सुश्रुत संहिता - कुष्ठनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


मनास वाटेल तसा आहारविहार करणारा , विशेषतः जड पदार्थ , विरुदान्न , असात्म्य जेवण , नेहमी अजीर्ण होईल असे खाणे , किंवा स्नेहपान करून अगर वमनप्रयोग करून अपथ्य करणे , ग्राम्य , अनुप किंवा जलसंचारी प्राण्याचे मांस नेहमी दुधाशी खाऊन अतिश्रम , व मैथुन करणारा किंवा उन्हातून तापून येऊन थंड पाण्यात बुड्या मारणारा किंवा ओकारीचा वेग आवरून धरणारा अशा मनुष्याचे प्रकुपित झालेले पित्त व कफ ह्या दोषांना बरोबर घेऊन प्रकुपित झालेला वायु आडव्या गतीने शिरांमध्ये शिरून दोषांचा बाहेर पडण्याचा त्वचेतील मार्ग बंद करितो व त्या दोषांना आसमंतात फेकतो . त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी दोष फेकला जातो त्या त्या ठिकाणी मंडळ उत्पन्न होतात . ह्याप्रमाणे त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न झालेला दोष त्या त्या ठिकाणी वाढतो . आणि त्याजवर उपचार केले नाहीत तर तो दोष आत शिरून धातूंना दूषित करितो .

त्याचे पूर्वरूप त्वचा खरखरीत किंवा कठीण होणे , अकस्मात रोमांच उभे राहणे , कडू , त्या ठिकाणी घाम फार येणे , किंवा मुळीच न येणे , त्या त्या भागाच्या त्वचेला स्पर्श कळेनासा होणे , त्या ठिकाणी झालेला व्रण चरत जाऊन त्याची वाढ होणे , आणि रक्ताला काळेपणा येणे ही लक्षणे कुष्ठाच्या पूर्व रूपात होतात .

ह्या कुष्ठाचे सात महाकुष्ठे व अकरा क्षुद्रकुष्ठे असे अठरा प्रकार आहेत . त्यापैकी महाकुष्ठे -अरुण (रुक्तकुष्ठ ), औदुंबर , ऋृष्यजिव्ह , कपाल , काकणक , पुंडरीक व दद्रुमंडल अशी सात आहेत . क्षुद्रकुष्ठे , स्थूलारुष्क , महाकुष्ठ , एककुष्ठ , चर्मदल , विसर्प , परिसर्प , सिध्म , विचर्चिका , किटिभ , पामा , (खरूज ) व रकसा अशी अकरा आहेत . ही सर्व कुष्ठे वातपित्त व कफयुक्त असून सव्र जंतुयुक्त आहेत . परंतु त्यात जो दोष अधिक असेल त्या दोषाने उत्पन्न झालेले असे म्हणण्याचे कारण बाकीच्या दोषांचा उपचाराशी संबंध येऊ नये म्हणून .

त्यापैकी वातदोषाने रक्तकुष्ठ , पित्तान औदुंबर , ऋष्य , जिव्ह , कपाल व काकण ही कुष्ठे ; व कफाने पुंडरीक व दद्रुमंडलकुष्ठ ही उत्तरोत्तर महत्वाची असून ह्यांजवर उपचार करणेही फार प्रयासाचे आहे . आणि ही धातुंच्या आश्रयाने होत असल्यास ती असाध्यही आहेत ॥३ -६॥

७ ) महाकुष्ठांची लक्षणे -वातदोषापासून होणारी कुष्ठे तांबूस रंगाची , पातळ किंवा विरळ असणारी , पसरत जाणारी आणि टाचणी , फोडल्याप्रमाणे पीडा व त्वचेला स्पर्श न कळणे ह्या लक्षणांनी युक्त असतात . त्यांना अरुणकुष्ठे म्हणतात . पित्तदोषाने होणारी कुष्ठे पिकलेल्या उंबराच्या फळाच्या आकारासारखी व रंगानेही त्यासारखीच असतात . त्यांना उदुंबार कुष्ठे म्हणतात . जी कुष्ठे अस्वलाच्या जिभेप्रमाणे रंग वगैरे असणारी व खरखरीत असतात , त्यांना ऋृष्यजिव्ह असे म्हणतात . जी कुष्ठे काळ्या खापरखुंटीच्या रंगाची व आकाराची असतात . त्यांना कपालकुष्ठे म्हणतात . जी कुष्ठे (त्याची मंडले ) गुंजेच्या फळाप्रमाणे (गुंजेप्रमाणे ) आरक्तवर्ण असून मध्यभागी कृष्णवर्ण असतात त्यांना काकणकुष्ठे म्हणतात . ही औदुंबरादि चार कुष्ठे पित्तदाषप्रधान असतात . त्यामुळे त्यांच्या ठिकाणी विस्तवाने भाजल्याप्रमाणी पीडा , ओढल्याप्रमाणे पीडा , परिदाह (दाह होणे ) व त्यातून धूर निघाल्यासारखे वाटणे ही लक्षणे होतात . ही लवकर उत्पन्न होतात . त्वरित पिकतात व लवकर फुटतात . आणि त्यात कृमीही लवकरच उत्पन्न होतात . ही त्यांची सामान्य लक्षणे आहेत . कफदोषामुळे होणारी पुंडरीककुष्ठे पांढर्‍या कमळाच्या पाकळीच्या रंगाची असतात . त्याचप्रमाणे कफदोषापासूनच होणारी द्रदुकुष्ठे ही जवसाच्या फुलाप्रमाणे काळसर रंगाची किंवा तांबड्या रंगाची , पसरणारी अशी असून त्यांची मंडले बारीक पुटकुळ्य़ांनी व्याप्त असतात . ह्या काळ्या व तांबड्या अशा दोन्हीही रंगाच्या दद्रुकुष्ठामध्ये मंडळे उचललेली असणे , मंडळे कडायुक्त असणे , कडू सावकाश उत्पन्न होणे ही लक्षणे असतात , ही त्याची सामान्य लक्षणे आहेत .

आता क्षुद्रकुष्ठे सांगतो . ज्याच्या सांघ्याच्या ठिकाणी मोठे कठीण व्रण होत त्या कुष्ठाला ‘‘स्थूलारूक्ष ’’ कुष्ठ म्हणतात . हे कष्टसाध्य आहे . त्वचा संकुचित होणे , त्वचेला भेगा पाडणे त्वचेला स्पर्श न कळणे , अंगगलित होणे ही लक्षणे ‘‘महाकुष्ठ ’’ नावाच्या क्षुद्र कुष्ठांत होतात .

ज्या कुष्ठाच्या योगाने सर्व शरीर काळसर तांबूस होते , त्याला एककुष्ठ असे म्हणतात .

ज्या कुष्ठाच्या रोगाने तळहात व तळपाय ह्या ठिकाणी कडु होतो , आग होते व ओढ लागते त्या कुष्ठाला ‘‘चर्मदल ’’ कुष्ठ म्हणतात .

जे कुष्ठ विसर्पाप्रमाणे सर्वत्र पसरते आणि त्वचा रक्त व मांस ह्यांना त्वरित दूषित करिते . ह्याच्या योगाने मूर्च्छा , दाह , अस्वस्थपणा , टोचल्याप्रमाणे पीडा व बारीक फोड ही लक्षणे होतात . ह्याला ‘‘विसर्प ’’ (इसब ) असे म्हणतात . सदोदित स्रवणार्‍या अशा पुटकुळ्य़ा अंगावर उठतात . व त्या हळू हळू पसरतात त्या कुष्ठाला ‘‘परिसर्प ’’ असे म्हणतात . कंडुयुक्त व श्वेतवर्ण असे कुष्ठ प्रायः शरीराच्या कमरेपासून वरच्या भागात होते हे निरुपद्रवी असते . ह्याला सिध्मकुष्ठ असे म्हणतात . ह्या कुष्ठात अतिशय कंडु असून रूक्ष रेषा उत्पन्न होतात . ह्यांत ठणकाही असतो . हे हाताला झाले असता त्याला ‘‘विचर्चिका ’’ म्हणतात . आणि कंडू दाह व ठणका ह्यांनी युक्त , पायाच्या ठिकाणी झाले असता त्याला ‘‘विपादिका ’’ म्हणतात . ज्या कुष्ठात स्राव होतो . व मंडळे वाटोळी असून ती कठीण असतात व त्याला अतिशय कंडू असतो , त्याला ‘‘किटिभ ’’ कुष्ठ (नायटे ) असे म्हणतात .

स्राव , कंडु व दाह ह्या लक्षणांनी युक्त जे बारीक फोड अंगावर उठतात . त्यांना ‘‘पामा ’’ (खरूज ) असे म्हणतात . हीच पामा ढुंगण , हात , पाय ह्या ठिकाणी पुष्कळ फोडांनी युक्त व दाहयुक्त झाली असता तिला ‘‘कच्छु ’’ असे म्हणतात . स्रावरहित व कंडुयुक्त अशा पुटकुळ्या सर्व शरीरावर होतात त्या कुष्ठाला ‘‘रकसा ’’ (कोरडी खरूज ) असे म्हणतात .

अरुक्ष , सिध्म , रकसा , महाकुष्ठ व एककुष्ठ ही कफजन्य आहेत . एक परिसर्णकुष्ठ मात्र वातजन्य आहे , आणि बाकीची विसर्प , किटिभादि कुष्ठे पित्तजन्य आहेत॥८ -१५॥

‘‘ किलास ’’ हे कुष्ठांतीलच एक प्रकार आहे . ते वातज , पित्तज , व कफज असे तीन प्रकारचे आहे . कुष्ठ व किलास ह्यामध्ये अंतर असे आहे की किलास हे केवळ त्वचेचा आश्रय करून असते आणि त्याला स्राव नसतो . हे कुष्ठ त्वचा , रक्त व मांस ह्यांच्या आश्रयाने असते . हे दोहोत अंतर आहे .

वातजन्य किलासाची मंडळे एकमेकांना चिकटलेली असतात ते , तसेच जे ओठ , हात , पाय व गुह्यभाग ह्या ठिकाणी असते ते व ज्याच्यावरील केस रक्तवर्ण झाले आहेत ते असाध्य समजावे . ह्या शिवाय जे किलास अग्नीने त्वचा भाजल्यामुळे झाले आहे तेही असाध्य समजावे .

कुष्ठात त्वचा आकसणे , तिला स्पर्श न कळणे , घाम येणे , सूज , त्वचेला भेगा पडणे , कौण्य (नाहीसे होणे ) व स्वर बसणे ही लक्षणे वातदोषाने होतात .

पिकणे , फाटणे , बोटे गळणे कान व नाक झडणे , डोळे लाल होणे व जंतू उत्पन्न होणे ही लक्षणे पित्तदोषाने होतात .

कंडु , त्वचेचा रंग बदलणे , सूज स्राव होणे व जडत्व ही लक्षणे कफदोषाने होतात .

त्यापैकी जे आदिबलप्रवृत्त म्हणजे आईबापांच्या आर्तव व शुक्रदोषामुळे झाले आहे ते पुंडरीककुष्ठ व काकणककुष्ठ ही दोन्ही असाध्य आहेत॥१६ -१८॥

वृक्षाला जसजशी अधिक वर्षे होतात तसतशी त्याची मुळे पावसाच्या पाण्याने वाढून जमिनीत फार खोलवर जातात , त्याप्रमाणे त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न झालेले कुष्ठ त्याचा प्रतिकार केला नाहीतर ते क्रमाक्रमाने रसरक्तादि सर्व धातूंना व्यापून टाकिते .

कुष्ठ त्वचेचा आश्रय करून आहे तोपर्यंत स्पर्श न कळणे , घाम येणे , किंचित कंडु , त्वचेचा रंग बदलणे व त्वचा रूक्ष होणे हे विकार होतात . ते रक्ताश्रित झाले असता त्वचेला स्पर्श न कळणे , रोमांच उभे राहणे , घाम अधिक येणे , कंडु व दुर्गंधी ही लक्षणे होतात . ते मांसाश्रित झाले असता मंडळे मोठी होणे , तोंडाला कोरड , ते कर्कश्य (उग्र ) दिसणे , त्यामध्ये बारीक फोड येणे , टोचणी , त्वचा फुटणे व मंडळांना कठीणपणा असणे ही लक्षणे होतात . ते मेदाश्रित झाले असता दुर्गंधी , त्याजवर मळ (लस ) फार येणे , पू वाहणे , जंतू आणि अंग फुटल्यासारखी वेदना होणे ही लक्षणे होतात . ते हाडे व मज्जाश्रित झाले असता नाक झडणे , डोळे लाल होणे , व्रणामध्ये कृमी उत्पन्न होणे आणि आवाज बसणे ही लक्षणे होतात . ते शुक्रधातुगुण झाले असता कौण्य (शुक्राचा नाश ) अवयवांची हालचाल बंद होणे , अंग फुटणे , व्रण चरत जाणे व वर सांगितलेली सर्व लक्षणेही होतात .

स्त्री व पुरुष ह्यांच्या कुष्ठाच्या दोषामुळे दूषित अशा शुक्रार्तवापासून जर संतती झाली तर ती देखील कुष्ठी होते ॥१९ -२७॥

त्वचा रक्त व मांस ह्या धातूंच्या आश्रयाने असणारे कुष्ठरोगी मनोनिग्रही असल्यास ते उपचाराने साध्य होते . मेदोगत असल्यास ते याप्य (औषध आहे तोपर्यंत बरे असणारे ) असते आणि ह्यापुढील अस्थि वगैरे धातुगत असलेले

कुष्ठ असाध्य समजावे .

ब्राह्मण स्त्री व सज्जन मनुष्य यांचा वध करणे व दुसर्‍यांचे द्रव्य चोरणे अशा प्रकारच्या पापकर्मापासून कुष्ठाची पीडा होते .

कुष्ठरोगाने जर एखादा रोगी मेला व त्याचे भोगतृत्व संपले नसेल तर ते त्याला पुढील जन्मातही पीडा करण्यास सोडीत नाही ; म्हणून हा कुष्ठरोग जितका कष्टदायक आहे तितका दुसरा कोणताही नाही .

कुष्ठाच्या परिहारार्थ जो जो आहार व आचार सांगितला आहे त्याप्रमाणे अतिशय कडक रीतीने वागून जो औषधोपचार व तपश्चर्या (ईश्वराची निस्सीम सेवा ) करितो त्याच्या त्या आचरणाने जर त्याचा कुष्ठरोग बरा झाला तर तो पुण्यकारक गतीला जातो .

नित्य एके ठिकाणी वागण्याच्या संबंधाने , अंगाला नित्य स्पर्श केल्याने , एकत्र बसून जेवण केल्याने , एका आसनावर व शय्येवर बसल्याने अगर निजण्याने , त्या मनुष्याची वस्त्रे पांघरणे , त्याने वास घेतलेली फुले वासास घेणे व त्याने लावलेल्या गंधादिकाचे लेपन करणे वगैरे सांसर्गिक गोष्टींनी कुष्ट , ज्वर , शोष , नेत्राभिष्यंद

( डोळ्य़ाचा रोग ) आणि देवी वगैरे रोग एकाच्या संसर्गाने दुसर्‍यास होतात . ( प्रवासानंतर असा अनुभव येतो ॥२८ - ३३॥


References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP