सुश्रुत संहिता - विद्रधिनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘विद्रधिनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे ॥१ -२॥

सर्व देवांचे गुरू श्रीमान् धन्वंतरी हे काहीतरी निमित्ताने पृथ्वीवरील लोकांना औषधरूपी अमृत द्यावे ह्या हेतूने ह्या भूतलावर राजाच्या रूपाने अवतार घेते झाले आणि आपला शिष्य जो सुश्रुत त्याला पुढे सांगितल्याप्रमाणे विद्रघीचे निदान सांगते झाले .

अस्थीच्या आश्रयाने असलेले वातादिदोष अतिशय वाढल्यामुळे त्वचा , रक्त , मांस व मेद ह्यांना दूषित करून हळु हळु भयंकर अशी सूज उत्पन्न करितात . तिचे मूळ फार मोठे असते . तिला ठणका असतो व ती वाटोळी किंवा पसरट अशी असते . त्या सुजेला विद्वान वैद्य विद्रधि (करट ) असे म्हणतात . ह्या विद्रधीचे सहा प्रकार आहेत . वातादि पृथक् दोषांनी तीन , त्रिदोषापासून एक , व्रणामुळे होणारा एक रक्तजन्य एक , असे ह्या विद्रधीचे (करटाचे ) सहा प्रकार आहेत व्रणामुळे होणारा एक व रक्तजन्य एक आहेत . त्या सहांचीही लक्षणे आता सांगतो .

वाताविधिलक्षण —— ह्या करटाची सूज काळसर किंवा तांबूस असते . तिला खरखरीतपणा असतो , वेदना फार असतात . तिचा आकार अनेक प्रकारचा असतो व ती चमत्कारिक रीतीने पिकते . ह्या लक्षणांनी युक्त विद्रधीला वातविद्रधि असे म्हणतात .

हा विद्रधि पिकलेल्या उंबराप्रमाणे लाल असतो किंवा शामवर्ण असून ज्वर व दाह ह्यांनी युक्त असतो . हा लवकर उत्पन्न होतो व पिकतोही लवकर , त्याला पित्तविद्रहि म्हणतात .

जो विद्रधि परळाच्या आकाराचा (म्हणजे मोठा ) पांढरा , थंड लागणारा ; कठीण किंचित् वेदना व कंडुयुक्त असून त्याला उत्पन्न होण्याला व पिकण्याला , उशीर लागतो व त्याला कफविद्रधि म्हणतात .

वातविद्रधि फुटला असता त्यातून पातळ पू जातो . पित्तविद्रधीतून पिवळा पू जातो आणि कफविद्रधीतून पांढरा पू जातो . असे त्यांचे क्रमाने स्राव होतात .

ज्या विद्रधीत अनेक प्रकारच्या वेदना असतात व स्राव अनेक रंगाचा असतो , तसेच तीवरील बाजूस मोठा , विषम आकाराचा , मोठा व एकसारखा न पिकणारा असतो त्याला सन्निपातिविद्रधि म्हणतात .

लाकू ड , धोंड इत्यादिकांचा प्रहार होऊन त्यामुळे किंवा एखादी जखम झाली असता अपथ्य केल्यामुळे त्या ठिकाणची उष्णता रक्तासह पित्ताला दूषित करते , त्यामुळे ज्वर , तहान , दाह हे विकार होतात . ह्याला आगंतुकविद्रधि (क्षतविद्रधि ) म्हणतात . ह्याची लक्षणे पित्तविद्रधीप्रमाणे असतात .

जो विद्रधि बारीक अशा काळ्या पुटकुळ्यांनी युक्त असून काळसर व अत्यंत वेदनायुक्त असतो आणि ज्यात पित्तविद्रधीची लक्षणे असतात त्याला रक्तविद्रधि म्हणतात . हे जे सहा विद्रधि सांगितले त्यापैकी

त्रिदोषजन्यविद्रधि असाध्य आहे ॥३ -१४॥

अंतरविद्रधिलक्षण -आता ह्यापुढे अंतरगत विद्रधीची लक्षणे सांगतो .

जड , असात्म्य (न मानवणारे ) व विरुद्ध असे अन्न खाणे , तसेच शुष्क व पथ्यापथ्ययुक्त अन्न खाणे , मैथुन , व्यायाम , मलमूत्रादिकांचे वेग धारण करणे , विदाही पदार्थ खाणे यामुळे वातादिदोष पृथक् किंवा एकत्र कुपित होऊन गुल्मासारखा वा वारुळाप्रमाणे उंच वाढणारा असा आतील बाजूस विद्रधि उत्पन्न करितात . गुद , बस्तीचे तोंड , नाभी , कुशी , वक्षण संधी , दोन्ही वृक्क (डाव्या व उजव्या कुशीतील मांसपिंड ) यकृत , पांथरी , हृदय किंवा क्लोम ह्या ठिकाणी तो अंतरविद्रधि होतो . त्याची लक्षणेही बाह्यविद्रधिप्रमाणेच असतात ‘‘आमपक्वैषणीय अध्यायांत सांगितल्याप्रमाणे त्याचे पक्व किंवा अपक्व लक्षण जाणावे .’’

आता त्याच्या स्थानावरून त्याची विशेष लक्षणे सांगतो . ऐक —— गुदाच्या ठिकाणच्या विद्रधीने वायूचा अवरोध होतो . बस्तिमधील विद्रधीने कष्टाने थोडी थोडी लघवी होते . नाभीच्या ठिकाणच्या विद्रधीने उचकी व पोटात आवाज होतो . कुशीतील विद्रधीने वायूचा क्षोभ होतो . वंक्षणसंधीतील विद्रधीने कंबर व पाठ अतिशय ताठते . वृक्कांतील विद्रधीने श्वासोच्छ्वासाचा अवरोध होतो , हृदयातील विद्रधीने सर्व अंग अतिशय जखडते व छातीत वेदना होते , तहान फार असते आणि क्लोमामधील विद्रधीने तहान फार लागते ॥१५ -२२॥

विद्रधि आम (अपक्व ) असो किंवा पक्व असो , तसाच मोठा असो अगर लहान असो , तो जर मर्मस्थानी झाला असेल तर तो कष्टसाध्य असतो .

नाभीच्या वरच्या भागात होणारे अंतरविद्रधि पिकले म्हणजे त्यांचा स्राव तोंडावाटे बाहेर पडतो आणि नाभीच्या खालील अंतरविद्रधीचा स्राव खालून गुदावाटे होतो . हा अंतरविद्रधीचा स्राव खालील मार्गाने झाला असता तो रोगी जगतो आणि ऊर्ध्वमार्गाने झाला असता तो जगत नाही .

हृदय , नाभी व बस्ति ह्याठिकाणचे अंतर विद्रधि सोडून बाकीच्या ठिकाणचे म्हणजे वृक्क , यकृत व पांथरी इत्यादी ठिकाणचे विद्रधि जर बाहेरच्या भागी फुटले तर तो मनुष्य कदाचित जगतो . पण ह्याखेरीज इतर ठिकाणचे विद्रधि बाहेर फुटले तर तो जगत नाही ॥२३ -२५॥

ज्यांचा गर्भपात झाला आहे किंवा ज्या प्रसूत झाल्या आहेत अशा स्त्रियांनी अपथ्यकारक अन्न खाल्ले असता त्यांना दाह व ज्वर ह्यांनी युक्त असा भयंकर रक्तविद्रधि उत्पन्न होतो .

जरी योग्य रीतीने स्त्री प्रसूत झाली तरी तिच्या शरीरातून खाली सरलेले रक्त कुशीमध्ये मक्कल्ल संज्ञक रक्तजन्यविद्रधि उत्पन्न करिते . तो जर सात दिवसात बरा झाला नाही तर तो पक्व होतो ॥२६ -२७॥

गुल्म व विद्रधि ह्याजमधील विशेष भेद आता स्पष्ट सांगतो . गुल्म व विद्राधि ह्याजमधील विशेष भेद आता स्पष्ट सांगतो . गुल्म व विद्राधि ह्यांचे दोष व स्थान समान आहेत . असे असून विद्रधि पिकतो मग गुल्म का पिकत नाही ? तर ह्याचे कारण असे आहे की गुल्माला मूळ नाही आणि विद्रधि हा मूळयुक्त आहे . तसेच दोष हे स्वतःचे गुल्मरूप होतात आणि विद्रधि हा मांस व रक्त ह्या योगाने गुल्मरूप (ग्रंथिरूप ) होतो . ज्याप्रमाणे पाण्यावरील बुडबुडा जसा पाण्यावर संचार करितो त्याप्रमाणे कोष्ठगत गुल्म कोठ्यात इकडे तिकडे संचार करितो .

असा गुल्माचा प्रकार आहे . म्हणून गुल्म पिकत नाही . आणि विद्रधीमध्ये मांस व रक्त ह्यांचा संचय असल्यामुळे तो पिकतो आणि गुल्म हा मांस व रक्तविरहित असल्याने पिकत नाही . शिवाय गुल्म हा स्वतःच्या दोषांनीच युक्त असतो . आणि विद्रधि हा मांस व रक्तयुक्त असतो . अशा भेदामुळे गुल्म पिकत नाही . आणि विद्रधि पिकतो . हृदय , नाभी व बस्ति ह्या ठिकाणचा गुल्म त्रिदोषजन्य असून जर पिकला तर तो असाध्य समजून सोडावा .

अस्थिमध्ये विद्रधि असता त्याचा मज्जेसह भयंकर पाक होतो . त्याला हाडे व मांस ह्यांच्या विरोधामुळे जर बाहेर येण्यास मार्ग मिळाला नाही तर त्या योगाने अग्नीप्रमाणे दाह करितो . आणि त्या अस्थि व मज्जेच्या कोंडलेल्या उष्णतेने अत्यंत दाह होऊन तो नाश पावतो . ह्या शल्याप्रमाणे पीडा करणारा व्याधि रोग्याला पुष्कळ दिवस क्लेश देतो . ह्या व्याधीवर शस्त्रकर्म करून त्याला मार्ग मिळाला असता हाड फुटल्यामुळे त्यातून मेदासारखा स्निग्ध , पांढरा , थंड व जड असा पू निघतो . ह्या विद्रधीला ज्ञातवैद्य सर्व दोषांच्या लक्षणांनी युक्त असा ‘‘अस्थिगतविद्रधि ’’ म्हणतात ॥२८ -३८॥


References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP