहे अशी (गंभीर ) थोडी सूजयुक्त , त्वचेच्या वर्णाची , आतल्या आत पिकणारी अशी पुळी (गाठ ) कफदोषाने होते तिला ‘‘अनुशयी ’’ असे म्हणतात .

त्रिदोषापासून काख किंवा वंक्षणसंधी ह्या ठिकाणी भुईकोहळ्याच्या गड्ड्य़ाच्या आकाराची रक्तवर्ण अशी गाठ होते . तिजमध्ये त्रिदोषाची सर्व लक्षणे असतात . तिला ‘‘विदारिका ’’ असे म्हणतात .

कफ , मेद वायु हे मांस , शिरा व स्नायु ह्यांचा आश्रय करून एक गाठ उत्पन्न करितात . ती फुटली म्हणजे तिजमधून मध , तूप व वसा ह्यासारखा पुष्कळ स्राव होतो . गाठीमध्ये वाताचा प्रकोप झाला असता त्या ठिकाणी मांस दूषित करून त्या ठिकाणी बारीक गाठी पुनः उत्पन्न करितो . त्यांना शर्करा म्हणतात . त्या गाठीतील शिरातून दुर्गंधी , बुळबुळित , अनेक रंगाचे असे रक्त वरचेवर वाहते त्याला ‘‘शर्करार्बुद ’’ असे म्हणतात .

पामा (खरूज ) विचर्चिका व रकसा ह्यांची लक्षणे मागे कुष्ठनिदानात सांगितली आहेत .

अतिशय चालणार्‍या मनुष्याचे पाय रूक्ष होऊन त्याठिकाणी वात वाढतो व तो तळपायाला भेगा पाडतो त्याला ‘‘पाददारी ’’ म्हणतात .

बारीक खडा अथवा काटा पायात रुतून राहिला असता त्या ठिकाणी मेद व रक्त ह्यासह वातादी दोष कीलयुक्त (काट्यासह ) कठीण , मध्य खोल अथवा उंच अशी बोराएवढी दुखणारी व स्रवणारी गाठ उत्पन्न करितात तिला ‘‘कदर ’’ असे म्हणतात .

घाणेरड्य़ा चिखलातून चालल्याने पायाच्या बोटांच्या मध्यंतरी (त्या ठिकाणी कातडे दूषित होऊन ) बुळबुळितपणा , ठणका , कडु व दाह ही लक्षणे होतात . त्याला ‘‘अलस ’’ असे म्हणतात . (लोकांत ह्यांना ‘‘चिखल्या ’’ म्हणतात .)

रोमकूपाच्या ठिकाणी असणारे पित्त वायूसह वर्तमान प्रकुपित होऊन त्या त्या ठिकाणचे केस नाहीसे करते . (केस गळतात .) नंतर त्यास्थानी प्रकुपित झालेला

कफरक्तासह त्या रोमकूपांची तोंड बंद करितो . त्यामुळे त्या ठिकाणी दुसरे केस येत नाहीत . ह्या विकाराला ‘‘इंद्रलुप्त , खाल्प्ति किंवा रुज्या ’’ असे म्हणतात . (लोकांत ‘‘चाई किंवा चांदी ’’ म्हणतात .)

कफवाताच्या योगाने मस्तकावरील केसाची जागा कठीण , कंडुयुक्त व रूक्ष होऊन भेगलते (चिरा पडतात ) ह्या रोगाला ‘‘दारुणक ’’ (दारणा ) असे म्हणतात .

कफ , रक्त व कृमी ह्यांच्या प्रकोपाने ज्यांना बारीक पुष्कळ छिद्रे आहेत असे व्रण होतात . त्यातून लस वाहते . ह्या विकाराला ‘‘अरुंषिका ’’ (खवंड )असे म्हणतात .

क्रोध , शोक व श्रम ह्यांच्या अतियोगाने शरीरातील उष्मा व पित्त मस्तकाकडे जाऊन केस पिकवितात त्याला ‘‘पलित ’’ असे म्हणतात .

दाह , ज्वर व ठणका ह्यांनी युक्त तांबूसपिवळे फोड अंगावर व तोंडाच्या आत देखील उत्पन्न होतात . त्यांना ‘‘मसूरिका ’’ म्हणतात (ह्यांना ‘‘कांजण्या ’’ म्हणतात .

शीतलिका ‘‘देवी ’’) हा त्यातील एक प्रकार आहे ॥२१ -३८॥

तरुण मनुष्याला शेवरीच्या काट्य़ासारखा कफ , रक्त व वात ह्यांच्या प्रकोपाने तोंडावर पुटकुळ्य़ा उठतात त्यांना ‘‘मुखदूषिका ’’ (तारुण्यपिडका ) असे म्हणतात .

कफवातापासून वाटोळे कंडयुक्त व पांढरे असे मंडळ उत्पन्न होते . ते काट्यासारख्या पुटकुळ्यांनी व्याप्त असते त्याला ‘‘पद्मिनीकंटक ’’ असे म्हणतात .

वेदनारहित सूक्ष्म (किंचित ) उचललेले , असे एक मंडळ कफरक्तदोषाने जन्मापासूनच अंगावर असते . ते किंचित् लाल व गुळगुळित असते . त्याला ‘‘जतुमणि ’’ असे म्हणतात .

वेदनारहित , कठीण , उडदाप्रमाणे काळे व किंचित् उंच असे मंडळ वातापासून होते त्याला ‘‘मशक ’’ असे म्हणतात .

वात , पित्त व कफ ह्यांनी रक्ताचे शोषण केल्यामुळे काळे , तिळाएवढे सूक्ष्म , वेदनारहित असे ठिपके उठतात त्यांना तिलकालक (तीळ ) असे म्हणतात .

मोठे किंवा लहान , काळे अथवा पांढुरके वेदनारहित असे मंडळ जन्मापासूनच अंगावर असते त्याला ‘‘न्यच्छ ’’ असे म्हणतात .

संप्रप्ति व निदान ह्यावरून चर्मकाल जाणावा . (कारण ह्याचा अशा रोगात अंतर्भाव आहे ).

क्रोध व आयास ह्यांच्या योगाने प्रकुपित झालेला वायु पित्तासह एकदम तोंडावर येऊन वेदनारहित , पातळ काळसर असे मंडळ उत्पन्न करितो त्याला ‘‘व्यंग (वांग )’’ असे म्हणतात॥३९ -४६॥

शिस्न अतिशय चोळवटल्याने , दाबल्याने तसेच त्यावर अभिघात झाल्याने , त्याच्या त्वचेतील व्यानवायु प्रकुपित होऊन त्या चर्मात संचार करितो . त्यामुळे ती त्वचा मण्यावरून दुमडून मागे सरते आणि मण्याच्या खाली ते कातडे गाठीच्या रूपाने लोंबू लागते . त्यामुळे यात वेदना व दाह ही लक्षणे होतात . क्वचित् ती गाठ पिकतेही . ह्या अगंतुक वातजन्यग्रंथीला ‘‘परिवर्तिका ’’ असे म्हणतात . हीच कफदोषामुळे झाली असता तिजमध्ये कठीणपणा व कंडु हे विकार असतात .

एकादा पुरुष कामातुर होऊन अल्पवयी व आकुंचित योनी अशा स्त्रीशी रममाण होतो . त्यामुळे किंवा हाताच्या ताडणाने किंवा शिस्नावरील चामड बळेच मागे सारल्याने , तसेच शुक्राचा वेग अनावर झाल्यामुळे शिस्नाचे मर्दन व पीडन केल्याने त्याजवरील चामडे फाटते . त्याला ‘‘अवपाटिका ’’ असे म्हणतात .

अशाच वरील प्रकारच्या कारणांनी प्रकुपित झालेल्या वायूने चामडे मण्यावर चढते व मण्यास दाबते , त्यामुळे त्या चामड्याने बद्ध झालेला मणी मूत्रमार्ग संकुचित करितो त्यामुळे वेदनारहित व सूक्ष्म धारेने लघवी होते . मण्याचे विदारण होत नाही . ह्याला ‘निरुद्ध प्रकाश ’ म्हणतात . कित्येक ह्याला ‘दुरढा अवपाटिका ’ म्हणतात .

शौचाचा वेग आवरून धरल्याने विगुण झालेला वायु गुदाचा आश्रय करून मोठ्या स्रोतोमार्गाचा रोध करितो . त्यामुळे शौचाचे द्वार अकुं चित होते . त्यामुळे त्या मनुष्याला फार कष्टाने शौचास होते . ह्या दुस्तर व्याधीला ‘संनिरुद्धगुद ’ असे म्हणतात .

लहान मुलाला मलमूत्र झाल्यावर त्याचे मलद्वार न धुतल्याने व गुदाचे स्वेदन केल्यावर त्याजवर पाणी न घालण्याने रक्त व कफ त्या ठिकाणी प्रकुपित होऊन कंडू उत्पन्न करितात . त्यामुळे तेथे खाजविल्याने तात्काळ फोड व त्यातून स्राव ही लक्षणे होतात . मग ते फोड चिघळून एकत्र होऊन त्याचा भयंकर व्रण होतो . त्याला ‘अहिपूतन ’ म्हणतात .

स्नान व उद्वर्तन (ऊठी ) ही कधीही न करणार्‍या मनुष्याच्या वृषणावर साठलेला मळ घामाने ओला झाला असता कंडु उत्पन्न करितो . त्यामुळे तेथे खाजविल्याने त्वरित पुटकुळ्या उठून त्या स्रवतात . ह्या कफरक्ताच्या प्रकोपाने होणार्‍या व्याधीला ‘वृषणकुच्छ ’ म्हणतात .

ज्याचे शरीर अशक्त व कोठा रुक्ष आहे अशा मनुष्याला अतिसार व प्रवाहण (मुर्डा ) ह्यांच्या योगाने गुद (अंग ) बाहेर पडते त्याला ‘‘गुदभ्रंश ’’ असे म्हणतात ॥४७ -६१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP